Site icon MH General Resource

बहादुरशाह जफर (Bahadur Shah Zafar)

बहादुरशाह जफर (२४ ऑगस्ट १७७५–७ नोव्हेंबर १८६२).

भारताचा १९ वा व शेवटचा मोगल सम्राट, तसेच तिमुरी घराण्यातील अखेरचा राज्यकर्ता. त्याचे संपूर्ण नाव अबू जफर सिराजुद्दिन मुहम्मद बहादुरशाह. दुसरा बहादुरशाह म्हणूनही विख्यात. त्याच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. मोगल सम्राट दुसरा अकबरशाह व त्याची हिंदू रजपूत पत्नी लालबाई या दाम्पत्याच्या पोटी त्याचा जन्म झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर १८ सप्टेंबर १८३७ मध्ये बहादुरशाह दिल्लीच्या सिंहासनावर विराजमान झाला. तो उत्तम राज्यकर्ता होता. त्याने अनेक सुधारणा केल्या व लोककल्याणकारी प्रशासन राबविले. प्रजाजनांसाठी महत्त्वपूर्ण आदेश काढले. त्यामध्ये गोहत्याबंदीचा महत्त्वपूर्ण आदेशही होता. धर्मनिरपेक्ष भावनेने राज्यकारभार करण्यात भारताच्या इतिहासातील त्याचे स्थान मोठे आहे. उत्तम राजकीय नेता, कवी व गझलकार म्हणून त्याची ख्याती होती. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील तो अत्यंत महत्त्वपूर्ण नेता होता.

भारतामध्ये १८५७ चा उठाव सुरू झाल्यानंतर मेरठमधून सैनिक ११ मे १८५७ रोजी सकाळी सात वाजता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पोहोचले. इंग्रज अधिकारी जेम्स डग्लसचा भारतीय सैनिकांनी पराभव केला. १२ मे १८५७ रोजी लाल किल्ल्यामध्ये बहादुरशाह व भारतीय सैनिकांनी विजयोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला. त्यावेळी बहादुरशाह दिल्लीचा नबाब होता. बंडवाल्यांनी बहादुरशाहलाच भारताचा सम्राट व स्वातंत्र्ययुद्धाचा नेता म्हणून घोषित केले. नानासाहेब पेशवे यांनी स्वातंत्र्ययुद्धाचा नेता म्हणून भेटवस्तू पाठवून आपला पाठिंबा दर्शविला. मंगल पांडे, तात्या टोपे, झांशीची राणी, पंजाबच्या रणजितसिंह राजाची पत्नी यांनीही त्याला पाठिंबा दिला. इंग्रजांनी भारतातील संस्थाने खालसा केल्याने, तनखे रद्द केल्याने सर्वत्र असंतोष पसरला होता. संस्थानांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. बहादुरशाहवर इंग्रजांचा प्रभाव होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये सर्व सत्ता होती. जाहीरनामे मात्र बहादुरशाहच्या नावे प्रसारित होत असत. पुढे पुढे कंपनी सरकार व भारतीय सैनिक यांमधील संघर्ष वाढत गेला.

बहादुरशाह ज्या वेळेस ब्रिटिशांच्या विरोधात लढत होते, तेव्हा त्यांचे वय ८२ वर्षांचे होते. १८५७ च्या उठावामध्ये सामील होण्यासाठी त्याने जयपूर, उदयपूर, जोधपूर, इंदूर, ग्वाल्हेर या संस्थानिकांना पत्रे पाठवून आपण सर्व भारतीय एकत्र येऊन परकीय इंग्रजांना भारतातून हाकलून देऊया, असे कळवले; परंतु रजपूत संस्थानिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. बहादुरशाहने भारतीय क्रांतिकारकांच्या मदतीने इंग्रजांचा पराभव करून दिल्ली व इतर भागांतील इंग्रजांना हाकलून दिले. नंतर मात्र शक्तिशाली इंग्रजांपुढे त्याचे काहीच चालले नाही. इंग्रजांनी हा उठाव निर्घृणपणे चिरडून टाकला. बहादुरशाहचा पराभव झाला. तरीही भारतीय जनता बहादुरशाहलाच भारताचा सम्राट मानत होती. उठाव सुरू असतानाच तो आपली तीन मुले व नातवंडांसह दिल्लीच्या हुमायूनच्या मकबऱ्याध्ये आश्रयास गेला. मिर्झा इलाही बख्तच्या विश्वासघाताने इंग्रज सैन्याने मेजर हडसनच्या नेतृत्वाखाली १४ सप्टेंबर १८५७ ला बहादुरशाहला पकडले. पुत्र मिर्झा मुघल, मिर्झा खिज्र सुलतान आणि नातू अबू बख्त यांना पकडून ठार करण्यात आले. इतर २१ शाहजाद्यांना पकडून फाशी देण्यात आले. बहादुरशाहवर जानेवारी १८५८ मध्ये यूरोपियन लोकांची कत्तल केल्याच्या आरोप ठेवून त्याला आजन्म कारावासाची शिक्षा दिली (२९ मार्च १८५८). त्याला रंगून (म्यानमार) येथे कैदेत ठेवले. पाच वर्षांनी त्याचे निधन झाले, तेथेच त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या मृत्यूबरोबरच औरंजेबाच्या नामधारी मोगल सम्राटाचा कालखंड इतिहासजमा झाला. त्याची आठवण म्हणून भारतात विविध ठिकाणी स्मारके उभारली आहेत.

बहादुरशाहची शेवटची इच्छा ही शेवटचा श्वास भारतातच घ्यावा, तसेच दफनही भारतभूमीतच व्हावे असे त्याला वाटत होते; परंतु तसे झाले नाही. बहादुरशाहने उर्दूमध्ये अनेक कविता, गझला केल्या. विशेषतः क्रांतीच्या काळामध्ये अनेक कविता व गझला लिहिल्या. त्याच्या कालखंडामध्ये उर्दू शायरी बहराला आली. प्रेम व रहस्य या विषयांवर त्याने अनेक कविता केल्या. ब्रिटिशांनी दिलेल्या त्रासाबद्दलही त्यांनी काही लेखन केले. त्याच्या बऱ्याच कविता व गझला १८५७ च्या उठावामध्ये नष्ट झाल्या. त्याच्या उर्वरित गझला कुल्लियात–ए–जफर या नावाने विख्यात आहे. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये दिल्ली येथे बांधलेली ‘जफर महलʼ ही मोगल कालखंडातील शेवटची वास्तू होय. तो सूफी धर्माचा सच्चा अनुयायी होता.

संदर्भ :

Exit mobile version