_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee गुन्हेशास्त्र - MH General Resource गुन्हेशास्त्र - MH General Resource

गुन्हेशास्त्र

गुन्हा आणि गुन्हेगार यांचा सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र. गुन्हेगाराची मानसिक प्रकृती अथवा विकृती आणि त्यामुळे उद्‌भवलेल्या समस्या, गुन्हेगार व समाज यांचे परस्परसंबंध, गुन्हेगारीच्या समस्या सोडविण्यासाठी समाजाने व कायद्याने केलेले प्रयत्न, या आणि यांसारख्या सर्व बाबींचा विचार गुन्हेशास्त्रात केला जातो. प्राचीन काळापासून अशा प्रकारचा विचार रूढ असल्याचे दिसून येते.

Telegram Group Join Now

गुन्ह्याची संकल्पना

गुन्ह्याच्या निरनिराळ्या व्याख्या केलेल्या आढळतात. वेस्टर मार्कच्या मताप्रमाणे कायदे व संप्रदाय काही मूल्यांवर आधारलेले असतात व त्यांविरुद्ध जे वर्तन असेल, ते गुन्हा होय. मायकेल व अ‍ॅड्लर यांच्या मते फौजदारी कायद्याने निषिद्ध असलेले वर्तन म्हणजे गुन्हा होय. सद्‌वर्तनाचा विरोध म्हणजे गुन्हा होय. गारॉफालो याच्या मताप्रमाणे सच्चाई व दया या भावनांविरुद्ध वर्तन म्हणजे गुन्हा होय. गिलीन यांच्या मताप्रमाणे मानवसमाजाच्या एका समुदायाच्या मते जे कृत्य समाजास हानिकारक, ते कृत्य गुन्हा होय; मात्र मानवसमाजाचा हा समुदाय सदाचारी असला पाहिजे. अशा प्रकारे निरनिराळ्या विचारवंतांनी गुन्ह्याची व्याख्या आपापल्या संकल्पनेप्रमाणे निरनिराळी केली आहे. गुन्ह्याची संकल्पना स्थलकालसापेक्ष असते. एका भूभागात जो गुन्हा समजला जाईल, तो दुसऱ्या भूभागात गुन्हा समजला जाईलच असे नाही. गर्भपात काही ठिकाणी गुन्हा नाही; पण आपल्या भारतात तो परवापर्यंत गुन्हा होता. समलिंगी संभोग इंग्लंडमध्ये गुन्हा नाही; पण भारतात तो गुन्हा आहे. दारुबंदी, जुगारबंदी व शस्त्रास्त्रे बाळगणे यांसंबंधी भारतात जे गुन्हे मानले आहेत, ते इतर देशांत तसे मानले आहेतच, असे नाही. एका कालखंडात जे वर्तन गुन्हा म्हणून समजले जाईल, ते दुसऱ्या कालखंडात गुन्हा ठरेलच, असे नाही.

सामाजिक आणि नैतिक मूल्ये बदलत असतात. त्यामुळे गुन्ह्याची संकल्पना व प्रकार बदलत राहतात. उदा., वैवाहिक-नीतिमत्तेच्या कल्पना बदलल्या, त्याप्रमाणे गुन्हेही बदलले. पूर्वी बहुपत्नीत्व गुन्हा नव्हता; पण तो आज गुन्हा होऊ शकतो. बहुपतित्व पूर्वी काही समाजांत गुन्हा नव्हता; पण तो आज गुन्हा होऊ शकतो. मालमत्ता अथवा योग्य वस्तूंच्या साठ्यावर पूर्वी नियंत्रण नसे. त्या वेळी जे कृत्य निर्दोष, तेच कृत्य नियंत्रण आल्यामुळे गुन्हा ठरले जाऊ शकते. सारांश, विशिष्ट काळी कायद्याने जे कर्म वा अकर्म सदोष व दंडार्ह ठरविले असेल, ते कर्म किंवा अकर्म त्या काळी गुन्हा ठरते.पाप, व्यसन व गुन्हा या तीन भिन्न संकल्पना आहेत. नैतिक दृष्ट्या पाप म्हणजे गुन्हा हे समीकरण बरोबर नाही. केलेला उपकार न स्मरणे नैतिक दृष्ट्या पाप असेल; पण तो गुन्हा नव्हे. खोटे बोलण्याची सवय हे पाप असेल; पण गुन्हा नव्हे. दारू पिणे जेथे कायद्याने मना नाही, तेथे दारूबाज हा व्यसनी आहे, पण गुन्हेगार नव्हे. कायदा वा तत्सम सामाजिक संकेत असल्याशिवाय गुन्ह्याची संकल्पना संभवत नाही. ‘जिकडे कायदा नाही तिकडे गुन्हा नाही’, अशी रोमन समाजात एक म्हण प्रचलित होती, ती या दृष्टीने अर्थपूर्ण आहे.

गुन्हेशास्त्राची व्याप्ती

समाजातील गुन्हेगारीचे अस्तित्व एका सामाजिक व्यवस्थेचा एक आविष्कार होय. अशा व्यवस्थेची शास्त्रीय उपपत्ती लावणे, गुन्हेगाराची मानसिक प्रकृती अथवा विकृती यांचे विवेचन करणे व गुन्ह्याच्या कारणांचे व प्रतिकाराचे विवेचन करणे, हे गुन्हेशास्त्राचे कार्य आहे. या शास्त्रामुळे गुन्हेगाराच्या व्यक्तिमत्त्वाचा ठाव घेता येतो व त्याच्या अंतर्मनात आपणास प्रवेश मिळतो. या शास्त्रामुळे गुन्ह्याच्या प्रतिकाराची आदर्श पद्धती कोणती, याचा बोध होतो. त्याचप्रमाणे बेकायदेशीरपणाच्या चक्रात सापडलेल्या गुन्हेगार व्यक्तीचे मानसशास्त्र, व्यक्तिमत्त्व व नीतिमत्ता या सर्वांचा अभ्यास गुन्हेशास्त्रात होऊ शकतो. सामाजिक निर्बंध व संकेत यांच्या चौकटीत व्यक्तीची समाजांतर्गत वागणूक ठराविक चाकोरीची असावी लागते. सामाजिक मूल्यांची जोपासना आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी समाजाने घटकांवर म्हणजे व्यक्तींवर निर्बंध लादलेले असतात. अनिर्बंध जीवन हे सामाजिक मूल्यांना घातक असते. गुन्हा हा सामाजिक मूल्यांवर केलेला आघात होय. म्हणूनच गुन्हेगारी ही समाजाच्या नैतिक मूल्यांशी व संकेतांशी उघड अथवा प्रच्छन्न असा संघर्ष ठरते. त्याचा ऊहापोह गुन्हेशास्त्रात केला जातो. गुन्ह्याचे मूळ शोधून काढताना मानसशास्त्रादी सर्वच सामाजिक शास्त्रांचा आधार घ्यावा लागतो.

समाज व व्यक्ती यांमध्ये संघर्षशून्य समन्वय राहिल्याशिवाय गुन्हेगारी नष्ट होणार नाही. विसाव्या शतकापर्यंत, गुन्हा केल्याच्या आरोपावरून ज्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात येत असे, अशांचाच अभ्यास गुन्हेशास्त्रात होत असे. अलीकडे गुन्हेशास्त्राचा अभ्यासविषय व्यापक होत चालला आहे. गुन्हेगार आणि त्याच्याबद्दलचे शासनाचे व न्यायासनाचे कार्य व त्यासंबंधित संस्था एवढ्यांचाच अभ्यास गुन्हेशास्त्रात अभिप्रेत नाही. गुन्हा का व कसा घडला, गुन्हेगाराने कोणत्या परिस्थितीत गुन्हा केला, गुन्हा करण्यामागील त्याचा हेतू कोणता होता, त्याच्या गुन्हेगारीमुळे इतरांवर आणि एकूण समाजावर विपरीत परिणाम कोणते झाले इ. प्रश्नांचा ऊहापोह गुन्हेशास्त्रात केला जातो. वर्तमान समाज औद्योगिकीकरण व शहरीकरण यामुळे जटिल झाला आहे. गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. समाजातील वातावरण गुंतागुंतीचे होत असल्याने व मोठमोठ्या शहरांमधील छोट्या समूहांची प्राथमिक नियंत्रणाची भूमिका गौण होत चालल्याने व्यक्तींच्या गुन्हेगारी वर्तनावरही दडपण राहत नाही. परिणामतः शहरांत गुन्हेगारी व प्रामुख्याने बालगुन्हेगारी वाढत आहे. सामाजिक जीवनातील गुंतागुंत, धावपळ, विस्कळीतपणा, अनामिकता या कारणांमुळे गुन्हेगारी बळावते आणि गुन्हेगारीमुळे सामाजिक जीवनात अस्थिरता व असुरक्षितता येते. जेथे शासनामध्ये शिथिलता आणि भोंगळपणा येतो, तेथे गुन्ह्याची दखल वेळीच व कार्यक्षमतेने घेतली जात नाही. गुन्हेगारांना जेथे सुरक्षितता वाटते, तेथे सामान्यांना भय वाटू लागते.

गुन्हेशास्त्रात गुन्हा, गुन्हेगार व गुन्हेगारी या तिन्हींचा सखोल अभ्यास केला जातो. गुन्हेशास्त्राइतकेच दंडशास्त्रही महत्त्वाचे आहे. गुन्हा करणाऱ्याच्या हातून समाजावर अन्याय झालेला असतो. अन्यायाचे परिमार्जन शिक्षेमार्फत व्हावे, अशी अपेक्षा समाजाची व गुन्हेगाराच्या दुष्कृत्याला नाहक बळी पडलेल्यांची असते. शिक्षा म्हणजे पापक्षालन, शिक्षा म्हणजे गुन्ह्याच्या दुष्कृत्याचा बदला, शिक्षा म्हणजे निरपराध्यांना दहशत, शिक्षा म्हणजे चुकलेल्याला सुधारणे, शिक्षा म्हणजे गुन्हेगाराला सामाजिक रोगी समजून उपचार करणे इ. विविध दृष्टीकोणांतून शिक्षापद्धतींचा अवलंब झाला. यांपैकी कित्येक पद्धती आजही प्रचलित आहेत. गुन्हेगाराने शिक्षा भोगल्याने समाजावर काय परिणाम झाला आणि शिक्षेनंतर गुन्हेगाराचे समाजात काय होते याचीही दखल दंडशास्त्रात घेतली पाहिजे, असा आधुनिक विचार पुढे येत आहे. गुन्हेगारीकडे व गुन्हेगाराकडे पाहण्याचे दृष्टीकोण व व्यवस्था सतत बदलत आहेत. त्या अनुषंगाने या दोन्ही शास्त्रांच्या अभ्यासाला वर्तमान समाजात महत्त्वाचे स्थान प्राप्त होत आहे.

