Site icon MH General Resource

प्रदर्शनातून व्यवसायवृद्धी | Exibition And Business Presentation

मुंबईतील बांद्रा (प.) रेक्लमेशन म्हाडा मैदान येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महालक्ष्मी सरस प्रदर्शनात देशभरातील 476 स्टॉल्स लावण्यात आले. यामध्ये हस्तकलांच्या वस्तु, शोभेच्या वस्तु, गृहपयोगी वस्तु आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ अशा वस्तु विक्रीसाठी पहायला मिळाल्या. शेतकरी व ग्रामीण उत्पादक यांचे उत्पादन विक्रीसाठी हे एक चांगले व्यासपीठ ठरले आहे.

ग्रामीण महिला उद्योजक आणि कारागीरांसाठी उत्पादनवाढीच्या विविध संधी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अत्यंत महत्त्वाची भुमिका पार पाडत आहे. अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्योगांस भरारी देण्याचे काम करत आहे.

महिलांचा गट तयार करुन महिला उद्योजक व ग्रामीण कारागीरांना उत्पादनाच्या विक्री आणि व्यवसायवृद्धीसाठी सतत मार्गदर्शन केले म्हणूनच आज आमच्या उद्योगाने चांगली भरारी घेतली असे देविका ताई म्हणतात.

देविका बबनराव कपाटे यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) जि. ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समिती, भातकुली, अमरावतीअंतर्गत राधिका महिला स्वयंसहायता बचत गटाची स्थापना केली, त्या या बचत गटाच्या अध्यक्ष आहेत.

राधिका बचत गट सध्या लोणच्याचे उत्पादन करत आहे. त्यामध्ये आंबा लोणचे, आवळा, करवंद, कवठ, मिरची, कारले अशी विविध लोणची व मुरब्बा असून गावात, मार्केट आणि प्रदर्शनातही याला चांगली मागणी आहे. राधिका महिला बचत गटाची स्थापना 2007 ला झाली. 10 महिलांचा हा गट एकत्रित कामाचे नियोजनाने यशस्वी होत आहे. राधिका बचत गटाने सुरुवातीला 25,000 चे कर्ज घेतले. एक एकर शेती भाड्याने घेऊन उत्पादन काढले. यात 10,000 चा फायदा झाला. हे पैसे प्रत्येकीने वाटून परत 2 लाख 50 हजाराचे कर्ज काढले. यावेळी सर्वांनी वेगवेगळा व्यवसाय केला. बॅग, कपडे, बँगल्स इत्यादी. कर्जाची परतफेड केली. 2015 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र पुर्णानगर, यांचेकडून 50,000 चे कर्ज मिळाले. याच कर्जावर लोणचे व्यवसाय सुरु केला. 10 महिलांवरही वेगवेगळी कामे सोपविली. दोन महिला हिशेब करतात, दोन महिला कच्चा माल आणतात, इतर महिला माल बनवितात, पॅकींग करतात, दोन महिला प्रदर्शने करतात. माझ्याकडे प्रदर्शनाची जबाबदारी आहे.

लोणचे व्यवसायाला फक्त 2 वर्ष झाले. गेल्या वर्षी अमरावती प्रदर्शनात 50,000 रु. एवढ्या किंमतीचा माल ठेवला. 20 हजार रु. नफा आला. यामध्ये आणखी 20,000 रु. जमा केली. एकूण 90 हजाराचा माल महालक्ष्मी सरस प्रदर्शनात आणला. या प्रदर्शनात राधिका बचत गटाला प्रदर्शनात एकूण 80,000 चा माल विकला. आपल्या ह्या प्रदर्शनातून आम्हाला आणखी नफा मिळेल, याचा विश्वास आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून मालविक्रीसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

अमरावती प्रदर्शनातून राधिका बचत गटाने पुरस्कार मिळविला. उमेदतर्फे राधिका बचत गटाचा सत्कार ही केला. आमच्या या उद्योगाने फारच कमी काळात आम्हाला चांगले यश दिले. उमेदने केलेल्या मार्गदर्शनामुळे व बँकेच्या सहकार्यानेच आमचा बचत गट हे यश संपादन करु शकला. तसेच आम्हाला प्रदर्शनाच्या माध्यमातून मालाच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतचे ज्ञान आत्मसात झाले. उत्पादनाच्या विक्रीसाठी तर शासनाने govki.com संकेत स्थळ निर्माण करुन आम्हाला अधिक दिलासा दिला आहे.

देविका म्हणाल्या, मी स्वत:च साहुर ता. भातकुली (जि. अमरावती) येथे सेविका म्हणून काम करीत होती. यावेळी 300 बचत गट तयार केले. यासाठी मला उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कारही मिळाला. आता उमेदमध्ये CRP म्हणून काम करते. 10 सुत्रांचा वापर करुन यशस्वी उद्योजक घडविण्यासाठी मी काम करते. यामध्ये नियमित बैठक, बचत अंतर्गत कर्ज व्यवहार, कर्जाची परतफेड, अद्यावत लेखा, आरोग्यविषयी माहिती, शासनाच्या विविध योजना, पंचायत व्यवस्थेशी समन्वय साधणे, शाश्वत उपजिवीका, शिक्षणाविषयी माहिती, बचत गटाकडून उन्नती याचे मार्गदर्शन करुन उद्योजक घडविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करत आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने केलेल्या मार्गदर्शनाने माझे जीवन बदलले. त्यांनी उत्पादन निर्मितीपासून ते विक्रीपर्यंत मार्गदर्शन केले. विक्रीसाठी प्रदर्शनासारखे व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळेच आमचा बचत गट एवढा प्रगती करु शकला. मी व माझ्या बचत गटातील सर्व महिलांकडे शेती, कपड्यांची दुकाने, घर यासारख्या सुखसुविधा पुर्ण झाल्या आहेत. प्रदर्शनाच्या माध्यमातून आता आमच्या उत्पादनाला स्थानिक पातळीवरुन मॉलपर्यंत मागणी असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Exit mobile version