सुशांत आणि दिशा यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे अनेक पुरावे आता समोर येत आहेत. खरे तर ८ जुलैला सुशांतची मॅनेजर म्हणून काम बघणाऱ्या दिशाने आत्महत्या केली तेव्हा जनतेमध्ये कोणतीही खळबळ झाली नव्हती. देशात घडणाऱ्या अनेक आत्महत्यांपैकी एक असाच विचार त्या मागे होता. काही प्रमाणात हाच विचार १४ जुलै रोजी सुशांतसिंग याच्या आत्महत्येनंतर पण होता. काम मिळत नसल्याने, चित्रपट सृष्टीतील काही लोकांच्या घरणेशाहीमुळे सुशांत निराशे मध्ये जात आत्महत्या केली असे वातावरण तयार करण्यात आले होते. हेच वातावरण नेमके या प्रकरणातील काळ्या बाजूवर उजेड पडण्यास कारणीभूत ठरले.
खरे तर पत्रकार शोध घेत होते की सुशांतसिंग राजपूत नक्की का निराशेच्या आहारी गेला त्याचा, घरणेशाहीच्या आरोपात नक्की काय तथ्य आहे त्याचा, पण त्यांच्या हातात वेगळेच घबाड लागले.
सुशांतसिंगच्या घरच्यांनी बिहार मध्ये प्रकरण दाखल केल्या मुळे या प्रकरणाने अजून वेगळी वळणे घेतली, खरे तर जेव्हा कायद्याने बिहार राज्यात प्रकरण पोलिसात नोंदवता येत असेल, तर त्याच कायद्यात बिहार पोलीस मुंबईत येऊन त्या प्रकरणाचा तपास पण नक्कीच करू शकत असतील.
खरे तर नेमक्या याच ठिकाणी राज्य सरकार आणि मुंबई पोलीस यांनी जवाबदार राज्यकर्ते आणि प्रशासकाची भूमिका वठवायला हवी होती. बिहार पोलिसांना आज पर्यंत मुंबई पोलिसांनी केलेला तपास सुपूर्त करायला हवा होता. बिहार पोलिसांना योग्य ती मदत उपलब्ध करून द्यायला हवी होती. त्यात काहीही वावगे नव्हते. मात्र सरकारची विशेषतः शिवसेनेची भूमिका आणि वक्तव्ये, सोबतच मुंबई पोलिसांनी केलेली लपवाछपवी या मुळे जनतेचे लक्ष या प्रकरणाकडे आकृष्ट झाले. त्याच मुळे या प्रकरणात शिवसेना कशी गुंतली असू शकते या वर अनावश्यक चर्चा सुरू झाल्या.
त्याच बरोबर या प्रकरणात अडकलेल्या रिया चक्रवर्ती हिने CBI चौकशी बाबत मारलेल्या कोलांट्या या प्रकरणाचे गांभीर्य वाढवणाऱ्या होत्या. प्रकरण CBI कडे द्यायचे की नाही हा निर्णय घेण्याचा अधिकार जरी राज्य शासनाच्या अधीन असला तरी, अत्यंत अपवादात्मक प्रकरणात स्वतः केंद्र सरकार किंवा न्यायालय पण प्रकरण CBI कडे हस्तांतरित करूच शकतात. या प्रकरणात तर दोन राज्यातून तपास करण्याचे प्रयत्न सुरू होते. सुशांतसिंगचे कुटुंबीय पण CBI चौकशीची मागणी करत होते, या सगळ्या पर्शवभूमीवर राज्य सरकार आणि शिवसेनेने सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक होते.
यातील अजून एक महत्वाची बाजू लक्षात आली का जनतेच्या किंवा शिवसेनेच्या ते माहीत नाही, पण छोट्या शहरातून आलेला, मध्यमवर्गीय कलाकार अशी सुशांतसिंग याची इमेज होती. काही प्रमाणात हे बरोबर पण आहे. मात्र सुशांतसिंग याचा परिवार मोठ्या प्रमाणात प्रशासनात अधिकारपदावर आहे. त्याचे अत्यंत जवळचे नातेवाईक IAS, IPS अधिकारी आहेत. वडील पण बिहार राज्य सरकार मधील अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. त्या मुळे प्रशासन कोणाला वाचवायला कसे काम करते हे त्यांना पक्के माहीत आहे. याच करता आपल्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी जे काही केले ते नेहमी भावनिक राजकारण खेळणारी शिवसेना हाताळू शकली नाही. त्यातच शिवसेनेच्या मित्र पक्षातून पण CBI तपासाचे आवाहन करणे हे शिवसेनेला गोत्यात टाकणारे होते.
एकूण काय ? तर या प्रकरणात शिवसेनेतील कोणी फसलेले असो किंवा नसो, पण हे प्रकरण हाताळतांना शिवसेनेकडून प्रचंड चुका झाल्या, त्या मुळे शिवसेनेला काही प्रमाणात तरी झळ पोहचणार हे नक्की