हिकी, जेम्स ऑगस्टस : (१७४०–१८०२). कलकत्ता (कोलकाता) येथे हिकी’ज बेंगॉल गॅझेट (१७८०) हे भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र सुरू करणारा आयरिश नागरिक आणि ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला अधिकृत मुद्रक. हिकीने आयर्लंडमध्ये मुद्रक, वकिलाचा कारकून, खलाशी, शल्यचिकित्सकाचा मदतनीस अशी विविध कामे केली. पुढे तो अनेक यूरोपियांप्रमाणे भारतात कलकत्ता येथे आला (१७७३). तेथे सुरुवातीला त्याने काही कर्जाऊ पैसे घेऊन कलकत्ता ते मद्रास दरम्यान व्यापार करण्यासाठी एक छोटे जहाज विकत घेतले. या व्यापारात त्याचा तोटा झाला; तथापि देणेकऱ्यांनी तगादा लावल्याने कर्ज फिटेपर्यंत त्याला तुरुंगात राहावे लागले (१७७६). दरम्यान हिकीने तुरुंगात जाण्याआधी जमवलेले २००० रुपये एका मित्राला दिले होते. त्या रकमेतून त्याने तुरुंगातच एक छापखाना विकत घेऊन तेथून तो छपाईची अनेक कामे करू लागला. पुढे दोन वर्षांनंतर त्याची कर्जमाफीसोबतच निर्दोष मुक्तता करण्यात आली.
हिकीला पुढे ईस्ट इंडिया कंपनीतर्फे एक मोठे कंत्राट मिळाले. कंपनीच्या वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एक नियमावली तयार करण्यात आली होती. जुनी नियमावली अस्पष्ट आणि परस्परविरोधी असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन अनेक ब्रिटिश अधिकारी भ्रष्टाचार करीत. नव्या नियमावलीमुळे या सर्वांना आळा बसणार होता. कंपनीचा मुख्य कमांडर सर आयर कूट याच्याशी बोलून हिकी त्याच्या छपाईची अंदाजे किंमत सादर करणार एवढ्यात कूटने कलकत्ता सोडले. या दरम्यान गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या दोघा मित्रांनीही एक छापखाना सुरू केला होता. कंपनीसंबंधी छपाईची कामे त्यांना मिळू लागली. नवीन नियमावलीमुळे भ्रष्टाचाराला कमी वाव राहणार असल्यामुळे अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी हिकीच्या कामात अनेक अडथळे आणायला सुरुवात केली. कंपनीचा थंडा प्रतिसाद पाहून हिकीने स्वत:चे वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन यूरोपीय समाजात वृत्तपत्रांना महत्त्वाचे स्थान असल्यामुळे या द्वारे त्याला लोकांवर प्रभाव पाडता येणार होता.
हिकीचे बेंगॉल गॅझेट हे दर शनिवारी प्रकाशित होणारे साप्ताहिक वृत्तपत्र चालू झाले (१७८०). एका प्रतीची किंमत एक रुपया होती. सामान्य यूरोपियनांना ‘ओपन टू ऑल पार्टीज, बट इन्फ्लुअन्सड बाय ननʼ अशा जाहिरातीमुळे हिकीच्या वृत्तपत्राबद्दल उत्सुकता होती. वृत्तपत्रातून हिकीने रस्त्यांची डागडुजी, सांडपाण्याची व्यवस्था, समाजातील स्त्रियांचे स्थान इ. अनेकविध विषयांना वाचा फोडून सर्वसामान्य जनतेचा आवाज बनण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पहिले इंग्रज-मराठा युद्ध आणि हैदर अलीसोबतच्या पोल्लिलूरच्या लढाईत कंपनीचे खूप नुकसान झाले. त्यामुळे इंग्रजांच्या लष्करी सर्वश्रेष्ठतेवरचा हिकीचा विश्वास उडून त्याने युद्धाचे दुष्परिणाम, धान्यांच्या वाढलेल्या किंमती, दुष्काळ इत्यादी अनेक पैलूंवर लेखन केले. सर्वदूर प्रसिद्धीमुळे इंग्लंड व अमेरिकेमधीलही अनेक वृत्तपत्रे भारतातील माहितीचा प्रमुख स्रोत म्हणून हिकी’ज बेंगॉल गॅझेटचा वापर करू लागली; तथापि हळूहळू सरकारच्या जाहिराती बेंगॉल गॅझेट ऐवजी इंडिया गॅझेट या उच्चभ्रू आणि शासनाची तळी उचलून धरणाऱ्या वृत्तपत्रामध्ये छापून येऊ लागल्या. हिकीवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरूपयोग केल्याची अप्रत्यक्षपणे टीका होऊ लागली. त्याला उत्तर म्हणून हिकीने ‘मी पत्रकार का झालोʼ अशा शीर्षकाचा एक मोठा लेख लिहिला. त्यातच लाच देऊ केल्याबद्दल व्यापार खात्याच्या प्रमुखावर त्याने कडक टीका केली. यामुळे त्यावर हेस्टिंग्जची इतराजी होऊन त्याने हिकीला कंपनीच्या पोस्टाचा वापर करण्यास बंदी घातली. प्रत्युत्तरादाखल हिकीने वीस हरकाऱ्यांना सेवेत दाखल करून घेतले आणि त्यांच्याद्वारे वृत्तपत्र वितरण कायम ठेवले. त्याचे वर्गणीदारही या काळात वाढले.
