Site icon MH General Resource

स्कॉटलंड यार्ड

इंग्लंडमधील लंडन या महानगरातील पोलीस खात्याचे मुख्यालय. स्कॉटलंड यार्ड या नावाने ते प्रसिद्ध आहे. स्कॉटलंडचा राजा केनेथ यास त्याच्या लंडनमधील निवासासाठी दिलेल्या राजवाड्याच्या जागेवरच हे मुख्यालय असल्याने त्यास स्कॉटलंड यार्ड असे नाव रूढ झाले. लंडन महानगरातील पोलीसांचे मुख्यालय ४, व्हाइट हॉल प्लेस या ठिकाणी होते. त्याच्या मागील बाजूचे प्रवेशद्वार ‘ ग्रेट स्कॉटलंड यार्ड ’ या रस्त्यावर उघडत असे. या रस्त्यावरून सामान्य जनतेस पोलीस मुख्यालयात प्रवेश करता येत असे. कालांतराने रस्त्याच्या नावानेच लंडन पोलीस ओळखले जाऊ लागले. कामाचा व्याप खूप वाढल्यानंतर हे मुख्यालय व्हिक्टोरिया इम्बँकमेंट येथे थेम्स नदीकाठी असलेल्या ठिकाणी हलविण्यात आले. त्यानंतर १९६७ पासून व्हिक्टोरियामधील ‘ ब्रॉड वे ’ या ठिकाणी सध्याचे न्यू स्कॉटलंड यार्ड आहे. ‘ मेट्रोपोलिटन पोलीस अ‍ॅक्ट ’ १८२९ मध्ये संमत करण्यात आला. त्यानुसार गृहसचिव रॉबर्ट पील यांनी पोलीस खात्याची स्थापना केली.

तोपर्यंत लंडन पोलीस व स्कॉटलंड यार्ड यांचा अर्थाअर्थी काही संबंध नव्हता. तत्पूर्वी पोलीस किंवा ज्यांना इम्प्रूव्हमेंट कमिशनर असे संबोधले जात होते, असे अधिकारी लंडनमधील रस्ते, त्यांची देखभाल, दिव्यांची सोय, रस्त्यांची स्वच्छता ही कामे करीत. इ. स. १६६२ च्या सुमारास अशा अधिकार्‍यांची कार्यालये स्कॉटलंड यार्डमध्ये स्थापन केली गेली. पुढे १८२९ मध्ये पोलीस दल स्थापन झाल्यावर लंडन पोलीस म्हणजेच ‘ स्कॉटलंड यार्ड ’ असे समीकरण बनले. स्कॉटलंड यार्डचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी हा ‘ कमिशनर ’ म्हणून ओळखला जातो. गृहसचिवाच्या शिफारशीवरून राजा त्याची नेमणूक करतो. त्या खालोखाल उपआयुक्त नेमला जातो. प्रशासन, वाहतूक, गुन्ह्यांचा तपास, पोलीस दल, सचिवालय व कायदा विभाग या सहा विभागांतर्गत स्कॉटलंड यार्डचे कार्य केले जाते. तपासास अवघड असणार्‍या गुन्ह्याचे कामी इंग्लंडमधील अन्यत्र कार्यरत असणारे पोलीस खाते स्कॉटलंड यार्डची मदत घेते. पोलीस अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याचे कामही या कार्यालयातर्फे केले जाते.

पोलीस जगतातील आदर्श, गुन्हेगारी तपासात लागणारे चातुर्य, कर्तव्यदक्षता यांचा अत्युच्च निकष म्हणून स्कॉटलंड यार्ड केवळ इंग्लंडमध्ये नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावले आहे. तेथे काम करणारे काल्पनिक गुप्तहेर अनेक कथा, कादंबर्‍यांचे तसेच चित्रपटांचे नायक, नायिका बनले आहेत.

Exit mobile version