बचतगटाच्या महिला उद्योग स्थापनेत मोठ्या प्रमाणावर पुढे येत असून पारंपारीक गृह उद्योगांपलीकडे महिला झेप घेत आहे. पारंपारीक घरगुती खाद्यपदार्थ्यांच्या पुढे जावून पुरुषांच्या बरोबरीने महिला उद्योगांची कास धरीत आहे.
यवतमाळ शहरालगत असलेल्या उमरसरा येथील एका बचतगटाने तर सिएफएल बल्ब निर्मीतीचा उद्योग सुरु केला आहे. या बचतगटाच्या महिला केवळ उद्योग स्थापन करुन थांबल्या नाहीत तर या उद्योगात त्यांनी नेत्रदिपक प्रगती करुन इतर महिलांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
क्रांतीजोती सावित्रिबाई फुले महिला बचतगट असे गटाचे नाव असून पाच वर्षापूर्वी 10 महिलांनी मिळून या बचतगटाची स्थापना केली. प्रत्येकी 50 रुपये मासिक बचतीतून महिलांनी या उद्योगात भरारी घेतली आहे. पारंपारीक वस्तूंच्या निर्मीतीपलिकडे विचार करुन या महिला आज महिन्याला दोन हजारावर सिएफएल बल्बची निर्मीती करुन त्याची विक्री करतात. बीए शिक्षण झालेल्या सुषमा फुलकर या महिलेच्या संकल्पनेतून हा उद्योग सुरु झाला. श्रीमती फुलकर यांचा मुलगा पुण्याला इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असतांना तो ज्या इमारतीत राहायचा त्या ठिकाणी महिला सिएफएल बल्ब निर्मीतीचा उद्योग करायच्या. एकदा त्यांच्या मुलाने या उद्योगाबद्दल त्यांना सांगितले. त्यांनी तो उद्योग प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तसा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. सीएफएल बल्बची कल्पना डोळ्यासमोर ठेवून सुषमा फुलकर यांनी पुणे येथे यशदाच्या प्रशिक्षण केंद्रात बल्ब निर्मीतीचे प्रशिक्षण घेतले. पुणे येथे या बल्बची निर्मीती करीत असलेल्या महिलांकडूनही त्यांनी या उद्योगाबाबत जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी बचतगटाच्या अन्य महिलांनाही याचे प्रशिक्षण दिले. आज गटातील अन्य महिलांच्या सहकार्याने हा उद्योग यशस्वीपणे उभा राहीला आहे.
बल्बसाठी लागणाऱ्या कच्च्या वस्तू व बल्ब निर्मीतीसाठी लागणारी मजूरी पकडून एकून एका बल्बसाठी 40 रुपये खर्च येतो. बाजारात हा बल्ब 80 रुपयाला विकल्या जातो. उद्योगासाठी बचतगटाने जुलै 2011 मध्ये 1 लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. काही महिन्यातच गटाने कर्जाची परतफेड केली असून महिन्याकाठी 15 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न गटाला होत असल्याचे सुषमा फुलकर यांनी सांगितले. बचतगटाच्यावतीने उत्पादीत या बल्बची 1 वर्षाची गॅरंटीही दिली जाते. या दरम्यान बल्ब खराब झाल्यास दुरुस्त किंवा बदलुन देण्याचे सोयही करुन देण्यात आल्याने ग्राहकांकडून या बल्बला विशेष मागणी आहे. गटाच्या नावाने यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत डा. टि.सी.राठो रूग्णालयाजवळ बल्ब विक्रीचे दुकानही सुरु करण्यात आले आहे. येत्या काळात बल्ब निर्मीतीच्या व्यवसायाला व्यापक स्वरुप दिल्यानंतर लाखो रुपयाची उलाढाल होणार असल्याची प्रतिक्रीयाही श्रीमती फुलकर यांनी व्यक्त केली.