जॉन्सन, अँड्रू : (२९ डिसेंबर १८०८–३१ जुलै १८७५). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सतरावे राष्ट्राध्यक्ष व प्रसिद्ध मुत्सद्दी राजकारणी. सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन (१२ फेब्रुवारी १८०९–१५ एप्रिल १८६५) यांच्या हत्येनंतर व अमेरिकन यादवी युद्धातील संहारक हानीनंतर अमेरिकेला पूर्वसन्मान मिळवून देण्यात अँड्रू जॉन्सन यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्म नॉर्थ कॅरोलायना राज्यातील रॅली येथे एका सामान्य कुटुंबात मेरी मॅकडांग व जॅकॉब जॉन्सन या दांपत्यापोटी झाला. तीन भावंडांत जॉन्सन सर्वांत लहान होते. वडील एका स्थानिक खाणावळीत काम करत होते. जॉन्सन तीन वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या आईने विणकाम व शिवणकाम करत कुटुंबाचा सांभाळ केला. जॉन्सनही शिलाईकामात आईस मदत करीत असत. पुढे आई व सावत्रवडिलांसह त्यांचे कुटुंब टेनेसी राज्यातील ग्रीनव्हिल येथे राहण्यास गेले (१८२६). तेथे जॉन्सन यांनी ‘ए. जॉन्सन टेलरʼ या नावाचे शिलाईचे दुकान थाटले.
अँड्रू जॉन्सन यांचे औपचारिक शालेय शिक्षण झाले नव्हते. त्यांनी स्वतःच थोडेफार वाचन-लेखन अवगत केले होते. शिवणकाम व्यवसायात त्यांना चांगले यश मिळाले. एका स्कॉटिश चर्मकाराची कन्या एलिझा मॅकॉर्डले (४ ऑक्टोबर १८१०–१५ जानेवारी १८७६) हिच्याशी ते विवाहबद्ध झाले (१८२७). तिने त्यांना वाचन, लेखन तसेच अंकगणित शिकविले. त्यांना तीन मुलगे व एक मुलगी होती. त्यांचे शिलाईचे दुकान हे हळूहळू राजकीय चर्चेचे केंद्र बनले. डेमोक्रॅटिक पक्षाचे संस्थापक व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सातवे राष्ट्राध्यक्ष ⇨ अँड्रू जॅक्सन (१७६७-१८४५) जॉन्सन यांचे आदर्श होते. जॅक्सन हे सामान्य कुटुंबातूनच नावलौकिकास आलेले नेते होते. जॅक्सनप्रमाणेच जॉन्सन यांनाही सामान्य जनतेविषयी आस्था व प्रेम होते, तसेच गोऱ्या शेतकऱ्यांविषयी आणि कामगारांबद्दल त्यांना सहानुभूती होती. त्यामुळे चर्चेदरम्यान ते आपली मते निर्भीडपणे मांडत. अल्पावधीतच जॉन्सन लोकप्रिय नेते व प्रभावी वक्ते बनले. पुढे त्यांनी ‘वर्किंगमॅन’ या नावाचा पक्ष स्थापन केला आणि या माध्यमातून स्थानिक राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. पहिली निवडणूक जिंकून ते ग्रीनव्हिल नगरपालिकेचे ज्येष्ठ सदस्य बनले (१८२९) व नंतर ग्रीनव्हिलचे महापौर म्हणून त्यांची निवड झाली (१८३४).
जॉन्सन यांनी १८३५–४३ या काळात राज्याच्या विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. पुढे त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षामार्फत राष्ट्रीय राजकारणात सहभाग घेतला. अमेरिकन कॉंग्रेसचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी दहा वर्षे वॉशिंग्टन येथे काम केले (१८४३–५३). यानंतर टेनेसीच्या गव्हर्नरपदी त्यांची नेमणूक झाली (१८५३–५७). या दरम्यान त्यांची अमेरिकन सीनेटचे सदस्य म्हणून निवड झाली (१८५७). या काळात त्यांनी होमस्टेट कायद्यासाठी प्रयत्न केले; पण तो १८६२ मध्ये पारित झाला.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत गुलामगिरीचा पुरस्कार करणारी दक्षिणेकडील घटकराज्ये आणि गुलामगिरीला विरोध करणारी उत्तरेकडील घटकराज्ये यांच्यातील तेढ वाढली होती. यातूनच तेथे संघराज्यांच्या अधिकारांसंबंधीचा वाद वाढला. घटकराज्यांच्या या परस्परविरोधी हितसंबंधांतून अमेरिकेत १८६१-१८६५ दरम्यान यादवी युद्ध सुरू झाले. तत्पूर्वी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ⇨अब्राहम लिंकन यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली (१८६०). या वेळी टेनेसी राज्याने संघराज्यातून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा जॉन्सन यांनी इतर सीनेटर्सप्रमाणे राजीनामा दिला नाही आणि संघराज्याप्रती आपली निष्ठा दाखविली. लिंकन यांनी जॉन्सन यांची टेनेसीचे लष्करी राज्यपाल म्हणून नेमणूक केली (१८६२). कोणत्याही घटकराज्याला कायदेशीरपणे संघातून बाहेर पडता येणार नाही, असे लिंकन यांचे मत होते. म्हणून फुटीर राज्यांविरुद्ध लिंकन यांनी युद्ध पुकारले. अखेर दक्षिणी राज्यांच्या सेनेने शरणागती पतकरल्यामुळे हे युद्ध विधिवत संपले. दरम्यान जॉन्सन १८६४ मध्ये उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आले.
अमेरिकेतील यादवी युद्धानंतर १४ एप्रिल १८६५ रोजी लिंकन यांचा खून झाला व उपराष्ट्राध्यक्ष अँड्रू जॉन्सन यांच्यावर राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी आली. या वेळी गुलामगिरीचा प्रश्न चिंताजनक झाला होता. जॉन्सन यांनी मध्यममार्ग अंगीकारून गुलामगिरीविरुद्धच्या रिपब्लिकन पक्षास विरोध केला; कारण त्यांना घटनेचा आदर अभिप्रेत होता आणि दक्षिणेकडील घटकराज्यांना सामावून घेण्याचे महत्त्वाचे काम करावयाचे होते. तसेच युद्धाने झालेली हानी भरून काढावयाची होती. म्हणून त्यांनी बंडखोरांना शिक्षा न करता मुत्सद्देगिरीने हाताळले. त्यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून विशेष अधिकार होते. तथापि त्यांनी त्यांचा गैरवापर केला नाही. दरम्यान मुक्त गुलामांना हाताशी धरून आपले बांधवच आपला छळ करीत आहेत, त्यांना ताळ्यावर आणण्याचा उपाय आपल्याजवळ नाही, ही विफलतेची भावना पराभूत घटकराज्यांतील गोऱ्यांमध्ये फैलावली होती. जॉन्सन यांचे एकसंध अमेरिकन संघाच्या पुनर्बांधणीचे प्रयत्न चालू असतानाच दक्षिणेकडील घटकराज्यांत १८६५ च्या अखेरीस ⇨कू क्लक्स क्लॅन ही गुप्त दहशतवादी संघटना कार्यरत झाली. तिचा मुख्य उद्देश निग्रोंवर गौरवर्णीयांचे वर्चस्व व श्रेष्ठत्व प्रस्थापित करणे हा होता. शिवाय दुर्बलांचे रक्षण करणे, अमेरिकन संविधानाचे संरक्षण करणे अशी आनुषंगिक उद्दिष्टेही होती. याच सुमारास म्हणजे मार्च १८६७ मध्ये अमेरिकन काँग्रेसने दोन कायदे पारित केले. ते जॉन्सन यांनी असंविधानिक ठरवून व्हेटोने फेटाळले; तथापि ते कायदे पुन्हा पारित करण्यात आले. तेव्हा जॉन्सन यांनी युद्धसचिवाला बडतर्फ केले आणि तेथे यादवी युद्धातील सरसेनापती ⇨ युलीसीझ ग्रँट यांची नियुक्ती केली. त्यामुळे हतबल झालेल्या विरोधकांनी अँड्रू जॉन्सन यांच्यावर अभियोग दाखल केला, पण तो एका मताने फेटाळला गेला आणि ते निर्दोष ठरले (२६ मे१८६८). त्यानंतरच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत युलीसीझ ग्रँट हे रिपब्लिकन पक्षातर्फे निवडून आले; तथापि सक्रिय राजकारणातून जॉन्सन निवृत्त झाले नाहीत. सीनेटसदस्य म्हणून ते पुन्हा निवडून आले.
जॉन्सन यांच्या कार्यकाळात रशियापासून अलास्का खरेदी करण्यात आले. तसेच नेब्रास्काला घटकराज्याचा दर्जा देण्यात आला आणि सेंट्रल पॅसिफिक व युनियन पॅसिफिक या संघटनांनी सुरू केलेले लोहमार्गाचे नियोजन मार्गी लागले. या सर्वांपेक्षा जॉन्सन यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे तेराव्या घटनादुरुस्तीने गुलामगिरी नष्ट केली आणि चौदाव्या घटनादुरुस्तीने सर्व भूतपूर्व गुलामांना नागरी हक्क देण्यात आले.
जॉन्सन यांच्या कारकिर्दीविषयी इतिहासकारांची भिन्न मते आढळतात. काही इतिहासकारांच्या मते, ते अयोग्य राष्ट्राध्यक्ष असून यादवी युद्धानंतरही त्यांचा दाक्षिणात्य राज्यांकडे अधिक कल होता; तर अन्य इतिहासकार त्यांना अनन्यसाधारण दूरदृष्टी असलेला नेता समजतात. अमेरिकेच्या एकसंधतेसाठी त्यांनी दाक्षिणात्य राज्यांबद्दल अधिक टोकाची भूमिका घेतली नाही, हे योग्य असल्याचे मानतात. शिवाय त्यांच्यावरील संसदीय अभियोग हा पहिलाच असून तो फेटाळल्यामुळे राष्ट्राध्यक्षांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले.
३१ जुलै १८७५ रोजी कार्टर स्टेशन, टेनेसी येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Gorden-Reed, Annette Andrew Johnson : The American Presidents, New York, 2011.
- Gunderson, Megan M. Andrew Johnson: 17th President of the United States, Minnesota, 2009.
- Mckitrick, Eric L. Andrew Johnson and Reconstruction, Oxford, 1988.