Site icon MH General Resource

गांधीजी विधायक कार्यकर्ते कसे निर्माण करीत?

  1. ‘गोपुरी शौचघरे’ निर्माण करणारे अप्पा पटवर्धन
  2. ग्रामोद्योग अर्थशास्त्रज्ञ जगदीश कुमारअप्पा
  3. निरा आणि ताडगूळ निर्मितीस प्रोत्साहन देणारे गजानन नाईक
  4. शिंदी वृक्ष लागवडीचा महाराष्ट्रात प्रसार करणारे भालचंद्र पाटील
  5. तोताराम – कडूनिंबाची लागवड हेच जीवित कार्य

देशाच्या आर्थिक र्‍हासाला ग्रामोद्योगाद्वारे आळा घालणे, लोकांचा वेळ सत्कारणी लागावा यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, तसेच प्रत्येक कामाला व श्रमाला प्रतिष्ठा मिळावी आणि आरोग्यपूर्ण वातावरण व सकस अन्न सर्वांना मिळावे, यासाठी महात्मा गांधींनी जणू मोहीमच सुरू केली होती. याकरिता त्यांनी अनेक कार्यकर्ते तयार केले होते. जाणून घेऊया अशाच काही मोजक्या कार्यकर्त्यांविषयी आणि त्यांच्या योगदानाविषयी…

‘गोपुरी शौचघरे’ निर्माण करणारे अप्पा पटवर्धन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली गावातील अप्पा पटवर्धन नावाचे एक युवक ‘तत्त्वज्ञान’ हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून पहिल्या वर्गात एम. ए. उत्तीर्ण झाले. ते गांधीजींना भेटण्यासाठी साबरमती आश्रमात गेले व त्यांना म्हणाले की, “मला समाजसेवा करावयाची आहे. आपण मार्गदर्शन करा!” गांधीजी त्यांना म्हणाले की, “देशात आज मानवी मैला उचलून तो वाहून नेण्याचे काम समाजातील एक विशिष्ट वर्ग करीत आहे. हे फार अन्यायकारक आहे. ही प्रथा बंद झाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही काम करा.” गांधीजींची ही आज्ञा शिरसावंद्य मानून अप्पा पटवर्धन सरळ कणकवली येथे परत आले. त्यांनी एक कावड तयार केली. ही कावड खांद्यावर ठेवून ते कणकवली गावात जात असत व तेथील मैला भरून ती कावड खांद्यावर ठेवून आपल्या गोपुरी आश्रमात परत येत असत. त्यावेळी कणकवली येथे टोपल्यांची शौचघरे होती. तो मैला चरात टाकून त्यापासून ते खत बनवीत असत. ते खत भातशेती, भाजीपाला पिके व फळझाडांना दिले जात असे.

अप्पासाहेबांनी मैला वाहून नेण्याचे हे काम अनेक वर्षे केले. पुढे त्यांनी शास्त्रीय पद्धतीने मैलापासून खत बनविण्याची शौचघरे तयार केली व त्यांना ‘गोपुरी शौचघरे’ असे नाव दिले. कणकवलीच्या नागरिकांनी अशी शौचघरे तयार करून त्याचा वापर केला आणि मैला वाहण्याची प्रथा बंद झाली.

