उत्तर व दक्षिण अमेरिकेतील मूळच्या रहिवाशांना ‘अमेरिकन इंडियन’ म्हणतात. कोलंबसने १४९२ साली अमेरिकेच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवले. आपण हिंदुस्थानात म्हणजे इंडियात आलो आहोत, या समजुतीने त्याने तेथील रहिवाशांना इंडियन म्हणूनच उल्लेखिले. पुढे वस्तुस्थिती कळल्यानंतर त्यांना अमेरिकन इंडियन म्हणून संबोधण्यात येऊ लागले. त्यांनाच ‘अमेरिंड’ असेही म्हणतात. हे लोक सामान्यतः तांबूस रंगाचे आहेत, तसेच ते आपल्या अंगास लाल रंग लावीत असत, त्यावरून व्यापाऱ्यांनी त्यांना ‘रेड इंडियन’ नाव दिले. कोलंबसने वेस्ट इंडीजमधील रहिवाशांना इंडियन म्हणून संबोधले होते. कालांतराने उत्तर व दक्षिण अमेरिकेतील सर्वच मूळच्या रहिवाशांना ‘इंडियन’ म्हणण्यात येऊ लागले. मानव- शास्त्रदृष्ट्या अमेरिकन इंडियनांचा जाणीवपूर्वक अभ्यास करण्याचा पहिला प्रयत्न हेन्री रो स्कूलक्राफ्ट (१७९३–१८६४) याने केला. अॅल्जिक् रिसर्चर्स (१८३९), हिस्टॉरिकल अँड स्टॅटिस्टिकल इन्फर्मेशन रिस्पेक्टिंग द हिस्टरी, कंडिशन अँड प्रॉस्पेक्ट्स ऑफ द इंडियन ट्राइब्ज ऑफ द युनायटेड स्टेट्स (सहा खंड, १८५१–५७) यांसारख्या ग्रंथांत त्याने अमेरिकन इंडियनांची माहिती दिली. तसेच लूइस हेन्री मॉर्गन ह्याच्या League of the Ho-de’-no-sau-nee or Iroquois (१८५१) ह्या ग्रंथात इरोक्वाइस जमातीबद्दल अधिक शास्त्रीय माहिती आढळते.
पंधराव्या शतकात इंडियनांची संख्या अदमासे एक कोटी तीस लक्ष असावी. त्यांपैकी सरासरी दहा लक्ष रीओ ग्रांदेच्या उत्तरेस, तीस लक्ष मध्य अमेरिकेत व नव्वद लक्ष दक्षिण अमेरिकेत राहत असावेत. अमेरिकन इंडियन आशियातून स्थलांतर करून आले, याबाबत आता शास्त्रज्ञांत दुमत नाही. ते अमेरिकेत येण्यापूर्वी अमेरिका खंडात मानवाची वस्ती नव्हती. पुरातत्त्ववेत्ते त्यांच्या येण्याचा काळ सरासरी २०,००० वर्षांपूर्वीचा ठरवितात. त्या वेळी आशिया व अमेरिका ही दोन खंडे अलास्काच्या बाजूने जुळलेली होती. स्थलांतर करणारे हे आशियाई मंगोलवंशाचे होते. शिकार व मासेमारी हेच त्यांचे मुख्य व्यवसाय होते. शेतीचा विकास त्यांनी अमेरिका खंडाच्या पश्चिम भागात आल्यांनंतर केला. त्यांनी आपल्याबरोबर कुत्रा व अग्नी आणला होता. आजच्या त्यांच्या भाषांचा व आशियाई भाषांचा काहीही संबंध प्रस्थापित होऊ शकलेला नाही. पुरातत्त्ववेत्ते त्यांच्या भूतकाळातील दुवे जुळविण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत.
शारीरिक मानवशास्त्रज्ञांच्या मते अमेरिकन इंडियन जरी मंगोलवंशीय असले, तरी ते आशियातील मंगोलवंशीयांहून भिन्न आहेत. त्याचे कारण, आशियातील मंगोलवंशीयांप्रमाणे इतरवंशीयांशी अमेरिकन इंडियनांचा संबंध राहिला नाही. परिणामतः इंडियनांची शारीरीक वैशिष्ट्ये वेगळ्या दिशेने विकसित झाली. हल्ली मंगोलवंशात अमेरिकन इंडियन हा स्वतंत्र वंशगट समजण्यात येतो.