गुन्ह्याची उद्‌गममीमांसा

गुन्ह्याची कारणमीमांसा करणारे अनेक सिद्धांत आहेत. त्यांपैकी महत्त्वाच्या सर्व सिद्धांतांचा परामर्ष पुढीलप्रमाणे घेता येईल. जननिक सिद्धांतानुसार एकाकार एकयुग्मज आणि द्वियुग्मज जुळ्या भावंडांमध्ये जननिक रचना बरीचशी सारखी असल्यामुळे एक भाऊ गुन्हेगार असेल, तर दुसरेही गुन्हेगारच होतील असा अंदाज बांधलेला आहे. गुन्हेगारी आनुवांशिक आहे असे सिद्ध करण्याचा हेतू जननिक पुराव्यावरून साध्य झालेला दिसत नाही. ज्याप्रमाणे डोळ्याचा रंग व कातडीचा रंग आनुवंशिक लक्षण आहे असे दिसून येते, त्याप्रमाणे अमुक एक मुलगा खिसेकापूच होईल, असे निश्चित सांगता येत नाही. गुन्हेगार व गुन्हेगार नसलेला यांच्यात निश्चितपणे फरक दाखविता येईल अशा स्वरूपाचे जननिक घटक नसल्याने गुन्हेगारीचा आनुवंशिकतेशी संबंध जोडता येत नाही.

गेश्टाल्ट सिद्धांतानुसार गुन्हेगाराचे शारीरिक अथवा मानसिक वैगुण्य, असमतोल, अंतरासर्गी ग्रंथीतील दोष यांचा व गुन्ह्याचा निकटचा संबंध असतो. रोगजर्जर शरीर, शक्तीचा अवास्तव उद्रेक, मासिक रजःस्त्राव वा अन्य स्त्रावांमुळे होणारा त्रास यांचा व व्यक्तीच्या गुन्हेगारीचा संबंध असतो. मस्तकमितीच्या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या मेंदूमध्ये पस्तीस कालदर्शक भाग आहेत आणि कवटीच्या वाढीवरून व्यक्तीतील कोणता स्वभावविशेष प्रभावी आहे, ते अजमावता येते. विध्वंसक वृत्ती, रागीटपणा, भित्रेपणा, लोभीपणा, मत्सर इ. स्वभावविशेष प्रभावी होऊन व्यक्तीच्या वर्तनात मानसिक वा शारीरिक विकृती निर्माण होतात व या विकृतींमुळे व्यक्ती गुन्हेगार होऊ शकतो. शल्यचिकित्साशास्त्रानुसार विशिष्ट शारीरिक लक्षणे विशिष्ट गुन्हेगारांमध्ये दिसून येतात. लहान कवटी, कमी वजनाचा मेंदू, लांब हात, पाठीमागे सपाट पसरट असणारे कपाळ, पुढे सरणारा जबडा, तिरपे डोळे इ. शारीरिक लक्षणे असणाऱ्या व्यक्तींमध्ये गुन्हेगारीची लक्षणे दिसून येतात. अतिशय काळे डोळे असणारा इसम वाटमारू असतो इत्यादी.

गुन्हेगार ही व्यक्ती मध्यवर्ती समजून तिच्याभोवती गुन्हेशास्त्र उभे केले गेले. काहींनी वेडे, जन्मजात, रुळलेला, नैमित्तिक व विकारवश इ. गुन्हेगारांचे प्रकार सांगितले. मानवशास्त्रानुसार विशिष्ट वंश व वांशिक संस्कृती असणाऱ्या गटांतील व्यक्तींमध्ये गुन्ह्याचे प्रमाण अधिक आढळते. निग्रो वंशाचे लोक किंवा आदिवासी लोक अधिकांशाने गुन्हे करतात, अशा स्वरूपाचा वंशश्रेष्ठतेतून निर्माण झालेला युक्तिवाद पुढे आला. मानसशास्त्रज्ञ किंवा जीवशास्त्रज्ञ यांनी मानसिक पूर्वग्रहांवर आणि अपुऱ्या पुराव्याच्या साहाय्याने काढलेले निष्कर्ष निर्णायक ठरू शकत नसल्याने गुन्हेशास्त्राच्या इतिहासात जमा झालेले दिसतात. एकोणिसाव्या शतकात नानाविध शास्त्रज्ञांनी तुरुंगातील कैदी, वेडी माणसे, मनोविकृत व्यक्ती यांची पाहणी करून गुन्हा आणि आनुवंशिकता किंवा मनोविकार यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला व त्यातूनच विविध सिद्धांत पुढे आले. एकोणिसाव्या शतकातील तुरुंगामध्ये इतकी दुर्व्यवस्था असे, की कैदी खरोखरीच वेडे व मनोदुर्बल होण्याची शक्यता असे. अभ्यासासाठीही अशांचीच निवड केल्यानंतर मानसिक व शारीरिक वैगुण्य आणि मानसिक असमतोल यामुळेच त्यांच्या हातून गुन्हा घडला असेल, याला सबळ पुरावा मिळाल्यासारखे वाटे. केवळ मानसिक व शारीरिक वा वांशिक लक्षणांवर भर देऊन त्यांचा व गुन्हेगारीचा निकटचा संबंध असल्याचे दर्शविणे हे प्रयोगशाळांतील आणि विशिष्ट नियंत्रित अवस्थेतील पुराव्यावरून सिद्ध करून दाखविण्याचे जे प्रयत्न झाले, ते निर्णायक स्वरूपाचे ठरले नाहीत.

भारतात ब्रिटिश राजवटीत काही जमातींनाच गुन्हेगार ठरविले होते आणि त्यामुळे व्यक्ती जन्मतःच गुन्हेगार ठरत. व्यक्तीच्या जीवनात आणि तिच्या व्यवहारांवर अनेक विविध घटकांचा प्रभाव पडत असतो. केवळ शारीरिक वा मानसिक दोषांमुळेच व्यक्ती गुन्हे करतात, असे अनुमान काढता येत नाही. कारण तशाच स्वरूपाचे दोष असलेल्या इतर व्यक्ती गुन्हेगार नसल्याचे आढळते. आजारी वा वेडी माणसे गुन्हा करतीलच असे नाही. शारीरिक व्यंग असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये न्यूनगंडाची भावना असतेच, असे नाही. आदिवासींची संस्कृती भिन्न असली, तरी ती गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी असते असे नाही. निग्रो लोक काळे असले, तरी ते सर्व गुन्हेच करतील व गोरे लोक गुन्हे करणार नाहीत असे नाही. सुरुवातीच्या शास्त्रज्ञांनी तुटपुंज्या, ठराविक प्रकारच्याच व गुन्हेगार असणाऱ्याच व्यक्तींचा प्रामुख्याने अभ्यास केल्याने त्यांच्या विश्लेषणात हा दोष काहीसा राहिला.

गुन्हेशास्त्राचा जन्म

गुन्हा करणारी व्यक्ती कोण व कशी आहे, गुन्हा करण्याच्या बाबतीत तिची जबाबदारी कितपत आहे, तिची शारीरिक, मानसिक कुवत आणि सामाजिक परिस्थिती या सर्व बाबींचा प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत स्वतंत्रपणे विचार केल्याशिवाय गुन्ह्याची कारणमीमांसा करता येणार नाही, हा विचार पुढे आल्यामुळेच गुन्हेशास्त्राचा पाया घातला गेला. सामाजिक घटकांच्या सिद्धांतानुसार दाट लोकसंख्या, सामाजिक व धार्मिक चालीरीती, कौटुंबिक परिस्थिती, शिक्षण, आर्थिक व सामाजिक विषमता, राजकीय स्थित्यंतरे, दारिद्र्य, घरटंचाई, गलिच्छ वस्त्या, करमणुकीच्या साधनांचा अभाव इ. विविध प्रकारच्या कारणांमुळे व्यक्तींच्या पुढे पेच उभे राहतात. परिस्थितीशी सामावून कसे घ्यावे हे न कळल्यामुळे व्यक्तीच्या हातून गुन्हा घडतो. गुन्हेशास्त्राचा उगम झाल्यापासून सामाजिक शास्त्रीय विवेचनावर व संशोधनावर अधिक भर दिला जाऊ लागला. गुन्हेशास्त्राची व्याप्ती विस्तारत गेली आणि गुन्हा, गुन्हेगार व समाज यांच्या साकल्याने विचार होऊ लागला.

