_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/5884df85cd8e3459fef5f214ffeba583/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee पंडिता रमाबाई (Pandita Ramabai) - MH General Resource पंडिता रमाबाई (Pandita Ramabai) - MH General Resource

पंडिता रमाबाई (Pandita Ramabai)

रमाबाई, पंडिता (Pandita, Ramabai) : (२३ एप्रिल १८५८ – ५ एप्रिल १९२२). स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्या, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी. रमा डोंगरे, पंडिता रमाबाई सरस्वती, रमाबाई डोंगरे, मेधावी, मेरी रमाबाई अशा स्थितंतरातून अतिशय खडतर आयुष्य जगलेली पंडिता रमाबाई सरस्वती बनली आणि स्त्री शिक्षणाची दीपस्तंभ ठरली.

Telegram Group Join Now

रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व अंबाबाई डोंगरे यांच्या पोटी तेव्हाच्या म्हैसूर संस्थानातील (कर्नाटक राज्य) मंगलोरजवळ माळहेरंजी जवळील गंगामूळ नावाच्या डोंगरावरील वस्तीत झाला. अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे, या मताचे ते होते. लक्ष्मीबाईंस व रमाबाईंस त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले. रमाबाईंच्या जन्मानंतर सहा महिन्यांतच आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे सर्व मुलांना घेऊन तीर्थयात्रेला पायी निघावे लागले. या तीर्थयात्रेच्या १५-१६ वर्षांच्या कालखंडात रमाबाईंना आई-वडिलांपासून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले. १८७७ साली दुष्काळात रमाबाईंचे आई-वडील वारले. रमाबाईंनी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळविले होतेच; पण मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड भाषाही त्या अस्खलितपणे बोलू शकत होत्या. त्याचबरोबर त्यांना गुजराती, तुळू व हिब्रू या भाषाही अवगत होत्या. १८७८ साली त्यांचे बंधू श्रीनिवासशास्त्री यांच्यासह प्रवास करीत त्या कलकत्त्याला आल्या. तेथे मात्र त्यांच्या विद्वत्तेचा व बुद्धिमत्तेचा उचित गौरव झाला. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या एकमेव महिला होत. बंगाली स्त्रियांनीही त्यांना ‘भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण’ म्हणून मानपत्र दिले.

रमाबाईंचा कलकत्ता येथे केशवचंद्र सेन यांच्याशी संबंध आला आणि हिंदू धर्माविषयी त्यांच्या मनात काहूर उठले. तत्पूर्वीही त्या हिंदू धर्माविषयी साशंक झाल्याच होत्या. रमाबाईंचा अशा रीतीने सर्वत्र सत्कार होत असतानाच त्यांच्या बंधूंचा १८८० मध्ये मृत्यू झाला. त्या आता एकाकी झाल्या; परंतु कलकत्त्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या शूद्र जातीतील पदवीधर व पुरोगामी विचारांच्या वकिलांनी मागणी घातल्यानंतर त्याच वर्षी त्यांच्याशी त्यांनी विवाह केला. आंतरजातीय विवाह करून रमाबाईंनी चुकीच्या रुढींविरूद्ध बंड पुकारले होते. वैवाहिक जीवन फार काळ त्यांना लाभू शकले नाही; कारण थोड्याच दिवसांत (४ फेब्रुवारी १८८२) अल्पशा आजाराने त्यांचे पती मरण पावले. वडील, आई, बहिण, भाऊ, पती यांच्या मृत्यूनंतरही त्या खचल्या नाहीत. ३१ मे १८८२ रोजी आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिला सोबत घेऊन त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या व त्यांनी स्वतःला पूर्णतः समाज कार्याला वाहून घेतले.

बालविवाह, पुनर्विवाहास बंदी इत्यादी घातक चालीरीती व दुष्ट रूढी यांतून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी १८८२ मध्ये प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इत्यादी ठिकाणी ‘आर्य महिला समाजा’ची स्थापना केली. त्यामार्फत त्यांनी पुरोगामी विचाराची पेरणी सुरू केली. त्यांनी याच वर्षी स्त्रीयांसंदर्भातील स्त्रीधर्मनीति नामक पुस्तक लिहिले. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवासखर्च त्यांनी स्त्रीधर्मनीति या पुस्तकाच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या वाँटिज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टिकोणामुळे, तसेच भूतदया व प्रेमाच्या शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामतः २९ सप्टेंबर १८८३ रोजी वाँटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्यामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या बरोबरच सनातनवादी विचारवंतांचा त्यांनी रोष ओढवून घेतला. त्यांना हिंदू धर्मातील मूर्तिपूजा, पुजाऱ्यांचा दांभिकपणा, देवापर्यंत पोहोचवण्यास लागणारे मध्यस्थ हे त्यांना मान्य नव्हते. मुक्तीसदन बांधण्यापासून ते पूर्ण होऊन त्यांचे कार्य सुरू होईपर्यंत आणि त्यानंतरही रमाबाई पूर्णपणे ख्रिस्तावर विसंबून होत्या. म्हणूनच मुक्ती सदन अथवा मुक्तीमिशन हे रमाबाईंच्या प्रभुवरील प्रगाढ श्रद्धेचे प्रतिक होते. १९१३ मध्ये मुक्ती सदन येथे रमाबाईंच्या कन्या मनोरमा या अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीतून शिकवित असत. त्यावरून त्यांचे मानवतावादी कार्य समोर येते.