हिकीने पुढे काही सरकारी कंत्राटांमधील भ्रष्टाचाराचे स्वरूप उघड केले. कंपनीच्या सैनिकांना पुरवले जाणारे अन्न आणि ओझेवाहू बैल यांसाठीच्या कंत्राटाची किंमत चार लाखांपासून हेस्टिंग्जने दहा लाख रुपयांपर्यंत वाढवली. याखेरीज बरद्वान जिल्ह्यात नदीकाठी बंधारे बांधण्याच्या पूलबंदी कंत्राटाची किंमत पंचवीस हजारांपासून नव्वद हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. शिवाय सर एलिजा इंपी याची दिवाणी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी झालेली वादग्रस्त नेमणूक, अशा मनमानी नेमणुकांचा समाचार घेतानाच हिकीने इशारा दिला की, लोकांना जर हे सरकार आपले प्रतिनिधित्व करत नाही असे वाटल्यास ते उठाव केल्याशिवाय राहणार नाहीत. त्या दरम्यान कलकत्त्याहून मद्रासला जाताना कर्नल पीअर्सच्या सैन्याला नागपूरकर भोसल्यांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक सैनिक पीअर्सला सोडून पळून गेले. त्या सैन्यातील शिपायांच्या अनेक तक्रारींना हिकीने वाचा फोडली. हिकीच्या अफवांवर लक्ष देऊ नये, अशा अर्थाचे पत्र पीअर्सने हेस्टिंग्जला पाठवले. या प्रकरणाबद्दल लिहिताना हिकीने हेस्टिंग्जला उद्देशून हुकूमशहा, मोगल असे शब्द वापरून, सततच्या युद्धांमुळे हेस्टिंग्जची लैंगिक क्षमता नष्ट झालेली आहे, असा अश्लाघ्य आरोपही केला. कंपनीच्या शिपायांनी हेस्टिंग्जच्या साम्राज्यवादाविरुद्ध उठाव करावा, असे सुचवणारे एक पत्रही त्याने छापले. उपरोध, बोचरा विनोद, जनसामान्यांबद्दलची कळकळ आणि सत्तेला शहाणपणा शिकवण्याचे धारिष्ट ही हिकीची मुख्य अस्त्रे होती.
लवकरच हिकीने चर्चमधील भ्रष्टाचाराकडेही वक्रदृष्टी वळवली. मूळचा स्वीडनचा जॉन झकारिया कीरनांडर हा तत्कालीन कलकत्त्यातील एक प्रतिष्ठित पाद्री होता. तत्कालीन गव्हर्नर-जनरल रॉबर्ट क्लाईव्हने कॅथलिक चर्चमधील पोर्तुगीजांना हाकलून कीरनांडरला १७५७ मध्ये ते चर्च बहाल केले होते. झटून काम केल्यामुळे कीरनांडरच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. एखादे अतिभव्य चर्च उभारण्याच्या इच्छेपोटी त्याने बांधकाम व्यवसायातून खूप पैसा मिळवला. कीरनांडरचे वय झाल्यामुळे त्याच्यानंतर चर्चची जबाबदारी स्वीकारण्यासाठी जर्मनीहून जोसेफ डीमर हा तरुण पाद्री कलकत्त्यात आला (१७७९). या वेळी जमाखर्चाचे हिशेब बघताना डीमरला धक्का बसला. चर्चला दिलेल्या अनेक देणग्यांची चर्चा शहरभर असताना हिशेबात मात्र त्यांचा उल्लेखही नव्हता. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे त्याने बांधलेले चर्च व शाळा या कीरनांडरच्या वैयक्तिक मालकीच्या राहिल्या. तसेच डीमरच्या कुटुंबाची मिशन हाउसमधील हकालपट्टी आणि त्याच्या पगाराचा काही भाग न देणे, यांमुळे डीमरचा संताप अनावर झाला. १७८१ साली त्याने हिकीशी संपर्क साधून हा तपशील कळविला. हिकीने आपल्या नेहमीच्या शैलीत कीरनांडरचा खरपूस समाचार घेतला. तेव्हा हिकीवर हेस्टिंग्जकडून तीन, तर कीरनांडरकडून दोन मानहानीचे आरोप लावण्यात आले. नुकसानभरपाईबद्दल त्याला सुरुवातीला चार हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. तो सरन्यायाधीश इंपीमुळे तब्बल दहापटीने वाढवण्यात आला. इंग्लंडमधील काही खटल्यांचा हवाला देत, आपल्या मूलभूत हक्कांवर न्यायाधीशांनी गदा आणल्याचा युक्तिवाद करून हिकीने नुकसानभरपाईची रक्कम कमी होण्याकरिता दोन अर्ज केले आणि न्यायाधीश आणि हेस्टिंग्ज यांची खिल्ली उडवणारे एक प्रहसनही छापले.