इतर सिद्धांतांचा परामर्ष

गुन्हेगारी ही विशिष्ट प्रभावकेंद्रात उद्‌भवणाऱ्या अडचणींतून निर्माण होते. कुटुंब, शाळा, आर्थिक संस्था, राजकीय वातावरण यांचे मार्गदर्शन व्यक्तीला होत असते. या क्षेत्रांमध्येच अडचणी वा अंदाधुंदी, भ्रष्टाचार व अराजकता निर्माण झाली, तर व्यक्तींना नियमांनुसार सदाचारी वर्तन ठेवणे कठीण होत जाते. सामाजिक विघटनामुळे गुन्हेगारी वाढण्यास मदत होते. काहींच्या मते विशिष्ट भौगोलिक व सामाजिक वातावरणात, विशिष्ट क्षेत्रात–नागरी वा ग्रामीण–विशिष्ट गुन्ह्यांचे प्रमाण कमीअधिक आढळते. दारू, अफू वा इतर अंमली पदार्थांच्या सेवनाने झिंगलेल्या स्थितीत व्यक्ती गुन्हे करते. शहरातील गलिच्छ वस्त्या बालगुन्हेगारी वाढविण्यास कारणीभूत ठरतात. युद्धकाळात गुन्ह्यांचे प्रमाण वाढते व शांततेच्या काळात घटते. चित्रपट, मासिके इ. करमणुकीच्या साधनांमुळे गुन्ह्यांच्या तंत्रांबद्दल व गुन्हेगारांबद्दल आकर्षण निर्माण होते आणि त्यांतूनही टोळ्यांचे उद्योग सुरू होतात. चोरटा व्यापार करणाऱ्या सोनेरी टोळ्यांचे बरेचसे उद्योग गुप्तपणे चालतात व तेथे समाजाला मान्य नसणाऱ्या व्यवहारांनाच प्राधान्य दिले जाते. परिणामतः अशा टोळ्यांचे जाळे देशभर व समाजभर पसरल्यास अनेक लहानमोठ्या व्यक्ती त्यात गुंतविल्या जातात. संघटित गुन्हे, विद्यार्थ्यांमधील असंतोषातून निर्माण होणाऱ्या चळवळी, धार्मिक व जातीय तेढीतून उद्‌भवणाऱ्या दंगली यांचेही प्रकार गुन्हेगारीचे समाजातील प्रमाण व दडपण वाढवितात. सामाजिक घटकांचा परामर्ष घेऊन गुन्हेगारीची मीमांसा करण्याचे प्रयत्न दिवसेंदिवस वाढत असून गुन्हेशास्त्रीय विवेचनाला अधिकाधिक शास्त्रीय स्वरूप येत चालले आहे.

गुन्हेगारीबाबतचे समाजशास्त्रीय स्पष्टीकरण

गुन्हेगारीचा विचार करता पुढील काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत : गुन्हेगारी उपजत नसून संपादन केलेली वर्तणूक असते. खिसा कसा कापायचा व गुन्हा करूनही निष्पापपणाचा आव कसा आणावयाचा याचे शिक्षण व त्या दृष्टीने सराव केल्याशिवाय खिसेकापूगिरी करता येणार नाही. माणसामाणसांच्या सहवासात राहूनच गुन्हा करण्याचे शिक्षण मिळते. घनिष्ट संबंध असलेल्यांच्या मार्फत गुन्ह्याचे शिक्षण घेणे सुलभ जाते. गुन्ह्याचे तंत्र, उद्देश, प्रयोजकता इ. सर्व शिकावे लागते. कायदेभंग, सामाजिक नीतिमूल्यांच्या विरोधी वर्तन किंवा नियमांचे उल्लंघन करण्यासारखे वातावरण व व्यक्ती यांचा सहवास जितका जास्त, तितका गुन्हा करण्यास प्रोत्साहन मिळण्याचा संभव जास्त असतो.

गुन्हेगार हा नेहमीच उपाशी किंवा गरजू असतो असे नाही. गुन्हा करण्याची सवय जडते आणि तिचे इतर व्यसनांप्रमाणे व्यसनामध्ये रूपांतर होण्याची शक्यता असते. सामान्यजन साध्याप्रत जाण्यासाठी जसा साधनांचा अवलंब करतो, तसाच गुन्हेगारही इच्छित साध्य करण्यासाठीही गुन्हा करताना आढळतो. समाविष्टतेच्या सिद्धांतानुसार व्यक्तीची अंतर्गत कुवत बाह्य वातावरणातील प्रलोभनांना वा दुर्व्यवहारांना बळी न पडता आत्मविश्वासाने समाजमान्य वर्तन करण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरते; त्यावेळी व्यक्ती गुन्हेगार होत नाही. बाह्य समाजविरोधी घटकांच्या प्रभावाने आत्मसंयम, धैर्य, आत्मविश्वास ढळू न देण्याची शक्ती तिच्यात समाविष्ट झालेली असते. गुन्ह्याला प्रवृत्त करणाऱ्या बाह्य शक्तींशी सामना करण्याची व्यक्तीची कुवत किती आहे, यावर गुन्हेगारी वर्तन अवलंबून असते. समाज व सामाजिक संस्था यांच्यामार्फत होणाऱ्या व्यक्तीवरील संस्कारांवर गुन्हेगारीचे प्रमाण निर्भर असते. मूल्यसंघर्ष व व्यवहारसंघर्ष यांमुळे आचारविचार यांत विसंगती निर्माण होण्याची शक्यता जेथे असते, तेथे व्यक्तीची आंतरिक समाविष्टता बलवान असावयास हवी. जेथे बाह्य समाविष्टता बलवान असते, तेथे सर्वसाधारणपणे व्यक्ती गुन्हेगारीला बळी पडत नाही. जेथे बाह्य शक्ती कमकुवत नसतानाही व्यक्ती गुन्हा करते, तेथे तिच्या आंतरिक कुवतीमध्ये दोष आढळून येतो. हा सिद्धांत गुन्हेगार आणि गुन्हेगारांव्यतिरिक्त इतर सर्वसामान्य व्यक्ती या सर्वांना लागू करता येतो व गुन्हेगाराच्या कृत्याचे, त्याच्या वर्तनामागील पार्श्वभूमीचे आणि त्याच्या गुन्ह्यामुळे होणाऱ्या परिणामांचे विवेचन करता येते.

गुन्हा घडण्यास कोणते कारण घडले हे समजले, तर त्या कारणाचे निराकरण कसे करता येईल, याचीही सूचकता व मार्गदर्शकता या सिद्धांताच्या विवेचनावरून मिळते. गुन्हेशास्त्रात केवळ गुन्हेगारीचा अभ्यास करून भागणार नाही. गुन्हेगारी हा सामाजिक रोग आहे व त्याचे विपरीत परिणाम व्यक्तीवर व समाजावर होतात; म्हणून त्याचा प्रतिबंध करणे, जेथे शक्य तेथे समूळ उच्चाटन करणे याचाही विचार गुन्हेशास्त्रात अभिप्रेत आहे. गुन्हेशास्त्र गुन्हेगाराच्या आणि समाजाच्या भविष्याचा विचार केल्याशिवाय परिपूर्ण ठरणार नाही. वंशविचार, शरीरलक्षण व मनःप्रकृती यांवर भर देणाऱ्या उपपत्त्या या पहिल्या गटातील व वैयक्तिक सामाजिक परिस्थिती, शिक्षण आणि आसमंत यांवर भर देणाऱ्या उपपत्त्या या दुसऱ्या गटातील होत.

गुन्हेशास्त्राचा ऐतिहासिक आढावा

पूर्वी कोणत्याही व्यक्तीने गुन्हा केला, की फक्त त्या कृत्यावरूनच तिला शिक्षा होत असे. गुन्हा करणारी व्यक्ती कोण, त्या व्यक्तीची गुन्ह्याच्या बाबतीत कितपत जबाबदारी आहे, त्या व्यक्तीची मानसिक अथवा शारीरिक ठेवण कशी आहे, तिची आनुवंशिक पूर्वपीठिका काय आहे इ. गोष्टींचा विचार जुन्या काळी होत नसे. गुन्हेगारीचे एक शास्त्र आहे, असे सिद्ध झाल्यावर यासंबंधी साकल्याने विचार होऊ लागला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या शास्त्राचा पाया घातला गेला. हा पाया घालणाऱ्यांपैकी प्रमुख म्हणजे इटलीतील शास्त्रज्ञ लोंब्रोसो होय. त्याच्याच कार्याला साहाय्यभूत झालेले आणखी शास्त्रज्ञ म्हणजे फेऱ्य व गारॉफालो होत. या तिघांनीही या शास्त्राचा पाया घातला.लोंब्रोसो याचा जन्म १८३५ मध्ये झाला व १८७२ साली वैद्याच्या शरीरमापनावर त्याने पहिले पुस्तक लिहून गुन्हेशास्त्राचा पाया घातला. १८२५ मध्ये फ्रान्समध्ये गुन्हेगारीविषयक आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू झाले होते. त्यानंतर दहा वर्षांनी कटले याने यासंबंधी एक पुस्तक लिहिले. कटले याला गुन्हेगारी सांख्यिकीचा जनक समजण्यात येते.

कटले याचे काम फ्रान्समध्ये पुढे तार्द याने व जर्मनीत फ्रान्झलिझ्ट याने चालविले. समाजशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र, जीवविज्ञान इत्यादींत जसजशी प्रगती होत गेली, तसतसा गुन्हेशास्त्राचा विचार व्यापक होत गेला.लोंब्रोसो हा शल्यचिकित्सक होता. त्याने आपल्या रोग्यांची शरीरलक्षणे, वैगुण्ये व शारीरिक मोजमापे या सर्वांची यादी केली होती. त्याचप्रमाणे वेड्यांच्या रुग्णालयातील रोगी व कारागृहातील कैदी यांची लक्षणे नोंदवून घेतली होती. काही विशिष्ट गुन्ह्यांमध्ये लोंब्रोसो याला तीच तीच शारीरिक लक्षणे, म्हणजे लहान कवटी, कमी वजनाचा मेंदू, लांब हात, पाठीमागे पसरट असणारे कपाळ, पुढे सरणारा जबडा, लहान दाढी, जास्त प्रसृत कान, तिरपे डोळे इ. सापडली. यामुळे लोंब्रोसो याने अशी शारीरिक लक्षणे एकत्र करून विशिष्ट लक्षणे असणारा इसम गुन्हेगार असतो, असे आपले मत प्रतिपादन केले. कुब्ज इसम खुनी असत नाही; पण तो आग लावणारा अगर खोटे दस्तऐवज करणारा असतो. अतिशय काळे डोळे असणारा इसम वाटमारू असतो. करडे डोळे असणारा इसम सर्वसाधारण चोर असतो, असे काही निष्कर्ष त्याने नमूद केले. गुन्हेगार ही व्यक्ती मध्यवर्ती समजून तिच्या भोवती गुन्हेशास्त्र उभारण्याचे कार्य प्रथम लोंब्रोसो यानेच केले. गुन्हेशास्त्राला लोंब्रोसो याने जीवविज्ञानाचा आधार घेतला. त्याने गुन्हेगारांचे वर्गीकरण केले व कोणते गुन्हेगार जन्मतःच गुन्हेगार असू शकतील व कोणते गुन्हेगार सवय, विकार अथवा संधी यांमुळे गुन्हेगार बनतील ते ठरविले.तसे पाहू गेल्यास लोंब्रोसोच्या अगोदर जवळजवळ १०० वर्षे इटलीमध्ये बेकारिआने दंडशास्त्राचा पाया घातला. १७६४ मध्ये गुन्हे व शिक्षा यांवर त्याने पुस्तक लिहून शिक्षाप्रकारांविषयी मूलभूत विचार प्रदर्शित केले आणि त्यामुळे दंडशास्त्राच्या विचारामध्ये क्रांती झाली. दंडशास्त्राचा प्रमाणभूत संप्रदाय बेकारिआपासून सुरू झाला.लोंब्रोसो व त्याच्या संप्रदायातील शास्त्रज्ञांनी गुन्हेगाराच्या शरीरावर व व्यक्तिमत्त्वावर भर दिला; पण त्यांनी फक्त काही लक्षणेच जमेस धरली.

