Site icon MH General Resource

निरोगी शरीरयष्‍टीसाठी अंडी | Eggs for a healthy body

  1. जागतिक अंडी दिन
  2. अंड्यामध्‍ये amino acids

जागतिक अंडी दिन

जागतिक अंडी दिन साजरा करण्‍यामागचा उद्देश हा की, लोकांमध्‍ये अंड्यांच्‍या सेवनाबाबत जागरुकता निर्माण करणे आणि अत्‍यल्‍प दरामध्‍ये उपलब्‍ध होणारी अत्‍युच्‍च दर्जाची प्रोटीन्‍स यांचा वापर करुन कुपोषण दूर करणे, हा होय. हा दिवस प्रत्येक वर्षी ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस १४ ऑक्टोबरला साजरा केला जात आहे.

आयआयटी दिल्‍ली येथील सहयोगी प्राध्‍यापिका डॉ. ऋतिका खेडा यांनी भुकबळी/ कुपोषणावर सादर केलेली वस्‍तुस्थिती अत्‍यंत भयावह आणि धक्‍का देणारी आहे. जागतिक स्‍तरावर खाद्य उपलब्‍धता व कुपोषण यावर संशोधन करणाऱ्या संस्‍थांनी जाहीर केलेली आकडेवारी विचार करण्‍यास भाग पाडणारी आहे. कुपोषण दूर करण्‍याच्‍या प्रयत्‍नात भारत 118 कुपोषणग्रस्‍त देशांमध्‍ये 97 व्या स्‍थानी आहे. भारतामध्‍ये कुपोषणग्रस्‍त लोकांची संख्‍या 19.46 कोटी असून 1 ते 5 वयोगटातील 44 टक्‍के मुलांचे वजन सरासरीपेक्षा कमी आहे. भारतात दरवर्षी 2.1 दशलक्ष मेट्रीक टन गव्‍हाची नासाडी होते. ती ऑस्‍ट्रेलियाच्‍या एकूण वार्षिक गहू उत्‍पादनाइतकी आहे.

कुपोषण नि‍र्मुलन करण्‍यासाठी सर्वसमावेशक प्रथिन स्‍त्रोत अंड्याचा कसा उपयोग करता येईल, याबाबत चर्चा होणे गरजेचे असून अंड्याचे महत्‍व जाणले पाहिजे. जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या मूल्‍यांकनानुसार ज्‍याला 100 गुणांक दिलेले आहे, असे आईच्‍या दुधानंतर अंडे हा जगातील कदाचित एकमेव खाद्यपदार्थ आहे. अंडे हा निसर्गाने दिलेला सर्वोत्तम पोषण आहार आहे. अंडे हे नैसर्गिकरित्‍या कवचात बंद असल्‍यामुळे निर्भेळ अन्न घटक असून त्यात को‍णत्‍याही भेसळीला वाव नाही. इतर कोणत्‍याही अन्‍नापेक्षा अंड्याचे जैविक मूल्‍य (बॉयोलॉजीकल व्‍हॅल्‍यू) सर्वाधिक म्हणजे 96 इतकी आहे तर गाईच्‍या दुधाचे जैविक मूल्‍य 87.4 तर मटणाचे 74 इतके आहे.

अंड्यामध्‍ये अॅमिनो अॅसिड

अंड्यामध्‍ये प्रथिनाचा (प्रोटीन्‍स) मोठा स्‍त्रोत असून 58 ग्रॅमच्‍या एका अंड्यापासून 6 ग्रॅम प्रथिने आढळतात. म्‍हणजेच रुपये 50 ते 60 प्रति किलो दराचा विचार करताना अंडे हे जगातील सर्वात स्‍वस्त प्रथिनांचा स्‍त्रोत आहे. अंड्यामध्‍ये क जीवनसत्‍व वगळता भरपूर प्रमाणात खनिजे व जीवनसत्‍वे जसे अ, ब, ड, ई, के इत्‍यादी असतात. निरोगी हृदयासाठी आणि पोषणासाठी आवश्‍यक असलेली ओमेगा-3 फॅटी अॅसिड अंड्यात विपूल प्रमाणात आढळून येते. शरीर पोषणास आवश्‍यक समजले जाणारे नऊ प्रकारचे अॅमिनो अॅसिड अंड्यामध्‍ये असल्‍यामुळे अंडे हे परिपूर्ण आहार समजले जाते.

अंड्यातील कोलीन हा घटक शरीरामध्‍ये निर्माण होणारा दाह कमी करतो. तसेच मानवी रक्‍तातील घातक कोलेस्‍ट्रॉल (LDL) चे प्रमाण कमी करुन आवश्‍यक कोलेस्‍ट्रॉल (HDL) चे प्रमाण वाढविण्‍यास मदत करीत असल्‍यामुळे हृदय रोगाची जोखीम कमी करते. तसेच कोलीन हे मेंदू आणि चेतासंस्‍थेच्‍या आरोग्‍यासाठी पूरक पोषणमूल्‍य असून मेंदू पेशी निरोगी राहण्‍यासाठी आवश्‍यक असणारी फॉस्‍फोलिपीडस हे कोलीनमुळे मिळतात. तसेच कोलीनमुळे मुडदूस, अल्‍झायमर, हाडाची ठिसूळता आणि मधूमेह यांची जोखीम टाळता येते.

वयोमान परत्‍वे होणारी शरीराची झीज, ताणतणाव, मोतीबिंदू, प्रोस्‍टेट ग्रंथीची वाढ, कर्करोग इत्‍यादी कमी करण्‍यास अंड्यातील सुक्ष्‍म पोषकमूल्‍य सेलिनियम उपयोगी ठरते. निरोगी केसांची वाढ, नखांचे आरोग्‍य, नितळ चमकदार त्‍वचा व शरीर वाढीस अंडे हे आवश्‍यक असल्‍यामुळे सर्वांच्‍या आहारात अंडे असणे गरजेचे आहे. अंगणवाडी, बालवाडी तसेच शाळांमधून शिक्षकांनी अंड्यांचे महत्‍व व मुलांना पटवून दिल्‍यास निरोगी सदृढ भारत निर्माण होण्‍यास मदत होईल, यात शंका नाही.

Exit mobile version