महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्यप्रकार. यामध्ये गायन, वादन, नृत्य व नाट्य यांचा अंतर्भाव असतो. तमाशा हा शब्द उर्दूतून मराठीत आला असून, उघडा देखावा असा त्याचा अर्थ आहे. काही अभ्यासक तमाशा या शब्दाची फोड करून तम + आशा = तमातून म्हणजेच अंधारातून आशेचा प्रकाश दाखविणारा प्रकार, असेही त्याचे वर्णन करतात. हा प्रकार लोकभाषेतून लोकरंजनाद्वारे लोकशिक्षण देण्याचे काम करतो. महाराष्ट्रातील प्रचलित तमाशा हा लोकरंगभूमीवरील एक अत्यंत लोकप्रिय कलात्मक आविष्कार आहे. प्रामुख्याने खेडेगावी भरणाऱ्या यात्रांमध्ये तमाशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अलीकडे बंदिस्त नाट्यगृहातही तमाशा लोकनाट्याचे प्रयोग होत असतात. सतराव्या शतकात उदयाला आलेला तमाशा हा मूळ रंजनासाठीच उदयाला आल्याने त्यातील शाब्दिक विनोद, द्विअर्थी संवाद, आध्यात्मिक रचना आणि शृंगार हा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा असतो. तमाशा रंगभूमीला अनेक शाहिरांनी आपले योगदान दिले. भाऊ फक्कड, परशराम, होनाजी बाळा, हैबती घाटगे, रामजोशी, सगनभाऊ, अनंत फंदी, पठ्ठे बापुराव अशा अनेक शाहिरांनी रचना केलेल्या आहेत. वरील सर्व शाहीर स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. पूर्वी तमाशात फक्त आख्यानक लावण्या गायल्या जायच्या; पण पुढे उमा सावळजकर याने बाबा मांग याच्या साहाय्याने रचलेला मोहना बटाव सारखा वग तमाशा रंगभूमीवर १८६५साली आला आणि तमाशाचा आकृतिबंध तयार झाला.
खेळाच्या आरंभी सरदार हातात डफ घेऊन सुरते आणि झीलकारी या साथीदारांच्या मदतीने गणाने सुरुवात करतो, गणेशाचे स्तुतिपर गीत गाऊन झाल्यानंतरच सरदार नाच्या पोऱ्यासमवेत रंगमंचावर येऊन इतर साथीदारांची आणि स्वत:ची ओळख प्रेक्षकांना करून देतो. नंतर काही स्वरचित आणि संतांच्या गौळणी सादर होतात. कृष्ण, पेंद्या, गौळणी,दहया-दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजाराला निघत तेव्हा त्यांच्या चटकदार आणि खुमासदार विनोदाच्या झडती होतात. यात भरपूर नाटय असल्याने विनोदालाही वाव मिळतो. यानंतर लावण्यांचा कार्यक्रम सादर होतो. लावण्यांचे विषय वेगवेगळे असतात. यात काही शृंगारिक लावण्या असतात, तर काही भेदिक, कूटात्मक, स्तुतिपर, विरहात्मक लावण्याही असतात.काही नीतिपर व धार्मिक विषयांवरच्या लावण्याही असतात. पेशवेकाळापासून उपरोक्त पद्धतीने तमाशाचे सादरीकरण केले जात आहे.कालौघात त्यात निरंतर बदल होत आले आहेत. तमाशा रंगभूमीवरील एकूण कलाघटकांच्या बाजूंचा विचार करता आपणास असे आढळून येईल की, इतर कलांच्या सादरीकरणाच्या तुलनेत तमाशातील कलाघटकांच्या सादरीकरणाची शैलीसुध्दा भिन्न असते. तमाशात हलगी, ढोलकी जुगलबंदी, गण, मुजरा, बतावणी, रंगबाजी, लावणी आणि उत्तररंगात पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय विषयांवर वग लावण्याची परंपरा आहे.
गण, मुजरा, गौळण, बतावणी, रंगबाजी, वग हे तमाशातील अविभाज्य् घटक आहेत.या घटकांचे विश्लेषण केल्यास तमाशा हा कलाप्रकार स्पष्ट होतो .
गण : गण म्हणजे गणपतिस्तवन. नाट्यप्रयोग यशस्वीपणे पार पडावा, यासाठी श्रीगणेशाची आराधना तमाशाप्रमुख गातो व अन्य साथीदार त्याचे धृपद आळवितात.
गौळण : रतिनाटयात मंगलाचरण म्हणजेच गण झाल्यावर पौराणिक सोंगे नाटयमयरीत्या सादर केली जातात. या नाट्यातील सोंगांची नावे कृष्ण, राधा, यशोदा,पेंद्या, गौळणी या पात्रांना लाभलेली आहेत. याचाच आदर्श किंवा परंपरा डोळयांसमोर ठेवून तमाशा कलावंतांनी नाटयस्वरूपात कृष्णप्रेम व्यक्त करणाऱ्या गौळणी आपल्या तमाशात आणल्या असाव्यात. अगदी मंगलाचरणासारखी तमाशातील गौळण या उपांगात दिसते. नृत्य व अभिनय यांच्यासह ती तमाशात गायिली जाते. तमाशा कलावंतांनी आणि शाहिरांनी गौळणींची विभागणी हाळीची गौळण, तक्रारीची गौळण, ओळखीची गौळण (कृष्णाची गौळण), विनवणीची गौळण याप्रमाणे केली आहे. सोळा सहस्त्र गवळयांच्या नारी मथुरेच्या बाजाराला दहीदूध आणि लोणी घेऊन विकण्यासाठी निघतात. तेव्हा त्यांना कृष्णा वाटेत अडवतो आणि त्यांच्याकडे असलेले दान मागतो. तद्प्रसंगी गौळणी त्याच्या समोर भक्तिरूप स्वरूपातील गौळण गायकीच्या अंगाने सादर करतात, ती हाळीची गौळण -‘‘थाट करूनी माठ करूनी घ्या गं सगळया शिरी – अगं जावू चला मथुरेच्या बाजारी’’ अशा प्रकारे गौळण अंगणातून हाळी देऊन इतर गौळणींना बोलावते आणि बाजाराला निघते; परंतु लगेच दुसरी गौळण तिला सांगते की, बाई तो नंदाचा कान्हा लईच बाई खोडकर, त्याने माझी अशी खोडी काढली की त्याची तक्रार आपण यशोदा माईला सांगू या प्रसंगावेळी तक्रारीची गौळण सादर करतात. तक्रार झाल्यानंतर त्या मथुरेच्या बाजाराला निघतात तेव्हा वाटेत त्यांना कृष्ण अडवितो. या सगळया गौळणी कृष्णाला विनंती करतात, ती विणवणीची गौळण – ‘‘सोड जाऊ दे मला मथुरेला – का अडविशी गवळणीला
लहान सहान पोरी सगळया छळसी का मजला’’. अशा प्रकारे अनेक शाहिरांनी गौळणी रचून त्यांतील नाटय तमाशात सादर केले. या गौळणप्रकारात कृष्ण आणि राधा यांच्या शृंगारलीलांचे दर्शन घडते.
बतावणी : एखाद्या व्यक्तीला बनवण्यासाठी रचलेले सोंग म्हणजेच बतावणी. एकदुसऱ्याच्या बनवाबनवीत हास्य-विनोद निर्माण होतो, म्हणून बतावणीला तमाशाचे एक अविभाज्य अंग म्हणून संबोधले जाते. बतावणीचा खरा जन्मदाता शाहीर परशरामाचा शिष्य भवानी तेली आहे. कारण पहिल्यांदा त्यानेच बतावणीची सुरुवात केली. १८५६ साली मराठी रंगभूमीवर जो फार्स अवतरला त्यातूनच तमाशा रंगभूमीवर बतावणी अवतरली, असेही मानले जाते. बतावणीतच रंगबाजीला सुरुवात होते.
रंगबाजी : शृंगारिक लावण्यांचे सादरीकरण म्हणजे रंगबाजी. मंचावर एकापेक्षा अधिक फडांचे तमाशा कलावंत असल्यास संगीतबारी असेही तिला संबोधतात. या प्रकारात आंगिक आणि वाचिक अभिनय दिसतात. इथे तमाशाचा पूर्वरंग संपतो, त्यानंतर वगास सुरुवात होते.