आजचे शास्त्रज्ञ समग्र व्यक्तिमत्त्वावर भर देतात. एवढेच नव्हे, तर गुन्हेगाराची एकाकी छाननी न करता, व्यक्तिगत परिस्थिती आणि आसमंत यांच्या प्रभावाचीही नोंद घेतात. गुन्हेगारी समाजशास्त्र, ते हेच. बोंगर, सेलीन, ग्रिस्पीनी वगैरे शास्त्रज्ञ या बाबतीत प्रसिद्ध आहेत.इटलीतील शास्त्रज्ञांनी काढलेले वरील सर्व निष्कर्ष–विशेषतः लोंब्रोसोचा ‘शारीरिक लक्षणे व गुन्हा यांचा अविभाज्य संबंध असतो’ हा सिद्धांत–आज सर्वसंमत नाही; पण एक गोष्ट निश्चित, की गुन्हेगार, गुन्हा व गुन्हेशास्त्र या त्रयींच्या अभ्यासाचा पाया लोंब्रोसो याने घातला.गारॉफालो याचेही काम लोंब्रोसोप्रमाणेच महत्त्वाचे आहे. गारॉफालो याच्या मते गुन्हा म्हणजे कायद्याने केलेली कृत्रिम व्याख्या (म्हणजे व्याख्याविषय) नव्हे, तर गुन्हा ही एक निसर्गाने घडणारी घटना आहे आणि गुन्ह्याचे केवळ कृत्यच न बघता गुन्हेगार या व्यक्तीचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

लोंब्रोसो याने गुन्हेगाराच्या शारीरिक लक्षणांवर जोर दिला होता; पण गारॉफालो याने मानसिक लक्षणांवर भर दिला.फेऱ्य या शास्त्रज्ञाने मानवशास्त्र, मानसशास्त्र, दंडशास्त्र आणि सांख्यिकी या सर्वांचा आधार घेऊन गुन्हेगार या व्यक्तीची छाननी केली. त्याने वेडा, जन्मजात, रुळलेला, नैमित्तिक व विकारवश असे गुन्हेगारांचे पाच प्रकार केले. तसेच दाट लोकसंख्या, सामाजिक व धार्मिक चालीरीती, कौटुंबिक परिस्थिती, शिक्षण, औद्योगिक उत्पादन, मद्यसेवन, आर्थिक व राजकीय संस्था, पोलीस व न्यायसंस्था या सर्वांचा गुन्हेगारीवर कसा परिणाम होतो, हे दाखवून दिले.जर्मन शास्त्रज्ञ आशाफोन्य बर्ग याने स्वतःचे एक निराळे गुन्हेगारांचे वर्गीकरण केले आहे. इंग्रज शास्त्रज्ञ एलिस याने आणखी एक वर्गीकरण केले आहे. पारमेली या शास्त्रज्ञानेही एक वर्गीकरण केले आहे. एलवुड आगस्ट, ड्राहमस, प्रोगिलीन यांनीही आपापली वर्गीकरणे केली आहेत. गुन्हेगार म्हणून काही खास वैशिष्ट्ये असलेली व्यक्ती असते, असे अलीकडे मानले जात नाही, सदरलँडच्या मते गुन्हा करणारा वर्ग निश्चित करणे अशक्य आहे. तसेच मानसिक अथवा राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने गुन्हेगार आणि निर्दोष या दोहोंमध्ये खास वेगळेपण असते असेही नाही. यूरोपीय देशांत गुन्ह्यांचे मूळ आनुवंशिक गुणांच्या आधारे शोधण्याचा कल जास्त आहे. अमेरिकेत परिस्थितिजन्य घटकांवर जास्त भर दिला जातो.सदरलँडच्या मते गुन्हेशास्त्राचे पाच संप्रदाय आहेत. जुना संप्रदाय १७७५ साली सुरू झाला. प्रत्येक इसम सुखकारक अथवा दुःखकारक परिणामांचा विचार करून स्वेच्छेने गुन्हा करतो, हे या संप्रदायाचे मत. बेकारिआ याने हे तत्त्व आपल्या दंडशास्त्रात मान्य केले व शिक्षेचे परिणाम अधिक दुःखकारक असल्याशिवाय गुन्ह्याची प्रवृत्ती नष्ट होणार नाही, असे प्रतिपादन केले. त्यासाठी गुन्हा व त्याची शिक्षा या दोहोंची आगाऊ कल्पना लोकांना असली पाहिजे, हे मत त्यांनी मांडले. दुसरा भौगोलिक संप्रदाय १८३० साली सुरू झाला. फ्रान्सचे कटले व गेरी हे या संप्रदायाचे प्रवर्तक. विशिष्ट भौगोलिक व सामाजिक वातावरणात गुन्हे उद्‌भवतात, हे सिद्ध करण्यासाठी या तज्ञांनी सांख्यिकीचा अवलंब केला. तिसरा आर्थिक संप्रदाय १८५० साली सुरू झाला. मार्क्स आणि एंगेल्स यांच्या लिखाणावरून या संप्रदायाने गुन्हेगारीचे मूळ आर्थिक परिस्थितीत असते, हे सिद्ध केले. चौथा व्यक्तिमत्त्ववादी संप्रदाय १८७५ नंतर सुरू झाला. या संप्रदायाप्रमाणे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक लक्षणांशी गुन्हेगारी निगडीत असते. गुन्हेगारी ही सामाजिक घटना नसून मुख्यतः वैयक्तिक घटना आहे, असे या संप्रदायाचे प्रतिपादन आहे.

पाचवा समाजशास्त्रीय संप्रदाय १९१५ साली सुरू झाला. लिस्ट, प्रिन्स फान हेमह, फाइन् टस्की वगैरेंनी असे मत मांडले, की सामाजिक परिसराच्या परिणामांतून गुन्हेगारी निर्माण होते. सदरलँडच्या मते गुन्ह्यात सात कल्पना अंतर्भूत आहेत : (१) गुन्ह्याच्या कृत्यापासून काहीतरी बाह्य परिणाम अथवा नुकसान झाले पाहिजे. (२) ते कायद्याने निषिद्ध असले पाहिजे. (३) ते कर्त्याची काही एक प्रवृत्ती अथवा निवृत्ती दाखविणारे पाहिजे. (४) त्यामागे कर्त्याचा दुराशय पाहिजे. (५) कर्त्याची वागणूक व दुराशय यांमध्ये मेळ असला पाहिजे. (६) कृत्य व नुकसान यांमध्ये कार्यकारणभाव पाहिजे. उदा., अ ने बला गोळी मारली. त्यामुळे तो जखमी झाला. नंतर तो सुधारत असता हृदयक्रिया बंद पडून मरण पावला; तर यांत गोळी मारणे व मृत्यु घडणे यांमध्ये कार्यकारणभाव नाही. (७) शेवटी अशा कृत्यास कायद्याने मंजूर अशी शिक्षा पाहिजे.सामाजिक दृष्ट्या गुन्हा म्हणजे एक विसंवाद अथवा विघटन आहे. गारॉफालोची व्याख्या वर सांगितलेलीच आहे. रेडक्लिफ ब्राउन याने गुन्हा म्हणजे शिक्षेस पात्र असा समाजसंकेत अथवा रीतिभंग अशी व्याख्या केली आहे.

त्याच्या मते गुन्ह्यात तीन कल्पना अंतर्भूत आहेत

(१) सत्ताधारी वर्ग काही मूल्यांचा आदर करतो,

(२) दुसऱ्या काही व्यक्ती या मूल्यांचा अनादर करतात आणि

(३) सत्ताधारी वर्ग तो आदर कायम राखण्यासाठी या दुसऱ्या व्यक्तींवर बळजबरी करतो.

गुन्हेगारीचा उगम दारिद्र्य, घरटंचाई, गलिच्छ वस्ती, करमणुकीच्या साधनांचा अभाव, मानसिक दुर्बलता, अस्थिरता, विकारवशता यांमधून होतो हे खरे; पण हे पूर्ण सत्य नव्हे. श्रीमंत अथवा मध्यम वर्गात वरील कारणे आढळत नसूनही त्यांत गुन्हेगारी आढळून येते.

गुन्हेगारीचे मूळ शोधताना दोन दृष्टिकोणांतून विचार केला पाहिजे :

(१) परिस्थिती अथवा घटना आणि

(२) व्यक्तिमत्त्व.

दुकानदाराच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन एखाद्या इसमाने दुकानातील वस्तू पळविली, तर दुकानदाराची गैरहजेरी ही घटना; पण अशा वेळी सर्वच माणसे चोरी करणार नाहीत. म्हणून चोराचे व्यक्तिमत्त्व, त्याचा पूर्वेतिहास इ. लक्षात घेऊन हाच इसम गुन्हेगार का झाला, याबद्दल काहीतरी स्पष्टीकरण मिळू शकते.

