ढवळपुरीकर, चंद्रकांत : (२३ जुलै १९३२). ढोलकी फडाच्या तमाशाचे मालक, ज्येष्ठ कलावंत. पूर्ण नाव चंद्रकांत शिवराम जाधव.
त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे झाला . त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. एक बहीण व सात भाऊ असा त्यांचा घरचा परिवार. चंद्रकांतजी बालवयात गुरे सांभाळून जेमतेम इयत्ता ३ री पर्यंत शिक्षण घेऊ शकले. त्यांचा जन्म गोंधळी समाजातला आहे . बालवयातच ते आपल्या मामांच्या तमाशात काम करू लागले. विष्णूबुवा बेल्हेकर सह देविदास रांधेकर या तमाशात प्रथम बिगारी काम करीत असतानाच नंतर ते नृत्य कला शिकले. ते नाचाची उत्तम भूमिका करीत असत. १९५५ मध्ये जगताप पाटील पिंपळेकर यांच्या फडात त्यांनी वगात छोट्या मोठ्या भूमिका केल्या. त्यांचा आत्मविश्वास वाढला, संवादातून संभाषण कौशल्य विकसित झाले.
१९५६ साली तुकाराम खेडकर सह विठ्ठल कवठेकर या तमाशात त्यांनी प्रवेश केला. तुकाराम खेडकर हे कुशल तमाशा कलावंत होते. त्यांचे अभिनय कौशल्य अप्रतिम होते. ते शब्दसृष्टीचे उपासक होते. त्यांचा चंद्रकांतजींवर चांगलाच प्रभाव पडला. त्याच तमाशात चंद्रकांतजी उर्फ भाऊ खलनायक म्हणून प्रसिद्ध झाले. १९५८ मध्ये माधवराव नगरकर तमाशा मंडळात सारंगपूरची होळी या वगात खलनायकाची भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे सादर केली. १९५९ ते १९६२ पर्यंत तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर तमाशा मंडळात त्यांच्या कलेला बहर आला. त्यांची खलनायकाची भूमिका पाहण्यासाठी तमाशाचा तंबू खचून भरत असे. त्याच काळात पानिपतचा सूड हा त्यांनी भूमिका केलेला ऐतिहासिक वग अतिशय गाजला. त्या वगात ‘ सादुल्ला ‘ नावाची खलनायकाची भूमिका त्यांनी यशस्वीपणे सादर केली. त्याच काळात त्यांनी काळ रक्त,लडूसिंग, गवळ्याची भूमिका सादर केल्या. ते रसिकांचे खलनायक म्हणून प्रसिद्ध झाले.
महाराष्ट्रातील तमाम तमाशा रसिकांनी त्यांना वगसम्राट ही पदवी बहाल केली. १९६३ ते १९६४ या कालावधीत जगताप पाटील पिंपळेकर या तमाशा मंडळात दत्ता महाडिक पुणेकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला. परिचयातून स्नेह वाढला. दत्ता महाडिक यांच्यासारखा उत्कृष्ट कलावंताचे ते मित्र बनवले. स्वतःच्या मालकीचे लोकनाट्य मंडळ असावे अशी प्रेरणा त्यांना झाली. त्याचाच परिणाम म्हणून १९६४ मध्ये वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह बाबुराव सविंदणेकर नावाने तमाशा फड सुरु केला. बिगारी कामगार बनून दाखल झालेला तमाशातील कामगार तमाशा मंडळाचा मालक बनला; परंतु आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या. १९६६ सालापासून चंद्रकांत ढवळीपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर तमाशा मंडळ अस्तित्वात आले. या तमाशा मंडळाने त्यांच्या वैभवाच्या व प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. त्यांनी गणपतराव चव्हाण सविंदणेकर यांना गुरुस्थानी मानले होते.
त्यांची गाजलेली वगनाट्य व त्यातील भूमिका : महाराष्ट्र झुकत नाही – गणोजी शिर्के, महाराष्ट्रा तू जागा रहा – बहिर्जी नाईक, चित्ता फाडला जावळीचा – चंद्रराव मोरे, चिचोंलीचा देशमुख – देशमुख , गवळ्याची रंभा – रंगभल महाराज ,संत तुकाराम – मंबाजी, भक्त पुंडलिक – अंबाजी पाटील, चाकणचा किल्लेदार – फिरंगोजी नरसाळे, ज्ञानेश्वर माझी माऊली – दादभट, झाला उद्धार वाल्मिकीचा – वाल्मिकी, याशिवाय त्यांची रक्तात भिजला बांगला , असे पुढारी ठार करा , पुढाऱ्यांनी काढली शाळा , पुढारी पाहिजे गावाला , तिथं मठातील सैतान , मुंबईचा रेल्वे हमाल, काय दिले या स्वातंत्र्याने ,यासाठी स्वातंत्र्य हवे का ?, इंदिरा मठाचे गुपित , करा ठार हे गॅंगवॉर , रनात रंगली इंदिरा , राजीव गांधी झिंदाबाद , ही झुंज मुरारबाजीची , संत सावता माळी , करितो चोखोबा जोहार , संत एकनाथ , खुर्चीसाठी वाटलं ते , संभाळ तुझ्या सौभाग्याला , चांडाळ चौकडी गाव गुंडांची, तिकीट मिळालं गुंडाला , लोकशाहीचे मारेकरी अशी अनेक वगनाट्ये गाजली. महाराष्ट्र झुकत नाही या वगनाट्याने तर त्यांची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविली. इराण सरकारचे सांस्कृतिक मंडळ भारतातील सांस्कृतिक जीवनाचा विकास कशाप्रकारे झाला आहे याचा अभ्यास करण्यासाठी १९६७ साली महाराष्ट्रात आले होते. त्यांनी भाऊंच्या वगनाट्याचे शूटिंग करून नेले आणि ते इराण च्या दूरचित्रवाणीवरून प्रसारित केले.
चंद्रकांत ढवळीपुरकर यांना मिळालेले पुरस्कार : ढवळपुरी ग्रामस्थांकडून ६५ वी निमित्त सत्कार व पुरस्कार (१९९४), विठ्ठलराव विखे पाटील कला गौरव पुरस्कार (२००१) , पुणे महानगरपालिका पट्ठे बापूराव पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद दादू इंदुरीकर स्मृती पारितोषिक (२००३) , पुणे नवरात्रौ महोत्सव पुरस्कार (२००४), महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२००४) , उत्कृष्ट तमाशा अभिनय सम्राट ( पवळा पुरस्कार – २००१ ) , सहकार महर्षी जयंती समारंभ पुरस्कार (२००५), नाद निनाद तमाशा महोत्सव पुरस्कार (२००६), नांदेड जिल्हापरिषद तमाशा महोत्सव पुरस्कार (१९९०). तमाशा करत असताना त्यांनी अनेक गावातील शाळांना व मंदिरांना भरघोस देणग्या दिल्या. ढवळपुरी गावातली शाळा बांधली. मारुती मंदिर व दत्त मंदिर बांधले. ह्यात असे पर्यंत शालेयपयोगी वस्तूंचे मुलांना वाटप केले. त्यांनी १६ ऑक्टोबर २००९ साली जगाचा निरोप घेतला . अखिल महाराष्ट्र तमाशा परिषदेत त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले. सध्या त्यांची दोन्ही मुले किरण चंद्रकांत जाधव ( किरण कुमार ढवळीपुरकर ) व संतोष चंद्रकांत जाधव ( संतोष ढवळीपुरकर ) लोकनाट्य तमाशा मंडळाचे काम आजतागायत सांभाळत आहेत.
संदर्भ : क्षेत्र संशोधन