Site icon MH General Resource

कृषी क्षेत्रातील करिअर

भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे. देशाच्या विकासात या क्षेत्राचा वाटा मोठा आहे. दिवसेंदिवस शेती या क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होतो आहे. कृषी ही व्यापक संज्ञा असून त्याचा अनेक विभागात शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला जातो. वाढती अन्नाची मागणी पाहता या क्षेत्रावरील बोजा वाढत आहे. देशातील जवळजवळ सत्तर टक्के लोकसंख्या शेतीवर आधारित आहे. नव्या पद्धतीने शेतीचा विकास आणि संशोधन होण्यासाठी देशातील अनेक कृषी विद्यापीठे कार्यरत असतात.

कृषी विज्ञान यासारख्या नव्या संकल्पना उदयास येत असताना त्यामध्ये रोजगाराच्या अनेक संधी आता उपलब्ध होत आहेत. शेती हा व्यवसाय म्हणून उत्तम पद्धतीने केल्यास त्यामध्ये करिअर करता येते. कृषी उद्योगासाठी प्रशिक्षित तरुणांची गरज आता मोठ्या प्रमाणात भासत आहे. देशात ५३ कृषी विद्यापीठे, पाच अभिमत विद्यापीठे, एक केंद्रीय कृषी विद्यापीठ आणि चार केंद्रीय विद्यापीठे कार्यरत आहेत. या सर्व संस्थामधून उत्तम दर्जाचे विद्यार्थी शिक्षण घेउन बाहेर पडत आहेत. परदेशातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन, संशोधन आदी शाखांमध्ये कार्य होत आहे. इतर शाखांप्रमाणे याही क्षेत्रात करिअर करता येवू शकते यासाठी हा खास लेख…

पात्रता

क्षेत्रात पदवी संपादन करण्यासाठी शास्त्र शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कृषी शिक्षण हे दोन स्तरावर दिले जाते. 

  1. कृषी उच्च शिक्षण यात पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवीपर्यंत शिक्षण महाविद्यालयातून दिले जाते.
  2. कृषी निम्नशिक्षण पदविका ही कृषी विद्यालयातून दिले जाते. राज्यातील कृषी विषयातील उपलब्ध अभ्यासक्रम कृषी, उद्यानविद्या, कृषि अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, गृह विज्ञान, मत्स्य विज्ञान, वनिकी, पशुसंवर्धन हे होत.

करिअरच्या संधी

कृषी पदवीधारकांना कृषी विद्यापीठांतर्गत पदवी-पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये व्याख्याता, कृषी तंत्रनिकेतन, कृषी तंत्र विद्यालयांमध्ये शिक्षक हे पद मिळू शकते. शेती विषयात माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये, कृषीविषयक किमान कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यात येत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक होता येईल. कृषी विद्यापीठांतर्गत कृषी संशोधन केंद्रामध्ये शास्त्रज्ञ या पदावर तसेच कृषी विस्तार कार्य करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. कृषी पदवीधर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या विविध राष्ट्रीय संशोधन केंद्रांवर शास्त्रज्ञ म्हणून काम करू शकतात. राज्य सरकारच्या कृषी विभागामध्ये विविध पदांवर काम करण्याची संधीही उपलब्ध आहे. याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यामध्येही विविध पदांवर कृषी अधिकारी, ग्रामसेवक या पदांवर काम करण्याच्या संधी या पदवीधारकांना उपलब्ध आहेत. कृषी पदवीधरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याच्यासुद्धा संधी करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय बँका, आशियाई विकास बँक, आंतरराष्ट्रीय वित्त, कॉर्पोरेशन, बहुराष्ट्रीय कंपन्या व कृषी आयात-निर्यातीमध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत.कृषी पदवीधर विविध उद्योग स्थापन करू शकतात.

प्रशिक्षण संस्था

कृषि विद्यापीठे

  1. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहमदनगर ४१३७२२
  2. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी नगर, अकोला ४४४१०४
  3. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, बासमत रोड, कृषीनगर, परभणी  ४३१४०२
  4. डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी ४१५७१२

अधिक माहितीसाठी सदर लिंकवर जावे


http://www.mcaer.org/
http://www.mcaer.org/images/macer/downloads/college-list-16-17.pdf

अधिक माहितीसाठी संपर्क

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, १३२ / ब, भांबुर्डा, भोसले नगर, पुणे – ४११००७
फोन: ०२०-२५५३१२०८.

मित्रहो शेती हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकरी, सैनिक यांच्याविषयी आपल्यात आदराची भावना दिसून येते. हे दोन्हीही घटक देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावत असतात. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करावयाचा असेल तर जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळ या क्षेत्रात निर्माण होणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती उत्पादनात आपण अग्रेसर राहिल्यास राष्ट्राच्या अनेक समस्या सुटण्यास मदत होईल. हे क्षेत्र मातीशी इमान ठेवणारे आणि वेगळा आनंद देणारे आहे. अनेक कवी आणि लेखकांनी कृषी क्षेत्राला आपल्या साहित्यातून, कलाकृतीतून मांडले आहे. वेळोवेळी अनेक संशोधकांनी देशात हरित क्रांती निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा केली आहे. चला तर मग शेतीत करिअर करूया आणि देश घडवूया..

Exit mobile version