गुन्हेगारी व सामाजिक घटक

औद्योगिक क्रांतीमुळे व लोकशाहीच्या कल्पनांमुळे सामाजिक बदल झाले व त्यामुळे पूर्वीची नियंत्रणे ढिली झाली. स्पर्धाक्षेत्र वाढले व प्रत्येकास आपणास दर्जा मिळावा म्हणून पैसे मिळविण्याची हाव सुटली. स्वार्थ ही प्रेरकशक्ती झाली. सहकारी जीवन अथवा सामाजिक हिताबद्दल आस्था राहिली नाही. धर्मसंस्था व ग्रामपंचायत यांसारख्या सामाजिक हिताच्या दृष्टीने व्यक्तीचे वर्तननियंत्रण करणाऱ्या संस्था दुर्बल झाल्या. आपल्याला खास हक्क अथवा फायदे मिळावेत, म्हणून सत्ताधारी व्यापारीवर्गाने कायदा दुर्बल ठेवला. नवीन समाज हा उत्क्रांतीने निर्माण न होता, क्रांतीने निर्माण झाला; नवी मूल्ये व नवीन रीती उत्पन्न झाल्या; त्यामुळे जुन्यानव्यांचा संघर्ष अपरिहार्य ठरला. ही सर्व परिस्थिती गुन्हेगारीला पोषक ठरली.गुन्हेगारी काही ऋतूंत जास्त वाढते अथवा डोंगराळ भागात जास्त आढळते, यांसारखे समज चुकीचे आहेत, असे सिद्ध झाले आहे. गुन्हेगारी वातावरणावर अवलंबून नसून आनुवंशिकतेवर असते, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी इतर संशोधनावरून ती गोष्ट चूक आहे, असे आढळून आले आहे. शरीरलक्षणे आणि गुन्हेगारी यांचा संबंध आहे अशा प्रकारची मते चुकीची आहेत, असे सिद्ध झाले आहे.

विशिष्ट वयोगटातील व्यक्तींकडून जास्त गुन्हे घडतात अथवा ते विशिष्ट प्रकारचेच असतात; हेही मत पूर्ण सत्य नव्हे. स्त्रियांपेक्षा पुरुषांत गुन्हेगारी जास्त आहे; पण त्याचे कारण लिंगभेद नसून पुरुषांना समाजात संधी व स्वातंत्र्य जास्त आहे, हे होय. ज्या ठिकाणी स्त्रिया पुरुषांएवढ्याच सत्ताधारी अथवा सामर्थ्यशील असतात, त्या ठिकाणी स्त्रियांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आढळते.मानसिक दौर्बल्य व गुन्हेगारी यांमधील सांधा फार हलका व लवचिक आहे. संशोधन करून वरील मत प्रतिपादन केले आहे. मानसिक विकृतीचे काही विशिष्ट प्रकार विशिष्ट सामाजिक संघटनांमध्ये आढळून येतात. या विकृतींमुळे नियमांचा भंग व गुन्हेगारी संभवते; पण मानसिक विकृतीचे सर्वच लोक गुन्हे करतातच, असे आढळून येत नाही. काही वेळा मेंदू अथवा मज्जातंतूंच्या रोगाने प्रकृतीवर परिणाम होऊन तो इसम चमत्कारिक तऱ्हेने वागतो. अशा वेळी समाज त्याला अडथळे आणतो अथवा त्याची अवहेलना करतो. परिणामतः अशी व्यक्ती बेदरकारीने वाटेल ते करण्यास प्रवृत्त होते.दारू, अफू वा इतर अमली पदार्थांच्या सेवनाने झिंगलेल्या स्थितीत व्यक्ती गुन्हे करते, पण हेही सर्वथा खरे नाही. सर्वच व्यसनी माणसे गुन्हे करीत नाहीत. व्यसनी व्यक्तीच्या परिस्थितीवर, संस्कारावर गुन्ह्याच्या प्रवृत्ती अवलंबून असतात.मनोविकाराचे संतुलन बिघडल्याशिवाय गुन्हे संभवत नाहीत.

फ्रॉइडच्या प्रतिपादनाप्रमाणे मनामध्ये समाजसंकेताशी संघर्ष येऊ नये, म्हणून काही भावना सुप्त वा दबलेल्या असतात; त्यांवरील नियंत्रण गेले, की गुन्हेगारी संभवते.सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केला, तर गुन्हेगारीनिदर्शक असे व्यक्तीचे व्यवच्छेदक लक्षण नाही, हे लक्षात येते. समाजातील व्यवहाराच्या प्रक्रियेतून गुन्हेगारीचा उद्‌भव आहे.काही संशोधकांच्या मते गुन्हेगारी श्वेतवर्णीयांपेक्षा निग्रोंमध्ये आणि स्वदेशीयांपेक्षा परदेशीयांमध्ये जास्त असते; पण हेसुद्धा पूर्ण सत्य नव्हे. उत्तर अमेरिकेत खून-मारामारीचे गुन्हे निग्रो जास्त करतात, असे आढळून आले आहे. तथापि जेथून परके लोक आले आहेत, तेथील संस्कृतिमूल्ये कशी आहेत अथवा कायद्यांबद्दल आदर कसा आहे व नवीन ठिकाणी ही परिस्थिती कशी आहे आणि या दोन परिस्थितींत विरोध आहे की संवाद आहे, हे पाहणे महत्त्वाचे असते. विरोध असेल, तर गुन्हेगारी संभवते. मात्र वंश, जात, वर्ण, देश यांवर गुन्हेगारी अवलंबून नसून समाजातील शक्तींची क्रिया व प्रतिक्रिया, संवाद व विसंवाद, विरोध व विकास यांवर गुन्हेगारी अवलंबून आहे. गुन्हेगारी जीवनाशी अथवा बिगर गुन्हेगारी जीवनाशी संपर्क येणे, हीदेखील एक महत्त्वाची बाब आहे.

गुन्हेगारी व पर्यावरण

गुन्हेगारीला काही क्षेत्रे अनुकूल असतात, असे दिसते. खेड्यांपेक्षा शहरांत व औद्योगिक वस्तीत, तसेच श्रीमंत वस्तीपेक्षा गरीब अथवा गलिच्छ वस्तीत गुन्हे जास्त होतात. स्पर्धा, स्वार्थ व आर्थिक संघर्षाचा हा परिणाम होय. तथापि अमेरिकेत जबरी संभोगाच्या गुन्ह्याचे जे प्रमाण शहरांत आढळते, तेच खेड्यांतही आहे. मात्र तेथील खेड्यांत खुनांचे प्रमाण जास्त आहे, तर शहरांत चोरीदरोड्याचे प्रमाण जास्त आहे. तरीही अमेरिकेत दळणवळण व यांत्रिकीकरण या बाबतींत शहरे व खेडी यांत फारसा फरक नाही, ही वस्तुस्थिती महत्त्वाची आहे. शिकागोसारख्या ठिकाणी गुन्हेगारी संघटित झाली आहे. दरोडेखोरी, खून वगैरेंचे बाळकडू मिळालेली माणसे टोळीत राहून जीवन व्यतीत करीत आहेत. जीव आणि मत्ता यांबद्दल कदर नसलेली माणसे कायद्याला कस्पटासमान मानून धाडशी जीवन जगत आहेत. अशा ठिकाणी पालक-शिक्षक संस्था, चर्च अगर इतर धार्मिक संस्था किंवा सहकारी जीवनाचा आदर्श पाळणाऱ्या संस्था हतबल झाल्या आहेत आणि अशीच क्षेत्रे गुन्हेगारीला पोषक असतात. अशा क्षेत्रांत बाहेरचे गुन्हेगार आपल्या फायद्याकरिता घुसतात आणि संपर्काने नवीन गुन्हेगार तयार होतात. रोगाप्रमाणेच गुन्हेगारीही संसर्गजन्य आहे. टोळीमध्ये ज्यांना प्रवेश मिळाला, त्यांपैकी प्रत्येकास आपण शूर आहोत, हे दाखविण्यासाठी गुन्हा करावा लागतो. गुन्ह्यातून आर्थिक फायदा घेण्यासाठी संघटक लहान मुलांना गुन्हा करण्याचे शिक्षण देऊन त्यांच्या टोळ्या बनवितात आणि त्यांत नवीन सभासदांची भर पडत जाते.घरातील वातावरणाचा आणि गुन्हेगारीचा, विशेषतः बालगुन्हेगारीचा, फार संबंध आहे. प्राचीन जमातींत जीवन साधे होते. आजचे जीवन फार गुंतागुंतीचे झाले आहे. ज्या कुटुंबात काही घटक गुन्हेगार आहेत अथवा मातापित्यांपैकी एकाचा अभाव आहे किंवा अज्ञान अथवा आजारपणामुळे मातापित्यांची देखरेख नाही अथवा आर्थिक कारणांनी किंवा पक्षपात, मत्सर वगैरेंमुळे वातावरण रोगट व विसंवादी आहे, त्या कुटुंबात गुन्हेगारीला पोषक अशी प्रवृत्ती निर्माण होते.

गुन्हेगारी व सामाजिक प्रभाव केंद्रे

गुन्हेगारी व सामाजिक प्रभाव केंद्रे यांचा संबंध पहाणे उद्‌बोधक आहे. कुटुंब, आर्थिक व्यवहार, राजसत्ता, शिक्षण व धर्म ही सामान्यतः सामाजिक प्रभाव केंद्रे मानण्यात येतात. पैकी कुटुंबाचे महत्त्व आपण वर पाहिले आहे. आर्थिक परिस्थितीच्या दबावांमुळे गुन्हेगारी संभवते, याचाही उल्लेख आलेला आहे. जितका आर्थिक दर्जा खालावलेला, तितका गुन्हेगारीला वाव जास्त, असे आढळून आले आहे. शिवाय आर्थिक जगात फसवेगिरी व स्वार्थमूलक गुन्हे नेहमीच उद्‌भवतात. म्हणजे सगळ्या आर्थिक स्तरांत गुन्हे हे आहेतच; त्यांचे प्रकार व जाती निरनिराळ्या असतील. गरज, लोभ आणि महत्त्वाकांक्षा या तीन बाबी सर्व स्तरांत गुन्हेगारीची उगमस्थाने बनतातराजेशाही, लोकशाही, हुकूमशाही, साम्यवादी वगैरे राजसत्तेचे प्रकार आहेत. राजसत्तेने घालून दिलेले नियम तोडणे ही गुन्हेगारी होय. राजकारणातील संघर्ष, तत्त्वप्रणालींचा संघर्ष यांमुळे कायदेभंगाची परिस्थिती उद्‌भवते. शिवाय राजकारणात पक्षपात, भ्रष्टाचार वगैरेंमुळे गुन्हेगारी फोफावते. मते गोळा करण्यासाठी, सत्ता काबीज करण्यासाठी अनेक गैरव्यवहार केले जातात. कायद्याची कडक अंमलबजावणी होऊ नये, अशी व्यवस्था केली जाते. विशिष्ट वर्गावर अन्याय घडतो व त्यामुळे असा दुखावलेला वर्ग संघर्ष सुरू करतो, राजकारण ही सेवा नसून धंदा होऊन बसतो.धार्मिक संस्था ज्या वेळी नैतिक मूल्ये समाजमनावर ठसवून कायदेशीर वर्तनास अनुकूल वातावरण तयार करतात, त्या वेळी गुन्हेगारीची वाढ खुंटते. अमुकच धर्माचे लोक जास्त अथवा कमी गुन्हे करतात, असा नियम नाही. त्याचप्रमाणे चर्चमध्ये अगर देवळात न जाणारे लोक अधिक प्रमाणात गुन्हेगार असतात, असेही नाही, तथापि धर्म आणि अंधश्रद्धा या कारणांवरूनही जगात प्राचीन काळापासून अनेक गुन्हे घडलेले आहेत.शिक्षणसंस्थांनी कुटुंबसंस्थेप्रमाणे सामाजिक वातावरण विशुद्ध राखण्याचा व मुलांवर नैतिक मूल्ये ठसविण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हेगारीला आळा बसू शकतो.

गुन्हेगारांमध्ये निरक्षर आहेत, तसेच साक्षरही आहेत. तथापि अमेरिकेत गुन्हेगारांत कमी शिक्षित अथवा निरक्षरांचा भरणा जास्त आहे आणि सर्वत्र सामान्यतः हीच स्थिती आढळेल; पण याचा अर्थ निरक्षरतेमुळे गुन्हेगारी निपजते, असा नव्हे. ज्या खालावलेल्या आर्थिक स्थितीमुळे अशी वर्तणूक निर्माण होते, त्या स्थितीत शिक्षण घेण्याची संधीही अप्राप्य असते.युद्धजन्य परिस्थितीत गुन्हेगारी वाढते, असे दिसून आले आहे. या परिस्थितीचा आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दूरगामी परिणाम होतो. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत जर्मनी, ऑस्ट्रिया व अमेरिका या देशांत स्त्रियांत गुन्हेगारी वाढली. बांगला देश लढाईतही असाच अनुभव आला. युद्धकाळात नवीन कायदे अमलात येतात व त्यामुळे अनभिज्ञ अथवा संत्रस्त लोकांकडून कायदेभंग घडत असतो. काही वृत्तपत्रे, पुस्तके, चित्रपट यांच्यामुळे गुन्हेगारी वाढते, असे काहींचे म्हणणे आहे. तथापि मूलतः ही साधने शिक्षणप्रसाराची आहेत. पण त्यांतील गुन्ह्याच्या आगर गुन्हेगारी जीवनाच्या भडक अथवा उत्तेजक वर्णनाच्या दृश्यांचा संस्कारक्षम मनावर वाईट परिणाम होतो. यास्तव त्यांवर नियंत्रण ठेवणे इष्ट असते; परंतु अशा नियंत्रणाच्या पद्धतीबद्दल वादग्रस्तता आढळते.

गुन्हेगारांचे प्रकार व त्यांचे जीवन

गुन्हेगारी जीवन कसे असते, याविषयी खूपसे संशोधन झालेले आहे. गुन्हेगार पहिला गुन्हा केल्यानंतर हळूहळू निर्ढावत जातो. ही क्रिया केव्हा पूर्ण होईल, हे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर आणि गुन्ह्याच्या प्रकारावर अवलंबून आहे. ज्या गुन्हेगाराने लहानपणीच हिंसात्मक गुन्ह्यांना सुरुवात केली आहे, तो एकोणिसाव्या वर्षी निर्ढावतो. पैशांची अफरातफर करणारा गुन्हेगार पहिल्याने लहान रकमांनी सुरुवात करतो. नंतर त्याचा आत्मविश्वास वाढतो व शेवटी समाजच अन्यायी आहे, असे मानून आपल्या कृत्याचे स्वतःशी समर्थन करतो. पुष्कळ वेळा बेकायदेशीरपणाने पैसे वापरले, तरी आपण ते योग्य वेळी भरून टाकू, अशा खोट्या विश्वासाने गुन्हे घडतात. असे गुन्हेगार आत्मवंचनाच करतात. नंतर ते पैसे फेडण्यासाठी जुगाराकडे वळतात. त्यांपैकी काही तर पुष्कळदा आत्महत्या करतात. गुन्हेगारांमध्ये जोपर्यंत स्वतःची सुधारणा करण्याची सुप्त इच्छा असते, तोपर्यंत जर त्याची सुधारणा झाली, तर तो चांगल्या मार्गाला लागू शकतो. गुन्हेगारास पकडल्यावर, तो तुरुंगात असताना अथवा सुटून आल्यावर त्याच्याकडे पाहण्याचा समाजाचा विशिष्ट दृष्टीकोण असतो. काही अंशी अशी व्यक्ती तिरस्कृत अथवा बहिष्कृत असते. त्यामुळे गुन्हेगाराचे पुनर्वसन होणे कठीण बनते.गुन्हेगारांचे स्वतःचे असे एक जग असते. इंग्रजीत त्याला ‘अंडरवर्ल्ड’ म्हणतात. या जगात गुन्हेगार परस्परांशी भ्रातृभावाने वागतात.

गुन्हेगारांस ज्यापासून धोका नाही, असे इसम यांत समाविष्ट होतात. गुन्ह्याची योजना, यशस्वी अंमलबजावणी, पकडल्यानंतर बचाव वगैरे बाबींची तरतूद या जगात केली जाते. एक टोळी अथवा निरनिराळ्या टोळ्या, त्यांचे प्रमुख व उपप्रमुख, त्यांच्या हाताखालील कार्यकुशल संघटना इ. या गुन्हेगारी जगात कार्य करीत असतात. गुन्ह्याने मिळविलेला पैसा अधिक गुन्हे करण्यासाठी खर्च केला जातो. अशा काही टोळ्यांचा संबंध राजकारणी अथवा व्यापारी व्यक्तींशी असतो व त्यांच्याकडून गुन्हेगारांना मदत अथवा संरक्षण मिळते.पोलीस व गुन्हेगार या दोघांची एकमेकांविरुद्ध कायमची स्पर्धा असते. शास्त्रीय प्रगती व शोध यांचा उपयोग गुन्हेगार गुन्हे करण्यात आणि पोलीस गुन्हेगार पकडण्यात करीत असतात. गुन्ह्यामध्येही अलीकडे फॅशन येत चालली आहे. काही जुने गुन्हे म्हणजे ठगी, लूटालूट इ. आता नष्ट झाले आहेत. नवीन चालीरीती, नवीन प्रथा, नवीन आर्थिक व्यवस्था, नवीन सामाजिक संस्था यांमुळे गुन्ह्यांचे नवीन प्रकार प्रचारात येत चालले आहेत. पूर्वी ज्याप्रमाणे गुन्हेगार संघटना करून राहत, त्याप्रमाणे आताही राहतात. विशिष्ट गट तयार करणे, नेत्यांची निवड करणे, कायद्याबद्दल बेदरकारी बाळगणे, जुगार खेळणे, वेश्या व दारू यांचा पद्धतशीर व्यापार करणे, निरनिराळ्या टोळ्यांशी करार करणे, पोलीस आणि राजकारणी व्यक्तींकडे संधान बांधणे वगैरे प्रकार संघटितपणे केले जातात. लाचलुचपत आणि भ्रष्टाचार यांमुळे कायदा व न्यायसंस्था पुष्कळ वेळा निष्प्रभ होतात आणि संघटीत गुन्हेगारीला वाव मिळतो. तुरुंगात गेल्यावरही गुन्हेगार लाच देऊन आपले जीवन सुसह्य करू शकतो. पकडल्यावर जामीन देणे, वकील नेमणे वगैरे बचावाची व्यवस्था आगाऊ केलेली असते. पंच अथवा इतर फिर्यादी वा साक्षीदार फोडणे, खोट्या साक्षी देणारे साक्षीदार तयार ठेवणे, धंदेवाईक जामीनदार तयार ठेवणे इ. बाबी संघटितपणे पार पाडल्या जातात.सराईत अगर धंदेवाईक गुन्हेगार तेच तेच गुन्हे पुनःपुन्हा करून पटाईत होतात. तिजोरी फोडणे, खिसे कापणे, खोटे दस्तऐवज तयार करणे, वगैरेंचे तंत्र ते शिकतात. लहान मुलांना लहानपणापासून गुन्हेगारीच्या तंत्रात प्रवीण केले जाते. फसवणुकीच्या निरनिराळ्या क्लृप्त्या योजण्यात येतात. स्त्रियांमध्ये वेश्याव्यवसाय करून तरूण मुलींना फसवून पळविणे, वाईट मार्गाला लावणे, विकणे इ. गुन्हे आढळतात.

विषप्रयोग करून मारणे, खोट्या सह्या करणे, गृहकलह निर्माण करणे याही गुन्ह्यांमध्ये स्त्रिया असतात. गुन्हेगारांमध्येही एक प्रकारचा प्रामाणिकपणा आढळतो. मिळालेल्या वित्ताची योग्य वाटणी करणे व दुसऱ्या कोणाही गुन्हेगाराची पोलिसांनी बातमी न देणे यांसारख्या गोष्टी गुन्हेगार कसोशीने पाळतात. गुन्हेगार कसे वागतात, हे पाहणे उद्‌बोधक असते. गुन्हेगाराच्या वागणुकीत संघभावनेचा प्रभाव असतो. गुन्हेगारांमधील संकेत, संप्रदाय, रूढी, भ्रातृभाव वगैरेंना धरून त्यांची वागणूक असते. विशेषतः एकाच प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांमध्ये एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण होतो. सर्व प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांमध्ये कायद्याबद्दल अथवा पोलिसांबद्दल द्वेष किंवा तिरस्कार हा सामान्य घटक असतो. दुकानातून वस्तू लंपास करणारे अथवा खिसेकापू लोक तंत्रज्ञ असतात. इतर चोरांकडे ते कनिष्ठ या नात्याने बघतात. गुन्हेगारांच्या सामूहिक जीवनात त्यांची विशिष्ट भाषा आणि संकेत रूढ असतात. हे प्रकार पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेले असतात. धंदेवाईक चोरी हा गुन्हेगारीचा विशिष्ट प्रकार यामुळेच संशोधनाचा विषय झाला आहे.