ग्रामोद्योग अर्थशास्त्रज्ञ जगदीश कुमारअप्पा

तामिळनाडू राज्यातील जगदीश कुमारअप्पा नावाचे युवक अमेरिकेत राहत होते. त्यांनी ‘चार्टर्ड अकौंटंट’ ही सनद प्राप्त केली होती. ते या क्षेत्रात व्यवसाय करीत होते व त्यांची प्राप्ती चांगली होती. त्यांच्या डोक्यात एक दिवस विचार आला की, अमेरिकेत आपण फक्त पैसा मिळवित आहोत. येथे समाजसेवेला काही वाव नाही. समाजसेवेला वाहून घेता यावे, म्हणून ते आपला व्यवसाय सोडून भारतात परत आले. भारतात आल्यावर पहिल्यांदा ते गांधीजींना भेटण्यास सेवाग्रामला गेले. गांधीजींना त्यांनी आपली पार्श्‍वभूमी सांगितली व म्हणाले की, मला समाजसेवा करावयाची आहे. आपण मार्गदर्शन करा! गांधीजी म्हणाले की, आपला देश कृषिप्रधान आहे. त्यात ग्रामोद्योगांना मोठे महत्त्व आहे. आपण अर्थशास्त्राचा अभ्यास केला आहे. म्हणून ग्रामोद्योगाच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करा. त्यासाठी वर्ध्याला जा व मगनवाडीत जी तेलघाणी आहे, ती प्रत्यक्ष चालवून त्याचा अभ्यास करा. गांधीजींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कुमारअप्पा वर्ध्याला गेले. घाणी कशी चालवावयाची, हे त्यांनी कारागिराकडून शिकून घेतले. ते स्वत: घाणीत तेलबिया टाकीत व दिवसभर बैल हाकीत असत. बैल हाकत असताना ते तेलघाणीच्या अर्थशास्त्राचा विचार करीत असत. त्यांना असे दिसून आले की, गावात तेलघाणी असल्यास लोकांना ताजे खाद्यतेल मिळते. जी पेंड राहते, तिचा पशुखाद्य म्हणून उपयोग होतो. गावातील दूध-दुभते वाढते. बालकांना सकस आहार प्राप्त होतो. कामाच्या बैलांना पेंड मिळते व ते मशागत चांगली करतात. त्यातून शेतीची उत्पादकता वाढते व शेतकर्‍यांना उत्पन्न सुरक्षा प्राप्त होते. या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित कुमारअप्पांनी ‘तेलघाणी अर्थशास्त्र’ लिहिले. गांधीजींमुळेच हे शक्य झाले असल्याचे कुमारअप्पा नेहमी सांगत असत. पुढे कुमारअप्पांनी देशातील सर्व ग्रामोद्योगांचा अभ्यास केला. प्रत्येक ग्रामोद्योग स्वत: करून त्यापासून ते अनुभव मिळवित असत व त्यावर आधारित अर्थशास्त्र लिहीत असत. ते म्हणत असत की, ग्रामोद्योग असले पाहिजेत. त्याद्वारे गावातील भूमिहीन कारागिरांना उत्पादक रोजगार मिळेल, तसेच शेतकर्‍यांनी प्रक्रिया केलेले ताजे अन्न व इतर पदार्थ मिळतील. ग्रामस्वराज्य निर्माण करण्यात ग्रामोद्योगांचे स्थान फार मोठे आहे, किंबहुना भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करावयाची असेल, तर ग्रामोद्योगांचा विकास केला पाहिजे.

निरा आणि ताडगूळ निर्मितीस प्रोत्साहन देणारे गजानन नाईक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गजानन नाईक नावाचे एक युवक गांधीजींना भेटण्यासाठी सेवाग्राम येथे गेले. ते गांधीजींना म्हणाले की, मला समाजसेवा करावयाची आहे, आपण जी आज्ञा द्याल, तिचे मी पालन करीन. गांधीजी म्हणाले की, आपल्या सेवाग्रामच्या परिसरात शिंदीची खूप झाडे आहेत. त्यापासून निरा काढा व ताडगूळ बनवा.

गजानन नाईक लगेच वर्ध्याला गेले व त्यांनी शिंदीपासून निरा काढण्याचे व ताडगूळ बनविण्याचे कौशल्य शिकून घेतले. ते सेवाग्रामला परत आले. इथल्या शिंदीच्या झाडावर ते स्वत: चढत असत. त्यांचा शेंडा छेदून निरा काढीत व ताडगूळ बनवित असत. यातून त्यांना मोठा अनुभव मिळाला.

शिंदीच्या झाडाविषयी बोलताना ते म्हणत असत की, शिंदी हे अत्यंत काटक असे झाड आहे. ते पडीक जमिनीवर येऊ शकते व वर्षाला 200 ते 250 लिटर निरा देऊ शकते. निरा हे अत्यंत सकस पेय आहे. जी निरा शिल्लक राहते, त्यापासून ताडगूळ बनविता येतो व त्याचा आहारात उपयोग करता येतो. त्याचबरोबर शिंदीच्या वाळलेल्या पानांपासून चटया व झाडू बनविता येतात, त्यामुळे शिंदीचे झाड हे बहुउपयोगी आहे. हे सर्व मी प्रत्यक्ष कामातून शिकलो असून, त्या कामाची प्रेरणा मला गांधीजींकडून प्राप्त झाली आहे. गांधीजी त्यांना म्हणाले की, या तुमच्या अनुभवाचा देशात उपयोग करा.

गजानन नाईक प्रथम तामिळनाडूत गेले. तेथे कडल्लोर येथे त्यांनी निरा – ताडगूळ प्रशिक्षण केंद्र सुरू केले व त्याचा प्रसार केला. महाराष्ट्रात बोर्डी येथे आचार्य भिसे हे गांधीजींच्या मुलोद्योग शिक्षणाचे कार्य करतात, असे त्यांना समजले. त्यामुळे 1938 साली ते बोर्डीस आले व त्यांनी ‘निरा-ताडगूळ प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले.

