Site icon MH General Resource

हुंड्यासाठी होणारा छळ: Hundyasathi Honara Chale

“हुंड्यासाठी होणारा छळ: Hundyasathi Honara Chale”

हुंड्याची प्रथा:

भारतात प्रत्येक समाजामध्ये हुंड्याची प्रथा प्रचलित आहे. विवाहसंस्थेत गुंतलेल्या व भवतालच्या असंख्य लोकांच्या आयुष्यांवर ही प्रथा अनिष्ट परिणाम करत आहे. 

जेव्हा एखाद्या घराण्याच्या राजकन्येचे लग्न होत असे तेव्हा राजा अत्यानंदाच्या भरात त्याच्या संपत्तीचा व राज्याचा काही भाग जावयाला एका भव्य सोहळ्यामध्ये प्रदान करत असे. त्याचे मंत्रीही या राजेशाही प्रथेचे पालन एक शिष्टाचार म्हणून करू लागले. मग राजाची सामान्य प्रजा, मग ती गरीब असो किंवा श्रीमंत, या दिखाऊ प्रथेचे पालन ‘प्रतिष्ठा’ जपण्यासाठी करू लागली आणि त्यांनाही आपण राजेशाही असल्याचा आभास यातून होऊ लागला. 

विवाहातील ही विचित्र प्रथा गरीब व वंचित कुटुंबांमध्येही वेगाने जाऊन पोहोचली आणि त्याभवती प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पना गुंफल्या गेल्या. तेव्हापर्यंत मुलीला जन्म देण्याशी आणि तिचे पालनपोषण करण्याशी एक अपराधी भावना जोडली गेली होती. त्यातच मुलींचा जन्मदर मुलग्यांच्या तुलनेत वाढल्यामुळे ही भ्रष्ट प्रथा अधिक दृढ होत गेली. प्रत्येक घरात मुलग्यांच्या तुलनेत जास्त मुली असणे ही कुटुंबातील ज्येष्ठांसाठी धोक्याची घंटा होती. त्यांनी मुलींच्या लग्नाची घाई सुरू केली व त्यातून स्पर्धा लागली. 

अलीकडील काळात हुंड्याची प्रथा रुजत गेली.  हुंड्यापोटी मिळणाऱ्या वस्तू, सोने आणि पैसे नवऱ्यामुलासाठी अभिमानाची आणि दिखाव्याची बाब झाली. 

मुलीचे आईवडीलही जावयाला या सगळ्या भेटवस्तू देऊन सुटकेचा नि:श्वास टाकू लागले. कारण, हे सगळे दिल्यामुळे आता त्यांच्या मुलीला सासरी मान मिळेल, चांगली वागणूक मिळेल असे त्यांना वाटू लागले. 

नवऱ्यामुलींनाही आपल्या आईवडिलांकडून खूप काही मिळणे अभिमानास्पद वाटू लागले. नवीन घरात प्रवेश केल्यानंतर आपले माहेर किती श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्याची प्रत्येक संधी त्या घेऊ लागल्या. त्या ज्या घरात जातात त्यात त्यांची ऐहिक श्रेष्ठता प्रस्थापित करण्यासाठी हुंडा महत्त्वाचा ठरतो. भलामोठा हुंडा घेऊन न आलेल्या सुनांचा दर्जा कमी असतो आणि त्या एकतर सासरच्यांशी भांडतात किंवा आईवडिलांना अधिक हुंडा देण्यास भाग पाडतात, जेणेकरून, त्यांना नवऱ्याच्या घरात आदराचे स्थान मिळेल. 

हुंड्याचे परिणाम 

वर दिलेल्या संघर्षांचा परिणाम कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर होतो आणि हे संघर्ष वेगवेगळे आकार घेऊ शकतात. उदाहरणार्थ, कुटुंबाचे विभाजन होते, जोडपी वेगळी होतात, न संपणारी शत्रुत्वाची भावना निर्माण होते, कोर्टात खटले होतात, आनंद पार हरवून जातो आणि व्यक्तिगत हाडवैर निर्माण होते. 

लग्नाची चर्चा सुरू झाली की बहुतेक सर्व कुटुंबात स्त्रीच स्त्रीची शत्रू असल्यासारखे चित्र निर्माण होते. सुनेने लग्नानंतर किती पैसा व सोन्याचे दागिने आणायचे आणि आपल्या ताब्यात द्यायचे याबद्दल वाटाघाटी करताना नवऱ्यामुलाची आई जिभेच्या एका फटकाऱ्याने सर्व कुटुंबाला गप्प करते.