वग : हा शब्द ‘ओघाओघाने बोलणे’ किंवा ‘वगावगाने बोलणे’ या अर्थाने आलेला दिसतो. यालाच वगाचे स्वरूप प्राप्त झाले असावे. वग म्हणजे नाट्यस्वरुपात सादर केलेली कथा. वगाचे विषय पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक किंवा राजकीय असतात. वगाची संहिता नसते, त्यातील संवाद पात्रांकडून प्रसंगानुरूप उत्स्फूर्तपणे बोलले जातात. तमाशातील अविभाज्य घटकांपैकी एक प्रमुख घटक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो.
अलीकडे पूर्वीच्या शाहीरांच्या रचनाच तमाशा कलावंत गातात व सादर करतात. मौखिक परंपरेने उपलब्ध असणाऱ्या वगाच्या संहिता विपुल प्रमाणात आजही उपलब्ध आहेत. पूर्वसुरींची पारंपरिक आख्याने, लावणी रचना जाऊन त्याची जागा वगलेखनाने घेतलेली दिसते.आधुनिक काळात तमाशात नवनवीन गोष्टींचा वापर झालेला दिसतो. उपलब्ध भागभांडवलानुसार ५०-६० कलावंतांचे एक मंडळ स्थापन करून तमाशा उभा केला जातो. पाडव्यापासून ते अक्षयतृतीयेपर्यंत तमाशा मंडळी दौऱ्यावर असतात. रसिकांच्या अभिरुची-प्रमाणे तमाशात पारंपरिक वाद्ये आणि रचना कमी प्रमाणात वापरल्या जातात. तमाशाचा डोलारा पाहता तंबू, कनात, लाकडी प्रवेशद्वार (गेट), प्रकाशयोजनेचे साहित्य, ध्वनी, नेपथ्य, यांच्या दळणवळणासाठी ट्रक, सुमो बस, मोटारगाडी इ. साहित्य बाळगतात. तमाशात चित्रपटातील गाणी रंगमंचावरून (तमाशाच्या भाषेत बोर्डावरून) सादर होत आहेत. त्यांची रंगभूषा, वेषभूषा, संगीत-संयोजन यांमध्ये आधुनिकता आली आहे. सुरुवातीला तमाशात हलगी, ढोलकी, तुणतुणे ही ऐवढीच वाद्ये असायची, आता तबला, पायपेटी, क्लॅरोनेट, गिटार, कोंगो-बोंगो, ऑक्टोपॅड, सिंथेसाइजर, रम्बा-संबा वाद्य साधनांचा समावेश झाला आहे. उघडया तमाशाचे स्वरूप बदलून कनातीचा तमाशा आला आहे. तमाशातील रंगमंचाचे रूपही आधुनिकतेनुसार बदलले आहे. १९८२ च्या दशकात गणपतराव व्ही. माने चिंचणीकर यांनी फिरता रंगमंच तमाशा रंगभूमीवर आणला. सादरीकरणानुसार वगात संहितेच्या मागणीसाठी गुंडाळी पडदे, रंगमंचरचना, नेपथ्य आणि प्रयोगरूप सजावट विकसित झालेल्या आहेत.
लोकरंगभूमीवरील तमाशाने लोकरंजनाबरोबरच लोकशिक्षण देण्याचेही काम केले आहे. सामाजिक चळवळी आणि भारतीय स्वातंत्र्यलढा यांत तमाशाने जनजागृतीचे काम केले. आंबेडकरी जलसे, सत्यशोधकी जलसे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नवे तमाशे, लोकनाटय, मुक्तनाटय ही तमाशाचीचचेच प्रारूपे होत. म्हणून समाजाच्या जडणघडणीत सांस्कृतिक दृष्ट्या तमाशाचे योगदान मोठे आहे.
संदर्भ :
- कसबे, मिलिंद, तमाशा कला आणि कलावंत,सुगावा प्रकाशन, पुणे, २००७.
- बनसोड, मंगेश, तमाशा रूप आणि परंपरा,अवे मारिया पब्लिकेशन्स, मुंबई, २०१२.