उत्तर व मध्य अमेरिकेत, पंधराव्या शतकात, अमेरिकन इंडियनांचे सरासरी ४० भाषासमूह होते व तेवढेच दक्षिण अमेरिकेत होते. आराउकानियन, आयमारा, क्वेच्वा, चिब्चा, आरावाक, कॅरिब, तुपी, पानो, तुकानो, गे, ग्वायकुरू, पुएलचे, तेहुएल्चे अशी काही दक्षिण अमेरिकेतील अमेरिकन इंडियनांच्या भाषासमूहांची नावे आहेत. माया व अॅझटेक सोडल्या तर इतर भाषा बोलभाषा होत्या, त्या लिपिबद्ध नव्हत्या. माया आणि अॅझटेक या जमाती सोडल्यास अमेरिकन इंडियनांचे लिपिबद्ध साहित्य उपलब्ध नाही. त्यांचे लोकसाहित्य मुख्यतः मौखिक परंपरेनेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत गेले आहे. चित्रलिपीत, काठ्यांवर लिहिलेले वालम ओलम हे क्रॉनिकल मात्र यास अपवाद ठरावे. तेही मूळ स्वरूपात उपलब्ध नाहीच. काँस्टंटीन राफीनेस्क (१७८३–१८४०) यानेद अमेरिकन नेशन्स (१८३६) या पुस्तकात वालम ओलमच्या हस्तलिखित प्रतीवरून तयार केलेले इंग्रजी भाषांतर समाविष्ट केले आहे. या क्रॉनिकलचे पाच विभाग असून त्यांतील १८३ छोट्या कवितांतून ‘डेलावेअर इंडियन’ जमातीचा इतिहास दिला आहे.
उत्तर पेरूतील उत्खननांवरून सिद्ध झाले आहे, की ख्रिस्तपूर्व २,००० वर्षांपूर्वी, तेथे राहणाऱ्या अमेरिकन इंडियनांचा मुख्य व्यवसाय मासेमारीचा होता. ते कापूस, भोपळा व घेवडा यांची लागवड करीत. मातीची भांडी मात्र त्या वेळी नव्हती. नंतरच्या काळात मातीची भांडी, लामांचे पालन, मक्याची लागवड, विणकाम, धातूंचा उपयोग, कला, शिल्प इत्यादींची त्यांना माहिती मिळाली. पॅराग्वाय व बोलिव्हियात इंडियनांनी मका, रताळी, काळी मिरी, तंबाखू इत्यादींच्या लागवडीची जगात प्रथम सुरुवात केली. टोमॅटो व कापसाची लागवड उत्तर व दक्षिण अमेरिकेत इंडियनांनी एकाच वेळी सुरू केली असावी. कोको व बटाट्याचे पीक अँडीज प्रदेशातील इंडियनांनी प्रथम घेतले असावे, असा कयास आहे. सुरुवातीस दक्षिण अमेरिकेत कुत्राच तेवढा पाळीव प्राणी होता. काही काळानंतर अमेरिकन इंडियन लामा व गिनीपिग पाळावयास लागले. दक्षिण अमेरिकेतील इंडियनांच्या संस्कृतींचे चार विभागांत विभाजन करता येते :
(१) अँडीजमधील इंडियन-स्पॅनिश विजयाच्या वेळी ते कसबी शेतकरी होते. ते खतांचा, पाटबंधारे व खाचरांचा उपयोग करीत. बटाटा, काळी मिरी, घेवडा, मका ही मुख्य पिके ते काढीत, तसेच कापूस, कोको व तंबाखूचीही लागवड करीत. लामा व अल्पाका यांचा ओझे वाहून नेण्याकरिता, त्याचप्रमाणे मांस व लोकर यांकरिताही उपयोग करण्यात येत असे. गिनीपिग खाण्याकरिता पाळले जात. मातीची भांडी, विणकाम, धातुकाम यांत विविधता होती. त्यांची घरे दगडाची असत. चिलीतील आराउकानियनांची घरे लाकडाची होती. खेडेगावात नात्यागोत्यातील कुटुंबे राहत असत. इंका नावाचे अमेरिकन इंडियनांचे साम्राज्य एक्वादोरपासून चिलीपर्यंत पसरले व ही सर्व खेडी त्यांच्या आधिपत्याखाली आली. अंदाजे इ. स. १००० ते १४५० मध्ये अनुक्रमे चाव्हिन, त्यावानाको व इंका या अमेरिकन-इंडियनांच्या तीन भिन्न प्रकारच्या संस्कृतींचे आधिपत्य या प्रदेशावर प्रस्थापित झाले. स्पॅनिश योद्धा फ्रॅन्सिस्को पिझारो याने १५३२ साली इंका इंडियनांचा पराभव करून स्पॅनिश साम्राज्याखाली सर्व प्रदेश आणला.
