मनुष्यहत्येचा एक प्रकार. हा प्रकार कायद्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानण्यात येतो; कारण यात हत्या पूर्वविचाराने आणि विद्वेषाने केलेली असते. कोणतीही कृती किंवा अकृती मनुष्यहत्या करण्याच्या उद्देशाने केली असेल किंवा मृत्यू होण्याची संभाव्यता लक्षात येऊनही त्या प्रकारची शारीरिक दुखापत पोहोचविण्याच्या उद्देशाने केली असेल किंवा केलेली उद्दिष्ट दुखापत स्वाभाविकपणे त्या व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत झाली असेल किंवा कृतीचा धोकादायकपणा व त्यायोगे मृत्यू होण्याची अधिकांश संभाव्यता याची जाणीव असूनही केलेल्या दुखापतीने हत्या झाली असेल, तर अशा हत्येस कायद्याच्या परिभाषेत खून म्हणतात.
गुन्हा सदोष मनुष्यहत्या आहे किंवा खून आहे, हे केलेल्या कृत्याने मानवी जीविताला धोका किती आहे, यावर अवलंबून असते. इच्छित शारीरिक दुखापतीने किंवा कृतीने जर मृत्यूची संभाव्यता असेल, तर सदोष मनुष्यहत्या व जर अशी दुखापत किंवा कृती मृत्यू घडविण्यास पुरेशी असेल, तर खून असे साधारणतः समजण्यात येते. उदा. मुष्टिप्रहार किंवा लाठीचा हल्ला यायोगे मृत्यूची शक्यता असते. अशा प्रहाराने किंवा हल्ल्याने मृत्यू आला, तर साधारणतः तो सदोष मनुष्यहत्येत मोडतो. तलवारीने नाजूक जागी जखम करण्यात आली, तर ती निसर्गनियमाप्रमाणे मृत्यू होण्यास पुरेशी आहे. असा मृत्यू साधारणतः खुनात मोडतो. हत्या करण्याच्या उद्देशाने केलेली कृती किंवा मृत्यू व्हावा म्हणून केलेली शारीरिक दुखापत किंवा मृत्यू होण्याची अधिक संभाव्यता माहीत असून केलेली कृती प्रथमदर्शनी खून म्हणून समजण्यात येते.
मृत्यू यावा या उद्देशाने जर कृत्य केले गेले नसेल, तर कृतीच्या योगाने होणाऱ्या मृत्यूच्या संभाव्यतेचे प्रमाण कमी किंवा अधिक यावरून झालेली हत्या सदोष मनुष्यहत्या आहे किंवा खून आहे, हे ठरविण्यात येते.सार्वजनिक शांतता, धर्म, नीती, कायदा इ. दृष्टिकोनांतून हत्या करणाऱ्याच्या जबाबदारीचे स्वरूप त्याच्या संबंधिताशी व राज्याशी काय असावे, याचा विचार फार पूर्वीपासून होत आला आहे. खुनाचे मूळ ‘रक्ताचा बदला रक्ताने’ घेण्याच्या मनोवृत्तीत असल्याचे दिसून येते. आदिम व भटके लोक या मनोवृत्तीचे असल्यामुळे ते हत्येचा बदला घेण्याची जबाबदारी त्याच्या जवळच्या नातेवाईकांवर टाकीत. आदिम लोक सांस्कृतिक दृष्ट्या जसजसे प्रगत होत गेले, तसतसा त्यांच्या मनोवृत्तीत फरक पडत गेला व रक्ताचा बदला रक्ताने घेण्याला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कौटुंबिक भांडणांना समाजाचा पाठिंबा राहिला नाही.
परिणामतः भिन्न लोकांच्या इतिहासांत रक्ताचा बदला रक्ताने घेण्याऐवजी पैसे व किंमती वस्तू स्वीकारण्याची प्रथा रूढ झाली.
