_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee टॉमस जेफर्सन (Thomas Jefferson) - MH General Resource टॉमस जेफर्सन (Thomas Jefferson) - MH General Resource

टॉमस जेफर्सन (Thomas Jefferson)

जेफर्सन, टॉमस (jefferson thomas) : (१३ एप्रिल १७४३ – ४ जुलै १८२६). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा तिसरा अध्यक्ष आणि स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा प्रमुख लेखक. व्हर्जिनियातील सधन कुटुंबात शॅडवेल (आल्बेमार्ले) येथे जन्म. तो व्हर्जिनियातील सुखवस्तू समाजात वाढला. त्याने खाजगी रीत्या प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे विल्यम व मेरी या महाविद्यालयांतून (व्हर्जिनिया) आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. त्याला गणित व शास्त्रे या विषयांत गोडी होती; तथापि कायद्याचा अभ्यास करून त्याने वकिलीस सुरुवात केली (१७६७–७४). त्यात त्याला प्रतिष्ठा मिळाली. याच काळात तो हाउस ऑफ बर्जिसिसवर निवडून आला व  राजकारणात त्याने प्रवेश केला. या काळात त्याने कायद्याबरोबर स्थापत्य, संगीत व विविध भाषा यांचा अभ्यास केला. आरंभी तो ललित साहित्यात रस घेत असे; पण पुढे राजकारणाच्या तात्त्विक चर्चेचे ग्रंथ तो वाचू लागला. या सुमारास त्याचे मार्था वेल्झ स्केल्टन या युवतीबरोबर लग्न झाले (१७७२). तिच्याकडून त्यास आणखी काही जमीन मिळाली. साहजिकच त्याने वकिली थांबवून राजकारणात लक्ष घातले. या वेळी अमेरिकेच्या स्वातंत्र्य चळवळीस बरेचसे मूर्त स्वरूप प्राप्त झाले होते. त्याने ए समरी व्ह्यू ऑफ द राइट्स ऑफ ब्रिटिश अमेरिका  (१७७४) हे पुस्तक लिहून इंग्लंडच्या संसदेला अमेरिकेन जनतेवर अधिकार गाजविण्याचा हक्क नाही, हे विचार मांडले. त्याला दुसऱ्या काँटिनेंटल काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला. अमेरिकेन स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करण्याकरिता नियुक्त झालेल्या समितीत त्याला महत्त्वाचे स्थान मिळाले. जाहीरनाम्याचे सर्व लेखन त्याने केले. त्याचा त्याला अभिमान होता.

