Site icon MH General Resource

अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृह योजना

राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या योजना, उपक्रम राबविले जातात. या योजनेचा फायदा विद्यार्थी, महिला याबरोबरच सर्वसामान्य जनता यांना होत असतो. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समुहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही योजना राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृह योजनेविषयीची माहिती जाणून घेऊया…

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींनी पुढे यावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाने अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृह योजना राबविली आहे.

योजनेचा लक्ष्यगट

राज्यातील अल्पसंख्याक समाजातील (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी व जैन) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी.

योजनेचे उद्दिष्ट

अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृहाची सोय उपलब्ध करुन मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवणे.

योजना

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनींसाठी वसतीगृहे बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यापैकी केंद्र शासनाने राज्यातील ज्या 25 जिल्ह्यांमधील 43 शहरे “अल्पसंख्याक बहुल क्षेत्रे” घोषित केली आहेत, अशा 25 जिल्ह्यांमध्ये प्राथम्याने वसतीगृह उभारण्यात येतील. वसतीगृहांसाठी शासकीय जमीन किंवा विद्यापीठांकडून जमीन उपलब्ध करून घेण्यात येऊन वसतीगृहाचे बांधकाम सिडको/ सार्वजनिक बांधकाम विभाग/ म्हाडामार्फत करण्यात येईल. सदर वसतीगृहे अल्पसंख्याक विकास विभागामार्फत नेमून दिलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था /तंत्रनिकेतन/ विद्यापीठ/ शासकीय महाविद्यालये यांच्याकडून व्यवस्थापन करण्यात येईल.

योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा

संबंधित जिल्हाधिकारी, व्यवस्थापनाकरिता नेमून दिलेली शाळा संस्था/विद्यापीठ/महाविद्यालय व अल्पसंख्याक विकास विभाग.

Exit mobile version