(२) दक्षिण अमेरिकेचा पनामाशेजारचा भाग, ग्वातेमालाची सरहद्द वगैरे भागांत चिब्चा भाषा बोलणारे अमेरिकन इंडियन होते. हे लोक शेतकरी होते. मका, बटाटा, घेवडा, कापूस यांची लागवड ते करीत असत. त्यांना विणकाम येत होते. त्यांनी रस्ते व पूल बांधले. ते सोन्याच्या कामात कसबी होते. ते सूर्याला मनुष्यबळी देत असत. या प्रदेशात आरावाक व कॅरिब बोली बोलणारे लोक राहत. स्पॅनिश विजयानंतर येथील संस्कृती झपाट्याने लोप पावली.
(३) अॅमेझॉनचे खोरे, ओरिनोकोचा वरचा भाग, गिनी नद्यांची खोरी व पूर्व ब्राझीलचा समुद्रकिनारा येथे शिकार व मासेमारी करणारे अमेरिकन इंडियन लोक होते. मका व कापसाचे पीक ते काढीत असत. घनदाट जंगलांमुळे बाहेरील लोकांना या भागात शिरकाव करता आला नाही.
(४) दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकापासून पूर्व ब्राझिलच्या पहाडी प्रदेशाच्या भागात स्पॅनिश जयापर्यंत आलाकालुफ, याहगान, ओना व तेहुएल्चे नावाच्या अमेरिकन इंडियनांच्या भटक्या शिकारी टोळ्या राहत असत. त्यांची भांडी दगडाची व झाडाच्या सालीपासून तयार केलेली होती. मध्य व सखल भागात पुएलचे, क्वेरांडी व चार्रुआ नावाच्या इंडियन टोळ्या राहत असत. त्यांच्यापाशी लाकडाची व थोड्या प्रमाणात मातीची भांडी होती. उत्तर भागात गे बोली बोलणाऱ्या टोळ्या राहत असत. शिकार, मासेमारी, अन्न गोळा करणे व काही प्रमाणात रताळी पिकविणे हे त्यांचे व्यवसाय होते.
उत्तर अमेरिकेतील इंडियनांचे सहा सांस्कृतिक विभाग पडतात : (१) मेसो अमेरिकन संस्कृती–मेक्सिको, ब्रिटिश होंडुरस, ग्वातेमाला व एल्-साल्वादोर या प्रदेशांत अमेरिकन इंडियनांची माया ही सर्वांत महत्त्वाची संस्कृती होती. दहाव्या शतकात माया संस्कृतीचा र्हास झाला. १४५० साली स्पॅनिशांनी मायांना जिकले. मेसो अमेरिकेत माया संस्कृतीने व्यापलेल्या प्रदेशांव्यतिरिक्त इतर ठिकाणी तिओ-ती-हु-आकान, तॉल्तेक, मीक्सतेक व अॅझटेक संस्कृतींचा एकामागोमाग उदय व अस्त झाला. ५०० च्या सुमारास तिओ-ती-
हु-आकान संस्कृती परमोच्च बिंदूवर होती. २१७ मी. पायथ्याशी रुंद व ६२ मी. उंच असलेला त्यांचा सूर्याचा पिरॅमिड प्रसिद्ध आहे. तेराव्या शतकात अॅझटेकांनी आपल्या साम्राज्यास सुरुवात केली. त्यांची संस्कृती फार सुधारली होती. १५२० साली स्पॅनिश योद्धा कॉर्टेझने त्यांचा पराभव केला.
