फायद्याकरितां वाटेल त्याला आपला अंगविक्रय करणार्या स्त्रियांस वेश्या म्हणतात. वेश्यापासून रखेल्या निराळ्या काढिल्या पाहिजेत. रखेल्या या पत्नी या नात्यानें एकाच पुरूषाशी व्यवहार करतात. तेव्हां त्यांचा दर्जा धर्मपत्नीच्या जरा खालीं व वेश्येच्या जरा वर लागेल. वेश्या या सर्व काळीं सर्व ठिकाणीं आढळून येतील. पोटाच्या इतर धंद्यापेक्षां हा धंदा बरा असें समजून बर्याच स्त्रिया याचा अंगीकार करतात व बर्याच स्त्रियांनां बळजबरीनें या धंद्यांत ओढिलें जातें.
(१) उद्योगधंदा मिळण्याची पंचाईत;
(२) अतिशय दगदगीची व कमी पगाराची नोकरी;
(३) घरीं मुलींनां होणारा जाच;
(४) गरीब लोकांची दाटीनें व असभ्यतेनें रहाण्याची सवय;
(५) कारखान्यातून तरूण स्त्रीपुषांशांनां सदोदित एकत्र करावें लागणारें काम व वाईट लोकांची संगत;
(६) श्रीमंत लोकांची चैनींचीं व अनीतीचीं समोर घडणारीं उदाहरणें;
(७) अनीतिकारक वाड्.मय व करमणुकीचे प्रकार;
(८) व्यसनी व दुराचारी लोकांचे व त्यांच्या हस्ताकंचे डावपेंच; इत्यादि कारणांनीं बायका घरांतून उठून वेश्या बनतात असा पाश्चात्त्य समाजशास्त्रज्ञांचा अनुभव आहे. आपल्याकडे यांपैकीं कांहीं कारणें नवीन वेश्या होण्याला उपयोगी पडतात; तथापि आपल्यांत एक स्वतंत्र वेश्यावर्गच प्राचीन काळापासून अस्तित्वांत आहे. त्या वर्गातील स्त्रियांचा वंशपरंपरेचा हा धंदा आहे.
इतिहास:-
वेदवाड्.मयांत देखील वेश्याव्यापाराविषयीं उल्लेख आढळतात. पुंश्चली, महानग्नी, रामा वगैरे शब्द वेश्या अर्थाचे होत. वाजसनेयी संहितेंत हा एक धंदा म्हणून उल्लेखिला आहे. रामाच्या राज्यारोहणाच्या वेळीं राजवाड्यांत वेश्यांचा नाच झाल्याचा उल्लेख आहे. लग्नासारख्या मंगलप्रसंगी वेश्यांचें आगमन शुभदायी मानणार्या जाती मुंबईशहरांत आजमित्तीलाहि आहेत. वेश्यांचा धंदा करणें हें आपलें कर्तव्य आहे असें मानणार्या व त्याप्रमाणे वंशपरंपरेनें हा धंदा चालविणार्या स्त्रियाहि आपल्याकडे आहेत. इतर कोणत्याहि देशांत हा धंदा परंपरेनें करणारी अशी स्वतंत्र जात नाहीं. गोंव्यांत वेश्यांचा भरणा फार आहे. ”तेथें या स्त्रियांचा वर्ग पोर्तुगीज लोकांनीं उत्पन्न केला. पोर्तुगीजांचा पाय गोंवा प्रांतांत भक्कम रूजल्यावर त्यांनीं आपल्या गोर्या शिपायांची कामवासना शांत करण्याकरतां ज्या हिंदु स्त्रिया त्यांच्या हवाली केल्या त्यांची संतति म्हणजेच हा वेश्यावर्ग होय” असें म्हणतात. पाश्चात्त्य ग्रीक, रोमन व सेमेटिक राष्ट्रांतहि हा वर्ग असेच. ग्रीसमधील अतिशय सुशिक्षित स्त्रिया म्हणजे वेश्यापैकींच असत. रोममध्ये अत्युच्च दर्जाच्या स्त्रिया आपली वेश्यावर्गांत गणना करून घेत.
प्रच्छन्नवेश्या:-
मुरळ्या, देवदासी यांसारख्या नांवाखालीं अल्पवयी मुलींचा वेश्यांच्या धंद्याकरतां उघडपणें व्यापार चालत असतो (देवदासी, बसवी, भाविणी व देवळी, मुरळी पहा.) फिनिशिया, फ्रिजिया, ईजिप्त वगैरे प्राचीन राष्ट्रांत धर्माच्या नांवाखालीं स्त्रिया वेश्यांचा धंदा करीत. मुंबई व मद्रास इलाख्यांत हा प्रघात फार आहे. इ.स. १९०१ ते १९०५ सालापर्यंत बेळगांव, धारवाड व विजापूर या तीन जिल्हयांत २६२३ मुली या कामीं देण्यांत आल्या. पुष्कळ वेळां या मुली विकत देतात व कधीं कधीं एकेका मुलीची किंमत २००० रू. घेतात. अशी हिंदुस्थान सरकारला प्रांतिक सरकारनें माहिती पुरविली होती.
वेश्यागारें:-
गेल्या खानेसुमारीच्या वेळीं आपण अनीतीचा धंदा करतों असें स्वत: तोंडानें कबूल करणार्या वेश्यांची संख्या मुंबई शहरांत २९५५ होती. परंतु हा आंकडा बरोबर असावा असें वाटत नाहीं; कारण सर्वच वेश्या आपण हा धंदा करितो असें स्वत: कबूल करतील हें शक्य नाहीं. पोलीस कमिशनरच्या मतें ही संख्या ५१६९ असून ह्या सार्या वेश्या ५५८ वेश्यागारांत राहतात. यांपैकीं ५००० हिंदी, ८० जपानी, २८ यूरोपियन, २३ यूरेशियन ५ मॉरिशिअसच्या आणि ३३ बगदादी ज्यू होत्या. वेश्यागारांचे हस्तक आगगाड्यांचीं स्टेशनें, रस्ते, बागा, देवळें, मुलींच्या शाळा व विशेषेकरून स्त्रियांचे जमाव असण्याची ठिकाणें यांत नेहमीं येरझारा घालीत असतात. आणि नवरा बायकोचें भांडण पुष्कळदां हे स्वत: किंवा आपल्या साथीदारांच्या करवीं उपस्थित करीत असतात. किंवा अशाच प्रकारचे अनुकूल प्रसंग दिसतांच त्याचा फायदा घेऊन स्त्रियांनां पळविण्याची व्यवस्था करतात. एखादी स्त्री एकांतांत मिळाली किंवा नादिष्ट असली तर प्रसंगीं जुलूम करून सुध्दा तिला लांबवितात. कोणत्या तरी निमित्तानें भर रस्त्यांत या बेगुमान लोकांनीं स्त्रिया गाडींत घालून पळविल्याचीं व पुढें त्या आपल्या इच्छेप्रमाणें वागत नसल्यास त्यांचा भयंकर छळ केल्याचीं उदाहरणें कोर्टांत आलेली आहेत.
वेश्यागारांत नवीन स्त्री आली कीं वेश्यागाराचा चालक तिला ज्या ज्या कांहीं वस्तू पुरवितो त्यांची दामदुप्पट किंमत आपल्या खात्यावर लिहून तिच्या नांवीं बरेंच कर्ज चढवून ठेवितो. कारण तिला आपल्या कह्यांत ठेवण्याचा हाच एक मुख्य मार्ग असतो. वस्तुत: तिच्या नांवावर कितीहि कर्ज असलें तथापि हल्लींच्या कायद्याप्रमाणें वेश्यागाराच्या मालकाला तें तिच्यावर फिर्याद वसूल करतां येत नाहीं. वेश्यागारांतील स्त्रियांची स्थिति खरोखरींच गुलामापेक्षांहि अगदीं खालच्या प्रतीची असते. त्यांनां गिर्हाइकांकडून मिळालेले पैसे मालकाला द्यावे लागतात, व त्या शरीरानें कितीहि असमर्थ असल्या किंवा व्याधिग्रस्त असल्या तथापि मालक सांगेल तितक्या माणसांची पाशवी इच्छा त्यांनां तृप्त करावी लागते आणि तसें न केल्यास अंगावर डागण्या मिळाल्याचींहि उदाहरणें आहेत. कित्येक ठिकाणें त्यांच्या १५x१० फूटांच्या किंवा त्याहिपेक्षां लहान खोल्या असतात. आणि या कनिष्ठ दर्जाच्या वेश्यागारांत १०।१२ वेश्या राहतात. त्याच जागेंत त्यांचा धंदा, जेवण-खाण, राहाणें वगैरे सर्व व्यवहार होतात. कित्येक वेश्यांचा हा व्यवसाय स्वत:च्या राहत्या घरांत खोल्यांतून चालतो. यातल्या कित्येक स्त्रिया नांवाच्या गरती, परंतु धंद्यानें वेश्या असतात. त्यांचे नवरे व त्यांची मुलें तेथेंच असतात व हे सर्व अनीतीचे प्रकार त्यांच्या डोळ्यांदेखत चालतात. कांहीं दिवसांपूर्वी मुंबईंतील डेक्कन रोडवर एका वेश्येचा खून झाला. त्या खटल्यानें बाहेर आलेल्या माहितीवरून कुंटणखान्यांतील स्त्रियांनां साधारणत: दररोज तीस ते चाळीस गिर्हाइकांची पशुवासना तृप्त करावी लागते असें सांगण्यांत आलें!
