महाराष्ट्र राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या योजना, उपक्रम राबविले जातात. या योजनेचा फायदा विद्यार्थी, महिला याबरोबरच सर्वसामान्य जनता यांना होत असतो. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समुहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता प्रशिक्षण योजना शासनाने आणली आहे.
अल्पसंख्याक समाजातील युवक/युवतींना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या प्रगतीमधील अडथळे समजावून त्यांच्यामध्ये जागृती करणे आवश्यक आहे. तसेच अल्पसंख्याक युवक, युवतींमध्ये सकारात्मक बदल होऊन सामाजिक प्रगतीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. अल्पसंख्याक समाजातील मुलामुलींना उच्च शिक्षण देणे, उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील अल्पसंख्याक उमेदवारांकरिता रोजगाराभिमुख फी प्रतिपूर्ती प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये निरंतर प्रशिक्षण योजना / तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ / मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण योजना समाविष्ट करण्यात आली आहे.
योजनेचा लक्ष्यगट :तंत्र निकेतने, अभियांत्रिकी महाविद्यालये यामधून तंत्रशिक्षण संचालनालयाच्या मान्यतेने निरंतर प्रशिक्षण योजनेंतर्गत राबविण्यात येणारे विविध अभ्यासक्रम.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या मान्यतेने चालविण्यात येणारे विविध अभ्यासक्रम.
मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त विविध अभ्यासक्रम यामध्ये चालू शैक्षणिक वर्षात प्रशिक्षण घेत असलेले निवडक अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेचे उद्दिष्ट :राज्य शासनाने अल्पसंख्याक लोकसमू म्हणून घोषित केलेल्या राज्यातील मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारसी, बौद्ध व जैन या समाजातील उमेदवारांमधील बेरोजगारीची समस्या लक्षात घेवून त्यांना रोजगारक्षम बनविणे व त्यांच्याकरिता नियमित उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे.
योजना :या योजनेंतर्गत उल्लेखित अभ्यासक्रमामध्ये तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती म्हणून प्रति विद्यार्थी प्रशिक्षण शुल्काची प्रत्यक्ष रक्कम किंवा चार हजार रुपये यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम अदा करण्यात येते.
योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा:तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक (तंत्र शिक्षण) यांच्यामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते.
-वर्षा फडके, वरिष्ठ सहायक संचालक.
माहिती स्रोत: महान्युज