Site icon MH General Resource

फिटनेस क्षेत्र

  1. बीपीएड
    1. पात्रता
  2. एमपीएड
    1. पात्रता
  3. प्रवेश
  4. शैक्षणिक शुल्क
  5. प्राधान्य
  6. अधिक माहितीसाठी…
  7. अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :

खेळ आणि आरोग्याविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती वाढली आहे. पाल्याने एखाद्या खेळात करिअर करावे असे अनेक पालकांना वाटते. तर कुणाला आपण निरोगी आणि सुदृढ राहावे असे वाटते. त्यामुळे कुठलाही मैदानी खेळ आणि व्यायामशाळेसाठी शारीरिक प्रशिक्षकाची गरज भासत असल्याने फिटनेस क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.

फिटनेस हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. आपल्याला फिटनेस प्रशिक्षक बनायचे असेल, तर फिटनेसबद्दल आवड, सुदृढ शरीरियष्टी ही पहिली पात्रता म्हणता येईल. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी बीपीएड व एमपीएड हे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राजमार्ग आहेत. त्यासोबतच मुंबईसारख्या महानगरांमध्ये काही संस्थांमार्फत फिटनेस संदर्भातील काही अभ्यासक्रम शिकविले जातात. मात्र शासनमान्य अभ्यासक्रम बीपीएड व एमपीएड या पदव्या अथवा पदव्युत्तर शिक्षणानंतर पीएच.डी. मिळवली तर आपल्याला खासगीसोबतच शासकीय क्षेत्रातही करीअरच्या अनेक संधी उपलब्ध असतात. फिटनेसमधील शास्त्रशुद्ध शिक्षण पूर्ण केल्यानंतर फिटनेस प्रशिक्षक म्हणून काम करता येते. त्यासोबतच विशेष प्रशिक्षक, खासगी प्रशिक्षक, जिम इन्स्ट्रक्टर, रोबिक्स इन्स्ट्रक्टर, डाएटिशियन आणि स्पोर्टस प्रशिक्षक अशा अनेक पदावर काम करता येते. शिवाय शारीरिक शिक्षण, एखादा खेळ, योग, जिम्नॅस्टिक्स, ॲरोबिक्स इत्यादी विषयांपैकी एखादा आवडीचा विषय घेऊन त्यामध्ये विशेष प्रावीण्य (स्पेशलायझेशन) मिळविल्यास अधिक फायदा होतो.

बीपीएड

पात्रता

उमेदवार भारतीय नागरिक असावा. कुठल्याही शाखेची पदवी 50 टक्के गुणांसह आवश्यक. मागासवर्गांसाठी किमान 45 टक्के गुणांची मर्यादा. उमेदवाराने आंतरमहाविद्यालयीन, विभागीय, जिल्हा तसेच शालेय स्पर्धेत भाग घेतलेला असावा. किंवा शारीरिक शिक्षण विषय अनिवार्य किंवा पर्यायी विषयी म्हणून निवडलेला कुठल्याही शाखेचा किमान 45 गुण प्राप्त (मागासवर्गांसाठी 40 टक्के) पदवीधर. किंवा कुठल्याही शाखेचा 45 टक्के (40 टक्के मागासवर्गांसाठी) गुण प्राप्त आणि किमान तीन वर्षांचा शारीरिक शिक्षण शिक्षक/प्रशिक्षक म्हणून काम केलेला पदवीधर.

एमपीएड

पात्रता

या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हा भारतीय असावा. तसेच त्याने शारीरिक शिक्षण (बीपीएड) मध्ये किंवा समकक्ष अभ्यासक्रमात किमान 50 टक्के गुणांसह (मागासवर्गांसाठी 45 टक्केपर्यंत) पदवी प्राप्त केलेली असावी. किंवा त्याने हेल्थ अँण्ड फिजिकल एज्युकेशनमध्ये 50 टक्के गुणांसह बीएसस्सी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. मागासवर्गांसाठी 45 टक्क्यांपर्यंत अट शिथील करण्यात आली आहे.

प्रवेश

बीपीएड व एमपीएड या दोन्ही अभ्यासक्रमाला राज्य सामायिक प्रवेश परीक्षेमार्फत (सीईटीमार्फत) प्रवेश दिला जातो. मेरीट व आपण निवडलेल्या महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम यानुसार प्रवेश दिला जातो.

शैक्षणिक शुल्क

राज्य शासन/शिक्षण शुल्क समिती किंवा विद्यापीठाने ठरवून दिलेले शुल्क.

प्राधान्य

शासकीय महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये बीपीएड व एमपीएस प्रवेशासाठी होम युनिव्हर्सिटीतील उमेदवारांसाठी 60 टक्के, इतर विद्यापीठातील उमेदवारांसाठी 20 टक्के, राज्याबाहेरील उमेदवारांसाठी 15 टक्के तर एनआरआय व विदेशी उमेदवारांसाठी 5 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. हेच प्रमाण विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये अनुक्रमे 64, 16, 15 व 5 टक्के असे असते, तर शासकीय अनुदानित अल्पसंख्याक महाविद्यालयात हे प्रमाण अनुक्रमे 18, 12, 15, 5 टक्के असे असते व 50 टक्के जागा अल्पसंख्याकांसाठी राखीव असतात.

अधिक माहितीसाठी…

http://www.mahacet.org

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :

http://dhe.mhpravesh.in

Exit mobile version