“मला जेलमध्ये टाकण्यासाठी जाळं टाकलं होतं. पण विरोधक यशस्वी होऊ शकले नाहीत”, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरंतर नाव न घेता काँग्रेसवर याबाबतची टीका केली आहे. तसेच काँग्रेस सत्तेत असताना काही लोक बँकेला लुटून पळाले, असं देखील नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणांकडून देशभरात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई केली जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केल्याचं दिसून आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही वक्तव्य केलं आहे. मला जेलमध्ये टाकण्यासाठी जाळं टाकलं होतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे.
नरेंद्र मोदी हे भारताचे गेल्या नऊ वर्षांपासून पंतप्रधान पदावर कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी तब्बल 15 वर्षे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सांभाळली होती. असं असताना त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
“भ्रष्टाचाराने आपल्या देशाचं खूप नुकसान केलं आहे. देशाची जनता पाहत आहे की, आधीच्या सरकारांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाईच्या नावाने फक्त खानापुरी केली. हे तर ते लोकं आहेत ज्यांनी मलाही जेलमध्ये टाकण्यासाठी जाळं टाकलं. पण ते त्यामध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरले”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी जनतेला आवाहन करताना परदेशात गेलेला काळा पैसा भारतात आणण्याचं वचन दिलं होतं. त्यानंतर नरेंद्र मोदी निवडून आले. भाजप सरकारने भ्रष्टाचार विरोधात कारवाई करत गेल्या नऊ वर्षात 1 लाख 10 हजार कोटींची संपत्ती जप्त केल्याची माहिती देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही असंच काहीसं वक्तव्य केलं होतं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना आपल्याला अटक करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.