नजीबखान रोहिला : (मृत्यू ३० ऑक्टोबर १७७०). मोगल दरबारातील मिरबक्षी, मुत्सद्दी आणि मराठेशाहीतील एक उपद्रवी व्यक्ती. मराठ्यांच्या पत्रव्यवहारामध्ये ‘खेळ्याʼ, ‘हरामखोरʼ, ‘मात्रागमनीʼ सारख्या शेलक्या विशेषणांनी त्याचा उल्लेख आढळतो. मुळचा अफगाणिस्तानचा. नजीब रोहिला युसुफजाई पश्तून एक साधा शिलेदार होता.
हिंदुस्थानातील कुटेर प्रातांत रोहिला सरदार अलीमहंमद खान याने सर्वप्रथम आपले बस्तान बसविले. अलीमहंमदकडे चाकरी करणारा त्याचा काका बशारत खान याच्या बोलावण्यावरून १७३९ मध्ये नजीब हिंदुस्थानात आला. तो अलीमहंमद खानाच्या एका पथकाचा जमादार म्हणून रुजू झाला. अलीमहंमद खानाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सादुल्ला खान याला त्याच्या बापाची जहागिरी मिळवून देण्यात रहमत खान आणि दूंदे खान या रोहिला सरदारांनी मोठी मदत केली आणि ते सादुल्ला खानाचा कारभारही पाहू लागले. आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर नजीबने दूंदे खानाच्या मुलीशी लग्न केले. या लग्नसंबंधामुळे नजीबची प्रतिष्ठा वाढून चंदपूर, नगीना, शेरकोट, पिंजोर हे मुरदाबादच्या जवळचे परगणे जहागीर म्हणून मिळाले आणि तेथूनच त्याच्या उत्कर्षाला सुरुवात झाली. लिहिता आणि वाचताही न येणाऱ्या नजीबने आपल्या धाडस, प्रसंगावधान आणि बुद्धिचातुर्य या गुणांनी लवकरच दिल्ली दरबारी नाव कमावून उमराव पद प्राप्त केले. मुळचा कट्टर पठाण, पण नाइलाजाने मोगलांच्या नोकरीत होता. पुढे सन १७५१ ते १७५३ या काळात वजीर सफदरजंग आणि बादशाह आलमगीर (दुसरा) यांच्या संघर्षात अचानकपणे नजीबने बादशाहची बाजू घेतली आणि आपल्या पराक्रमाने आलमगीर (दुसरा) याला विजय मिळवून दिला. या कामगिरीने नजीबचे पाय मोगल दरबारात घट्ट रोवले गेले आणि संपूर्ण सहारणपूर परगणा त्याच्या नावे झाला. याच काळात दिल्लीचे संरक्षक असलेल्या मराठ्यांशी नजीबचा संबंध आला.
पठाणांच्या पातशाहीची स्वप्ने पाहणारा नजीब मोगल बादशाहच्या नोकरीत रमला नाही. आपल्या उपद्व्यापी स्वभावामुळे अनेक हिकमती करून त्याने अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दालीचा पाठिंबा मिळवला आणि मोगल, मराठा विरुद्ध अहमदशहा अब्दाली या संघर्षाला त्याने हिंदू विरुद्ध मुसलमान असा रंग भरला. याच क्लृप्तीचा वापर करून त्याने अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला यालाही त्याच्या मनाविरुद्ध मोगलांच्या पर्यायाने मराठ्यांच्या विरोधात उभे केले. नजीबच्या या उपद्व्यापाने मराठ्यांना हिंदुस्थानच्या रक्षणासाठी १७६१ मध्ये पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला सामोरे जाऊन मोठे नुकसान सहन करावे लागले. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतरही अब्दालीने मराठ्यांनाच दिल्लीचे संरक्षक नेमले आणि सदाशिवराव भाऊंनी नेमलेल्या शाहआलमलाच बादशहा नेमून नजीबला मिरबक्षी पद मिळाले. तेव्हापासून पुढील जवळजवळ आठ वर्षे दिल्लीचा कारभार नजीबच्या हाती राहिला. पानिपतच्या युद्धानंतर पुढील वर्षभरातच शिंदे-होळकरांनी मराठ्यांचा उत्तरेतील अंमल आणि दरारा पूर्ववत कायम केला. त्यामुळे खिळखिळ्या मोगल पातशाहीच्या कारभारात नामधारी झालेल्या नजीबने आपला मिरबक्षीगिरीचा कारभार आपला मुलगा झाबेता खान याच्या हाती देऊन आपला मुक्काम पत्थरगड नजीकच्या नजीबाबादला हलवला. पुढे तेथेच त्याचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याची कबर पत्थरगडच्या पायथ्याशी बनवण्यात आली.
नजीबच्या मृत्यूनंतर पुढच्या केवळ दोनच वर्षात पानिपतच्या पराभवाचे आणि दत्ताजी शिंदे यांच्या मृत्यूचे शल्य मनात बाळगत महादजी शिंदे यांनी नजीबचा मुलगा झाबेता खानावर हल्ला चढवला. गंगेच्या काठाने होत असलेल्या रोहिल्यांचा प्रतिकार समूळ मोडत महादजींच्या फौजा विसाजीपंत बिनीवाले यांच्यासह ४ मार्च १७७२ रोजी झाबेता खान असलेल्या शुक्रतालच्या किल्ल्यावर तुटून पडल्या. मराठ्यांच्या तोफांच्या तुफान माऱ्यापुढे शुक्रतालचा किल्ला शरण आला. शुक्रतालच्या किल्ल्यातील मोठी संपत्ती मराठ्यांच्या हाती लागली. पण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन झाबेता खान बिजनोर प्रांतात पळून गेला. त्याच्या पाठलागावरच्या फौजा एप्रिल महिन्यात नजीबाबादवर चालून गेल्या. झाबेता तेथूनही निसटल्याने संतापलेल्या मराठ्यांनी नजीबाबाद पूर्णपणे लुटून अपार संपत्ती मिळवली. पानिपतच्या युद्धात गमावलेल्या तोफा, काही मुले, माणसे आणि स्त्रियाही मराठ्यांना परत मिळाल्या. पानपतावर नजीबच्या कृष्णकृत्याने मराठ्यांची झालेली लूट, कत्तल, जाळपोळ आणि अपमान यांचा बदला म्हणून मराठा फौजांनी नजीबची कबर खणून उद्ध्वस्त केली.
एत्तदेशीय आणि परकीय या संघर्षाला हिंदू विरुद्ध मुसलमान असा रंग देणारा नजीबखान रोहिला आयुष्यभर राजकारणाचा आटापिटा करूनही आपल्या एका जहागिरी व्यतिरिक्त फारसे काही मिळवू शकला नाही. त्याचा मुलगा झाबेता खान याने पुढे शीख धर्म स्वीकारला.
संदर्भ :
- सरदेसाई, गो. स. मराठी रियासत – खंड ४ आणि ५ , मुंबई, १९४२.
- Keene, H. G. The Fall of the Moghul Empire of Hindustan, Seltzer Books, 1887.
- Verma, Abhas, Third Battle of Panipat, Bharatiya Prakashan, 2013.