हत्या झालेल्या माणसाचा दर्जा व प्रतिष्ठा, पूर्वयोजना व खून करतेवेळी असलेली परिस्थिती या गोष्टी मृताच्या कुटुंबांना भरपाई देताना विचारात घेण्यात येत असत. अशा प्रकारच्या रक्त-धनाची तरतूद अँग्लो-सॅक्सन कायद्यात व जुन्या आयर्लंडच्या ब्रेहॉन कायद्यात दिसून येते. हिंदू धर्मशास्त्राच्या काही ग्रंथकारांनी आपल्या धर्मसूत्रात गाई देण्याबद्दलची तरतूद सांगितली आहे. अरब लोकांत खुनी व्यक्तीच्या अनेक नातेवाईकांचे खून करण्याची प्रथा कुराणाने बंद करून नुकसानीच्या न्याय्य भरपाईवर भर दिला आणि फक्त खुनी माणसाचाच जीव घेण्याची परवानगी दिली.जुन्या हिब्रू लोकांच्या मानवहत्या संहितेने मात्र हेतुपूर्वक केलेल्या खुनाबद्दल पैसे स्वीकारण्यास मनाई केली.
इतकेच नव्हे, तर खुनाचे कारण अपघाती आहे किंवा तो जाणूनबुजून करण्यात आला आहे, हे ठरविण्याकरिता न्यायाधिकरणाचीही तरतूद केली. खून सर्व समाजाविरुद्ध अथवा शासनाविरुद्ध गुन्हा समजण्याची आधुनिक दृष्टी तीत दिसून येते. रक्ताचा बदला व रक्त-धन यांसंबंधीची आधुनिक घृणा, हत्येचे स्वरूप ठरविण्याची शासनाच्या जबाबदारीची मान्यता आणि इतर धार्मिक व तात्त्विक गोष्टी या संहितेत दिसून येतात.
भारतात पाप्यांना किंवा गुन्हेगारांना प्रायश्चित्त देण्याची प्रथा फार जुनी आहे. प्रसंगी शासनातर्फेही शिक्षा देण्यात येत असे. त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या प्रगतीबरोबर खुनासारखा गुन्हा सर्व समाजाविरूद्ध आणि शासनाविरुद्ध समजण्यात येत असावा, असे समजण्यास भरपूर वाव आहे. काही स्मृतींत व सारसंग्रहात वर्ग आणि जातीनुसार खुनाच्या शिक्षेत भिन्नता दिसून येत असली, तरी असे भेद व पक्षपात बाराव्या शतकाच्या सुमारास संपुष्टात आल्याचे स्मृतिचंद्रिका, मदनरतन व सरस्वतीविलास यांवरून दिसून येते. कायदेशीर दंडाच्या धर्तीवर प्रायश्चित्ताऐवजी गाई व पैसा यांचा शिक्षेच्या दृष्टीने उपयोग होऊ लागला. पुढे परकीय लोकांच्या राजवटीचा परिणाम होत जाऊन ब्रिटिशांच्या अमदानीत समाजातील शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने खुनी व्यक्तीस शासनाने शिक्षा देण्याची जबाबदारी स्पष्टपणे मान्य करणारा फौजदारी कायदा अंमलात आला.
प्रचलित कायद्याप्रमाणे जी हत्या समर्थनीय किंवा क्षम्य ठरते ती खुनात मोडत नाही. हत्या अनवधानी, अभावित, कायदेशीर कर्तव्य बजावीत असताना होणारी (उदा. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करणे), लष्करी कारवाईत युद्ध-कायद्याप्रमाणे होणारी, स्वतःचे संरक्षण करताना किंवा ज्यांचा बचाव करणे कर्तव्य आहे, अशा व्यक्तींचा बचाव करताना किंवा संविधीमध्ये सांगितलेल्या आणखी काही विशिष्ट कारणाने झाली असेल, तर ती खून या सदरात येत नाही.खुनी माणसाकडे पाहण्याचा आधुनिक समाजाचा दृष्टिकोन अधिक प्रगत व उदार होत चालला आहे. म्हणून समाजसुधारक, कायदेपंडित व नेते खुनास असलेली फाशीची शिक्षा रद्द करण्याचा गंभीरपणे विचार करीत आहेत.