आनंदीबाई जोशी यांच्या ६ मार्च १८८६ रोजी होणाऱ्या पदवीदान समारंभास हजर राहता यावे म्हणून त्या फेब्रुवारी १८८६ मध्ये अमेरिकेस गेल्या. हिंदुस्थानातील बालविधवांना उपयुक्त होणारी ‘बालोद्यान शिक्षणपद्धती’ त्यांनी शिकून घेतली व त्यासंबंधी मराठी पुस्तके लिहिली. अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात हिंदू बालविधवांच्या प्रश्नाचा ऊहापोह करणारे द हायकास्ट हिंदू वूमन (१८८७-८८) हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले. स्त्रियांच्या शोषणाच्या मुळाशी असलेल्या पुरुषप्रधान व्यवस्थेची कठोर चिकित्सा रमाबाईंनी त्यांच्या या पुस्तकात केली आहे. एवढेच नव्हे, तर त्या काळातील संपूर्ण देशातील आणि त्यातही महाराष्ट्रातील भौतिक, वैचारिक तसेच सांस्कृतिक व्यवहार ज्या पुरुषप्रधानतेच्या पायावर उभे होते, त्या पुरुषप्रधानतेचे सखोल विश्लेषण, चिकित्सा आपल्याला रमाबाईंच्या या ग्रंथात अभ्यासण्यास मिळते. त्यांच्या विचाराने अमेरिकन प्रभावित झाले. १८८९ मध्ये यूनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले. हिंदुस्थानातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी अमेरिकनांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ व इतरही काही संस्था निर्माण केल्या. मुळ हिब्रू भाषेतील बायबलचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.

रमाबाई अमेरिकेहून परत आल्यानंतर ११ मार्च १८८९ रोजी मुंबईला विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली. त्यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाकरिता स्त्रीप्रतिनिधित्वाचा पुरस्कार केला. केशवपनाविरुद्ध त्यांनी प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीस पाठिंबाही दिला. नोव्हेंबर १८९० मध्ये ‘शारदा सदन’ पुण्यात आणण्यात आले. ‘शारदा सदन’ मध्ये प्रत्येक मुलीला धर्माचे स्वातंत्र्य दिले होते. तरीही गैरसमजातून झालेल्या विरोधामुळे त्यांना आपल्या कार्याचे मुख्य केंद्र केडगाव (जि. पुणे) येथे हलवावे लागले. २४ सप्टेंबर १८९८ रोजी केडगावला ‘मुक्तिसदना’चे उद्घाटन करण्यात आले. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यात ३०० हून अधिक उच्चवर्णीय स्त्रिया होत्या. तत्पूर्वी १८९८ साली रमाबाई जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत पुन्हा अमेरिकेत जाऊन आल्या. त्यांच्या सांगण्यावरून ‘रमाबाई असोसिएशन’ बंद करण्यात येऊन ‘अमेरिकन रमाबाई असोसिएशन’ ही नवी संस्था स्थापन करण्यात आली आणि ‘शारदा सदन’ ही संस्था ख्रिस्ती संस्था म्हणून काम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. अमेरिकेहून परत आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याचे क्षेत्र वाढविले. ‘कृपासदना’ला जोडून एक रुग्णालय बांधण्यात आले. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन’, ‘शारदा सदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून निरनिराळ्या गटांचे लोक राहत. आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून रमाबाईंनी शारीरिक श्रमाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इत्यादी कामे शिकविली. ‘मुक्तिसदना’त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे मुलींच्या साह्याने उत्पन्न काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता ‘सायं घरकुला’ ची व्यवस्था त्यांनी केली. १९१९ मध्ये रमाबाईंना त्यांच्या या समाजकार्याबद्दल ‘कैसर-ई-हिंद’ हे सुवर्ण पदक देण्यात आले.

अबला स्त्रीयांची मागासलेल्या हालाखिची परिस्थिती, पुरुष व अन्य महिलांकडून त्यांची होणारी पिळवणूक, अनिष्ट रूढी व परंपरा यांविरूद्ध त्यांनी आवाज उठवला. कुमारी मातांसाठी केंद्र, स्त्री साहाय्यता केंद्र, गरीब मुलींसाठी शाळा असे अनेक उपक्रम राबवून त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ पुढे चालू ठेवली. महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचे प्रयत्न होते. हा फक्त कपड्यापुरता मुद्दा नव्हता, तर स्त्री स्वातंत्र्य व स्वनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते.