रोग:-
वेश्याव्यवसायजन्यरोग मुख्यत: तीन प्रकारचे आहेत. पैकीं साफ्ट कॅन्सर हा अगदीं सौंम्य स्वरूपाचा व अल्प उपचाराअंतीं बरा होण्यासारखा असतो. प्रमेह (गनोरिया) हा रोग संसर्गजन्य व लवकर बरा न होणारा असा आहे. स्त्रियांवर या रोगाचे फारच अनिश्ठ परिणाम होतात. यामुळें शेकडा ५० स्त्रिया कायमच्या वांझ होतात. व केव्हां केव्हां या रोगाचें स्वरूप इतकें भयंकर होतें कीं, असह्य वेदना कमी करण्याकरतां शस्त्रक्रियेनें त्यांचे गर्भाशय कापून काढावे लागतात. तिसरा उपदंश (सिफ्लिस) हा रोगहि फार भयंकर आहे. स्त्री व पुरूष या दोघांनांहि याची बाधा होते. या रोगानें निरनिराळ्या प्रकारचे रोग होऊन माणसें कायमची दगावतात व याच्या संततीलीहि याचे परिणाम भोगावे लागतात.
रोगप्रतिबंधक उपाय:-
या रोगांचा प्रसार मुख्यत: वेश्यांकडून होत असल्यामुळें त्याला प्रतिबंधक उपाय म्हणून वेश्यांनां शहराच्या एका ठराविक भागांत राहावयास लावावयाचें व तेथें त्यांचीं वैद्यकिय तपासणी करावयाची अशी क्लूप्ति कांही राष्ट्रांत काढण्यांत आली होती; पण त्याचें सर्व दृष्टीनीं वैयर्थ्य दिसून आल्यामुळें वेश्यांनां सर्व समाजापासून अलग करण्याची व त्यांची शारीरिक तपासणी करण्याची पध्दति आतां हळूहळू नाहींशी होत आहे. उपदेश, प्रमेह वगैरे रोग साधारणपणें वर वर तपासणी करून समजण्यासारखे नसतात. शरीरांतील रक्ताची तपासणी केली किंवा सूक्ष्मदर्षक यंत्राच्या साहायानें जननेंद्रिय तपासण्यांत आलें तरच या रोगाचा सुगावा लागतो. तसेंच वेश्यांची रोगमुक्तता डॉक्टराच्या दाखल्यावरून ठरावयाची असल्यामुळें असे खोटे दाखले देणार्या पोटार्थी डॉक्टरांचीहि वाण नसते. शिवाय वैद्यकी तपासणीच्या वेळी काहीं औषधांच्या साहाय्याने आपण रोगमुक्त आहोंत असें वेश्या सिध्द करूं शकतात असाहि अनुभ्व असल्यामुळें हे कायदे जेथें जेथें होते तेथें तेथें ते बंद करण्यांत येत असून हे रोग हटविण्याकरितां दुसर्या मार्गाचें अवलंबन करण्यांत येत आहे ही समाधानाची गोष्ट होय. इंग्लंडमधील अशा प्रकारचा कायदा इसवी सन १८८६ मध्यें रदद करण्यांत आला.
कायदे:-
इंग्लंडमध्यें सांसर्गिक रोगांचा कायदा पास झाल्यानंतर तशाच प्रकारचा कायदा इसवी सन १८६८ मध्यें हिंदुस्थानांत पास करण्यांत आला व वेश्यांची नोंद करणें, सक्तीनें त्यांची शारीरिक तपासणी करणें, रोगग्रस्त वेश्यांनां सक्तीनें जरूर असे औषधोपचार करण्यास भाग पाडणें, इत्यादि प्रकार इकडे सुरू करण्यांत आले. हा कायदा इकडे इ.स. १८७० च्या ता. १ मे पासून अमलांत आला. वेश्याव्यवसायनज्य रोगामुळें आजारी असलेल्या रोग्याकरतां मुंबईत एक तात्पुरते हॉस्पिटल बांधण्यांत आलें. पहिल्याच वर्षी यांत २००० वेश्यांची नोंद करण्यांत आली व त्यांची सक्तीनें शारीरिक तपासणी करण्यांत आली. ६०० रोगग्रस्त वेश्यांनां औषधोपचार करण्यांत आले. याकरतां ८०००० रूपये खर्च करण्यांत आले. खर्चाच्या मानानें यश फारसें आलें नाहीं. हे सरकारनें पहिल्या वर्षाच्या अनुभवानें कबूल केलें; पण थोड्या कमी खर्चांत आणखी एकदां प्रयत्न करण्याचें ठरविलें. दुसर्या वर्षी ६०००० रूपये खर्च झाले आणि शारीरिक तपासणी कशी चुकवावी याच्या युक्त्या वेश्यांनां अवगत झाल्यामुळें दुसरें वर्ष अगदींच अपयशी ठरलें, इतकें कीं इ.स. १८७२ च्या मार्च अखेरला उपरिनिर्दिष्ट हॉस्पिटल व या कायद्याबद्दलच्या इतर सर्व तरतुदी बंद करण्यांत आल्या.
इ.स. १८७६ मध्यें या प्रश्नानें पुन: उचल खाल्ली. सरकार व मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्यामध्यें या प्रश्नांच्या अपयशाबद्दल पुष्कळ वाटाघाट झाली व उपदेश-प्रमेहादि रोगांचा उपद्रव झालेल्या माणसांनां ठेवण्याकरितां स्वतंत्र हॉस्पिटल काढण्याचें ठरलें. यावेळीं वेश्यांची नोंद करण्याचें काम पोलिसांकडे देण्यांत आलें. वेश्यांची शारीरिक तपासणी शहराच्या निरनिराळ्या भागांत करण्याची व्यवस्था करण्यांत आली आणि रोगग्रस्तांनां लॉक हॉस्पिटलमध्यें सक्तीनें ठेवण्यांत येऊ लागलें. मुंबईचे बिशप आदिकरून पुष्कळ लोकांनीं या प्रयत्नांचा निषेध केला. परंतु सरकारनें आापला हट्ट न सोडतां ही पध्दत तशीच चालू ठेविली. शेवटीं इंग्लंडांत या कायद्याची दुरूस्ती झाल्यावर दोन वर्षांनीं म्हणजे इ.स. १८७८ मध्यें मध्यवर्ती सरकारनें या कायद्याची दुरूस्ती केली. यापुढें या बाबतींत विशेष कांहीं प्रयत्न करण्यांत आले नाहींत.
मुंबई सरकारनें १९२१ सालीं नेमलेल्या कमिटीनें मुखत्वेंकरून सुचविले कीं, या बाबतींत ब्रह्मदेशांतील सरकारचें अनुकरण करून वेश्यागारें ठेवणें, वेश्याव्यवसायकरितां स्त्रिया आणणें व वेश्याव्यवसायाकरितां जागा देणें या तीन गोष्टी बेकायदेशीर ठरवाव्या. पुढें एका वर्षाने वरील कमिटीच्या सूचनांनां, कायद्याचें स्वरूप देण्याचें ठरवून आगस्ट १९२३ मध्यें सरकारनें एक बिल आणलें, पण उपरिनिर्दिष्ट तीन गोष्टींपैकीं वेश्याव्यापारावर उदरंभरण करण्याकरितां स्त्रिया आणणें ही एकच गोष्ट बेकायदेशीर ठरवून कुंटणपणाचे प्रकार गैरकायदा ठरविण्यांत आले.
याशिवाय कायद्याच्या दृष्टीनें मध्यवर्ती सरकारनें एक दोन कायदे पास केले आहेत. त्यांपैकीं देवदासीच्या नांवाखालीं होणारा वेश्याव्यापार बंद करण्याच्या दुसर्या कायद्याचा ठराव तारीख २६ फेब्रुवारी १९२३ रोजी लेजिस्लेटिव्हअसेंब्लीमध्यें सर मालकम हेले यांनीं आणला होता. अल्पवयी मुलीवर बलात्कार करणाराला शिक्षा करण्याची तरतूद पीनलकोडांत पूर्वीच केलेली होती. तशा कृत्याला मदत करणाराला शिक्षा करण्याचा या बिलाचा हेतु होता. हा यांतील फरक लक्षांत ठेवण्यासारखा आहे. यांत आपला देहविक्रय करण्यास कबुली देण्याच्या बाबतींत स्त्रीचें वय कमींत कमी १६ वर्षाचें असावें असें त्यांनीं सुचविलें होतें. अब्रूच्या बाबतींत निर्णय करण्यास हें वय निदान अठरा तरी असावें अशा रा. नी. म. जोशी यांना सूचना आणली होती ती शेवटीं पास झालीं पण या ठरावाची अमंलबजावणी सरकारनें आपल्या हातीं घेतलीं.
