‘नावात काय आहे?’ असे बऱ्याचदा बोलले जाते. मात्र नावानुरुप कामगिरी झाल्यावर मात्र खरी ओळख सर्वदूर प्रस्थापित होत असते. नाशिक जिल्ह्यातील ‘चाफ्याचा पाडा’ गावाने स्वच्छतेमुळे असाच लौकिक मिळविला आहे. गावाला भेट दिल्यावर चाफ्याचे सौंदर्य आणि निर्मलतेचा अनुभव प्रत्येकाला येतो.
चाफ्याचा पाडा म्हटल्यानंतर त्याचा संबंध चाफ्याच्या झाडांशी असेल असे वाटले होते. मात्र नावाला तशी पार्श्वभूमी नाही. सप्तश्रृंगी देवीचा गड ओलांडून कळवण जवळ गावाची चौकशी केली. ‘डांगसौंदाणे ओलांडीसन चाफाना पाडा कुणालाबी इचारा, सांगी देयी’ एका ग्रामस्थाने माहिती दिली. परिसरात गाव चांगलंच परिचित असल्याचे त्यावरून लक्षात आले. सभोवतलच्या हिरव्या शेतातून नजर फिरवित पुढे गेल्यावर गाडी मोठ्या वडाच्या झाडाजवळ थांबली. डाव्या बाजूला दाट झाडीतून डोकावणारा अंगणवाडीचा फलक दिसला. रस्त्याच्या दुतर्फा जाळ्यांमध्ये लावलेली रोपे, रोपांचे उन्हापासून रक्षण करण्यासाठी त्यावर हिरवी नेट, मधूनच दिसणारी फुलझाडे… प्रवेश करताच गावाचे सौंदर्य नजरेत भरत होते.
ग्रामसेवक श्री. देवरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात नेले. लहानशी पण नेटकी आणि परिसर स्वच्छ असलेली ही इमारत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तोफा होत्या. गावात पाहुणे आले की या तोफांमध्ये पिवळी फुले भरून बार उडविला जातो… स्वागताची ही कल्पना मनाला भावली. जुजबी माहिती घेतल्यावर गावात फेरफटका मारला.
प्रत्येक दारासमोर फुलाचे किंवा शोभेचे झाड लावलेले होते. रस्ते अगदी चकाचक… सर्व गावांत सिमेंटचे रस्ते… कुठेच कचरा दिसत नव्हता. केवळ 159 कुटुंब असलेल्या या लहानशा गावात दोन ठिकाणी असलेले कचऱ्याचे ढीग स्वच्छ करून बाग तयार केली होती. गावात सातशेच्या वर जनावरे असताना कुठेच घाण दिसत नव्हती. प्रत्येक घराजवळ असलेल्या नळाला व्यवस्थित तोटी लावलेली होती. नळाद्वारे दिवसातून दोनदा स्वच्छ पाण्याचा पुरवठा गावाला होतो.
गावात गटर सर्वत्र झाकलेली होती. गावातला कचरा गावकरी स्वत:च ‘नेडॅप’ पद्धतीच्या खड्यात टाकत होते. प्रत्येक घराजवळ स्वतंत्र शौचालय होते. सर्व गटारींचे पाणी फिल्टर टँकमध्ये आणले जाते. तेथे त्याचे स्थिरीकरण करून त्या पाण्यातून प्राथमिक शाळेची बाग फुलविण्यात आली आहे. बागेत आवळा, सीताफळ यासोबत फुलझाडे लावली आहेत. हिरव्यागार दाट झाडीत असलेल्या शाळेत मुलांना बालपणापासूनच शेतीचे वाफे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. अंगणवाडीत दृकश्राव्य माध्यमांचा उपयोग करण्यात आला आहे. स्वच्छतेची सवय मुलांना शाळेपासूनच लावण्यात येते.
शाळेजवळच पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे. त्यातील पाणी गुरांना पिण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी वापरण्यात येते. टाकीच्या बाजूलाच महिलांना कपडे धुण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गावात स्वच्छता राहण्याबरोबर वाया जाणाऱ्या पाण्याचा चांगला उपयोग करता येतो. गावाच्या विकासाबाबत आणि विशेषत: स्वच्छतेबाबत प्रत्येकाच्या मनात विशेष आस्था असल्याचे गावकऱ्यांशी चर्चा करताना प्रकर्षाने जाणवले. गावातील वैशिष्ट्य टिपताना ग्रामसेवक आणि माजी सरपंच हिरामण बागूल उत्साहाने विविध उपक्रमांबाबत माहिती सांगत होते.
