नवी दिल्ली-कोणत्याही सबळ कारणाशिवाय पत्नी सासू-सासऱ्यांपासून दूर राहण्याचा हट्ट पतीकडे करु शकत नाही. असे करणे पतीसाठी दु:खदायक आणि क्रूरतापूर्ण आहे. दिल्ली हाय कोर्टाने पती-पत्नीच्या भांडणावर आधारित एका खटल्या प्रकरणी ही महत्त्वाची टिप्पणी केली आहे. अशा परिस्थितीत पती पत्नीला घटस्फोट देऊ शकतो, असं कोर्टाने म्हटलं आहे. भारतासारख्या देशासाठी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय मार्गदर्शक ठरणार आहे.
न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या बँचने या खटल्याची सुनावणी केली. यात कोर्टाने पतीची घटस्फोटाची मागणी मान्य केली आहे. कोर्टाने सुनावणीवेळी म्हटलं की, पश्चिमी देशाच्या विरुद्ध भारतामध्ये मुलाने आई-वडीलांना सोडून राहणे सामान्य नाही. पती पत्नीसोबत राहण्यासाठी कुटंबाचा त्याग करु शकत नाही.
कोणतंही सबळ कारण नसताना पत्नी सासू-सासऱ्यांना सोडून राहण्याचा हट्ट करु शकत नाही. पतीने आई-वडीलांना सोडावं आणि आपल्यासोबत राहावं अशी मागणी वारंवार करत राहणे योग्य नाही. त्यामुळे अशा परिस्थीत पती पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा प्रस्ताव मांडू शकतो, अशी महत्त्वाची टिप्पणी दिल्ली हायकोर्टाने केली आहे.
पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी पतीने फॅमिली कोर्टात अर्ज केला होता. पण, या कोर्टाने नकार दिल्याने त्याने दिल्ली हाय कोर्टात धाव घेतली. पतीने हिंदू विवाह अधिनियम अंतर्गत अनेक मुद्दे उपस्थित करुन पत्नीपासून फारकत देण्याची मागणी केली होती. त्याने म्हटलं होतं की, त्याची पत्नी एक भांडकुदळ महिला आहे. तसेच घरात मोठ्या लोकांचा सन्मान करत नाही. याशिवाय सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याची वारंवार मागणी करते.