एखाद्या व्यक्तीने आपली शेतजमीन, वास्तू, व्यवसाय इ. मालमत्तेसंबंधी आपले काम पाहण्यासाठी दुसऱ्या एखाद्या इसमास कायदेशीररीत्या प्राधिकृत केल असेल, तर कायद्याच्या परिभाषेत अशा इसमास सामान्यपणे ‘मुखत्यार’ असे म्हणतात. इंग्रजी मध्ये त्याला ‘अटर्नी’ किंवा ‘एजंट’ म्हणतात.
जेव्हा ‘अ’ हा इसम ‘ब’ ह्या दुसऱ्या इसमास मुखत्यार म्हणून नेमतो, तेव्हा ज्या दस्तान्वये मुखत्यार नेमला जातो, त्यास ‘मुखत्यारपत्र’ किंवा इंग्रजीत ‘पॉवर ऑफ अटर्नी’ म्हणतात. मुखत्यारपत्र कायदेशीर दस्तऐवज असतो. त्याला योग्य तो मुद्रांक लावावा लागतो. जो व्यक्ती मुखत्यारपत्र देते, त्या व्यक्तीने मुखत्यारपत्रावरची आपली सही, दंडाधिकारी, लेखप्रमाणक (नोटरी) किंवा इतर अधिकृत अधिकाऱ्यासमोर करावी लागते. मुखत्यार म्हणून नेमलेल्या इसमास कोणत्या प्रकारची कामे करण्याचे अधिकार दिले आहेत, ते मुख्यत्यापत्रवरून समजते. मुखत्यार या अधिकाराने त्या इसमाने जर मुखत्यारकर्त्याचे येणे वसूल केले व त्याबद्दल पावती दिली, तर कायदेशीर रीत्या ऋणको कर्जमुक्त होतो. मुखत्यारपत्रान्वये जे अधिकार दिलेले असतात, ते मुखत्यार व्यक्तीने तंतोतंत पाळावयाचे असतात. मुखत्यार करीत असलेली सर्व कामे जर मुखत्यारपत्राप्रमाणेच केलेली असतील, तर ती कामे जर मुखत्यारपत्रकर्त्यावर बंधनकारक असतात. ती कामे आपण स्वतः केली नव्हती, असे त्याला म्हणता येत नाही . त्याचप्रमाणे मुखत्यार म्हणून काम करत असता संबंधित मुखत्याराला काही नुकसान पोहोचले अगर तोशीस लागली, तर त्याची भरपाई मुखत्यारपत्रकर्त्याला द्यावी लागते.
मुखत्यारपत्र दोन प्रकारचे असते :
(१) सर्वसामान्य
(२) विशिष्ट
ज्यावेळी विशिष्ट कामाकरिताच मुखत्यारास अधिकार दिला असेल, त्यावेळी मुखत्याराने तेवढे विशिष्ट कामच करावयाचे असते. उदा., एखाद्या दस्तावर सही करणे किंवा त्याची नोंदणी करणे. त्याव्यतिरिक्त इतर कामे केल्यास त्यास मुखत्यार वैयक्तिकरीत्या जबाबदार राहतो; मुखत्यारपत्रकर्ता जबाबदार रहात नाही. एखादे विशिष्ट काम न देता जर सामान्यतः सर्व कामे दिली असतील, तर त्याला सर्वसामान्य मुखत्यारपत्र म्हणतात. उदा. ‘ब’ ला ‘अ’ तर्फे न्यायालयात दावा लावायचा असेल तर, सर्वसामान्य मुखत्यारपत्राची जरुरी असते. मुखत्यारपत्राच्या आधारे जर स्थावर मिळकतीवर काही ⇨ बोजा निर्माण करावयाचा असेल किंवा स्थावर मिळकतीसंबंधी काही व्यवहार करावयाचा असेल, तर असे मुखत्यारपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावे लागते.
सार्वजनिक संस्थेचे विश्वस्त हे त्या संस्थेचे मुखत्यार असतात [⟶ विश्वस्तपद्धति]. याच कल्पनेप्रमाणे कायद्यामध्ये वकील हा पक्षकाराचा मुखत्यार मानला जातो. कायद्यात वकिलाला अटर्नी अथवा अटर्नी ॲट लॉ म्हणतात. वकिलास पक्षकार जे वकीलपत्र देतो, ते वास्तविक एकप्रकारचे मुखत्यापरत्रच असते. अर्थात वकिली व्यवसायास नियंत्रण करणारे इतरही काही कायदे आहेत; परंतु मूळ कल्पना म्हणजे वकील हा पक्षकाराचा मुखत्यार अशीच आहे.