यशासह आकाशात उंच झेप घ्यायची असेल तर वायु सेनेत सेवा करणे हा एक उत्तम पर्याय आहे. महासत्ता असलेल्या भारत देशाच्या वायु सेनेने नुकतेच रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले आहे. 8 ऑक्टोबर 1932 ला वायु सेनेची स्थापना झाली त्यावेळी 6 अधिकारी आणि 19 वायुसैनिक कार्यरत होते. 85 वर्षे यशाची कारकीर्द वायु सेनेने उत्तमरित्या पूर्ण केली आहेत.
उज्ज्वल भविष्याची सुरुवात वायु सेनेतील करिअरने तुम्ही करू शकता. तुमच्यातील कौशल्य विकसीत करण्याबरोबरच, नेतृत्व गुण, आत्मविश्वास वाढविण्याची संधी तुम्हाला प्राप्त होते. देशाच्या स्वातंत्र्याची सुरक्षा जपण्याची मोठी जबाबदारी तुम्ही पेलू शकता. आकर्षक पगार, कुटुंबियांना व तुम्हाला भविष्याची सुरक्षितता, समाजात मिळणारा मान-सन्मान हे सर्व तुम्हाला वायु सेना देऊ शकते. देशावर प्रेम आणि कर्तृत्वाची जाणीव तुमचे हे गुण उत्तुंग भविष्य बनवते.
वायु सेना तीन विभागात कार्यरत आहे. वैमानिक अभियांत्रिकी (ॲरोनॉटीकल इंजीनिअरींग), उड्डाण (फ्लाइंग) आणि ग्राउंड ड्युटी या तीन शाखांमध्ये विविध पदांवर कार्यरत होऊन तुम्ही वायु सेनेचा एक भाग होऊ शकता. 10 + 2, पदवी, पदव्युत्तर पदवी, इंजीनिअरींग या क्षेत्रातील विद्यार्थी वायु सेनेत करीअर करू शकतात.
वैमानिक अभियांत्रिकी विभागात पुरूष आणि महिलांना प्रवेश घेता येतो. यासाठी 20 ते 26 वर्षे वयोमर्यादा असून, जून आणि डिसेंबर महिन्यात जाहिरातीद्वारे भरती करण्यात येते. तांत्रिक शाखेचे अधिकारी म्हणून तुम्ही काम करू शकता. अत्याधुनिक शस्त्रांचे प्रभारी म्हणून कार्य करण्याची संधी तुम्हाला याद्वारे मिळते. या विभागात ॲरोनॉटीकल इंजिनिअरींग इलेक्टॉनिक्स आणि ॲरोनॉटीकल इंजिनिअरींग मेकॅनीकल या दोन शाखांत शैक्षणिक पात्रतेनुसार प्रवेश घेता येतो. ॲरोनॉटीकल इंजिनिअरींग इलेक्ट्रॉनिक्ससाठी 10 + 2 आणि 4 वर्षे पदवी पूर्ण असणे आवश्यक किंवा अभियांत्रीकी शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. ॲरोनॉटीकल इंजिनिअरींग मेकॅनिकलसाठी भौतिकशास्त्र आणि गणित या विषयासह 10+2 पूर्ण असणे आवश्यक आहे.
फ्लाइंग विभागात काम करताना आयुष्यात उंच भरारी घेण्याचा अनुभव तसेच देशसेवा करीत असल्याचा मान समाजात मिळतो. यामध्ये फायटर पायलट, हेलिकॉप्टर पायलट, ट्रान्सपोर्ट पायलट म्हणून काम करण्याची संधी प्राप्त होते. केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा एकत्रित सुरक्षा सेवा परिक्षेद्वारे (CDSE) किंवा एनसीसी किंवा शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकता. 20 ते 24 वर्षे वयोमर्यादा असून, पुरूष या पदासाठी अर्ज करू शकतात. 10+2 भौतिकशास्त्र आणि गणित या विषयासह उत्तीर्ण असणे गरजेचे असून, 3 वर्षे पदवी पूर्ण केलेले उमेदवार किंवा बी.ई. किंवा बी.टेक. उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकतात. शेवटच्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थीही अर्ज करण्यास पात्र ठरू शकतात.
ग्राउंड ड्युटी विभागात प्रशासकीय, लेखा, लॉजिस्टीक, शैक्षणिक मेट्रोलॉजी अशा विविध शाखेत रूजू होण्याची संधी आहे. या विभागात मानवी आणि भौतिक संसाधनांचे व्यवस्थापन करण्याची संधी प्राप्त होते. 20 ते 26 वयोमर्यादा असलेले पुरूष आणि महिला या विभागात अर्ज करू शकतात. पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. प्रशासकीय शाखेत एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि फायटर कंट्रोलर म्हणून कार्य करण्याची संधी प्राप्त होते. तर, लेखा शाखेत रूजू व्हावयाचे असल्यास 60 टक्केसह वाणिज्य शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. लॉजिस्टीक शाखेत 60 टक्केसह पदवी असणे आवश्यक आहे.
शिक्षण आणि मेट्रोलॉजी शाखेसाठी एम.ए. किंवा एम.एस्सी. इंग्रजी / गणित/ रसायनशास्त्र/ स्टॅटीस्टीक / आंतरराष्ट्रीय संबंध / आंतरराष्ट्रीय शिक्षण / सुरक्षा शिक्षण / मानसशास्त्र / संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / व्यवस्थापन / मास्टर इन कम्प्युटर ॲप्लीकेशन / मास कम्युनिकेशन / पत्रकारिता / जनसंपर्क या विषयात ५० टक्केसह पूर्ण असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी http://careerairforce.nic.in या संकेतस्थळास भेट द्या.