Site icon MH General Resource

अफांसो द अल्बुकर्क (Afanso de Albuquerque)

अल्बुकर्क, अफांसो द (?-१४५३—१५ डिसेंबर १५१५). भारतातील पोर्तुगीज अंमलाखालील प्रदेशाचा दुसरा गव्हर्नर. पूर्वेकडे साम्राज्य स्थापण्याच्या आकांक्षेने १५०९ मध्ये हा भारतात आला.

गव्हर्नर म्हणून येण्यापूर्वी त्याने १५०३ साली एकदा भारतास भेट दिली होती. पुढे तो अल्मेईदा ह्या पहिल्या व्हाइसरॉयनंतर गव्हर्नर जनरल म्हणून आला.प्रथम त्याने तिम्म ह्या विजयानगरच्या सेनापतीच्या मदतीने गोवा काबीज केला. त्यानंतर त्याने पूर्वेकडील व्यापाराची मलका, ओर्मुझ व एडन ही ठाणी हस्तगत करून दीव जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्‍न केला. भारतात पोर्तुगीज वसाहत स्थापन करण्याचे सर्व श्रेय ह्यासच द्यावे लागेल. तसेच ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कार्यास त्याच्याच कारकिर्दीत प्रारंभ झाला. त्याने गोमंतकात कॅथलिक चर्चची स्थापना केली; तसेच भारतीय स्त्रिया व पोर्तुगीज पुरुष ह्यांत विवाह घडवून आणून अशा विवाहित पुरुषांस अधिकाराच्या जागा दिल्या. त्याने सरकारी रुग्णालय बांधले. त्याने आपले वकील जावा, सुमात्रा, सयाम इ. देशांत धाडून त्यांच्याबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापिले. त्याने हिंदी राज्यकर्त्यांशी सलोख्याचे धोरण ठेवले होते. मुसलमानी अंमलातील धार्मिक जुलूम आणि क्रौर्य ह्यांच्या तुलनेने त्याचे धोरण हिंदूंना सह्य वाटले. त्यामुळे त्यांच्या मनात अल्बुकर्कविषयी आदरभाव निर्माण झाला. पोर्तुगीज बादशाहाने १५१५ साली त्याच्या अदूरदर्शी व अरेरावी वर्तनामुळे त्यास परत बोलविले. ह्यामुळे त्यास धक्का बसून तो प्रवासातच मरण पावला.

संदर्भ :

Exit mobile version