हागणदारी मुक्तीसाठी महिलांनी पुढाकार घेतला हे विशेष. उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना 1 हजार रुपये दंड करण्याचा प्रस्ताव महिलांनी एकत्रितरित्या ग्रामसभेत मांडला आणि तो संमत झाला. त्यामुळे उघड्यावर घाण करणाऱ्यांना जरब बसली. तत्कालीन सरपंच वसंत बागूल हे पहाटे स्वत: गस्त घालत. ते कुणालाही उघड्यावर शौचाला बसू देत नसत. हळूहळू गावातील सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व पटले आणि गाव हागणदारीमुक्त झाला.
राज्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरू झाल्यापासून गावाने त्यात सहभाग घेऊन विविध पुरस्कारही मिळविले आहेत. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात राज्यस्तरावर तृतीय पुरस्कार, साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार, सामाजिक एकता पुरस्कार, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत 9 लाखाचा पुरस्कार अशा पुरस्कारांमुळे गावाला स्वच्छतेबाबतीत पावतीच जणू मिळाली आहे.
गावात पूर्णत: प्लास्टिक, चराई आणि कुऱ्हाडबंदी आहे. केवळ झाडाच्या वाळलेल्या फांद्याच वापरण्याची मुभा ग्रामस्थांना आहे. गावात दीड हजार झाडे जगविण्यात आली आहेत. 100 टक्के साक्षरता असलेल्या या गावात दारुबंदी आणि गुटखाबंदी कटाक्षाने पाळण्यात येते. व्यसनमुक्त आणि सुशिक्षित नागरिक घडविण्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच कदाचित गावातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती शासकीय किंवा खाजगी नोकरीत आहे.
शासनाच्या प्रत्येक योजना ग्रामस्थांनी एकोप्याने राबविल्या आहेत. आपला गाव प्रत्येक बाबतील अग्रेसर रहावा ही भावना प्रत्येकाच्या बोलण्यातून इथे सहज जाणवते. विशेष म्हणजे असे असताना शेजारच्या गावातील चांगल्या बाबींचे कौतूकही तेवढ्याच मोकळेपणाने केले जाते.
ठक्करबाप्पा योजनेतून सिमेंटचे रस्ते आणि सभागृह उभारण्यात आले आहे. विहीर पुनर्भरण, बांधबंदिस्ती, तलावातील गाळ काढणे असे उपक्रम सातत्याने राबविले जातात. श्रमदानातून पाणंदरस्ता तयार करण्यात आला आहे. गावात दरडोई 5 झाडे असून हे प्रमाण 10 पर्यंत नेण्याचा निश्चय सरपंच शांताराम बागूल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. बिनविरोध निवडणुका हेदेखील गावाचे वैशिष्ट्य आहे. गाव तंटामुक्त असल्याने गावात शांती आणि सौख्य आहे.
गावात वीज बचतीसाठी सोलर लॅम्पपोस्ट उभारण्यात आले आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून 10 विहिरी करण्यात आल्या आहेत. नियमित ग्रामसभा, महिलांचा सहभाग, 100 टक्के करवसुली, रोगराईमुक्त वातावरण अशी चांगली कामगिरी करताना शासनाची प्रत्येक योजना गावात राबविण्याचा प्रयत्न ग्रामस्थ सातत्याने करीत आहेत.
एखादा गाव स्वच्छ होणे तशी साधारण बाब, मात्र सतत 15 वर्षे जाणीवपूर्वक व्रत म्हणून हे कार्य करीत राहणे खरोखर वैशिष्ट्यपूर्णच आहे. साल्हेर-मुल्हेरच्या डोंगररांगांच्या जवळील दुर्गम भागात वसलेले असताना शहरी भागाला मार्गदर्शक ठरेल असा विचार घेऊन गावाने केलेली वाटचाल आदर्श अशीच आहे. ‘तुम्ही केव्हाही न सांगता या, गाव असाच दिसेल’ हिरामण बागूल यांच्या शब्दातून गावाबद्दलचे प्रेम आणि विश्वास प्रकट झाला. अर्थातच मी याचा अनुभव घेतला होता. पूर्वकल्पना न देता गावात जाऊन हे सुंदर वातावरण अनुभवले होते. गावाने फार मोठा प्रकल्प राबविला नसेल, मात्र ग्रामविकासाची कल्पना साकार करून दाखविली एवढे मात्र खरे!