(२) नैर्ऋत्येस न्यू मेक्सिको, अॅरिझोना, कोलोरॅडो व उटाचा काही भाग येथे अमेरिकन इंडियनांची एक विशिष्ट संस्कृती होती. तेथे १०० ते ७०० या काळात बास्केट-मेकर इंडियनांची संस्कृती होती. त्यांच्याकडे धनुष्यबाण नव्हते. घरे कायम स्वरूपाची नव्हती. त्यानंतर प्वेब्लो इंडियन संस्कृतीस सुरुवात झाली. आजच्या प्वेब्लो इंडियनांचे तीन गट पडतात : होपी, झून्यी, रिओ ग्रांदे. स्पॅनिश व गोऱ्या अमेरिकनांशी संबंध येऊनही प्वेब्लोंनी आपली संस्कृती आजतागायत टिकविली आहे. अपॅची व नव्हाहो हे आथाबास्कन बोली बोलणारे लोक १३०० ते १७०० च्या मध्ये प्वेब्लो भागात स्थलांतर करून आले व आजही तेथेच राहतात.
(३) कॅलिफोर्निया, रॉकी आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या डोंगरामधील प्रदेशातील भागात संस्कृतीचा विकास व परिवर्तन फार थोड्या प्रमाणात झाले. तेथील लोकांचा मासेमारी, शिकार व जंगली पदार्थ गोळा करण्यावर भर होता.
(४) वायव्य समुद्रकिनारा ऑरेगन ते अलास्का या प्रदेशातील इंडियनांचा मासेमारी हाच मुख्य व्यवसाय होता. या भागात राहणाऱ्या अमेरिकन इडियनांचे (१) हैदा, त्सिमशीअन (२) क्वाकीऊटल (३) चिनूक, युरोक, हूपा हे गट होते. हे लोक विणकाम व वेतकामात तरबेज होते. ते झाडाचे बुंधे कोरून नावा करीत. यांच्या गणचिन्हांचे खांब प्रसिद्ध आहेत. धातुकाम व मातीची भांडी त्यांना माहीत नव्हती.
(५) एस्किमो संस्कृती–अलास्का येथे व उत्तर कॅनडापासून न्यू फाउंडलंड व ग्रीनलंडपर्यंतच्या प्रदेशात राहणाऱ्या इंडियनांना ‘आर्क्टिक मंगोलवंशी’ असे विशेष नामकरण आहे. यांची घरे बर्फाची असतात. सील, वालरस व व्हेल माशांची शिकार करून ते राहतात.
(६) उत्तर व पूर्व क्षेत्रातील संस्कृती–रॉकी पर्वताच्या पूर्वेकडील व मेक्सिकोच्या उत्तरेस जरी मोठा प्रदेश येत असला, तरी त्यात वातावरण सारखे आहे. त्यामुळे सांस्कृतिक साम्यही आढळते. हडसन उपसागराच्या पूर्वेस अल्गाँक्वियन बोली बोलणाऱ्या जमाती राहतात. ईस्टर्न वुडलँड भागातील इरोक्वायन, हुरॉन, एरी इ. आदिवासी गट व मध्य अल्गाँक्वियनमधील ओजिब्वे, ओटावा, मेनीमिनी इ. आदिवासी गट आजही त्या त्या भागांत दिसून येतात. परंतु अॅबनाकी, मिकमॅक इ. बऱ्याचशा आदिवासी जमाती मात्र इतिहासकालात नष्ट झाल्या आहेत. मका, घेवडा, रानभात यांचे पीक; हरिण, रेडा व अस्वलाची शिकार; मासेमारी; मातीची, लाकडी व झाडाच्या सालीची स्वयंपाकाची भांडी; चामड्याचे कपडे; लाकूड कोरून तयार केलेल्या बोटी इ. पूर्व अल्गाँक्वियनमधील गटांच्या संस्कृतीची वैशिष्ट्ये होती.
मिसिसिपीच्या पूर्वेकडील भागात नॅचिझ, पौअटन, चॉक्टॉ, चिकसॉ, क्रीक इ. इंडियन जमाती राहतात. गोर्या लोकांच्या संपर्कात येण्यापूर्वी ते मका, टरबूज, तंबाखू यांची लागवड करीत. ते कुत्र्याचे मांस खात असत. सूर्यदेवतेस ते प्राधान्य देत. अरॅपाहो, ब्लॅकफूट, कोमँची, क्रो इ. अमेरिकन इंडियन टेक्सासच्या आसपासच्या सखल प्रदेशात राहतात. गोऱ्यांच्या संपर्कात येण्यापूर्वी त्यांची अर्थव्यवस्था दुग्धव्यवसायावर आधारलेली होती. रानटी कंदांचा उपयोग खाण्याकरिता करीत असत. मातीची भांडी किंवा टोपल्या त्यांना माहीत नव्हत्या. त्यांच्या धार्मिक विधींत सूर्यनृत्यास महत्त्व होते. या भागात स्पॅनिशांनी घोडा आणल्यानंतर शेती व इतर बाबींत त्यांची प्रगती झाली.
