Site icon MH General Resource

जिम्मेदारी

(वॉरंटी). हमी (गॅरंटी), आश्वासन (अ‍ॅशुअरन्स), प्रसंविदा (कॉव्हीनंट), अशा निरनिराळ्या अर्थांनी निरनिराळ्या प्रकारच्या संविदांमधून या संज्ञेचा वापर होतो. विक्रीव्यवहारात विकत दिलेल्या मालाच्या निर्दोषत्वाबद्दल दिलेल्या हमीस जिम्मेदारी किंवा समाश्वासन म्हणतात; मग ते दोष विक्रेत्यास माहीत असावयासच पाहिजेत असे नाही. विक्रीकराराच्या प्रमुख उद्देशांशी जिम्मेदारी संलग्न असते. ती व्यक्त किंवा गर्भित अशी दोन प्रकारची असू शकते. प्रत्येक विक्रीच्या व्यवहारामध्ये ज्या काही बाबी फार महत्त्वाच्या असतात, त्याना शर्ती म्हणतात. त्यांचा भंग झाल्यास कराराचा भंग झाला, असे मानले जाते. काही बाबी गौण स्वरूपाच्या असतात. त्यांचा भंग झाल्यास मालाचा स्वीकार न करण्याचा हक्क न मिळता फक्त नुकसानभरपाईच मिळू शकते. जिम्मेदारीचे स्वरूप प्रत्येक विक्रीच्या व्यवहाराच्या अनुरोधानेच निर्धारित करावे लागते. सर्वसाधारणपणे विरुद्ध अर्थी करार नसल्यास, विक्रीच्या मालाचा निर्वेध व बोजारहित ताबा मिळणे, मालनमुना किंवा वर्णन केल्याप्रमाणे असणे, तसेच माल धोक्याचा असल्यास तशी स्पष्ट सूचना मिळणे, मालावर विक्रेत्याचा विक्रीचा हक्क असणे, माल वजनाप्रमाणे असणे ह्या बाबी जिम्मेदारी म्हणून समजल्या जातात. जिम्मेदारीचा भंग ही दिवाणी बाब फसवणुकीच्या गुन्ह्यापेक्षा निराळी समजली जाते.

Exit mobile version