Site icon MH General Resource

Dharmaj Crop Guard IPO : ऍग्रो सेक्टरमधील आयपीओ येतोय..

Dharmaj Crop Guard

शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात आयपीओ येत आहेत. एकट्या नोव्हेंबरमध्ये डझनभर आयपीओ आले, यात आता आणखी एका आयपीओचे नाव जोडले जाणार आहे. कारण धर्मराज क्रॉप गार्ड  (Dharmraj Crop Guard) या कृषी रसायन उत्पादन कंपनीचा आयपीओ येत आहे. त्याचा प्राईस बँडही निश्चित करण्यात आला आहे.

डीआरएचपीमध्ये कंपनीला आयपीओद्वारे 251 कोटी रुपये उभे करायचे आहेत. हा आयपीओ 28 नोव्हेंबरला उघडेल आणि 30 नोव्हेंबरला बंद होईल. आयपीओसाठी 216-237 रुपयांचा प्राइस बँड   निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटमध्ये 60 शेअर्स असतील. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट आणि जास्तीत जास्त 14 लॉटसाठी बोली लावू शकतात. एका लॉटसाठी 14220 भरावे लागतील.

आयपीओमध्ये 216 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. बाकी रक्कम ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) उभारली जाईल. यामध्ये विद्यमान गुंतवणूकदार 14.83 लाख इक्विटी शेअर्स जारी करतील. 5 डिसेंबरला शेअर वाटप होऊ शकते. तसेच, 8 डिसेंबरपर्यंत लिस्टिंग होईल असा अंदाज आहे.

धर्मराज क्रॉप गार्ड ही अहमदाबादमध्ये स्थित आहे. ही कंपनी कृषी रासायनिक फॉर्म्युलेशनचे मार्केटिंग, डिस्ट्रिब्युशन आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे. कृषी रासायनिक फॉर्म्युलेशनमध्ये इनसेक्टिसाइड्स, फंगिसाइड्स, हर्बिसाइड्स, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, मायक्रो फर्टिलायझर्स आणि एंटिबायोटिक्स यांचा समावेश होतो. कंपनी 25 पेक्षा जास्त देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते. यामध्ये लॅटिन अमेरिका, पूर्व आफ्रिकन देश, मध्य पूर्व आणि पूर्व आशियाई देशांचा समावेश आहे.

आयपीओमधून उभारलेली रक्कम धर्मराज क्रॉप गार्ड कंपनी कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी वापरणार आहे. याअंतर्गत गुजरातमधील भरुचमध्ये उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहे. याशिवाय, हा निधी कर्जाची परतफेड आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल. या आयपीओसाठी एलारा कॅपिटल (इंडिया), (Elara Capital) मोनार्क नेटवर्थ कॅपिटल (Monarch Networth Capital)  बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Exit mobile version