अमेंरिकेसारख्या पुढारलेल्या राष्ट्रांनीं या बाबतींत पुष्कळच सुधारणा केली आहे. त्या देशांत या धंद्यांतील अपराध्यांनां दंड किंवा शिक्षा न करतां ते सुधारावे म्हणून त्यांनां विशिष्ट संस्थांतून ठेवण्यांत येतें. तथापि हा धंदाच असा आहे कीं, कांहीं केल्या हा अजीबात नष्ट होणार नाहीं. समूल निर्मूलन करण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रच्छन्न रूपानें सर्व समाजांत पसरेल व एकंदर समाजाची अधोगति होईल याची जाणीव पाश्चात्त्य राष्ट्रांनां पुरी असल्यानें केवळ हा धंदा सुधारण्याचाच तिकडे प्रयत्न चालू आहे. गरीब लोकांची स्थिति सुधारणें; मुलांनां नीतीचे पाठ शाळेंतून शिकवणें व या धंद्याच्या अनिष्टतेची योग्य जाणीव करून देणें, अनाथ मुलींचें व बायकांचें संगोपन व संरक्षण करणार्या संस्था काढणें वेश्याव्यवसाय सोडूं इच्छिणार्यांनां मदत देऊन त्यांनां पुढील आयुष्यक्रमणाचा मार्ग दाखविणें इत्यादि अप्रत्यक्ष उपाय केल्यास या धंद्यामुळें समाजावर ओढवणारी आपत्ति कमी होईल. [पु. गो. नाईक -वेश्या व वेश्याव्यवसाय; अॅमॉस-दि सोशल इव्हल; सँगर-हिस्टरी ऑफ प्रास्टिट्यूशन; एन्सायको. सोशल रिफार्म्स; ए.रि.ए; ए. ब्रिं.; मुंबई कमिटीचा रिपोर्ट (१९२१)].
वेश्याव्यवसाय : चरितार्थासाठी तसेच अधिक धनाच्या वा मौल्यवान वस्तूंच्या मोबदल्यात प्रस्थापित झालेले दोन परक्या व्यक्तींमधील लैंगिक संबंध म्हणजे वेश्यावृत्ती वा वेश्याव्यवसाय, असे स्थूलमानाने म्हणता येईल. पैशाच्या आमिषाने, कमीअधिक प्रमाणात अनिर्बंधित स्वैर स्वरूपाचे कायमचे अथवा तात्पुरते लैंगिक संबंध ठेवण्याची पद्धत म्हणजे वेश्याव्यवसाय होय.
वेश्याव्यवसायात मुख्यत: स्त्रिया पुरुषांसाठी देहविक्रय करतात. पण पुरुषांनी पुरुषांबरोबर सामान्यत: समलिंगी संबंधात केलेल्या वेश्याव्यवहाराची काही उदाहरणे आढळतात. स्त्रियांनी पैसे मोजून पुरुष वेश्यांकडून लैंगिक सुख घेण्याचा प्रकार अस्तित्वात असला, तरी तो अल्प प्रमाणात आढळतो. वेश्याव्यवसायातील व्यक्तीची मोबदला देणाऱ्या अनेक व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवण्याची तयारी असते. पण क्वचित आपल्या ग्राहकाची निवड त्याचे वय, आरोग्य, वंश वा जात असे निकष लावून करणाऱ्या वेश्याही आढळतात.
वेश्याव्यवसाय ही जगातील सगळ्यात पुरातन व्यवसाय मानला जातो. ग्रीक व रोमन काळांतील ग्रंथांमध्ये वेश्यावृत्तीचे उल्लेख आढळतात. भारतीय समाजातही वेश्याव्यवसाय पूर्वापार चालत आलेला आहे. इतर अनेकविध कारणांप्रमाणेच काही अनिष्ट अशा धार्मिक व सामाजिक रूढी-परंपरांतूनही या व्यवसायाला चालना मिळाली [→ देवदासी].
मानवसमाज जेव्हा वसाहती करून स्थिर, सामुदायिक जीवन जगू लागला, तेव्हा लैंगिक संबंधांवर अनेक प्रकारचे नीतिनियम व निर्बंध लादण्यात आले. प्रस्थापित
⇨कुटुंबसंस्था व त्यासाठी रूढ अशी
⇨ विवाहसंस्था ही सामाजिक स्थैर्यासाठी आवश्यकच होती. त्यामुळे काही प्रकारचे लैंगिक संबंध हे समाजमान्य व प्रतिष्ठेसाठी अनिवार्य ठरले. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील निकटवर्ती नात्यागोत्यांतील व्यक्तींना परस्परांत लैंगिक संबंध ठेवण्यापासून परावृत्त करण्यासाठी कठोर नियमने अस्तित्वात आली. उदा., आर्इ-मुलगा, वडील-मुलगी, बहिण-भाऊ अशा निकटच्या नात्यांतील
⇨ अगम्य आप्तसंभोग सर्वच समाजांत निषिद्ध मानला जातो. प्रत्येक समाजात विवाहसंस्था भक्कम राखणे, औरस संततीचे संगोपन व कुटुंबसंस्थेचे संवर्धन करणे, ही सामाजिक व्यवस्थेची अविभाज्य अंगे मानली जात. मात्र अनिर्बंधिक लैंगिक संबंध ठेवण्याबाबत सामाजिक नियम नेहमी संदिग्ध राहिले. विशेषत: पुरुषप्रधान सामाजिक व्यवस्थेमध्ये स्त्रीकडे उपभोगाचे साधन म्हणून पाहिले जाते. या प्रवृत्तीमधून वेश्या-व्यवसाय हा प्रत्येक समाजात निर्माण झाला. वेश्यावृत्तीला एका बाजूने निषिद्ध मानले जाते व वेश्याव्यवसाय करणारी स्त्री कलंकित व हीन समजली जाते. तरीदेखील वेश्याव्यवसाय प्रत्यके समाजव्यवस्थेत, प्रत्येक काळात पाय रावून उभा राहिलेला आढळतो.
मानवाचे लैंगिक जीवन हे साधारणत: संस्कार व रूढी यांनुसार आकारित होते. स्त्री-पुरुष संबंधांना सहजप्रवृत्तीनुसार किंवा वैयक्तिक इच्छेनुसार व्यक्त करण्याची पूर्ण मुभा प्रगत मानवी समाजांत नाही. कायद्याने व सामाजिक रूढींमुळे विवाहाखेरीज लैंगिक संबंध ठेवणे अमान्य ठरते, तरीदेखील वेश्याव्यवसायाचे प्रचलन टाळता येत नाही. ह्याला विविध कारणे संभवतात; लैंगिक संबंध केव्हाही व वेगवेगळ्या रूपांत ठेवणे फक्त मानवालाच शक्य असते. वैयक्तिक शारीरिक सुखासाठी तसेच विशिष्ट हेतू साधण्याच्या दृष्टीनेही लैंगिक संबंधांचा उपयोग होऊ शकतो. जेव्हा लैंगिक संबंध आर्थिक मोबदल्याकरिता अथवा इतर प्रकारचे हेतू साध्य करण्याकरिता (शारीरिक गरज व प्रजनन सोडून) ठेवले जातात, तेव्हा वेश्यावृत्तीची व वेश्याव्यवसायाची सुरुवात होते. मानवी व्यवहार हे सहज प्रवृत्तीपेक्षा बुद्धिपुरस्सरतेवर अवलंबून असल्याचा हा परिणाम आहे. विशेषत: ज्या समाजात लैंगिक संबंधांवर फारशी बंधने नाहीत, तेथे वेश्याव्यवसायाची सामाजिक प्रश्न म्हणून तीव्रता कमी असते, तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या समस्याही सौम्य असतात. उदा., नेदलॅंड्समध्ये वेश्याव्यवसायाला कायद्याने संमती दिलेली आहे. तेथील वेश्यांना उत्पन्नावर कर भरावा लागतो व त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा व इतर कल्याणकारी सोयी उपलब्ध करण्यास सरकार बांधील आहे. विवाहबाह्य लैंगिक संबंध स्वखुषीने ठेवण्याच्या व्यवहाराला जरी समाजमान्यता नसली, तरी त्यात आर्थिक मोबदल्याची देवाणघेवाण नसल्याने ती वेश्यावृत्ती ठरत नाही [→ विवाहबाह्य मातृत्व]. वेश्याव्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बहुतांश समाजामध्ये हेटाळणीचा असला, तरीदेखील एक सामाजिक वस्तुस्थिती या दृष्टीने ते मानवी व्यवहाराचे अविभाज्य अंग बनले आहे, असेही मत आढळते. मात्र व्यक्तिगत कल्याणाच्या दृष्टीने हे चुकीचे आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी : प्राचीन काळातील ग्रीक व सायप्रसमधील संस्कृतींमध्ये विवाहयोग्य स्त्रियांना हुंड्याची रक्कम जमविण्यासाठी वेश्याव्यवसाय पतकरावा लागे. बॅबिलोनियन संस्कृतीमध्ये विवाहपूर्वी मुलींना इश्तार या देवतेला अपेण करीत व तेथील राजपुरोहिताबरोबर संबंध आल्यानंतर ती विवाहयोग्य समजली जाई. इश्तार ही सुफलतेची देवता मानली होती व तिच्या मंदिरात धार्मिक मान्यतेने वेश्याव्यवसाय चाले.
