( अकाँप्लिस ). एखादा अपराध एकापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रपणे केला, तर ते सर्व संयुक्तपणे अपराधी मानले जातातच; परंतु अपराध होण्यापूर्वी, होताना अगर झाल्यावर अशा अपराधात स्वारस्य असणाऱ्या, अपराध किंवा अपराधी यांना मदत करणाऱ्या काही व्यक्ती असू शकतात, त्यांना कायदयाच्या परिभाषेत सह-अपराधी समजण्यात येते. गुन्हा होणार आहे हे माहीत असताना त्याची सूचना न देणारे, आपल्या एखादया कृतीमुळे गुन्हेगाराला गुन्हा करण्यास मदत होईल हे माहीत असूनही तशी मदत देणारे, गुन्हा घडल्याचे माहीत असताना गुन्हेगाराला आश्रय देणारे, चोरीच्या गुन्ह्यात चोरीचा माल दडवण्यास मदत करणारे हे सर्व सह-अपराधी मानले जातात.
सह-अपराध्यांना दंडसंहितेच्या विविध कलमांनुसार शिक्षा होऊ शकते; पण काही वेळा त्यांच्या गुन्ह्यातील मदतीबद्दल त्यांच्यावर आरोप ठेवलेला नसतो; अशा वेळी असा सह-अपराधी न्यायालयात ⇨ साक्षीदार म्हणून येऊ शकतो. त्यावेळी त्याच्या साक्षीवर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्न उपस्थित होतो. भारतीय पुराव्याच्या कायदयानुसार सह-अपराध्याने दिलेला पुरावा गाह्य मानला जाऊ शकतो. प्रकरणातील हकिगतीनुसार न्यायालय त्याच्या विश्वसनीयतेबाबत निर्णय घेते व असा पुरावा विश्वासार्ह वाटला, तर त्याचा आधार निर्णयासाठी घेऊ शकते. विविध न्यायालयीन निर्णयांनी गुन्ह्याचे वेळी हजर असणारे, गुन्हा घडल्याचे उघड न करण्यात स्वार्थ असणारे व गुन्हेगार किंवा गुन्ह्याची साधने गुन्हा झाल्याचे किंवा होणार असल्याचे माहीत असतानाही दडवणारे यांना सह-अपराधी मानले आहे.