आपणही लग्न करून आलो तेव्हा हुंडा घरात आणला होता असा युक्तिवाद काही स्त्रिया करतात, तर काही स्त्रिया सुनेने आणलेले दागिने आपल्या मुलीला तिच्या लग्नात हुंडा म्हणून देतात. हे सुनेला व तिच्या आईवडिलांना आवडत नाही. 

नवऱ्यामुलाचे कुटुंबीय किंवा स्वत: नवऱ्यामुलाने मागितलेला बेसुमार हुंडा देणे परवडत नाही, अशा आईवडिलांच्या परिस्थितीचा विचार करून बघा. हुंड्याच्या या प्रथेमुळे मुलीचे लग्न करून देणे त्यांच्यासाठी ओझे होते. 

हुंडेच्या प्रथेमुळे मुलींबद्दल घृणा निर्माण होते आणि नवजात मुलींच्या हत्येसारख्या गुन्ह्यांकडे लोक प्रवृत्त होतात,  बळजबरीने गर्भपात घडवले जातात, कुटुंबाच्या एकीला तडे जातात, जोडप्यांचे चांगले नातेसंबंध खराब होतात, शत्रुत्व वाढते आणि तरुण सुनांना जाळून किंवा अन्य मार्गांनी ठार मारण्याचे प्रकारही होतात. 

हुंडा मागणे हा पुरुषार्थ नव्हे!

लोभीपणा, सहज पैसा मिळवण्याचा मोह, मित्रमंडळींमध्ये खोटी प्रतिष्ठा या कारणांमुळे मुलगा मुलीच्या आईवडिलांकडे हुंड्याची मागणी करतो. मात्र, आपण स्वत:ला पुरुषवेश्येप्रमाणे विकत आहोत हे त्याच्या लक्षात येत नाही. 

मुलाच्या आईवडिलांनी मागितलेल्या हुंड्याची मागणी मुलीचे आईवडील पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत तो अत्यंत आज्ञाधारक मुलासारखा वागतो. 

कष्टाशिवाय मिळालेला पैसा आपल्याला आयुष्यात कधीही वर उचलणार नाही हे लग्नाला उभ्या राहिलेल्या मुलाने समजून घेतलेच पाहिजे. मुलीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती त्याने संवेदनशीलतेने समजून घेतलीच पाहिजे. 

लक्षात ठेवा हुंडा घेतल्याचा अपराधीभाव तुमच्या मनात कायम राहील आणि हुंडा म्हणून जे काही मिळाले आहे त्याचे खऱ्या अर्थाने मालक तुम्ही होऊ शकणार नाही.

तुम्ही पालक म्हणून काय करू शकता?

हुंडा मागणे हा समाजात प्रतिष्ठा कमावण्याचा मार्ग नाही, तर एक शाप आहे, एक पाप आहे, हे मुलाचे लग्न करू इच्छिणाऱ्या प्रत्येक कुटुंबाने समजून घेतले पाहिजे. हुंडा मागणाऱ्या मुलाचा व त्याच्या कुटुंबाचा समाजातील दर्जा प्रत्यक्षात खालावतो. 

नवीन नाते जोडताना आर्थिक बाबीमुळे काही कमी पडत असेल तर ते समजून घेण्याची व त्याच्याशी जुळवून घेण्याची नैतिक जबाबदारी नातेवाईकांनी व आईवडिलांनी स्वीकारावी तसेच समोरच्याला अवघडून टाकणाऱ्या तसेच कमी लेखणाऱ्या टिप्पण्या करणे टाळावे. तरच हुंड्याची अनिष्ट प्रथा दूर होईल किंवा मुळापासून नष्ट होईल आणि लग्नेच्छुकांची आयुष्ये सोपी होतील. 

आईवडिलांनी आपल्या इच्छेने मुलामुलींना दिलेली मालमत्ता नवविवाहितांनी नाकारू नये पण विवाहासाठी पूर्वअट म्हणून केलेल्या कोणत्याही मागणीला ठाम विरोध करावा. 

हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी प्रत्येक जबाबदार पालकाने प्रोत्साहन द्यावे तसेच आपल्या मुलांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी व मन:शांतीसाठी प्रयत्न करावे.

Exit mobile version