कॅन्सर आणि हेपेटायटस सी औषधांची प्रमुख कंपनी नॅटको फार्माचे (Natco Pharma) मल्टीबॅगर सिद्ध झाले असले तरी यावर्षी या शेअर्समध्ये 38 टक्क्यांची घसरण दिसली आहे. पण आता यात आणखी तेजीचा कल दिसून येत असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. लाँग टर्ममध्ये या शेअरने त्यांच्या गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे 1 कोटी बनवले आहेत. पण सध्या या शेअर्समध्ये घसरण दिसून येत असल्याने आयसीआयसीआय डायरेक्टने हे शेअर्स विकण्याऐवजी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने यामध्ये गुंतवणुकीसाठी 660 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे, जे सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 16 टक्के जास्त आहे. त्यांची मार्केट कॅप 10,350.08 कोटी रुपये आहे
नॅटको फार्मा कॉम्प्लेक्स जेनेरिक उत्पादने बनवते, शिवाय त्यांची यूएस मार्केटमध्ये चांगली उपस्थिती आहे. भारतातही ही कंपनी कँसरच्या उपचारांसाठी 39 ब्रँडच्या नावे औषध विक्री करते. ही कंपनी एपीआय अर्थात ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रिडिएंट्सही तयार करते. आता या कंपनीने पीक संरक्षणातही पाऊल टाकले आहे. या सर्व कारणांमुळे ब्रोकरेज फर्मने त्यात गुंतवणूक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
आजपासून 20 वर्षांपुर्वी अर्थात 22 नोव्हेंबर 2002 रोजी नॅटकोचे शेअर्स 4.24 रुपयांना होते. आता ते 133 पट वाढून 566.95 रुपयांवर पोहोचलेत. म्हणजे त्या वेळी गुंतवलेले 1 लाख रुपये सध्या 1.33 कोटी रुपये झालेत. पण सध्या या शेअर्सवर दबाव दिसत आहे. यावर्षी 17 जानेवारीला तो 942.15 रुपयांवर होता, जो एका वर्षातील उच्चांक आहे. यानंतर विक्रीमुळे तो 14 नोव्हेंबर 2022 पर्यंत 40 टक्क्यांनी घसरला आणि 563 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला. पण आता यापुढे रिकव्हरी दिसू शकते असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.