Site icon MH General Resource

बेंजामिन डिझरेली (Benjamin Disraeli)

डिझरेली, बेंजामिन : (२१ डिसेंबर १८०४ – १९ एप्रिल १८८१). इंग्लंडचा एक प्रसिद्ध पंतप्रधान व मुत्सद्दी. कादंबरीकार म्हणूनही तो इंग्रजी वाङ्‌मयेतिहासात प्रसिद्ध आहे. लंडनमधील मध्यमस्थितीतील ज्यू घराण्यात जन्म. त्याचे वडील आयझाक डिझरेली एक ख्यातनाम समीक्षक आणि इतिहासकार होते. त्यांचे ग्रंथालय फार मोठे होते. ज्यू म्हणून आपल्या मुलांना त्रास होऊ नये, म्हणून त्यांनी सर्व कुटुंबियांसह ख्रिस्ती धर्म स्वीकारला. बेंजामिनने मोठ्या ग्रंथसंग्रहाचा व ग्रंथकर्तृत्वाचा फायदा घेऊन घरच्या घरी आपले ज्ञान वाढविले. पुढे त्याने कायद्याचा अभ्यास केला आणि काही दिवस वकिली करण्यात घालविली. वयाच्या सतराव्या वर्षी एका सॉलिसिटरच्या कचेरीत भागीदार म्हणूनही त्याने काही दिवस काम केले. नंतर त्याने शेअर बाजारात लक्ष घातले आणि ‘मरे’ या प्रसिद्ध प्रकाशन कंपनीच्या वतीने एक वर्तमानपत्रही चालविले. यात त्याला अपयश आले. त्याने व्हिव्हियन ग्रे (१८२६) नावाची कादंबरी लिहिली. तिच्यावर टीका झाली आणि तिचा बोलबालाही भरपूर झाला; पण याला कंटाळून त्याने १८२८–३१ च्या दरम्यान इंग्लंडबाहेर दौरा काढला. मनात आणले तर सर्व शक्य आहे, हे तत्त्व त्याने वरील कादंबरीत मांडले होते आणि पुढे ते त्याने प्रत्यक्ष आचरणात आणले. या सुमारास त्याने द यंग ड्यूक (१८३१), द प्रेझेंट क्रायसिस एक्झामिन्ड (१८३१), व्हॉट इज ही ? (१८३३), व्हिंडिकेशन ऑफ द ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन (१८३५), काँटारीनी फ्लेमिंग (१८३२) वगैरे पुस्तके लिहिली होती.

साहित्यात थोडेसे नाव मिळाल्यावर तो राजकारणात पडला. त्याला चित्रविचित्र कपडे वापरण्याची मोठी हौस होती. पहिल्या काही निवडणुकांत तो पराभूत झाला, तथापि १८३७ मध्ये तो टोरी पक्षातर्फे पार्लमेंटमध्ये निवडून आला. त्याचे पहिलेच भाषण फार रटाळ झाले. ते अर्ध्यावरच त्याला सोडावे लागले; पण तो आत्मविश्वासाने म्हणाला, की ‘एक वेळ अशी येईल की, ज्या वेळी तुम्ही माझे भाषण ऐकून घ्याल’. या सुमारास त्याने विनडम ल्यूइस या सु. १२ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या श्रीमंत विधवेशी लग्न केले. त्यामुळे त्याचा आर्थिक प्रश्न काहीसा सुटला. राजसत्ता मजबूत असावी आणि धर्मास राजकारणात मानाचे स्थान असावे, असे त्याचे मत होते. धान्यावरील जकात (कॉर्न लॉज) रद्द करण्याच्या पील याच्या धोरणास त्याने कसून विरोध केला. व्हिग पक्षाच्या मदतीने जकात रद्द करण्यात जरी पीलला यश मिळाले, तरी दुसऱ्या एका मुद्द्यावर डिझरेलीने सर्व टोरी पक्ष हाताशी धरून पीलचा पराभव केला व त्यास राजीनामा देण्यास भाग पाडले. टोरी पक्षाची छकले उडाली आणि काही वर्षांनी पीलचे अनुयायी ग्लॅडस्टनसह व्हिग पक्षाला मिळाले. १८५२ मध्ये डिझरेली टोरी पक्षाचा प्रमुख म्हणून कॉमन्समध्ये निवडून आला. पक्षप्रमुख या नात्याने लॉर्ड डर्बी हाउस ऑफ लॉर्ड्‌समध्ये होता. त्याच वर्षी डर्बीच्या मंत्रिमंडळात त्यास अर्थमंत्र्याची जागा मिळाली; पण त्याने मांडलेल्या सुधारणा विधेयकावर ग्लॅडस्टन वगैरेंनी जोरदार हल्ले केले. विधेयक संमत होऊ शकले नाही. साहजिकच डर्बी मंत्रीमंडळाचा पराभव झाला. पुन्हा १८६६ च्या डर्बी मंत्रीमंडळात तो पुन्हा अर्थमंत्री झाला. त्याने पूर्वीचे सुधारणा विधेयक संमत करून घेतले व १८६८ मध्ये तो पंतप्रधान झाला; पण काही महिन्यांतच त्याच्या पक्षाचा निवडणुकीत पराभव झाला आणि व्हिग पक्षाचे मंत्रीमंडळ सत्तेवर आले. मात्र पुढे त्याने जोर धरून टोरी पक्षाचे बल वाढविले आणि १८७४ मध्ये त्याच्या आयुष्यातील महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली. भरपूर टोरी मताधैक्य असलेल्या पार्लमेंटमध्ये तो पंतप्रधान झाला. राणीने त्यास १८७६ मध्ये अर्ल ऑफ बीकन्सफील्ड या नावाचे उमरावपद दिले. आपल्या १८७४–८० या कारकिर्दीत त्याने अनेक महत्त्वाची विधेयके संमत करून घेतली. यांपैकी १८७४ व १८७८ चे अनुक्रमे फॅक्टरी अधिनियम आणि गरिबांसाठी केलेल्या कायद्यातील दुरुस्ती, हे महत्त्वाचे होते. याशिवाय त्याने सुएझ कालव्यावर ब्रिटनचे आधिक्य राखण्याकरिता ईजिप्तच्या खेदिवाकडून भरपूर शेअर्स विकत घेतले; व्हिक्टोरिया राणीला भारताची सम्राज्ञी हा किताब दिला. रशियाने भारताच्या वायव्येकडे बलिष्ट होऊ नये, म्हणून योग्य ती दखल घेतली आणि प्रिन्स बिस्मार्कच्या मदतीने बर्लिन परिषदेत भाग घेऊन सन्माननीय तह घडवून आणला.

त्याच्या अखेरच्या दिवसांत झूलू युद्ध व आर्थिक प्रश्नांची गुंतागुंत यांमुळे त्याची लोकप्रियता ओसरली. १८८० च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्याच्या पक्षाचा पराभव झाला. ग्लॅडस्टनच्या हाती सूत्रे सोपवून तो १८८० मध्ये ह्यूअंडन येथे राहावयास गेला आणि तेथेच श्वासनलिकादाहाने मरण पावला.

राजकारणात त्याने अनेक सुधारणा केल्या. आधुनिक कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या निर्मितीचे सर्व श्रेय त्यास द्यावे लागेल. राजकारणाप्रमाणे साहित्यातही त्याने मोलाची भर घातली. त्याची काही पुस्तके आजही लोकप्रिय आहेत. त्यांत विशेष उल्लेखनीय व्हिव्हियन ग्रे (१८२६), व्हेनिशिया (१८३७), हेन्‍रिटा टेंपल (१८३७), कॉनिग्ज्बी (१८४४), सिबिल (१८४५) इ. कादंबऱ्या होत.

संदर्भ :

Exit mobile version