रमाबाई आपल्या वडिलांप्रमाणेच काळाच्या पुढे होत्या. अत्यंत बुद्धिवान असलेल्या या महिलेचे अंतःकरण अत्यंत उदार व दीनदुबळ्या स्त्रियांकरिता सतत तळमळणारे होते. वैयक्तिक दुःखांची किंवा अडचणींची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. त्यांनी जरी दीनदुबळ्यांच्या सेवेचे व्रत स्वीकारले, ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तरी कोणताही विशिष्ट ख्रिस्ती धर्मपंथ त्यांनी स्वीकारला नाही. त्या धर्माने ख्रिस्ती झाल्या; मात्र त्यांनी हिंदू समाज व संस्कृती कधी सोडली नाही. शेवटपर्यंत त्या शाकाहारी राहिल्या. त्यांनी सतत खादी वापरली व आश्रमवासींनाही ते वापरायला लावली. स्त्रियांच्या उद्धाराकरिता त्यांनी आजन्म व अथकपणे केलेले प्रयत्न त्यांच्या समर्मित जीवनाचेच एक अंग होते. ज्या व्यक्त्तींनी आपल्या सेवेने भारताची प्रतिष्ठा वाढविली त्यांमध्ये रमाबाईंचे स्थान वैशिष्टपूर्ण आहे.

रमाबाईंचे महत्त्वपूर्ण पुस्तके खालीलप्रमाणे आहेत : स्त्रीधर्मनीति (१८८२); द हायकास्ट हिंदू वूमन (१८८७-८८); इबरी (भाषेचे) व्याकरण (१९०८); नवा करार (१९१२); बायबल (मराठी भाषांतर); प्रभू येशू चरित्र (१९१३); भविष्यकथा (२ री आवृ. १९१७); अ टेस्टिमनी, मुक्त्ति प्रेअर बेल अँड न्यूज लेटर्स, फॅमिन – एक्स्पिरिअन्स इन इंडिया  इत्यादी.

दुसऱ्यांकरिता अविरत कष्ट करणाऱ्या या समाजसेविकेचे व्यक्तिगत जीवन मात्र फार दुःखी होते. त्यांच्या मुलीचे २४ जुलै १९२१ रोजी मिरज येथे श्वासोच्छवास व हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. शेवटच्या काळात रमाबाईंनी केडगाव मिशनमध्ये अनाथ स्त्रियांसाठी नवे जग उभारण्याचा प्रयत्न केला; मात्र लवकरच केडगाव येथे रमाबाईंचेही निधन झाले.

संदर्भ :

  • टिळक, दे. ना., महाराष्ट्राची तेजस्विनी पंडिता रमाबाई, नासिक, १९६०.
  • भागवत, विद्युत, स्त्री प्रश्नाची वाटचाल, पुणे, २००४.
  • साठे, ताराबाई, अपराजिता रमा, पुणे, १९७५.
  • Chakravarti, Uma, Rewriting history : The life and times of Pandita Ramabai, 2014.
  • Dyre, Helen, Pandita Ramabai, 1900.
  • Kosambi, Meera, Pandita Ramabai through Her Own Words : Selected Works, New Delhi, 2000.
  • Kosambi, Meera, Pandita Ramabai : Life and landmark writings, London, 2016.
  • Macnicol, Nicol, Pandita Ramabai, Kolkata, 1930.

Related Posts

यमुनाबाई वाईकर (Yamunabai Waikar)

वाईकर ,यमुनाबाई (जन्म : ३१ डिसेंबर १९१५ – मृत्यू : ७ मे २०१८) मराठीतील सुप्रसिद्ध लावणी गायिका. मूळ नाव यमुना विक्रम जावळे. आईचे नाव गीताबाई. सातारा जिल्ह्यातील वाई…

चंद्रकांत ढवळपुरीकर (Chandrakant Dhawalpurikar)

ढवळपुरीकर, चंद्रकांत : (२३ जुलै १९३२).  ढोलकी फडाच्या तमाशाचे मालक, ज्येष्ठ कलावंत. पूर्ण नाव चंद्रकांत शिवराम जाधव. Telegram Group Join Now त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी…

छगन चौगुले (Chagan Chougale)

चौगुले, छगन : (१९५७ – २० मे २०२०). महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलावंत. लोकगीते व भक्ती गीते गाणारे म्हणून त्यांना ओळखले जायचे. लोककलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता खड्या आणि बहारदार गाण्याने…

मंगला बनसोडे (Mangla Bansode)

बनसोडे, मंगला : (१२ सप्टेंबर १९५१). ढोलकी फडाच्या तमाशातील कलावती. तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या कन्या. ढोलकी फडाच्या तमाशात गायिका, नर्तिका, अभिनेत्री अशा विविध भूमिका त्यांनी आजवर…

गुलाबबाई संगमनेरकर (Gulabbai Sangamnerkar)

संगमनेरकर, गुलाबबाई : (१९३२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत. नृत्यचंद्रिका म्हणून त्यांना ओळखले जाते. लावणी क्षेत्रात बैठकीच्या लावणीची अदाकारी याविषयी ज्या ज्या वेळी बोलले जाते तेव्हा हमखास डोळ्यासमोर येणारे…

मधू कांबीकर (Madhu Kambikar)

कांबीकर, मधू : ( २८ जुलै १९५३ ). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत चित्रपट नायिका . जन्म माळेगाव खुर्द, ता. गेवराई, जि. बीड येथे. एका उपेक्षित समाजात त्यांचा जन्म झाला. आई…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *