राजकुमारी अमृत कौर : (२ फेब्रुवारी १८८९ – ६ फेब्रुवारी १९६४). प्रसिद्ध गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या व भारताच्या पहिल्या कॅबिनेट मंत्री. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे राजघराण्यात झाला. वडील राजा हरमनसिंह व आई राणी हरनाम कौर यांच्या आठ अपत्यांपैकी अमृत कौर या एकुलती मुलगी होत्या. वडील हरनामसिंह पंजाबमधील कपुरथळाचे राजे होते. त्यांचे काँग्रेसमधील अनेक नेत्यांबरोबर मित्रत्वाचे संबंध होते. विशेषत: ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी त्यांची चांगली मैत्री होती. साहजिकच ना. गोखले यांचे व्यक्तित्व व विचार यांचा प्रभाव अमृत कौर यांच्यावर पडला.
अमृत कौर यांचे शालेय शिक्षण इंग्लंडमधील शेरबोर्न गर्ल्स स्कूलमध्ये झाले. ऑक्सफर्ड विद्यापीठामधून त्यांनी एम. ए. ची पदवी प्राप्त केली. इंग्लंडमधील शिक्षण पूर्ण करून भारतात परत आल्यानंतर १९१९ मध्ये मुंबई येथे महात्मा गांधी यांच्याशी त्यांची भेट झाली. गांधीजींच्या भेटीने व त्यांच्या विचाराने त्या प्रभावित झाल्या. पंजाबमध्ये या काळात जालियनवाला बाग हत्याकांड घडून आले होते. या हत्याकांडात झालेल्या प्रचंड नरसंहारामुळे त्या ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या लढ्यात सक्रिय झाल्या. स्वातंत्र्य लढ्याबरोबरच त्या स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, रूढी, परंपरांमधून त्यांची मुक्तता करणे, बालहत्या, बालविवाह व पडदा पद्धती विरोधात प्रबोधन करणे अशी कामे करण्यास त्यांनी सुरुवात केली. १९२७ मध्ये मार्गारेट कझिन्स यांच्या पुढाकाराने त्यांनी अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना केली. १९३० मध्ये त्या या परिषदेच्या सचिव व पुढे १९३३ मध्ये अध्यक्षा झाल्या.
१९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. महात्मा गांधीजींच्या सोबत त्यांनी दांडी यात्रेत सहभाग घेतला, त्यामध्ये त्यांना तुरुंगवासही झाला. १९३४ नंतर त्या महात्मा गांधीजींच्या आश्रमात राहण्यासाठी गेल्या व पुढे त्या गांधीजींच्या सचिव म्हणून १६ वर्षे कार्यरत होत्या. १९३७ मध्ये काँग्रेसने त्यांना सद्भावना मिशन अंतर्गत बन्नूच्या उत्तर–पश्चिम प्रांतात पाठविले. परंतु ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला आणि त्यांना तुरुंगात टाकले. तुरुंगातून सुटल्यानंतर १९४३ मध्ये त्यांनी छोडो भारत आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सामान्य जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी त्या आग्रही होत्या. ‘लोथिमन समिती’समोर त्यांनी यासंबंधी प्रतिनिधित्व केले. ब्रिटिश संसदेच्या संयुक्त निवड (जॉइंट सिलेक्ट) समितीसमोर भारतीय सांविधानिक सुधारणासंबंधी त्यांनी आपली आग्रही भूमिका मांडली. दरम्यानच्या काळात ब्रिटिश सरकारने अमृत कौर यांची ‘एज्युकेशन अॅडव्हायजरी बोर्डा’च्या सदस्यपदी नियुक्ती केली. परंतु त्यांनी या पदाचा ‘भारत छोडो’ आंदोलनात राजीनामा दिला.
