Site icon MH General Resource

सर एडवर्ड कुक: एक नामांकित ब्रिटिश विधिवेत्ता

Sir Edward Coke

(१ फेब्रुवारी १५५२–३ सप्टेंबर १६३४). एक नामांकित ब्रिटिश विधिवेत्ता. मिलहॅम (नॉरफॉक) येथील सनातनी कुटुंबात त्याचा जन्म झाला. केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये त्याचे शिक्षण झाले. त्याने १५७९ साली वकिलीस सुरुवात केली. १५८० मध्ये लायन्स इनचा अधिव्याख्याता  म्हणून त्याची नेमणूक झाली. नॉरविच व कॉव्हेंट्रो शहराचा अभिलेखपाल, सॉलिसिटर जनरल, हाऊस ऑफ कॉमन्सचा सभापती व अ‍ॅटर्नी जनरल वगैरे हुद्यांवर त्याने प्रभावीपणे कार्य केले. उत्तम सरकारी  वकील म्हणूनही त्याने नाव कमावले. १६०६ मध्ये तो कॉमन प्लीजचा व १६१३ मध्ये किंग्ज बेंचचा मुख्य न्यायाधीश झाला. बारा न्यायाधिशांपैकी राजाच्या निरंकुशाधिकारांना  विरोध करणारा हाच एकटा होता. राजाची व चर्चची सत्ता सर्वश्रेष्ठ न मानल्यामुळे व कॉमन लॉ पुरस्कार केल्यामुळे त्यास अनेक शत्रू निर्माण होऊन त्रास झाला.

परिणामत: क्षुल्लक कारणांवरून त्याला न्यायशाखेच्या पदावरून काढण्यात आले. पण राजकीय व वैयक्तिक प्रभावामुळे तो पुन्हा त्या पदावर आला.ब्रिटिश संसदेचा सभासद होण्याचा त्यास अनेक वेळा मान मिळाला. ब्रिटिश संसद ही राजाची मक्तेदारी असता कामा नये, असे त्याचे मत होते. या मताबद्दल त्यास व त्याच्या साथीदारांस कारागृहवास भोगावा लागला. पण त्यायोगे त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी न होता उलट वाढलीच. राजाच्या निरंकुशाधिकाराचा विरोधक, कॉमन लॉचा पुरस्कर्ता व लोकांचे अधिकार प्रस्थापित करणाऱ्या अधिकारांच्या सनदेचा प्रेरक म्हणून त्याचे नाव इंग्लंडच्या कायद्याच्या इतिहासात अजरामर झाले आहे.त्याने लिहिलेल्या पुस्तकांपैकी स्वतः ऐकलेल्या खटल्याच्या टिपणांवर आधारित असलेले तेरा खंडांचे अहवाल व संविधी, फौजदारी कायदा,न्यायालयांचे अधिकारक्षेत्र इत्यादींचे विवेचन करणारे इन्स्टिट्यूट्स (४ खंड) हे ग्रंथ विधि-साहित्यात महत्त्वाचे मानण्यात येतात.

संदर्भ: Bowen, C. S. Lion and the Thrones: The Life and Times of Sir Edward Coke(1552-1634),   London. 1957.

Exit mobile version