पुढे हेस्टिंग्जला ‘क्लाईव्हचा फालतू वारसदारʼ म्हटल्याच्या आरोपातून हिकी निर्दोष सुटला; पण षंढ, मोगल इत्यादी उल्लेखाबद्दल मात्र तो दोषी ठरला. याखेरीज कीरनांडरला ‘पैशाच्या हावेने प्रभावित झालेलाʼ असे संबोधल्याबद्दल हिकीला दोषी ठरवण्यात आले. कंपनीच्या लष्कराला हेस्टिंग्जविरुद्ध उठाव करायला चिथावणी दिल्याचा लेख प्रकाशित केल्याबद्दल आणि त्या द्वारे केलेल्या मानहानीबद्दलही हिकी दोषी ठरला. सरन्यायाधीश इंपीने त्याला एकोणिस महिने तुरुंगवास आणि २५०० रुपये दंड किंवा दंड न भरल्यास दोन वर्षे अशी शिक्षा सुनावली. शिवाय हेस्टिंग्जने दिवाणी न्यायालयात पुन्हा दावा दाखल केला. त्यावर हिकीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हिकीने या सर्व नामवंतांची टवाळी करणारे आणखी एक पत्रक छापले. अखेरीस हिकीने दिवाळखोरी जाहीर केली. त्याचा छापखानाही जप्त करण्यात आला. अशा प्रकारे फक्त दोन वर्षांत भारतातले पहिले इंग्रजी वृत्तपत्र बंद पाडण्यात आले (१७८२).
हिकीचे लेखन यूरोपात पोहोचल्याने कीरनांडरवर खूप टीका झाली. जर्मनीतील मातृसंस्थेने शेवटी कीरनांडरशी संबंध तोडले. पुढे कीरनांडरचे दिवाळे निघून तो १७९९ साली मरण पावला. पुढे सुप्रीम कौन्सिल (सर्वोच्च विधिमंडळ) सदस्य फ्रान्सिस यांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारावर ईस्ट इंडिया कंपनीच्या पर्यवेक्षक समितीचा अध्यक्ष एडमंड बर्कने इंपीला बडतर्फ करून इंग्लंडला परत बोलावले. वॉरन हेस्टिंग्जही यातून सुटला नाही. १७८४ च्या नवीन कायद्यानुसार कंपनीच्या अनिर्बंध सत्तेवर अनेक बंधने आली होती. एडमंड बर्कने हेस्टिंग्जवर महाभियोगाचा खटला चालू केला; पण यातून हेस्टिंग्ज निर्दोष मुक्त झाला.
हिकीची १७८४ साली तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. त्याने पुन्हा वृत्तपत्र चालू करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. कंपनीच्या अधिसूचना, नियमावली छापल्याचे पैसे मिळावेत म्हणून त्याने कंपनीमागे अनेक वर्षे तगादा लावला. बऱ्याच खटपटींनंतर हिकीला त्रेचाळीस हजारांऐवजी केवळ सात हजार रुपये मिळाले (१७९५).
एका व्यापारी गलबतावर हिकीचा मृत्यू झाला.
संदर्भ :
- Otis, Andrew, Hicky’s Bengal Gazette: the untold story of India’s first newspaper, Tranquebar, Chennai, 2018.