स्पॅनिशांच्या जयानंतर फार जलद गतीने या भागात परिवर्तन घडून आले. उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका यांत स्पॅनिशांचे प्रथम वर्चस्व प्रस्थापित झाले. स्पॅनिश सैनिक बंदुका, घोडे व सैनिकी शिक्षणामुळे आपल्यापेक्षा संख्येने जास्त असलेल्या इंडियनांचा सहज पराभव करू शकले. १५०० नंतरच्या उत्तर अमेरिकेची दक्षिण आणि मेसो अमेरिकेशी तुलना केल्यास असे आढळते, की उत्तर अमेरिकेत नागरी संस्कृती व औद्योगिक संस्कृती यांचा झपाट्याने विकास झाला. दक्षिण व मेसो-अमेरिकेत मात्र शेतीप्रधान संस्कृतीच टिकून राहिली. त्यामुळे श्रीमंत जमीनमालक व गरीब शेतमजूर असे लोकांचे विभाजन झाले. शेतमजुरांच्या मोठ्या संख्येमुळे आर्थिक व सांस्कृतिक अस्थिरता व त्यामुळे होणारी राजकीय अस्थिरता आजच्या परिस्थितीत दृष्टीस पडते. आजचे अमेरिकन इंडियन अजून शेतीलाच चिकटून आहेत. ज्यांच्याजवळ जमिनी आहेत ते बरेच पैसे मिळवूनही जुन्या संस्कृतीचेच पालन करतात. ज्यांच्याजवळ जमिनी नाहीत ते शेतमजुरी करतात.
उत्तर अमेरिकेतील सखल प्रदेशातील इंडियन लोकांची राहणी स्पॅनिशांनी आणलेल्या घोड्याच्या उपयोगाने विकसित झाली. परंतु जेव्हा गोऱ्यांनी त्यांची शेतजमीन हिसकावण्याचा प्रयत्न केला,तेव्हा मोठे रक्तपात झाले. वायव्य व उत्तर अमेरिकेतील अमेरिकन इंडियन लोकांनी स्पॅनिश संस्कृतीची बरीच वैशिष्ट्ये आत्मसात केली, तरी त्यांची मूळ संस्कृती नष्ट झाली नाही. प्वेब्लो , होपी, नव्हाहो व अपाची यांनी आपल्या संस्कृतीची बरीच वैशिष्ट्ये टिकविली आहेत. सुरुवातीस गोऱ्यांच्या संपर्कामुळे नवीन वनस्पती, पिके व प्राणी यांची माहिती मिळाल्याने पूर्व व उत्तर अमेरिकेतील इंडियनांची भरभराट झाली. पण गोऱ्यांशी घनिष्ठ संबंध आल्यानंतर अमेरिकन इंडियनांच्या संस्कृतीचा ऱ्हास व्हावयास लागला व काही टोळ्या नष्ट झाल्या.
यूरोपीय व इंडियन संस्कृतींच्या परस्परसंपर्काचा यूरोपीय संस्कृतीवरही बराच परिणाम झाला. जवळ- जवळ चाळीस प्रकारच्या नवीन वनस्पती व चार पाळीव प्राणी इंडियन संस्कृतीने जगाला दिले, असे म्हणता येईल. तसेच उत्तर अमेरिकन व स्पॅनिश अमेरिकन साहित्यातही मोलाची भर पडली. प्रामुख्याने मका व बटाटा इंडियनांनी प्रथम लागवडीखाली आणला. जगातील अन्न उत्पादनाचा एक तृतीयांश भाग इंडियनांनी शोध लावलेल्या पिकांपासून होतो, ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. तंबाखूची लागवड प्रथम दक्षिण अमेरिकेत अमेरिकन इंडियनांनी केली. जवळजवळ दोन शतकांत तंबाखूचा प्रसार जगभर झाला. तसेच कापूस, इंडियनांचे मद्य व त्यांची औषधे अमेरिकेत प्रसिद्ध आहेत. अमेरिकेतील ईजिप्तमधील लांब धाग्याचा कापूस हा प्रथम इंडियनांनीच लागवडीखाली आणला व त्यात सुधारणा केली. यूरोपीय लोक इंडियनांकडून रबर काढण्यास शिकले. अमेरिकन इंडियनांच्या सर्व जमातींना मैदानी व बैठ्या खेळांची आवड आहे. काही विशिष्ट बैठे खेळ हिवाळ्यासारख्या प्रदीर्घ ऋतूतच खेळले जातात. कुस्ती, पोहणे व धावणे या खेळांत इंडियनांनी प्रगती केली आहे. ‘चुंगके’ हा त्यांचा आवडता खेळ होय. निरनिराळ्या जमातींत हा खेळ निरनिराळ्या पद्धतींनी खेळला जातो. वाळू टाकलेल्या सपाट मैदानात हा खेळ खेळतात. चुंगके दगड थाळीसारखा असून सु. ११/२ सेंमी. जाड व १२१/२ सेंमी. रुंद असतो. सु. २१/२ मी. लांबीची काठी घेऊन हा खेळ खेळतात.
दोन खेळाडू मैदानावर बरोबरीने धावतात, त्यांपैकी एकजण थाळी (चुंगके दगड) पुढे फेकतो. धावणारे दोन्ही खेळाडू हातातील काठी भाल्याप्रमाणे अशी फेकतात, की ती चुंगके दगडाला न लागता, तो दगड फिरत जाऊन जेथे थांबतो, बरोबर तेथेच ती काठी जाऊन पडावी. या खेळास नियमित सरावाची व अचूक निर्णयाची आवश्यकता असते.
वृद्धांकडून अद्भुत गोष्टी ऐकणे, हा त्यांच्या मनोरंजनाचा एक प्रकार होय. त्याशिवाय लाकडी व धातूंची फिरक्यांची खेळणी व कौशल्याचे अन्य खेळही या लोकांत रूढ आहेत.
कला: अलास्काच्या उत्तर टोकापासून चिलीच्या दक्षिण टोकापर्यंत पसरलेल्या प्रदेशात गेल्या १५,००० ते २०,००० वर्षांपासून वसत असलेल्या ह्या जमातीच्या लोकांनी चित्रकला, मूर्तिकला, वास्तुकला आणि इतर हस्तकला यांत उच्च दर्जाची कलात्मकता व्यक्त केली आहे. त्यांच्या कलाकृतींत धातूंचे, दगडांचे, वास्तूंचे भव्य नमुने आढळतात. नऊ ते दहा हजार वर्षांपूर्वीच्या जुन्या अवशेषांत प्रामुख्याने राजप्रासाद, राजमार्ग, बगीच्यांचे नमुने, पुष्करिणी, कालवे, तसेच संगमरवरी पुतळे, भाले, बाणांची टोके, सुबक कोरीव काम केलेली शिंगे व हाडे व विणलेल्या टोपल्या आढळतात. संसारोपयोगी व अन्य प्रकारची भांडीही तेथील गुहांतून सापडलेली आहेत. त्यांपैकी काही भांडी सोन्याचीही आहेत. काही ठिकाणी झाडांच्या सालीपासून तयार केलेली व क्वचित त्यात चांदीचा वापर केलेली पादत्राणे व मण्यांपासून तयार केलेली कंठभूषणे सापडली आहेत. सात हजार वर्षांपूर्वीची व औद्योगिक प्रगतिनिदर्शक अशी तांब्याची व अन्य धातूंची भांडीही येथे सापडली आहेत. अॅरिझोना वाळवंटाशेजारील कोचीस तलावाजवळ धान्य दळण्याची दगडी जाती, पाटे–वरवंटे, चटया, शिंपल्याचे दागिने इ. वस्तू सापडल्या आहेत.
संदर्भ : 1. Colliers, John, Indian of the Americas, New York, 1947.
2. Driver, Harold, E. The Americas on the Eve of Discovery, New Jersey, 1964.
3. Editors of American Heritage, Book of Indians, London, 1968.
4. Editors of Life, The Epic of Man, New York, 1962.
5. Farb, Peter, Man’s Rise to Civilization . . . Industrial State, London, 1969.
6. Hynt, W. Ben,Indian Crafts and Lore, New York, 1965.