प्राचीन काळात चीनमध्ये वेश्यांची वस्ती अलग व विशिष्ट ठिकाणी असे. त्यांना विवाह समारंभात विशेष महत्त्व असे व नवविवाहित दांपत्याबरोबर अनेक रखेल्या (कॉंक्यूबाइन्स) पाठवल्या जात. रूढी व परंपरेमुळे ही प्रथा समाजात दृढमूल झाली. जपानी संस्कृतीमध्ये कुटुंबसंस्थेच्या संवर्धनाला अतिशय महत्त्व होते. आपल्या मातापित्याचे व भावंडांचे पालनपोषण करण्यासाठी जी स्त्री शरीरविक्रय करी, तिला ‘जोरो’ असे संबोधले जाई व तिची प्रतिष्ठा कमी होत नसे.
प्राचीन ग्रीक समाजात ‘हेटीअरी’ (चांगल्या मैत्रिणी) हा उच्चवर्गीय वेश्यांचा प्रकार होता. त्यांची राहणी विलासी असे. डिमॉस्थिनीझ (इ. स. पू. ३८४-३२२) ह्या अथेनियन वक्त्याचे उद्गार असे होते: ‘हेटीअरी ह्या आपर सुखाच्या अपेक्षेने पदरी बाळगतो, रखेल्या ह्या आपल्या दैनंदिन व्यक्तिगत देखभालीसाठी असतात, तर पत्नी वैध संतती देण्यासाठी व इमानेइतबारे कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी असते’. रोममध्ये वेश्याव्यवसायाला प्रतिष्ठा होती, पण त्यांना विशिष्ट कपडे वापरावे लागत आणि केस तांबूस, पिंगट रंगात रंगवावे लागत. तसेच वेश्यांना गावातील विशिष्ट भागात वास्तव्य करावे लागे, वेश्याव्यवसायासाठी परवना घ्यावा लागे व वेश्यांच्या उत्पन्नावर कर आकारला जाई.
वेश्याव्यवसायावर सामाजिक प्रतिबंध घालण्याविषयी बायबलच्या ‘जुन्या करारा’ त निर्देश आढळतात. ⇨पेगन वेश्या ज्यू समाजाला धोकादायक असल्याची समजूत होती. ज्यू पित्यांनी आपल्या मुलींना वेश्याव्यवसायापासून परावृत्त करावे, असे निर्बंध होते. आद्य ख्रिस्ती लेखकांनी वेश्याव्यवसाय हे अनिवार्य असे दुष्कृत्य मानले. सेंट ऑगस्टीनने (इ. स. ३५४-४३०) म्हटले आहे, की मानवी वासनेला वेश्यांनी वाट काढून दिली नाही, तर समाजात बलात्कारासारख्या दुर्घटना घडतील. मध्ययुगात यूरोपमध्ये सर्वच मोठ्या नगरांतून सार्वजनिक वेश्यागृहे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. त्यांना कायद्याचे संरक्षण व आधार होता आणि वेश्याव्यवसायाला परवानाही दिला जात असे. सार्वजनिक वित्तव्यवस्थेमध्ये वेश्याव्यवसायापासूनच्या उत्पन्नाचा वाटा मोठा होता. सोळाव्या शतकात ⇨गुप्तरोगाची संसर्गजन्य साथ सर्वत्र पसरली; तेव्हा वेश्याव्यवसायावर कडक नियंत्रणे लादली गेली. ⇨ धर्मसुधारणा आंदोलनामुळे (सोळावे शतक) लैंगिक वर्तनासंबंधीचे नवे नीतिनियम प्रस्थापित झाले व त्यातूनही वेश्याव्यवसायाला पायबंद बसला. परिणामी यूरोपमधील अनेक वेश्यागृहे बंद पडली. गुप्तरोगाच्या बळींची संख्या जशी वाढत गेली, तसे या व्यवसायावरचे निर्बंध जास्तच कडक झाले. स्त्रियांच्या व मुलींच्या अनैतिक व्यापाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदे करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धापर्यंत यूरोप व अमेरिकेत कुंटणखाणे व वेश्यावस्ती प्रत्येक मोठ्या शहरात होती. युद्धकाळात वेश्याव्यवसायाला चालना मिळाली. मात्र युद्धोत्तर काळात बदलत्या नीतिमूल्यांमुळे तेथील समाजांतील लैंगिक निर्बंध हळूहळू सैल होत गेले आणि स्वैर, अनिर्बंध व मुक्त लैंगिक संबंधांचे प्रमाण खूपच वाढले. विवाहपूर्व तसेच विवाहबाह्य संबंध, कुमारी मातांचे वाढते प्रमाण, कुटुंबसंस्थेचे विघटन या सर्व घडामोडींमुळे वेश्यावृत्तीचे स्वरूप पालटले. उच्चवर्गीय, नोकरदार स्त्रियांमध्येही `कॉलगर्ल’ म्हणून पैसे कमावण्याची प्रवृत्ती काही प्रमाणत वाढीस लागली. तसेच वेश्याव्यवसायाशी निगडित इतर अनैतिक व्यवहार व अंमली पदार्थांच्या व्यापारासारखी गुन्हेगारी कृत्ये वाढीस लागली. मद्यपानगृहाच्या माध्यमातून वेश्या पुरवल्या जाऊ लागल्या. एड्ससारख्या भयंकर रोगाचा फैलाव झाला. पश्चिमी जगातल्या बहुतेक मोठ्या शहरांतून वेश्याव्यवसाय खपवून घेतला जात असला, तरी या व्यवसायाशी निगडित असलेल्या गुन्हेगारीवर मात्र कायद्याने कडक कारवाई केली जाते. ब्रिटिश संसदेने १९५९ मध्ये केलेल्या कायद्यानुसार वेश्यांना उघडपणे खुल्या जागी गिऱ्हाईके पटवण्यावर मनाई आहे; मात्र त्यांना घरबसल्या हा व्यवसाय चालवता येतो. तथापि ज्यांना या व्यवसायातून बाहेर पडावयाचे आहे, त्यांना पुनर्वसनासंबंधी योग्य प्रशिक्षण दिले जाते. स्कॅंडिनेव्हियन देशांतले (मुख्यत: डेन्मार्क, नॉर्वे व स्वीडन) या व्यवसायावरचे निर्बंध हे मुख्यत्वे आरोग्यविषयक बाबींसंबंधी आहेत. अमेरिकेत सर्व राज्यांत कायद्याने वेश्याव्यवसाय निषिद्ध ठरविला असला, तरीदेखील वेश्यावृत्तीला बांध घालणे तेथेही अशक्य ठरले आहे.
वेश्याव्यवसायास कारणीभूत ठरणारे घटक : कोणत्याही समाजात वेश्यावृत्ती व वेश्याव्यवसाय निर्माण होण्यास व फोफावण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अनेकविध घटकांमध्ये मुख्यत्वे पुढील बाबींचा समावेश होतो : वेश्याव्यवसायास चालना देणाऱ्या प्रेरक घटकांमध्ये स्त्रियांची कौटुंबिक पार्श्वभूमी महत्वाची ठरते. आईवडिलांमधील सततचे तणाव व संघर्ष, व्यसनाधीन वडील किंवा वेश्याव्यवसाय करणारी आई-बहीण असणे, अशा परिस्थितीमुळे स्त्रीवर ही आपत्ती ओढवू शकते. स्त्रीला वेश्याव्यवसायाकडे आकृष्ट करणारे घटक मुख्यत: आर्थिक स्वरूपाचे असतात. दारिद्र व उपासमारीमुळे ग्रामीण भागातील स्त्रियांना फसवून, नोकरीची वा विवाहाची खोटी आमिषे दाखवून कुंटणखान्यात आणून विकले जाते. अनाथ तसेच परित्यक्ता स्त्रियांना कधीकधी शरीरविक्रयावाचून इलाज उरत नाही. त्याचप्रमाणे चंगळवादी शहरी संस्कृतीमुळे अधिक पैसा कमविण्याकरिता काही स्त्रिया ‘कॉलगर्ल’ चा व्यवसाय पतकरतात. यांतील काही नोकरीच्या व्यतिरिक्त कमाईसाठी कुमार्गाला वळतात. शहरातील हॉटेले, क्लब व इतर मनोरंजनाच्या ठिकाणी या स्त्रियांचे दलाल गिऱ्हाईक पटवितात व अनैतिक व्यवहारांना संघटित स्वरूप प्राप्त होते.
वेश्याव्यवसाय पतकरण्यामागचे निर्णायक घटक (प्रिसिपिटेटिंग फॅक्टर्स) हे प्रामुख्याने निराधार व फसविल्या गेलेल्या स्त्रियांच्या बाबतीत बलवत्तर ठरतात. कुमारी मातांना कुटुंबातून बहिष्कृत केले गेल्यास त्यांची दयनीय परिस्थिती होते. अशिक्षित व गरीब मुलींना असाहाय्यतेमुळे वेश्याव्यवसाय करावा लागतो.
समाजात वेश्याव्यवसाय फैलवण्यामागे आणखीही काही निर्णायक घटक कार्यरत असतात. विवाह हा लैंगिक गरजा भागविण्याचा रीतसर मार्ग असला, तरी त्याद्वारे समाजातील सर्वच स्त्रीपुरुषांच्या सर्व प्रकारच्या शारीरिक गरजा भागवल्या जातातच, असे नाही. अनेक कारणांनी विवाहासारखा पर्याय काही व्यक्तींच्या बाबत कधी दुर्लभ, तर कधी असफल ठरतो. अशा परिस्थितीतील पुरुषांना विवाहबाह्य संबंध ठेवणे शक्य होत नाही. वेश्यांबरोबर संबंध ठेवणे सोपे जाते, कारण तेथे परस्परांबद्दलचे भावनिक आकर्षण, प्रेम, बांधीलकी, निष्ठा यांचा पूर्ण अभाव असतो. पैशाच्या मोबदल्यात शारीरिक गरज भागू शकते. अनेकवेळा विकृत किंवा अनैसर्गिक गरजा भागविण्यासाठी वेश्यांचा उपयोग घेतला जातो. शहरीकरणामुळे व दारिद्र्यामुळे शहरात कामासाठी एकटे राहणाऱ्याची संख्या वाढते. हुंड्यासारख्या प्रश्नांमुळे विवाहित स्त्रीला छळ व अवहेलना सोसावी लागते व स्वत:चा बचाव करण्याकरिता कधीकधी घर सोडावे लागते. या निराधार स्त्रियांची विटंबना टळू शकत नाही व त्यांना अनिच्छेने या व्यवसायात ओढले जाते.
लैंगिक संबंधांविषयीचे अज्ञान तसेच संपर्कमाध्यमांतून दाखविले जाणारे अश्लील व बीभत्स स्त्री-पुरुष संबंध यांचा प्रभाव तरुण अजाण मुलामुलींच्या अध:पतनास कारणीभूत होतो. तरुण मुलींच्या वाट्याला अकाली मातृत्व व बहिष्कार आल्यामुळे त्या या व्यवसायात पडतात.
वेश्याव्यवसायाचे काही सामाजिक दुष्परिणाम संभवतात. वेश्याव्यवसायाच्या आडोशाने संघटित गुन्हेगारीचे एक अधोविश्व फोफावण्याचीही शक्यता असते. महानगरांतील भरमसाट वाढत जाणारी लोकसंख्या, नोकरीधंद्यानिमित्ताने शहरांकडे धाव घेणाऱ्या बेकार व एकाकी तरुणांचे तांडे, त्यांच्या लैंगिक गरजा भागविण्यासाठी व दारिद्र्यापोटी वेश्याव्यवसाय पतकरणाऱ्या असहाय्य, अनाथ, दीनदुबळ्या तरुणींची वाढती संख्या इ. कारणांस्तव संघटित गुन्हेगारी फोफावते व अनैतिक व्यवहारांचे जाळेही पसरत जाते. वेश्यावृत्तीला संघटित स्वरूप आल्यामुळे अनेक प्रकारच्या गुन्हेगारी व्यवहारांचा तो अड्डा बनतो. अंमली पदार्थांचा व्यापार, हातभट्टीचे व मद्यपानाचे अड्डे, नृत्यशाला, मसाज पार्लर इ. व्यवहार ह्या व्यवसायाच्या अवकाशात चालतात.
सर्व पुरुषप्रधान समाजव्यवस्थांमध्ये नैतिक व सामाजिक मूल्यांबाबत दुटप्पी धोरण आढळून येते. स्त्रियांचे पावित्र्य व चारित्र्य यांसंबंधी काटेकोर नीतिनियम असले, तरी पुरुषांच्या बाबतीत मात्र नैतिक मूल्ये शिथिल होतात. ह्या भेदभावामुळे वेश्याव्यवसाय करणारी स्त्री कलंकित ठरते आणि समाजातून बहिष्कृत होते; पण वेश्यांची विक्री करणारे दलाल व कुंटणखाना चालविणारे चालक यांच्यावर मात्र सहसा कारवाई केली जात नाही. अनेक गुप्तरोगांची तसेच एड्ससारख्या जीवघेण्या रोगांची लागण व फैलाव वेश्यांमध्ये आणि त्यांच्यामार्फत समाजात होतो. वेश्यांचे वय वाढल्यावर त्यांना विपन्नावस्था येऊन आधार उरत नाही. कलंकित व शारीरिक व्याधींनी आणि विकृतींनी पछाडलेल्या स्त्रियांचा एक वेगळाच उपवर्ग तयार होतो. एकमेकींना आधार देऊन त्या जगतात, कारण बाह्य जगाशी त्यांचा संबंध तुटून जातो. मुंबई, पुणे, कोलकाता यांसारख्या महानगरांत वेश्यावस्तीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. अशा वस्तीमध्ये अनेक प्रकारचे अनैतिक व बेकायदेशीर व्यवहार चालतात. बॅंकॉकसारख्या जागतिक पर्यटनकेंद्र असलेल्या शहरामध्ये वेश्याव्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर चालतो. मोठमोठ्या हॉटेलांमध्ये दलाली चालते व गिऱ्हाईकांना मुली पुरवण्याचा जोडधंदा चालतो. विकसनशील व गरीब असलेल्या देशांमधील बेकारी, दारिद्रय व गुन्हेगारी यांचे वाढते प्रमाण, तसेच भोगवादी संस्कृती व स्त्रियांचा कनिष्ठ दर्जा हे घटक वेश्याव्यवसायाच्या वाढीला कारणीभूत ठरतात. या प्रश्नाच्या मुळाशी दारिद्रय व शोषण आहे. जोपर्यंत ‘मागणी तसा पुरवठा’ हे तत्त्व लैंगिक संबंधांबाबत राबविले जाते, तोपर्यंत या व्यवसायाला पूर्ण आळा घालणे कठीण आहे.
वेश्याव्यवसायात अनेक व्यक्तींचा व संस्थात्मक रूढींचा सहभाग असतो. देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, कुंटणखाने चालविणाऱ्या कुंटिणी, दलाल इत्यादींचा मिळून एक भिन्न प्रकारचा गट तयार होतो. सर्वसाधारण समाजापासून हा समुदाय विलग्न असतो आणि उपेक्षा व शोषण यांचे लक्ष्य ठरतो.
भारतातील वेश्याव्यवसाय : भारतीय समाजात वेश्याव्यवसाय फार प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतात. ऋग्वेदात अशा स्त्रीला ‘साधारिणी’ म्हणून संबोधले जाई. पुरुषांना, विशेषत: धनिकांना, अमीर-उमरावांना कामवासनेच्या पूर्तीसाठी रखेल्या ठेवण्याची किंवा वेश्यांकडे जाण्याची मुभा होती. ‘धर्मसूत्रां’ त वेश्यांसंबंधी अनेक विचार प्रकट केलेले आहेत. गौतम धर्मसूत्रात वेश्याव्यवसायाबद्दल माहिती आहे. अशा स्त्रियांच्या दयनीय अवस्थेबद्दल उल्लेख करून त्यांच्या विविध स्तरांची कल्पना धर्मशास्त्रात दिलेली आहे. गौतम ऋषींनी ‘दासी’, गणिका’ व ‘पण्य स्त्री’ असे वेश्यांचे वर्गीकरण दिले आहे. दासी ही एकाच पुरुषाची सेवा करणारी, तर पण्य स्त्री सामान्य श्रेणीची वेश्या मानली जाई. नृत्य-गायनात व इतर कलांमध्ये कुशल असणारी गणिका उच्च श्रेणीची मानली जाई. मृच्छकटिक या संस्कृत नाटकातील नायिका वसंतसेना ही गणिका सुसंस्कृत व कलावती म्हणून वर्णिली आहे.
महाभारत काळात, राजाच्या दरबारात नृत्यगायन क्षेत्रातील कलावंतिणी राजाच्या छत्राखाली आपली कला जोपासून दरबारात मनोरंजन करीत. महाभारताच्या ‘आदिपर्वा’ त गांधारीच्या अनुपस्थितीत, धृतराष्ट्राची सेवा अशा दासींकडून होत असल्याचे म्हटले आहे. ‘उद्योगपर्वा’ त देखील कौरवांच्या दासींचा उल्लेख आहे. या स्त्रिया राजदरबारातील नर्तिकाही असत व राजघराण्यातील पुरुषांच्या रखेल्याही असत. मत्स्यपुराणात वेश्यांची विविध कर्तव्ये नमूद केली आहेत.
बौद्ध काळात ( इ. स. पू. ७००-५००) अनेक धार्मिक व सामाजिक स्थित्यंतरे घडली. बौद्ध मठांमध्ये गणिकांना प्रवेश दिला जात असे. जातककथांमध्ये तसेच अन्य बौद्ध वाङ्मयातही `आम्रपाली’ या नृत्यनिपूण गणिकेसंबंधीचे उल्लेख आढळतात. सुमारे पाचशे वर्षे बौद्ध धर्माचा अंमल भारतीय समाजावर राहिला, त्या काळात वेश्येला बहिष्कृत केले जात नसावे. गणिकेला सामाजिक प्रतिष्ठा होती. गणिकेला राजाकडून सन्मान व गुणीजनांकडून प्रशंसा लाभत असे, असा उल्लेख नाट्यशास्त्रात आढळतो. ती अभिगमनास व चिंतन करण्यास योग्य अशी असावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
कौटिलीय अर्थशास्त्रात ( इ. स. पू. चौथे शतक) वेश्यांचे नऊ वर्ग वर्णिले आहेत. तसेच वेश्याव्यवसायाचे नियंत्रण करण्यासाठी नियमावली दिली आहे. वेश्यांच्या उत्पन्नावर करवसुलीचा अधिकार राजाला असल्याचे नमूद केलेले आहे. वात्स्यायनाने रचलेल्या ⇨कामसूत्र (इ. स. तिसरे वा चौथे शतक) ग्रंथातील ‘वैशिक’ या अधिकरणामध्ये विविध प्रकारच्या वेश्यांसंबंधी माहिती आली आहे. या काळात वेश्यागमन जरी समाजमान्य असले, तरी विविध जातींच्या वेश्यांना वेगवेगळे स्थान असावे. कामसूत्रामध्ये कुंभदासी, परिचारिका, स्वैरिणी, कुलटा, नटी, शिल्पकारिका, रूपाजीवा व गणिका असे वर्ग नमूद केले आहेत. ज्या वेश्येला चौसष्ट कला अवगत आहेत. ती ‘गणिका’ होय. या काळातील समाजव्यवस्थेत वेश्याव्यवसायाला विशिष्ट स्थान व दर्जा दिलेला आहे. समाजाचे ते एक अविभाज्य अंग असावे.
जैन राजांच्या कारकीर्दीमध्ये (इ. स. दुसरे शतक) राजदरबारातील कलावंतीण ही राजाची रखेली असे व तिने इतर पुरुषांबरोबर संबंध ठेवणे निषिद्ध होते. मात्र सामान्यजनांना रिझविणाऱ्या ‘सामान्य वेश्या’ इतर वर्गांतील पुरुषांबरोबर संबंध ठेवू शकत.
मात्र काळाच्या ओघात वारांगना व गणिका हा भेद नष्ट होऊन त्यांची निर्भर्त्सना व अवहेलना होऊन त्यांना अमीर-उमरावांकडून उपमर्द सोसावा लागला. चाणक्यनीतिसार या ग्रंथात सामान्य वेश्यांची दयनीय अवस्था वर्णिली आहे.
भारतातील पारंपरिक समाजव्यवस्थेमध्ये वेश्या वा कलावंतीण ही ‘अखंड सौभाग्यवती’ म्हणून संबोधली जाई. दक्षिण भारतात नववधूचे मंगळसूत्र कलावंतीण ओवून देत असे. दुर्गापूजेसाठी देवीच्या मूर्तीसाठी शकुन म्हणून वेश्येच्या घरातील माती आणून सुरुवात करीत. लैंगिक संबंधाचे नियमन करताना पारंपरिक समाजात विविध रूढी-परंपरेमुळे काही प्रमाणात विवाहबाह्य संबंधांना मान्यता होती. भारतातील रूढी – परंपरांनुसार काही धार्मिक भावना आणि अंधश्रद्धा⇨देवदासी प्रथेला पोषक ठरल्या. तिसऱ्या शतकातील धार्मिक ग्रंथांत व साहित्यामध्ये या प्रथेचा उल्लेख आढळतो. अथर्ववेदामध्ये देवदासींना ‘गंधर्व गृहिता’ असे म्हटले आहे. कालिदासाच्या मेघदूतामध्ये देवदासींचे काव्यात्म वर्णन आढळते. कल्हणाच्या राजतरंगिणी ग्रंथात सातव्या शतकापासून ही प्रथा उत्तर भारतात रूढ असल्याचे म्हटले आहे. वाराणसीच्या विश्वनाथ मंदिरात नृत्यनिपुण देवदासी होत्या. महाराष्ट्रातही खंडोबाला मुरळी म्हणून मुली वाहिल्या जातात. काही मुरळ्याही वेश्याजीवन पतकरतात [→ वाघ्या-मुरळी].
भारतात ब्रिटिश अंमल सुरू झाल्यानंतर या व्यवसायाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले, उदा., कोलकाता व मुंबई येथील यूरोपीय व्यापाऱ्याच्या सोयीसाठी कुंटणखाणे निर्माण झाले. कोलकाता शहरातील कलिंगा बाजार व चितपूर येथील वेश्यावस्तीसंबंधीचे उल्लेख तत्कालीन जनगणनेत सापडतात. बंगालमध्ये ‘कुलीन’ पद्धतीमुळे ब्राह्मणांना बहुविवाह करण्यास मुभा होती. कौटुंबिक प्रतिष्ठेसाठी अनेक आईबाप भरमसाट हुंडा देऊन आपली मुलगी उच्चजातीय ब्राह्मणांना देऊ करीत. जरठ पातीच्या निधनामुळे अनेक अश्राप मुली बालविधवा होत. ज्या सती जात नसत, त्यांची अवहेलना होई व त्यामुळे त्यांना कुंटणखान्यात आश्रय घ्यावा लागे. तत्कालीन बंगाली साहित्यातदेखील कलानिपुण वेश्यासंबंधी उल्लेख आढळतात. शरत्चंद्र चतर्जींच्या श्रीकांत, देवदास कादंबमधून या स्त्रियांची संस्कृती व पिळवणूक यांचे चित्रण आढळते. श्रीमंत जमीनदार व व्यापारी हे रखेल्या ठेवणे ही प्रतिष्ठेची बाब समजत. रखेल्यांना ‘बंधा’ वेश्या म्हणत व त्यांना घरदार व दागदागिने दिले जात [→ रखेली पद्धति].
वेश्या ही कलंकित समजली जात असली, तरीदेखील या पेशासंबंधी परस्परविरोधी व संदिग्ध मतप्रणाल्या प्रचलित आहेत. स्त्रियांचे अपहरण करणे, कुंटणखाने चालविणे इ. कायद्याने निषिद्ध ठरविलेले असले, तरी या कायद्यांचा अंमल मर्यादित प्रमाणात आढळतो.
१९६० नंतरच्या स्त्रीमुक्तिवादी चळवळीच्या प्रवर्तकांनी वेश्याव्यवसाय अत्यंत हीन व ‘स्त्रियांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व व आरोग्य यांस बाधक ठरलेला धंदा’ असे म्हटले आहे. पितृसत्ताक विचारसरणीमुळे ही विदारक वस्तुस्थिती समाजात मान्यता पावते व केवळ कायद्याने तिचे निर्मूलन होऊ शकत नाही, या बाबीला या चळवळीच्या नेत्यांनी प्राधान्य दिले.
कायदेशीर तरतुदी : मुंबई वेश्याव्यवसाय प्रतिबंधक कायद्यान्वये (१९२३) वेश्येच्या उत्पन्नावर जगणे, हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. भारतातील वेश्याव्यवसाय व अनैतिक व्यापारबंदी आणि अजाण मुलींचे संरक्षण या दृष्टीने झालेले कायदे पुढीलप्रमाणे आहेत : (१) वेश्या – व्यवसाय – प्रतिबंधक कायदा, मुंबई (१९२३) व सौराष्ट्र (१९५२); (२) अनैतिक व्यापारनिर्मूलन कायदा, मद्रास (१९३०), बंगाल (१९६३), उत्तर प्रदेश (१९३३), पंजाब (१९३५), बिहार व मध्य प्रदेश (१९५३), म्हैसूर (१९३०) व हैदराबाद (१९५२); (३) अजाण मुली संरक्षण कायदा, उत्तर प्रदेश (१९२६); (४) नाईक मुली- संरक्षण कायदा (१९९०); (५) देवदासी- प्रतिबंधक कायदा, मुंबई (१९३४) व चेन्नई (१९४७). संपूर्ण भारतासाठी १ मे १९५६ रोजी स्त्रिया व मुली यांच्या अनैतिक व्यापारास बंदी करणारा कायदा लागू करण्यात आला. मात्र या प्रश्नाचे गांभीर्य ध्यानात घेऊन भारतीय पतित उद्धारण संघटना यांसारख्या बिगर शासकीय संस्थांनी जी पाहणी केली आहे (१९९३), तीनुसार महाराष्ट्र राज्यात सर्वांत अधिक, म्हणजे३.५ लाख वेश्या होत्या. या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये १,१०० ‘लालबत्ती’ (रेडलाइट) क्षेत्रे असून सु. २३,८८,३३० वेश्या या धंद्यात आहेत.
पुनर्वसन : सरकारी व बिगरसरकारी पातळ्यांवरून शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी उपक्रम राबविण्यात येतात. महिला व बालकल्याण संचालनालयामार्फत मुलींसाठी प्रमाणित शाळा तसेच महिला संरक्षण गृहे स्थापन केली आहेत. या ठिकाणी सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन व नवजीवन उभारणीचे प्रयत्न केले जातता. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतून असे प्रयत्न करण्यात येतात.
मुंबई शहरातील कुंटणखान्यांमधील बळजबरीने डांबलेल्या मुलींसाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्य करतात. ‘संवेदना’ व ‘समर्थन’ या संस्थांतर्फे नेपाळ व इतर राज्यांतून फसवून आणलेल्या मुलींना साहाय्य केले जाते. त्याचप्रमाणे ‘प्रयास’ ही संस्था महिलांच्या लैंगिक शोषणासंबंधी कार्यरत आहे. ‘लालबत्ती’ विभागात काम करणाऱ्या विविध संघटनांनी मुंबईच्या ‘प्रेरणा’ या संघटनेमार्फत ‘नॅकसेट’ कार्यजाळे सक्रिय केले आहे. कुंटणखान्यातील शोषित महिला व मुलींसाठी पुनर्वसनाचे काम यांद्वारे चालते. महाराष्ट्र राज्याच्या सर्व विभागांत ‘नॅकसेट’ च्या सहयोगी संस्था आहेत. नगर जिल्ह्यातील ‘स्नेहालय’ ही अशीच एक सदस्य – संस्था आहे.
महात्मा फुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘संवेदना’ ही संस्था १९८० सालापासून मुंबईतील कामाठीपुरा परिसरात अनेक उपक्रम राबविते. वेश्यांना आरोग्य, कायदेविषयक साहाय्य व पर्यायी रोजगाराबाबत मदत केली जाते. ‘नारी संघर्ष पंचायत’ या नावाने येथील वेश्यांनी स्वत:च संघटित होऊन स्वत:चे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. ‘आशा’ हा प्रकल्प मुंबई महापालिकेतर्फे, एडस् व इतर यौन कर्माशी संबंधित आजारांबाबत जागरूकता वाढविणे व उपचार करण्याबाबत ठोस काम करीत आहे. वरील प्रकल्पाशी संलग्न अशा ३० संस्था वेश्यांमध्ये एडस्बाबत जागृती आणणे, ऐच्छिक रक्ततपासणी मोहिमा व निरोध (कंडोम) वापराबाबत माहिती देणे. इ. कामे करतात.
मुंबईखेरीज इतर शहरांमध्येही स्वयंसेवी संस्थांचे कार्य चालते. नेटवर्क अगेन्स्ट कमर्शिअल सेक्स्युअल एक्सप्लॉयटेशन अँड ट्रॅफिकिंग ही नगरमधील स्वयंसेवी संस्था, लालबत्ती विभागात शरीरविक्रय व लैंगिक शोषणाविरुद्ध कार्य करीत आहे.
कोलकाता येथे नोव्हेंबर २००० साली वारांगनांची परिषद झाली. या परिषदेस आशिया खंडातील अनेक देशांतील वेश्या उपस्थित राहिल्या. वेश्यांचे ‘माणूस’ म्हणून हक्क जपण्यासाठी व समाजात मिळणारी उपेक्षा कमी करण्यासंबंधी या परिषदेत आवाज उठविण्यात आला. या परिषदेचे संयोजन दुर्बार महिला समन्वय समिती या बंगालमधील महिलांच्या संस्थेने केले. येथील ‘सोनागाची’ प्रकल्पाद्वारे वेश्यांना एड्सबाबत माहिती मिळते.
पुणे शहरामधील वंचित विकास ट्रस्टतर्फे ‘निहार’ हा एक लक्षणीय प्रकल्प चालविला जातो. १९८९ सालापासून येथे वेश्यांच्या बालकांसाठी निवासी केंद्र चालविले जाते. या मुलांना पालनपोषण, शिक्षण व रोजगार मिळवून देण्याचे कार्य चालू आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे.
स्त्रियांच्या प्रश्नावर विचार व कृती करण्यासाठी महाराष्ट्र सरकार व पोलीस विभागाने सुरक्षा समित्या स्थापन केल्या आहेत. महिला व बालकल्याण संचालनालयातर्फे निराश्रित महिलांना नारी निकेतन संस्थातर्फे साहाय्य मिळते. मात्र सरकारी योजनांना जोड म्हणून स्वयंसेवी संस्थांचे या क्षेत्रातील कार्य अनिवार्य आहे.
वेश्या व्यवसाय आणि एच.आय.व्ही–भारतातील वेश्या व्यवसाय
– आजपर्यन्तच्या नोंदणीनुसार भारतात सरासरी वीस लाख व्यक्ती वेश्या व्यवसाय करतात. (परंतु ही संख्या नक्कीच ह्यापेक्षा जास्त असू शकते.)
– त्यातील ४०% महिला १८व्या वर्षापूर्वीच वेश्या व्यवसायात आलेल्या असतात.
– खूपशी तरूण मुले ह्या कामात लहानपणीच ओढली जातात.
उगम: नॅशनल कमिशन फॉर वुमेन (१९९७), द वेल्व्हेट ब्लाऊज: सेक्शुअल एक्सप्लॉईटेशन ऑफ चिल्ड्रन, दिल्ली.
वेश्या व्यवसाय आणि कायदा – एक पूर्व इतिहास
भारतावर ब्रिटिशांचा अंमल होता तेव्हा भारतात वेश्या व्यवसाया बाबतीत व्हिक्टोरियन काळातला इंग्रजांसाठीचा कायदा वापरला जायचा. वेश्या व्यवसाय हा चोरून केला जाणारा अंधारतला कारभार आणि गुन्हा मानला जायचा. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा बर्याचश्या नियमावली इंग्रजांनी ठरवून केलेल्या जश्याच्या तशा भारतीय कायद्यात घेण्यात आल्या. त्यामधे Immoral Trafficking Prevention Act (ITPA) ह्याचाही सामावेश होतो. ह्या ३७७ क्रमांकाच्या कलमामध्ये पूर्वी म्हंटले होते की वेश्या व्यवसाय आणि समलिंगी असणे हा गुन्हा आहे. परंतु जून २००९ पासून बदललेल्या कायद्यानुसार त्यास मान्यता प्राप्त झाली आहे.
– मुंबईतील कामाठीपुरा ही अशिया खंडातील सर्वात मोठी रेडलाईट एरिया आहे.
– कामाठीपुरामधे गेल्या २०० वर्षापासून वेश्याव्यवसाय सुरू आहे.
– कामाठीपुरामधे वेश्या, पुरूष सेक्स वर्कर्स, आणि ट्रान्सजेंडर्स सर्व मिळून संख्या १५००० पेक्षा जास्त आहे.
– कामाठीपुरामधील ९०% पेक्षा जास्त सेक्स वर्कर्सना sexually transmitted infection (STI’s) ची लागण झाली आहे.
– तेथील ७०% पेक्षा जास्त जणांना एच.आय.व्ही. ची लागण होते.
अभ्यासातून असे दिसते की वेश्या व्यवसायात दोन पायर्यांवर कायद्याचे उल्लंघन केले जाते.
१. वेश्या व्यवसायात प्रवेश करणे
– सर्व सेक्स वर्कर्सची ह्या अभ्यासासाठी मुलाखत घेण्यात आली होती. त्या सर्व जणांनी ह्या व्यवसायात १० / १२ वर्षाचे असतानाच ह्या व्यवसायात प्रवेश केला होता.
– काही जणांचे त्यांच्या कुटुंबापासून अपहरण केले होते.
– अनेकांना पैशाची लालूच दाखवण्यात आली होती, आणि खोटे सांगून ह्या व्यवसायात गुंतवले होते.
– अनेकांनी “पैसा मिळवणे” ह्या एका कारणासाठीच ह्यात प्रवेश केला होता.
– भारतातील गुन्हेगारी हे वेश्या व्यवसायात प्रवेश करण्याचे एक खूप मोठे गंभीर कारण आहे.
२. सेक्स वर्कर म्हणून रहाणे:
– कामाठीपुरातील सेक्स वर्कर्स तिथे रहातात, व्यवसाय करतात, परंतु तेथे त्यांच्यासाठी सर्वकाळ एक असुरक्षितता असते. तेथे कधीही दंगल होऊ शकते, पोलीस येऊ शकतात, अशी खूप तर्हेची भीती त्यांच्यात असते.
– सेक्स वर्कर्सने यांच्या मुलाखतीमधे त्यांच्या नेहमी होणार्या शारिरीक आणि मानसिक छळाबद्दलही सांगतात.
मुंबई: कामाठीपुर्यातील गुन्हेगारी: एक सत्य.
झीनत: वय वर्ष ३०.
“लहानपणी मी एका खेड्यात रहात होते. आमच्या खेड्यात रहाणार्या एका माणसाने मला मुंबईत आणले. त्याने मला नोकरी देण्याचा शब्द दिला होता. पण मुंबईला आल्यावर त्याने मला एका वेश्यालयात विकले. आणि मला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करावा लागला. तो माणूस माझ्या वडिलांचा मित्र होता, आणि त्याला आमच्या घरची गरीबी माहीत होती. त्याला हे माहीत होते, की माझे लग्न जमवले तर लग्नाचा खर्च, हुंडा हे माझ्या वडिलांना मुळीच शक्य नव्हते. माझ्या वडिलांना त्याने शब्द दिला की मुंबईला घेऊन जाऊन मी तुमच्या मुलीला चांगली नोकरी देतो. पण इथे आम्हा सर्वांचीच खूप मोठी फसवणूक झाली.”
सायरा: वय वर्ष २०.
“माझी मावशी एका वेश्यागृहाची मालकीण होती. मी १० वर्षांची असतानाच तिने माझ्या आई-वडिलांना सांगितले की अत्तापासून जर सायरा वेश्यागृहात काम करू लागली आणि पैसे कमवू लागली तर पूर्ण कुटुंबाची ददातच संपेल. त्यामुळे मावशी मला दहाव्या वर्षीपासूनच वेश्यागृहात घेऊन गेली आणि तिने मला कामाला लावले. १० व्या वर्षीपासून मी पैसे कमवू लागले. माझ्याबरोबर झालेला पहिला संभोग हा खूप वेदनादायी आणि दु:खकारक होता. वेश्यागृहात येणारे कस्टमर्स हे वयाने आणि मोठे असायचे. त्या वयात मला संभोग आणि बलात्कार ह्या शब्दांचे अर्थसुद्धा माहीत नव्हते. वेश्यालयात काम करू लागल्यापासून मला फक्त त्या शब्दाचा अर्थच कळला नाही, तर मी रोज रात्रभर अनेकदा ते अनुभवू लागले. प्रत्येक संभोग हा सक्तीने केला जायचा. ते झाल्यावर मी माझ्या नशिबाला दोष देत तासंतास रडायचे. पण माझी मावशी मला अजिबात बाहेर सोडायची नाही, की कोणतीही मुभा द्यायची नाही.
गुन्हेगारी / हिंसा– एक सत्य : कामाठीपुरा, मुंबई.
राणीचा अनुभव
– भारतामध्ये १९८६ पासून वेश्या व्यवसायास कायद्याने मान्यता प्राप्त झाली आहे. Immoral Trafficking Prevention Act (ITPA)
– ITPA च्या आधारे वेश्या व्यवसायात होणारे गुन्हे आणि गैरव्यवहार रोखले जातात.
– ITPA च्या आधारे ‘Voluntary adult sex work’ ह्या विषयावरही काम केले जाते.
– ITPA ऍक्ट नुसार एक स्त्री वेश्या व्यवसायातून पैसे कमावू शकते. फक्त हा व्यवसाय उघड्यावर होऊ नये असा नियम असतो.
– कायद्या नुसार ह्या व्यवसायात तिसर्या व्यक्तीने सामील होऊ नये असा नियम असतो.
– तसे पहाता कायदा वेश्या व्यवसायास मान्यता देतो परंतु त्यामुळे होणार्या अनेक बेकायदेशीर गोष्टींवर नियंत्रण ठेवावे लागते.
– एखादा चालू वेश्या व्यवसाय बंद करणे हा सुद्धा कायद्यानुसार गुन्हा आहे.
– ITPA ammendmend नुसार कोणतीही कारवाई करण्याचा पोलिसांचा अधिकार आणि कायदा ह्यात फारशी तफावत नसते.
ITPA ammendmend
– केंद्र सरकारकडे आता ITPA ने वेश्यांकडे जाणार्या व्यक्तींवर आळा घालण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
– ह्या मागील तत्त्व म्हणजे वेश्यांकडे जाणारी माणसे कमी व्हावीत आणि लैंगिकतेमुळे होणारे आजार कमी व्हावेत हाच आहे.
– आजपर्यन्त घडत गेलेल्या घटनांनुसार लपून-छपून वेश्या व्यवसाय करण्यामुळे एच.आय.व्ही.चा प्रसार खूपच होतो. त्यामुळे व्यवस्थित नोंदणीकृत व्यवसाय आणि तेथे असलेली आरोग्या बद्दलची जागृती ह्याने खूप फरक पडतो असे दिसते.
– सरकार आणि केंद्र सरकार ह्यासाठी अजून खूप काही सुधारणा घडविण्यात प्रयत्नशील आहेत.
वेश्या व्यवसाय : एक सत्यता
कामाठीपुरा, मुंबई
Kamathipura, Mumbai
राणीचा हा अनुभव तिच्या प्रियकराबरोबरचा आहे. तिचा प्रियकरच तिचा दलाल होता.
“माझ्या प्रियकराला वाटले की माझ्या गर्भात वाढत असलेले मूल त्याचे नाही. परंतु ते त्याचेच होते. मला आठवा महिना लागला होता. तेव्हा आमचा काही क्षुल्लक कारणावरून वाद झाला, ज्याचे रुपांतर शाररिक झटपटीत झाले. तेव्हा अचानक त्याने मला पोटावर खूप जोरात लाथ मारली, आणि मला खूपच रक्तस्त्राव सुरू झाला. त्याने मला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची तसदी सुद्धा घेतली नाही. माझ्या शेजार्यांनी माझे हाल होताना बघून मला डॉक्टरांकडे नेले. माझे महिने पूर्ण होण्याआधीच बाळंतपण झाले आणि डॉक्टर बाळाला वाचवूसुद्धा शकले नाहीत. त्यानंतर कधी मला दिवस गेले नाहीत.”
वेश्या व्यवसाय – एक कलंक
शरीरक्रीया करणार्यांना ह्या कलंकीत व्यवसायात पडण्याचे कारण बर्याचदा गरीबी हे असते. हा व्यवसाय त्यातील जास्तीत जास्त जणांना कोणत्या ना कोणत्या आजाराच्या दिशेने नेत असतो. एच.आय.व्ही ची लागण ही जास्तीत जास्त हा व्यवसायामुळेच पसरते. ह्या विश्वात आज एवढे गुन्हे आणि फसवणूक चालू असते, की ती सर्वसामान्य माणसांपर्यन्त पोहोचत सुद्धा नाही. त्यामुळे वेश्या व्यवसाय हा आज एक खूप मोठा कलंक बनत चालला आहे.
वेश्या व्यवसाय – एक भेदभाव
शरीरक्रीया – म्हणजेच वेश्या व्यवसाय करणार्या स्त्रीयांना नेहमीच गुन्हेगारांना, पोलिसांना, आणि गुंडगिरी करणार्या लोकांना सामोरे जावे लागते. ह्या स्त्रीया समाजापासून फारच दूर सारल्या गेल्या असल्यामुळे ह्या भेदभावाची तीव्रता त्यांना खूपच जाणवते.
अशा तर्हेने शरीरक्रीया करणार्या स्त्रीया, म्हणजेच वेश्या ह्यांचे आयुष्य खूपच कठीण असते, आणि त्यामधे एच.आय.व्ही. ची लागण किंवा इतर आजार ह्याची शक्यता खूपच असते.
- आजपर्यन्तच्या नोंदणीनुसार भारतात सरासरी वीस लाख व्यक्ती वेश्या व्यवसाय करतात. (परंतु ही संख्या नक्कीच ह्यापेक्षा जास्त असू शकते.)
- त्यातील ४०% महिला १८व्या वर्षापूर्वीच वेश्या व्यवसायात आलेल्या असतात.
- खूपशी तरूण मुले ह्या कामात लहानपणीच ओढली जातात.