Site icon MH General Resource

नीटची परीक्षा देताना..

  1. नीट परीक्षेसाठी पात्रता
  2. अभ्यास कसा करावा

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट (NEET) प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. ‘नीट’ परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे वैद्यक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातात. ही परीक्षा सर्वच राज्यामध्ये घेतली जाते. नीट २०१७ च्या परीक्षेतून १५ टक्के एमबीबीएस आणि बीडीएसच्या जागा ऑल इंडिया कौन्सीलिंग यांच्याकडून तर उर्वरित ८५ टक्के जागा स्टेट कौन्सीलिंगकडून भरल्या जातात. २०१७ च्या नीट परिक्षेत दिल्ली विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ आणि जामिया हमदर्द विद्यापीठाचा समावेश केला गेला आहे.

नीट परीक्षेसाठी पात्रता

विद्यार्थी भारताचा नागरिक असावा. तो १०+२ परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि इंग्रजी विषयातून उत्तीर्ण असावा. खुल्या वर्गासाठी किमान बारावीत ५० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. शारीरिक अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यास ४५ टक्के गुण हवेत. एस.सी, एस.टी. आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यास किमान ४० टक्के गुण प्रवेश परीक्षेसाठी असणे आवश्यक आहे. तसेच ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी विद्यार्थ्याचे वय सतरा वर्षे पूर्ण असावे.

विद्यार्थी राज्याचा अधिकृत रहिवासी असावा तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. (जम्मू आणि काश्मीर आसाम, मेघालय ही राज्ये वगळता). २५ वर्षे वयाचा विद्यार्थी नीट परीक्षेसाठी पात्र राहील. तसेच नीट २०१७ परीक्षा दि. ७ मे २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल. परीक्षेची फी आपण नेटबँकिंग, क्रेडीट कार्ड ई वॉलेटद्वारे भरू शकता. खुला आणि इतर मागास या प्रवर्गासाठी परीक्षा फी रु.१४०० आणि एस.सी., एस.टी. आणि शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांसाठी रु.७५० राहिल. अॅडमिट कार्ड एप्रिल २०१७ रोजी उपलब्ध होणार असून प्रवेशपत्राची प्रत घेणे आवश्यक आहे. अधिक माहिती http://cbseneet.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

अभ्यास कसा करावा

नीट परीक्षेचा अभ्यास करताना एनसीईआरटीची पुस्तके वापरावीत. तसेच सोडविलेल्या प्रश्नसंचांचा अभ्यास करावा. ‘नीट’ मधील फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांला मॅथ्समधील वेक्टर्स, डिफरन्शियल अ‍ॅण्ड इन्टग्रल कॅलक्युलस, क्वान्ड्राटिक इक्वेशन्स, प्रोग्रेशन्स अ‍ॅण्ड स्ट्रेट लाइन या पाठांचा अभ्यास उत्तमरीत्या करणे आवश्यक आहे. गणित या विषयाचा सविस्तर अभ्यास करावा. तसेच पाठांतरावर भर न देता आकलनावर भर द्यावा. उपयोजन कौशल्याचा वापर करावा. अनेक प्रश्न वेळ लावून सोडवून पहावेत. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी अरिहंत, दिशा, टाटा मॅक्ग्रॉ हिल्स, एमटीजी, सेन्गेज, पीअरसन्स आदी पुस्तकांचा अभ्यास करावा. तसेच अनुभवी शिक्षकाकडून मार्गदर्शन घ्यावे. विषयांच्या नोट्स काढून त्याची उजळणी करावी. निगेटिव्ह गुणपद्धती असल्याने काळजीपूर्वक प्रश्न सोडवावेत. अभ्यासाचे शिस्तबद्ध वेळापत्रक तयार करावे. परीक्षेची पद्धत समजावून घेऊन संकल्पना समजून घ्याव्यात. वेगवेगळ्या चाचणी परीक्षा द्याव्यात तसेच निर्णयक्षमता वाढण्यास सहाय्य होईल अशा गोष्टी कराव्यात. तसेच परीक्षेच्या काळात प्रकृतीस्वास्थ्याची काळजी घ्यावी. परीक्षेबद्दल सकारात्मक आत्मविश्वास बाळगावा. सतत स्वत:चे मूल्यमापन केल्यास यश हमखास मिळेल. 

Exit mobile version