Telegram Group Join Now

अमेरिकेच्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात तो काही वर्षे व्हर्जिनियाचा गव्हर्नर झाला (१७७९–८१). या वेळी ब्रिटिशांनी व्हर्जिनियात धुमाकूळ घातला. त्याचा दोष जेफर्सनवर आला. तो काही काळ राजकारणातून निवृत्तही झाला. या अवधीत त्याने नोट्स ऑन द स्टेट ऑफ व्हर्जिनिया  हे पुस्तक पूर्ण केले. ते पुढे १७८५ मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची पत्नी १७८२ मध्ये वारली आणि या दोन तीन वर्षांत त्याच्यावर अनेक आपत्ती आल्या. फ्रँकलिननंतर त्याची फ्रान्समध्ये वकील म्हणून नियुक्ती झाली (१७८४–८९). निग्रो, वन्य जमाती इत्यादींशी तद्रूप होणारा जेफर्सन फ्रान्समधील गोरगरिबांचे जीवन जवळून न्याहाळीत असे. अमेरिकेने यूरोपातील औद्योगिक जीवनाची नक्कल करू नये, तसेच धनिकपणावर आधारलेल्या भांडवलशाहीला अवसर देऊ नये, असे त्याचे प्रांजल मत होते. स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यातील व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि घटक राज्याचे स्वातंत्र्य हे भाग दुर्लक्षिले जाऊ नयेत, असे त्यास वाटे. फ्रान्समधून परतल्यावर वॉशिंग्टनच्या पहिल्या मंत्रिमंडळात सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणून त्याचा समावेश झाला (१७९०–९३). मंत्रिमंडळातील अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टनची आर्थिक धोरणे त्याला पसंत नव्हती; म्हणून त्याने १७९३ मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला व आपल्या मताशी सहमत होणाऱ्या लोकांना जवळ घेऊन डेमोक्रॅटिक रिपब्लिकन हा पक्ष स्थापन केला. या पक्षाने त्यास जॉन ॲडम्सबरोबर उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिले (१७९३–१८०१). त्याने १८०० साली अध्यक्षाची निवडणूक लढविली. तेव्हा वृत्तपत्रांनी त्याच्यावर टीका केली; पण अखेर तो निवडून आला. कारण फेडरॅलिस्टांच्या एका तपाच्या कारभारानंतर जनतेला जेफर्सनसारखा स्वातंत्र्यवादी इसम सत्तेवर हवा होता. जेफर्सनने ए मॅन्युअल ऑफ पार्लमेंटरी प्रॅक्टिस  (१८०१) हे पुस्तक लिहून लोकशाहीची जोपासना कशी करायला हवी, याविषयी आपले विचार मांडले. जेफर्सन लागोपाठ दोनदा अध्यक्ष म्हणून निवडून आला. पहिल्या कारकीर्दीत १८०३ साली अमेरिकेन सरकारने फ्रान्सपासून लुइझिॲना हा प्रांत विकत घेतला. त्यामुळे अमेरिकेला मिसिसिपी नदीपासून रॉकी पर्वतश्रेणीपर्यंतचा व कॅनडापासून मेक्सिको आखातापर्यंत पसरलेला भूप्रदेश मिळाला. या प्रदेशाच्या खरेदीला संविधानात मान्यता नव्हती, तरी जेफर्सनसारख्या संविधानावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्याने हा सौदा केला, याचे सर्वांना आश्चर्य वाटले. तथापि यामुळे त्यास लोकप्रियता लाभली; कारण अमेरिकेचे क्षेत्र वाढले होते. त्याचा उपयोग त्याच्या दुसऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत झाला (१८०४). या सुमारास इंग्लंड व फ्रान्स यांचे वैर विकोपाला गेले होते. नेपोलियनच्या कारवायांना जोर चढला होता. त्याचे परिणाम तटस्थ अमेरिकेचा व्यापार व नौकानयन यांवर झाले. या प्रकरणी जेफर्सनने जे काही निर्बंध घातले, त्यांचा त्रास अमेरिकन जनतेला पोहोचू लागला. त्यामुळे जेफर्सनची लोकमान्यता हळूहळू कमी होऊ लागली. तरीसुद्धा तिसऱ्यांदा तो अध्यक्ष म्हणून निवडून आला असता; पण त्याने वॉशिंग्टनचे धोरण अवलंबिले व राजकारणातून निवृत्ती घेतली (१८०९).

उर्वरित आयुष्यात त्याने आपल्या जमीनजुमल्याकडे लक्ष घालण्याचे ठरविले; कारण आतापर्यंतच्या काळात त्याचे अपरिमित नुकसान झाले होते. त्याने स्वतःच्या कल्पनेने माँटिचेलो येथे सुरेख घर बांधले. या वेळेपर्यंत त्यास अतोनात कर्ज झाले होते. काही कर्ज त्याने काही संपत्ती विकून फेडले. १८१९ मध्ये त्याने पुढाकार घेऊन व्हर्जिनिया विद्यापीठाची स्थापना केली, त्याचा तो कुलमंत्रीही होता. अमेरिकेन फिलॉसॉफिकल सोसायटीचा तो कित्येक वर्षे अध्यक्ष होता. अत्यंत निस्पृह, निष्कलंक आणि निष्पाप अध्यक्ष म्हणून त्याची ख्याती होती. यामुळे तो म्हणत असे की, ‘या गोष्टी मला आपत्काली सामर्थ्य पुरवितात’. आपल्या थडग्यावर धर्मसहिष्णुतेचा पुरस्कर्ता, व्हर्जिनिया विद्यापीठाचा संस्थापक आणि जाहीरनाम्याचा लेखक या तीनच गोष्टींची नोंद व्हावी, अशी त्याची अखेरची इच्छा होती. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या दिवशी तो माँटिचेलो येथे मरण पावला.

संदर्भ :

  • Malone, Dumas, Jefferson and His Time4. Vols., Boston, 1948-70.
  • Peterson, M. D. Ed., Thomas Jefferson : A profile, New York, 1967.
  • Peterson, M. D. Thomas Jefferson and the New Nation, Oxford, 1970.

Related Posts

CAA Act

MHGR| News Update| CAA कायदा काय म्हणतो?

CAA Act

LGBTQ

MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

LGBTQ+

ISM office V6

MHGR| ISM office V6 software download for Windows 10

ISM office V6

What is a Domicile Certificate in Marathi

What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी स्थितीचे प्रमाणीकरण करते….

MHGR| महाराष्ट्र शासनाचा करार सूचीबद्ध आयटी कंपनी | Job Vacancy in Aksentt Tech in Mumbai

Government of Maharashtra Contract Listed Company: Aksentt Tech ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदाता आहे जी मोबाईल आणि फिक्स्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क दोन्हीसाठी पायाभूत सुविधा रोलआउट सोल्यूशन्स ऑफर करते. सेवा…

MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य

आता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार मोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *