Site icon MH General Resource

इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या योजना

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) नियम, २००७ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने दि. १ मे, २०११ रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केलेली आहे. राज्यातील इमारत व इतर बांधकाम आस्थापनाकडून जमिनीची किंमत वगळून बांधकाम खर्चाच्या १% दराने उपकर वसूल करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जमा करण्यात येत आहे.

जमा झालेला उपकर निधी राज्यातील इमारत व बांधकाम कामगाराच्या कल्याणकारी योजनासाठी वापरण्यात येत असतो. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कामगार विभागाच्या कार्यालयामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यात येते. त्यासाठी खालील पात्रता व कागदपत्रांची आवश्यकता असते.

पात्रता :-

• १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार

• मागील बारा महिन्यामध्ये ९० दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

• वयाबाबतचा पुरावा

• मागील वर्षभरात ९० दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

• पासपोर्ट आकारातील ३ रंगीत फोटो

• रहिवासी पुरावा (Address Proof)

• फोटो आयडी पुरावा

• बॅंक पासबुकची झेरॉक्स

कामगाराने नोंदणी केल्यानंतर नोंदणी जीवित असेपर्यंत त्या कामगारास मंडळाच्या सर्व योजनांचे लाभ घेण्यासाठी तो पात्र ठरतो. पालघर जिल्ह्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांची कामगार उपआयुक्त यांचे कार्यालय पालघर, एमआयडीसी कर्मचारी वसाहत, चित्रालय, हॉटेल सरोवरसमोर, बोईसर (पश्चिम), जि.पालघर, या कार्यालयात बांधकाम कामगारांची नोंदणी करणे व त्यांना लाभ वाटप करण्यात येते.

सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगारांस विविध १९ कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्या पुढीलप्रमाणे.

• नोंदीत लाभार्थी स्त्री बांधकाम कामगारांस तसेच नोंदित पुरुष लाभार्थी बांधकाम कामगारांच्या पत्नीस दोन जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी रु. १५,००० (रु. पंधरा हजार फक्त) व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी रु. २०,०००/- (रु. वीस हजार फक्त) एवढे आर्थिक सहाय्य.

• नोंदित लाभार्थी बांधकाम कामगारांच्या प्रति शैक्षणिक वर्षी शाळेतील किमान ७५% किंवा अधिक उपस्थिती असणाऱ्या दोन पाल्यांस इयत्ता १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी रु. २,५००/- (रु. दोन हजार पाचशे फक्त) आणि इयत्ता ८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी रु. ५,०००/- (रु. पाच हजार फक्त) एवढे शैक्षणिक आर्थिक सहाय्य.

• नोंदित लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी मध्ये किमान ५०% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु. १०,०००/- (रु. दहा हजार फक्त) एवढे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य.

• नोंदित लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी च्या शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्षी रु. १०,०००/- (रु. दहा हजार फक्त) एवढे शैक्षणिक सहाय्य.

• नोंदित लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रु. २०,०००/- (रु. वीस हजार) एवढे शैक्षणिक सहाय्य.

• नोंदित लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यासाठी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादीसाठी प्रती शैक्षणिक वर्षी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरीता रु. १,००,०००/- (रु. एक लाख फक्त) व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरीता रु. ६०,०००/- (रु. साठ हजार फक्त) इतके शैक्षणिक सहाय्य.

• नोंदित लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रती शैक्षणिक वर्षी वीस हजार फक्त आणि पदव्युतर पदवीका मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रती शैक्षणिक वर्षी पंचवीस हजार एवढे आर्थिक सहाय्य.

• नोंदित लाभार्थी कामगार अथवा त्याच्या पती / पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षांपर्यंत एक लाख रूपये मुदत बंद ठेव.

• नोंदित लाभार्थी कामगारांस ७५% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास रु. दोन लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य. तथापि नोंदीत बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत रु. दोन लाख आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ अनुज्ञेय राहील.

• नोंदित लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास रु. दहा हजार एवढी रक्कम अंत्यविधीसाठी मदत.

• नोंदित लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस प्रतिवर्षी रु. चोवीस हजार एवढे आर्थिक सहाय्य (फक्त पाच वर्षांपर्यंत)

• नोंदित लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रु. पाच लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य

• लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटूंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ रु. एक लाख एवढे वैद्यकिय सहाय्य (एका सदस्यास केवळ एकदाच आणि कुटूंबातील दोन सदस्यांपर्यंत मर्यादित) तथापि, आरोग्य विमा योजना लागू नसल्यासच सदर योजनेचा लाभ देण्यात यावा.

• संगणकाचे शिक्षण (MS-CIT) घेत असलेल्या नोंदीत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना, शुल्काची परीपुर्ती, तथापि MS-CIT उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपुर्तीसाठी करण्यात यावी.

• नोंदित लाभार्थी बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपुर्तीसाठी तीस हजार रूपये अनुदान.

• दिनांक ३१ ऑगस्ट २०१४ रोजी नोंदणी जिवीत असलेल्या सवर् नोंदीत बांधकाम कामगाराना दैनंदिन गरजेच्या वस्तु खरेदीसाठी प्रति कामगार रूपये तीन हजार एवढे अर्थसहाय्य.

• नोंदित बांधकाम कामगारांच्या पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप.

• महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांकरीता व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत उपचाराकरीता नोंदीत बांधकाम कामगारास रुपये सहा हजार इतके अर्थसहाय्य.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी उपयुक्त/आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता प्रतीकुटूंब रु. पाच हजार अर्थसहाय्य देणे.

Exit mobile version