शिंदी वृक्ष लागवडीचा महाराष्ट्रात प्रसार करणारे भालचंद्र पाटील

आचार्य भिसे यांनी 1948 साली ओसबाड येथे ‘कृषी शिक्षण संस्था’ स्थापन केली. या संस्थेत शिंदीची झाडे होती. गजानन नाईक तेथे आले व त्यांनी ‘निरा-ताडगूळ ग्रामोद्योग प्रशिक्षण’ केंद्र सुरू केले. ते आम्हास म्हणाले की, शिंदीची उत्पादकता वाढविण्याचे प्रयोग करा. संस्थेतील कृषी शास्त्रज्ञ श्री. भालचंद्र हरी पाटील यांनी या संशोधनाला वाहून घेतले आणि सेंद्रिय खताद्वारे शिंदीची निरा देण्याची उत्पादकता वाढते, हे त्यांनी दाखवून दिले.

भालचंद्र पाटील हे गजानन नाईक यांच्याकडून मार्गदर्शन घेत असत. सतत त्यांच्या संपर्कात असत, त्यामुळे त्यांनाही असा विचार आला की, आपण शिंदीचा प्रसार महाराष्ट्रातील जिरायती जमिनीत केला पाहिजे, म्हणून ते प्रथम सोलापूर जिल्ह्यात गेले व तेथे त्यांनी शेतकर्‍यांची शिबिरे घेऊन शिंदी लागवड करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी उत्तम प्रतिसाद दिला व अनेकांनी शिंदीची लागवड केली. माळीनगर येथील नीलकांत ओगले (भ्र. 9423528686) यांनी तर 3 हजार 500 शिंदीची झाडे लावली. त्यांच्या या झाडांपासून निरा उत्पादन सुरू असून, ते आधुनिक पद्धतीने त्याची विक्री करीत आहेत. ते कल्पतरू निरा उत्पादक सोसायटीचे अध्यक्ष आहेत. गजानन नाईक यांचे स्वप्न होते की, महाराष्ट्रातील जिरायती जमिनीत शिंदीसारखे काटक झाड रुजवावे, ते आता प्रत्यक्षात पूर्णत्वास येत आहे.

तोताराम – कडूनिंबाची लागवड हेच जीवित कार्य

फिजी देशातून तोताराम नावाचा एक युवक साबरमती आश्रमात आला. त्यांनी गांधीजींना सांगितले की, मला आपणासोबत आश्रमात राहावयाचे आहे. आपण मला राहण्याची संमती द्या. त्या युवकाची ती इच्छा गांधीजींनी मान्य केली. आश्रमात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीला शारीरिक श्रम करावे लागत असत. तोतारामने गांधीजींना विचारले की, मी कोणते काम करू?

गांधीजी म्हणाले, “आपल्या आश्रमाचा परिसर उजाड असल्याने तू तेथे कडूनिंबाची लागवड कर.”

आश्रमापासून दूर अंतरावर कडूनिंबाची झाडे होती. त्या झाडाखाली कडूनिंबाची रोपे उगवलेली होती. तोताराम तेथे जात असे. कडूनिंबाची रोपे काळजीपूर्वक उपटून ती आश्रमात आणत असे आणि आश्रमाच्या परिसरात त्यांची लागवड करीत असे. रोपांना पाणी देता यावे म्हणून तोतारामने एक कावड बनविली होती. त्या कावडीने तोताराम साबरमती नदीच्या पात्रातील पाणी आणून आश्रमातील कडूनिंबाच्या रोपांना घालत असे. आश्रमाचा सारा परिसर तसेच आश्रमापासून ते साबरमती कारागृहापर्यंतचा 3 किलोमीटर लांबीचा रस्ता व त्याच्या दुतर्फा त्याने कडूनिंबाची शेकडो रोपे लावली. आज या रोपापासून कडूनिंबाचे प्रचंड वृक्ष तयार झाले असून, सारा परिसर हिरवागार झाला आहे. कडूनिंबाच्या निंबोण्या खाण्यास जे पक्षी येतात. त्यांच्या गुंजनाने वातावरणात मोठा आंनद निर्माण होतो.

कडूनिंबाची लागवड हेच आपले जीवित कार्य आहे, असे तोतारामने मानल्यामुळेच हे घडून आले. गांधीजींनी भारतात असे कित्येक विधायक कार्यकर्ते निर्माण केले आहेत.

Exit mobile version