Site icon MH General Resource

छेडछाड आणि त्यापलीकडील त्रास

रस्ते, बस स्थानके, रेल्वे स्थानके, उद्याने आणि अन्य सर्व सार्वजनिक स्थळे सर्वांसाठी खुली आहेत. त्यांचा आनंद सर्वजण घेऊ शकतात. मात्र, अनेक स्त्रियांसाठी ही छळाची ठिकाणे ठरतात. स्त्रियांच्या संचाराच्या तसेच व्यक्ती म्हणून प्रतिष्ठेच्या मूलभूत हक्कावर दररोज गदा आणली जात आहे. 

समस्या:

सीमा रस्त्यावरून चालत असते, तेव्हा एक पुरुषांचा समूह तिच्या चेहऱ्यावर व बांध्यावर टिप्पणी करतो.  ‘वा! काय फिगर आहे!’ ‘बत्तीस असेल की छत्तीस?’ सीमा या आगाऊ टिप्पणीकडे दुर्लक्ष करून चालत राहते. टिपण्या अधिक अश्लाघ्य होत जातात. ते तिला ‘बिच’ म्हणतात. 

सुधा बससाठी रांगेत उभी आहे. अचानक तिला तिच्या छातीवर हात पडल्यासारखा वाटतो. ती आजूबाजूला बघते पण हे नेमके कोणी केले ते तिला ते कळत नाही. तिला आपल्या खासगी मर्यादेत अतिक्रमण झाल्यासारखे वाटते पण काही बोलण्याची हिंमत तिला होत नाही. 

एक माणूस ऑफिस ते घर या मार्गात आपला पाठलाग करत आहे हे कविताच्या लक्षात येते. तो बऱ्यापैकी अंतरावर असतो आणि अनेक दिवस शांत राहतो. मात्र, एक दिवस तो जवळ येऊन तिला हाक मारतो. ती खूप घाबरते आणि त्याला टाळण्यासाठी तिचा मार्ग तसेच जाण्यायेण्याची वेळ बदलून टाकते. सार्वजनिक स्थळी लैंगिक त्रास दिला जाणे चालवून घेण्याजोगे नाही. टक लावून बघणे, घाणेरडे हावभाव करणे, स्पर्श करणे, कमेंट्स करणे, पाठलाग करणे या सगळ्याचा समावेश  लैंगिकदृष्ट्या अश्लाघ्य वर्तनामध्ये होतो. ही मोठी समस्या नाही असे वाटू शकते पण या बाबी अस्वस्थ करून टाकू शकतात. यामुळे स्त्रियांना शरमल्यासारखे वाटते, अपमानित वाटते, भीती वाटते. 

सार्वजनिक स्थळी होणाऱ्या लैंगिक छळाशी निगडित गैरसमज:

विशिष्ट कपडे घातल्यामुळे लैंगिक छळाला आमंत्रण मिळते

हा गैरसमज आहे. कोणत्याही वयोगटातील व कोणत्याही प्रकारचे कपडे घातलेल्या स्त्रियांचा छळ होऊ शकते हे जगभरातील अनेकविध अभ्यासांतून पुढे आले आहे. एनआयपीपीसीआयडीने दिल्ली पोलिसांसाठी केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या स्त्रियांपैकी ८२ टक्के स्त्रिया अगदी सामान्य, प्रक्षोभक नसलेले कपडे (सलवार-कमीज, ट्राउजर-टॉप, साडी) परिधान करत होत्या, तरीही त्यांना लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता.

विशिष्ट वर्गातील लोकच लैंगिक छळात सहभागी असतात

हीदेखील सामान्य धारणा आहे. मात्र, येथे मुद्दा वर्गाचा नाही, तर मानसिकतेचा आहे. स्त्रियांना त्रास देणे सोपे आहे असे वाटणारे लोक स्त्रियांचा लैंगिक छळ करण्यात सहभागी असतात. 

लैंगिक छळाची समस्या कशी हाताळावी?

लैंगिक छळाची समस्या हाताळण्यासाठी एक असा उपाय नाही. प्रत्यक्ष घटनास्थळी आजूबाजूचे संदर्भ विचारात घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. 

स्पष्टपणे व मोठ्या आवाजात ‘नाही’ म्हणायला शिका. एखादे वाक्य मनात योजून ठेवा (उदाहरणार्थ, ‘माझ्याकडे टक लावून बघू नका’) आणि ते प्रतिक्षिप्त क्रियेसारखे उमटत नाही, तोवर ते म्हणण्याचा सराव करा. जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी हे वाक्य सुनावण्याचा आत्मविश्वास येईपर्यंत सराव करत राहा. 

आत्मविश्वासाने संवाद साधणे शिका. तुम्हाला त्रास देणाऱ्यांकडे सरळ बघा आणि त्यांच्या वर्तनाला स्पष्टपणे व शांतपणे उत्तर द्या. तुम्हाला तुमच्या हक्कांची व खासगीत्वाच्या अधिकाराची जाणीव आहे हे समोरच्याला दाखवून द्या. 

तुम्ही बसमधून प्रवास करत असाल, तर अशा वर्तनाची तक्रार वाहक किंवा चालकाकडे करू शकता. कायद्यानुसार तक्रार करणाऱ्या स्त्रीबरोबर जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तिला मदत करू शकता. 

जवळ सेफ्टीपिन्स बाळगणे तसेच स्वयंसंरक्षणाची तंत्रे अंगिकारणे उपयुक्त ठरू शकते. 

तुम्हाला कोणी सातत्याने त्रास देत असेल, तर याची माहिती तुमच्या पालकांना/मित्रमंडळींना दिली पाहिजे. यातून या त्रासावर उपायही निघू शकतो आणि तुम्हाला पाठिंबाही मिळू शकतो. अनेक स्त्रिया या त्रासातून गेलेल्या असतात आणि तुम्हाला काय अनुभव येत आहे हे त्या समजून घेऊ शकतात. 

छळ थांबवण्यासाठी पुरुष काय करू शकतात? 

तुम्ही स्वत: कोणालाही असा त्रास देऊ नका. या समस्येबद्दल जाणून घ्या, जेणेकरून, तुम्ही याबद्दल संवेदनशील व्हाल आणि या त्रासाला तोंड देणाऱ्यांच्या समस्या समजून घेऊ शकाल. 

– स्त्रियांना लैंगिक त्रास देणाऱ्यांना मदत करू नका. लैंगिक छळाला विरोध करा. छळाला प्रोत्साहन देऊ नका. त्यात सहभागी होऊ नका.

– अनुकूल प्रसंग असेल तेव्हा लैंगिक छळाचा मुद्दा उपस्थित करा.

– तुमची मते कणखरपणे मांडा.

– एखाद्या स्त्रीचा छळ केला जात आहे अशी परिस्थिती लक्षात आली, तर तुम्ही तिला मदत करू शकता. कोणी एखाद्या स्त्रीला त्रास देत असेल, तर ‘तुम्हाला कोण त्रास देत आहे?’ असा प्रश्न तिला विचारा. जर गर्दीत एखाद्या स्त्रीने छळाची तक्रार केली, तर ‘हे कोण करत आहे, असे अजिबात खपवून घेण्याजोगे नाही’ असे गर्दीला उद्देशून जोरात ओरडा.

Exit mobile version