१९४५ व ४६ मध्ये युनेस्कोच्या लंडन व पॅरिस येथील बैठकांसाठीच्या भारतीय शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात अमृत कौर यांचा समावेश झाला. केंद्रीय मंत्री बनलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. १९४७–५७ इतक्या प्रदीर्घ काळात त्यांनी आरोग्य व स्वास्थ्य मंत्रालयाचा कारभार पाहिला. या कार्यकाळात त्यांनी आरोग्यासंबंधी मूलभूत व धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी केलेली दिसते. १९५० मध्ये त्यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा सन्मान प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या आशियाई महिला होत्या. १९५१–५२ या वर्षांत त्यांच्याकडे केंद्रीय दूरसंचार मंत्रिपदाची जबाबदारी होती. १९५२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्या काँग्रेसच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून निवडून आल्या. त्यानंतर १९५७–६४ पर्यंत त्या राज्यसभा सदस्या म्हणून कार्यरत होत्या.
अमृत कौर यांनी आरोग्य मंत्रिपदाच्या काळात महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीचे काम केले. ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस्’ या संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या. ही संस्था उभारण्यासाठी त्यांनी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पश्चिम जर्मनी, स्वीडन व अमेरिका या देशांची मदत घेतली. अमृत कौर यांनी शिमला येथील आपले घर या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना व परिचारिकांना ‘हॉलीडे होम’ स्वरूपात दान म्हणून दिले. त्यांच्या पुढाकाराने ट्यूबरक्यूलॉसिस असोसिएशन ऑफ इंडिया; केंद्रीय कुष्ठरोग अध्यापन व संशोधन संस्था, मद्रास; सेंट जॉन ॲम्बुलन्स क्रॉप्स व अमृत कौर कॉलेज ऑफ नर्सिग इ. संस्थांची स्थापना करण्यात आली. तसेच त्यांनी या संस्थांचे अध्यक्षपदही भूषविले. १९४८–४९ मध्ये ‘ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ सोशल वर्क’ या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९५७ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या १९ व्या आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या त्या १४ वर्षे अध्यक्षा होत्या. लीग ऑफ रेड क्रॉस सोसायटी; सेंट जॉन ॲम्बुलन्स क्रॉप्स; इंडियन कौन्सिल ऑफ चाइल्ड वेलफेअर; लेडी आर्यविन कॉलेज, नवी दिल्ली; हिंदी कुष्ठरोग निवारण संघ; दिल्ली म्यूझिक सोसायटी, कौन्सिल ऑफ साएंटिफीक अँड इंडस्ट्रियल रिसर्च; गांधी स्मारक निधी; जालियनवाला बाग नॅशनल मेमोरियल ट्रस्ट्र; ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस व ऑल इंडिया स्पिनर्स असोसिएशन इत्यादी अनेकविध संस्था व संघटनांच्या त्यांनी विश्वस्त व अध्यक्षा म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले.
अमृत कौर एक उत्तम टेनिसपटू होत्या. त्यांनी ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’ ची स्थापना केली. या क्लबच्या त्या अध्यक्षा होत्या. भारतीय राज्यघटना समितीच्या विविध उपसमित्यांवरही त्यांनी काम केले. त्यामध्ये अर्थ व कर्मचारी, राष्ट्रध्वज, मूलभूत हक्क समिती व अल्पसंख्याक समिती इत्यादींचा समावेश होतो. या समितीमध्ये कार्यरत असताना त्यांनी रेणुका रे व बेगम रसूल यांच्यासोबत कार्य केले. राष्ट्रध्वज फक्त खादी कापडाचा व हातांनी विणलेला असावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. संविधान समितीने त्यांची ही मागणी मान्य केली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना दिल्ली विद्यापीठ, स्मिथ कॉलेज, वेस्टर्न कॉलेज, मेकमरे कॉलेज इत्यादींनी ‘डॉक्टरेट’ पदवी बहाल केली.
दिल्ली येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मृतदेहाचे दफन न करता अग्निसंस्कार करण्यात आले.
संदर्भ :
- Gupta, Indra, Indias 50 Most Illustrious Women, Delhi, 2003.
- Ram, S.; Gajrani, Shiv, Rajkumari Amrit Kaur: Dedicated Gandhian and Health Minister, Delhi, 2013.
- सुमन कुमारी, शिखर भारतीय महिलाएँ, २०१५.