गुन्हेगारांचा प्रतिबंध, शिक्षा, उपचार आणि पुनर्वसन

गुन्ह्यांचा प्रतिबंध करणाऱ्या समाजातील तीन संस्था म्हणजे पोलीस, न्यायालय व तुरुंग, या होत. काही समाजांत गुन्हेगारांना शिक्षा करण्यावर भर दिलेला असतो, तर काहींत त्यांची सुधारणा करण्यावर भर दिलेला असतो. प्राचीन जमातींत तीन प्रकारच्या गुन्ह्यांना तीन तऱ्हेच्या शिक्षा होत्या. जमातद्रोह, चेटूक, देवदेवतांचा अपमान आणि विषप्रयोग यांसारखे गुन्हे करणाऱ्या इसमास देहान्ताने अगर निर्वसनाने नष्ट करण्यात येई. त्याला शत्रू समजण्यात येई. दुसरा गुन्हा म्हणजे एका कुटुंबातील अगर जमातीतील इसमाने दुसऱ्या कुटुंबातील वा जमातीतील इसमावर केलेला हल्ला. उभयपक्षी मुख्य इसम व त्यांचे नातेवाईक यांमधील ही बाब आहे, असे समजण्यात येई. ‘खूनास खून’, ‘दातास दात’ अशी शिक्षा असे. या प्रकारात सूड, बदला अगर नुकसानभरपाई ही शिक्षेची कल्पना असे. तिसरा गुन्हा म्हणजे एकाच कुटुंबातील माणसांनी एकमेंकावर केलेले हल्ले. अशा वेळी त्या गुन्हेगारास तिरस्कार व हेटाळणी ही शिक्षा मिळे.

राजसत्तेचा उगम झाल्यावर गुन्हेगाराची शिक्षा ही सरकारी बाब झाली. गुन्हेगारास पीडा देण्याच्या पाठीमागे विशिष्ट उद्देश असला पाहिजे, हा सामाजिक दृष्टिकोण अलीकडच्या काळातील आहे.या दंडशास्त्रात तीन संप्रदाय निर्माण झाले. जुन्या संप्रदायानुसार माणूस सुखदुःखाची कल्पना आधीच बाळगून गुन्हा करतो. म्हणून गुन्ह्याच्या सुखापेक्षा शिक्षेचे दुःख जास्त आहे, याची जाणीव त्यास करून दिली पाहिजे. यासाठी कोणत्या गुन्ह्यास काय शिक्षा आहे, हे त्यास निश्चितपणे व अगोदर समजले पाहिजे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी दुसरा संप्रदाय निघाला. मुले, वेडे वगैरे लोकांना सुखदुःखांची कल्पना नसते. तरी गुन्हेगाराचा वैयक्तिक इतिहास व जबाबदारी लक्षात घेऊन त्यास शिक्षा केली पाहिजे. शिक्षेला अपवाद असू शकतात, असे ह्या संप्रदायाचे प्रतिपादन आहे. तिसऱ्या संप्रदायानुसार आग, पूर यांसारखीच गुन्हा ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. त्यासाठी गुन्हेगार एक तर नष्ट झाला पाहिजे अथवा तो सुधारला पाहिजे. या तिसऱ्या संप्रदायाचे दोन उपसंप्रदाय निर्माण झाले. गुन्हा घडणे ही एक वैयक्तिक समस्या आहे व त्याप्रमाणे त्यावर उपचार झाले पाहिजेत, अशी एकाची कल्पना; तर गुन्हा ही एक इतर घटकांशी निगडीत अशी समस्या आहे आणि त्या दृष्टीने सामाजिक परिस्थितीवर उपचार झाले पाहिजेत, ही दुसऱ्याची कल्पना.शिक्षेचे निरनिराळ्या काळी निरनिराळे प्रकार होते. उदा., मृत्युदंड, शारीरिक छळ, सामाजिक हीनपणा, हद्दपारी, कारावास, आर्थिक दंड व परतफेड इत्यादी. या वर्गीकरणात सर्व प्रकारच्या शिक्षांचा समावेश होऊ शकतो.सुळी देणे, पाण्यात बुडविणे, कडेलोट करणे, भिंतीत चिणणे, जाळणे, हत्तीच्या पायी देणे, चक्रावर हाडे मोडणे, लोखंडी पेटीत घालणे, शिरच्छेद करणे यांसारख्या निरनिराळ्या तऱ्हेने मृत्युदंड देण्यात येई.

पूर्वी निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या गुन्ह्यांना देहान्त शिक्षा होती. काळाच्या ओघात पुष्कळ गुन्हे कमी झाले. सर्वसाधारणपणे खून व राजद्रोहासाठी देहान्त शिक्षा दिली जाते. मृत्युदंड असावा, असे म्हणणारा विचारवंतांचा एक वर्ग आहे; त्याचप्रमाणे तो नसावा, असे म्हणणारेही पुष्कळ विचारवंत आहेत. पुष्कळ राष्ट्रांनी ही शिक्षा रद्द केली आहे व ही शिक्षा नसावी या मताकडे आधुनिक समाज जास्त झुकत आहे.शारीरिक छळाचेही प्रकार सध्या बहुतेक बंद झाले आहेत. कुठे कुठे फटके मारण्याची शिक्षा अमलात आहे; पण तीही रद्द करण्याकडे कल आहे. कारागृहात काम करून घेण्यात येते, हा एवढाच काय तो पीडेचा प्रकार शिल्लक राहिला आहे. मानहानीची शिक्षा म्हणजे पूर्वी गुन्हेगाराची गाढवावरून धिंड काढण्यात येत असे; पण हा प्रकार आता मान्य नाही. शिक्षा झाली तर फक्त नोकरी जाते, अधिकाराची जागा जाते, काही राजकीय हक्क नष्ट होतात व लोकनियुक्त मंडळाचे सभासदत्व जाते. या किंवा इतर प्रकारची मानहानी शिक्षा झाल्याचा परिणाम म्हणून सहन करावी लागते.पूर्वी आपल्या देशांतून गुन्हेगारास शिक्षा म्हणून हद्दपार व्हावे लागे. इंग्रज कैदी अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियात हद्दपार केले जात असत; पण १८६७ नंतर ही प्रथा बंद झाली. पोर्तुगाल आपले कैदी पूर्वी ब्राझीलला पाठवीत असे; पण नंतर अंगोला, मोझँबीक वगैरे ठिकाणी पाठवू लागला.आर्थिक दंड हा शिक्षेचा प्रकार बहुतेक सर्व ठिकाणी चालू आहे. दुखावलेल्या इसमास नुकसानीनिमित्त भरपाई देणे आणि राजसत्तेस चौकशीनिमित्त भरपाई देणे, अशा दोन कल्पना पूर्वी या दंडापाठीमागे होत्या. हळूहळू राजसत्तेस भरपाई देणे ही कल्पना बळावत गेली. हे राजसत्तेला देणे आहे आणि ते न दिल्यास कारावास ही शिक्षा ठरविण्यात आली.कारावास हा शिक्षेचा प्रकार फार प्राचीन काळापासून चालू आहे.

पाश्चिमात्य देशांत चर्चसुद्धा ही शिक्षा ठोठावीत असे. पूर्वी तुरुंगातील जीवन अतिशय भयप्रद असे. ते सुधारण्याच्या दृष्टीने इंग्लंडमध्ये १६१८ साली प्रयत्न झाले. जॉफ्रे मिशाल व जॉन हॉवर्ड यांनी या कामी पुष्कळ परिश्रम घेतले. भारतात १८३६ पासून तुरुंग सुधारण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. आज कैद्यांना पूर्ण जरी नाही, तरी बऱ्याच सुखसोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कैद्यांना माणुसकीच्या दृष्टीने वागविण्यात यावे, ही विचारसरणी आज साधारणतः सर्व देशांत दिसून येते. तुरुंगातील व्यवस्था व लोकांचा दृष्टिकोण पाहून कैद्यास वाटते, की आपणास समाजाचा शत्रू म्हणून वागविले जाते. तोही त्यामुळे शत्रू बनतो. हे वातावरण बदलण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. एकंदर नैतिक वातावरणच फार कमी प्रतीचे असते. शिक्षणासाठी व व्यवसायार्जनासाठी सोय, नैतिक शिक्षण, करमणुका, वाचनालये व आखाडे, योग्य वैद्यकीय तपासणी, मुदतीवर सुटका वगैरे अनेक बाबींनी तुरुंगांची सुधारणा होत आहे. १९३६ पासून तुरुंग सुधारणेकडे भारत सरकारही लक्ष देऊ लागले आहे. गुन्ह्याचा आरोप होऊन चौकशीनंतर जो कैदी सुटला आहे, त्याची नुकसानभरपाई राजसत्तेने केली पाहिजे. यूरोपमध्ये काही देशांत ही पद्धत आहे. याशिवाय गुन्हेगारांकडून मालकास व दुखावलेल्यास चोरलेली वस्तू परत देण्याचा अथवा नुकसानभरपाई वगैरे देण्याचा जो हुकूम होतो, त्यातही शिक्षेपेक्षा सुधारणेचा हेतू जास्त असतो.गुन्हेगारास शिक्षा देण्यामागे प्रायश्चित देणे, दहशत बसविणे, सूड घेणे, गुन्हेगारांत सुधारणा घडवून आणणे, राजसत्तेस आर्थिक फायदा लाभवून देणे अथवा सामाजिक संबंधांचे दृढीकरण इ. निरनिराळे हेतू असतात.

ख्रिस्तपूर्व काळातील हामुराबीच्या संहितेत शिक्षेचा सूड हा एक हेतू नमूद केलेला आढळतो. बेकारिआच्या विचारप्रणालीत माणूस सुखदुःखाचा विचार करून गुन्हा करतो हे गृहित धरल्यामुळे, दहशत हा प्रधान हेतू मानला आहे. शिक्षा भोगत असता गुन्हेगारास, गुन्हा पुन्हा करू नये, अशी उपरती होते; म्हणजे सुधारणा हासुद्धा शिक्षेचा एक हेतू मानावा लागतो. गुन्हेगार सर्वांचा शत्रू आहे या दृष्टीने समाज त्याचा तिरस्कार करतो; त्यामुळे समाजाची एकात्मता दृढ होते.मृत्युदंड ही शिक्षा दहशत बसविणारी, कारावासापेक्षा कमी खर्चाची व लोकांना स्वतःच गुन्हेगारास ठार मारण्यापासून परावृत्त करणारी आहे. या सर्व कारणांमुळे ती योग्य होय, असे एक मत आहे. ही शिक्षा कारावासापेक्षा जास्त दहशत उत्पन्न करणारी नाही; ही रद्द झाली तर लोक गुन्हेगारास ठार करीत नाहीत, तीत मानवी जीवनाचा अनादर आहे आणि चूक सुधारण्यास गुन्हेगारास वाव नाही, असे दुसरे मत आहे. मृत्युदंड रद्द केल्यानंतर खुनांचे प्रमाण वाढलेले नाही, असे आढळून आले आहे. देहान्त शिक्षा देण्यास पुष्कळ न्यायाधीश नाखुष असतात. ही शिक्षा कमी खर्चाची आहे हे पुराव्याने सिद्ध झाले नाही. मृत्युदंड योग्य व सयुक्तिक असेल, तर इतरही अनेक गुन्ह्यांना तो द्यावा लागेल. मृत्युंदड नसावा याकडेच लोकमत अधिक झुकत आहे.समाजात विचार व मूल्ये जसजशी बदलत गेली, तसतसे शिक्षेचे हेतू व प्रकार बदलले गेले.

समाजाच्या सुप्त आक्रमक भावना गुन्हेगारांस शिक्षा दिल्यानंतर उदात्त होतात, असे एक मत आहे. सामाजिक, आर्थिक, औद्योगिक परिवर्तनांचाही शिक्षेच्या प्रकारावर परिणाम घडून, त्यात बदल होत गेले.गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार पोलिसांच्या संपर्कात येतो. पोलीसयंत्रणा जर प्रामाणिक, कार्यक्षम, गुन्हेगारी समस्या नीटपणे समजू शकणारी असेल, तर गुन्हेगार सुधारण्याची आशा असते. नाहीतर पोलीस व समाज या दोहोंचा गुन्हेगार कट्टा शत्रू बनतो. कायद्याबद्दल कदर व आदर निर्माण होणे, हे साधारणतः पोलिसांच्या वागणुकीवर अवलंबून असते. पोलीसयंत्रणा हे राजसत्तेचे प्रमुख अंग आहे. पोलीसयंत्रणा प्रामाणिक, कार्यक्षम व लोकप्रिय असणे आवश्यक आहे.गुन्हेगारास अटक झाल्यानंतर पोलिसांनी त्यास चोवीस तासांच्या आत कोर्टापुढे आणले पाहिजे. जामीनयोग्य गुन्हा असेल, तर त्यास जामीन मिळतो. देहान्त शासनयोग्य गुन्ह्यांना जामीन मिळत नाही. अशी एखादी गुन्हेगार स्त्री, सोळा वर्षांखालील मुलेमुली अथवा आजारी इसम असेल, तर कायद्यात जामीन मिळण्याची तरतूद आहे. गुन्हा शाबीत होईपर्यंत आरोपी निर्दोषी समजला पाहिजे, हा दंडक भारताप्रमाणे काही देशांत आहे.गुन्ह्याची चौकशी ही फौजदारी न्यायालयात होते. गुन्हा शाबीत झाल्यास आरोपीस शिक्षा होते किंवा विशिष्ट प्रसंगी त्यास तुरुंगात न पाठविता चांगल्या वर्तणुकीबद्दल जामीन घेऊन मोकळे सोडतात. फौजदारी न्यायालयाचे वर्ग आणि घटना व अधिकार निरनिराळ्या देशांत निरनिराळे आहेत. साधारणतः प्रथम न्यायालयात चौकशी, नंतर अपील न्यायालय व त्यानंतर शेवटचे म्हणजे उच्चतम न्यायालय अशी व्यवस्था असते. पूर्वी बालगुन्हेगारांची चौकशी इतर गुन्हेगारांबरोबरच होत असे.

बालगुन्हेगारांना शिक्षेऐवजी संरक्षणाची गरज आहे, ही कल्पना एकोणिसाव्या शतकात पुढे आली. शिक्षेऐवजी उपचार हे तंत्र, किचकट कायदेतंत्राचा कमी वापर, अनौपचारिक वातावरण, मुलांसंबंधी पूर्वेतिहास समजण्यासाठी अधिकाऱ्यांची योजना व कायदे आणि समाजशास्त्र या दोहोंची माहिती असलेल्या न्यायाधीशांची निवड, तुरुंगात न पाठविता हस्तव्यवसाय वगैरे शिकविणाऱ्या संस्थांत बालगुन्हेगारांची रवानगी वगैरे अनेक उपयुक्त योजना सध्या ठिकठिकाणी अंमलात आहेत.गुन्हेगारास शिक्षा न देता समाजाने त्याला संरक्षण व सुधारण्याची संधी दिली पाहिजे. यासाठी गुन्हा शाबीत झाला, तरीही काही प्रकरणी गुन्हेगारास चांगल्या वर्तणुकीच्या शर्तीवर मोकळे सोडण्याची, तसेच प्रसंग विशेषी गुन्हेगारांस नुसती ताकीद अथवा समज देऊन सोडण्याची तरतदू कायद्यात आहे. साधारणपणे अशा गुन्हेगारास पूर्वी शिक्षा झालेली नसावी. गुन्हेगाराचे वय, परिस्थिती, पूर्वेतिहास, शारीरिक व मानसिक परिस्थिती, गुन्ह्याचे स्वरूप व इतर गोष्टी लक्षात घेतल्या जातात. परिवीक्षा अधिकाऱ्याचे निवेदन ध्यानात घेतले जाते. चांगल्या वर्तणुकीबद्दल जामीन घेतले जातात व त्यास विशिष्ट मुदत असते. या मुदतीत शर्तीचा भंग झाल्यास मूळ गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगण्यास गुन्हेगार पात्र होतो. गुन्हेगारास केव्हाकेव्हा काही अवधीपर्यंत परिवीक्षा अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली रहावे लागते. काही ठिकाणी गुन्हा शाबीत झाल्यावर शिक्षा देण्याचे स्थगित करतात; अथवा शिक्षा सांगून तिची अंमलबजावणी स्थगित ठेवतात. हे सर्व चांगल्या वर्तणुकीच्या शर्तीवर असते. चांगल्या वर्तणुकीची मुदत १ ते ३ वर्षांपर्यंत असते. परिवीक्षा अधिकारी नेमल्याने वा फक्त त्यांच्या कार्यानेच गुन्हेगारीचे उच्चाटन होणार नाही.

समाजातील निरनिराळ्या पातळींवर हे काम हाती घेतले पाहिजे.गुन्हेगार हे आजारी इसमासारखे असतात म्हणून त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत, हे मतसुद्धा बळावत आहे. शिक्षा ही कल्पना जाऊन उपचार ही कल्पना दृढ होत आहे. गुन्हेगारास शिक्षेची खरोखर भीती नसते; पण आपल्या लोकांत आपण हीन गणले जाऊ हीच भीती असते. अशा वेळी शिक्षेची गरज नाही. शिक्षेमुळे गुन्हेगारास आपण एकाकी पडल्याची भावना होते. तो समाजाचा शत्रू बनतो. यामुळेही तो इतर गुन्हेगारांत सहानुभूती शोधतो अथवा मनोविकृतीला बळी पडतो. गुन्हेगाराचे समाजात पुनर्वसन होणे इष्ट असेल, तर त्याला एकाकी पडल्याची भावना होणे घातक आहे. शिक्षेमुळे गुन्हेगारात जे इतर दृष्टिकोण उत्पन्न होतात, ते धोकादायक असतात. गुन्हेगार ही व्यक्ती आहे, म्हणून ज्याप्रमाणे वैयक्तिक उपचार केले पाहिजेत; त्याचप्रमाणे तो गुन्हेगारी समुदायाचा घटक आहे हे समजूनही उपचार केले पाहिजेत. त्याचा गुन्हेगारांशी संपर्क तुटेल व कायदा व नीतीची कदर करण्यास तो प्रवृत्त होईल, अशी योजना केली पाहिजे.एकंदरीत आढावा घेता शिक्षेच्या दहशतीने अथवा सुधारणेच्या उपचाराने गुन्हेगारी कमी होत नाही, असे दिसून आले आहे. त्यासाठी गुन्हेगार ही एकाकी व्यक्ती म्हणून लक्षात न घेता ज्या समूहात तो वावरतो, त्या समूहाची सुधारणा झाली पाहिजे.

संदर्भ : 1. Barnes, H. E.; Teeters, N. K. New Horizons of Criminology, New York, 1959.

2. Ferri, E.; Trans. Kelley, J. I.; Lisle, Joh, Criminal Sociology, Boston, 1917.

3. Garofalo, R.; Trans. Millar, R. W. Criminology, Boston, 1914.

4. Radinowicz, Leon. In Search of Criminology, London, 1961.

5. Rusche, G.; Kirchheimer, Otto, Punishment and Social Structure, New York, 1939.

6. Sethana, M. G. Society and the Criminal, Bombay, 1971.

7. Sutherland, E. H.; Cressey, D. R. Principles of Criminology, New York, 1960.

8. Reckless, Walter, Crime Problem, New York, 1955.

9. Reckless, Walter, Criminal Behaviour, New York, 1940.

Related Posts

CAA Act

MHGR| News Update| CAA कायदा काय म्हणतो?

CAA Act

LGBTQ

MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

LGBTQ+

ISM office V6

MHGR| ISM office V6 software download for Windows 10

ISM office V6

What is a Domicile Certificate in Marathi

What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी स्थितीचे प्रमाणीकरण करते….

MHGR| महाराष्ट्र शासनाचा करार सूचीबद्ध आयटी कंपनी | Job Vacancy in Aksentt Tech in Mumbai

Government of Maharashtra Contract Listed Company: Aksentt Tech ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदाता आहे जी मोबाईल आणि फिक्स्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क दोन्हीसाठी पायाभूत सुविधा रोलआउट सोल्यूशन्स ऑफर करते. सेवा…

MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य

आता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार मोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *