Site icon MH General Resource

सेक्सटॉर्शन नेमकं काय घडतं?

पुण्यातल्या एका महाविद्यालतील प्रोफेसरच्या व्हॉट्सअॅपवर रात्री उशीरा एक मेसेज आला. त्यांच्या एका विद्यार्थिनीची आई बोलत असल्याचं भासवण्यात आलं. तुमचं उद्याचं कॉलेजचं शेड्युल कसं आहे? असं त्या विचारत होत्या.

मुलगी काही नीट सांगत नाही तुम्हीच सांगा असं त्या म्हणत होत्या. काही वेळाने त्याच नंबरवरुन प्रोफेसरला व्हॉट्सअॅप कॉल आला त्या कॉलवर आवाज व्यवस्थित येत नव्हता. नंतर व्हिडीओ कॉल आला ज्यात काहीवेळ ती महिला बोलल्यानंतर ती प्रोफेसरसमोर कपडे काढू लागली.

हा व्हिडीओ रेकॉर्ड करुन एडिटकरुन शिक्षकांच्या ग्रुपवर टाकण्यात आला आणि काही वेळात डिलीट करण्यात आला. त्यात लिहिलं होतं प्रोफेसर मागण्या मान्य करुन घेण्यासाठी काय करतात पाहा.

त्या प्रोफेसरने सायबर तज्ज्ञांशी संपर्क करुन हे कोणी केलं याचा शोध घेतला, तेव्हा त्यांच्याच महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी इंटरनेटवरुन माहिती घेऊन हा प्रकार केल्याचे समोर आलं.

सेक्स + एक्स्टॉर्शन (Sex + Extortion) यावरून सेक्स्टॉर्शन हा शब्द आलाय. म्हणजे सेक्सचा वापर करत ब्लॅकमेल करून वा दबावाखाली आणत खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणं.

सेक्सटॉर्शनच्या अशा 682 घटना पुणे शहरात 2021 या एका वर्षात समोर आल्या आहेत. हा आकडा ज्यांनी समोर येऊन सायबर पोलिसांकडे तक्रार केली त्यांचा आहे. ज्यांनी तक्रार केली नाही अशांची संख्या अधिक असण्याची शक्यता सायबर पोलीस व्यक्त करतात.

सध्या प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाल्याने त्यातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार देखील वाढलं आहे. सावज शोधून त्याला अडकवून पैसे वसूल करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. याप्रकारांमुळे अनेकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय तर काही लोक बदनामीच्या भीतीमुळे नैराश्यात देखील जात आहेत.

दुसरी घटना देखील पुण्यातली आहे. एका व्यक्तीला एका अनोळखी व्यक्तीचा व्हिडीओ कॉल व्हॉट्सअॅपवर आला. त्या व्यक्तीने कुतुहलाने तो फोन उचलला तर कॉलवर न्यूड महिला दिसत होती. त्या व्यक्तीने काही वेळातच तो व्हिडीओ बंद केला.

तुम्ही अश्लील व्हिडीओ पाहत होता आता हे आम्ही व्हायरल करु असं म्हणत त्या व्यक्तिकडे पैशांची मागणी करण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे ती व्यक्ती पुरती घाबरुन गेली होती.

पुणे सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर गुन्ह्यातील 60 ते 70 टक्के गुन्हे हे एखाद्या व्यक्तीकडून पैसे वसूल केल्याचे असतात. जमतारा नावाची वेब सिरीज नेटफ्लिक्सवर आहे त्याप्रमाणे सॉफ्ट टारगेट शोधून लोकांना आर्थिक गंडा घातला जातो. यात मॅट्रोमोनियल साईटवरुन ओळख करुन गिफ्ट देण्याच्या बहाण्याने फसवण्याचे गुन्हे देखील अधिक आहेत.

पुणे सायबर पोलिसांच्या आकडेवारीनुसार 2020 या वर्षामध्ये मॅट्रोमोनियल साईटवरुन फसवणुकीचे 278 गुन्हे दाखल झाले होते. 2021 मध्ये ही संख्या 94 इतकी होती तर 2022 या नवीन वर्षात आत्तापर्यंत 14 गुन्हे दाखल झाले आहेत. सेक्स्टॉर्शनचे बळी ठरलेल्यांमध्ये 30 वयाच्या वरील पुरुषांचे तसेच खासकरुन लग्न झालेल्या पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.

पुणे सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, ”गेल्या वर्षात पुण्यात सेक्सटॉर्शनच्या गुन्हांची संख्या जास्त आहे. एखाद्या व्यक्तीशी फेसबुकवरुन मैत्री केली जाते. त्यानंतर न्यूड फोटो पाठवले जातात व्हिडीओ कॉलवर न्यूड होण्यासाठी सांगितले जाते आणि नंतर बदनाम करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात. फसवणुक करणारे लोक फसवल्या गेलेल्या व्यक्तीच्या प्रोफाईलचा संपूर्ण अभ्यास करतात. त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये कोण आहे, ही व्यक्ती काय करते वगैरे ही सगळी माहिती ते घेतात.”

”सेक्सटॉर्शनमध्ये फसवणूक झालेल्यांमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. अशी फसवणूक ही राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली या भागांमधून केली जात असल्याचं प्रमाण अधिक आहे.

Exit mobile version