खोटी बतावणी. हा एक कपटाचा किंवा फसवेगिरीचा प्रकार आहे. अशा प्रकारात एखाद्या व्यक्तीकडून स्वतःच्या वर्तनाने अथवा शब्दाने आपण दुसरेच कोणी इसम आहोत असे भासवून किंवा वस्तुतः स्वतः नसलेल्या स्थानावर असल्याचे भासवून इतरांची फसवणूक करण्यात येते. जी व्यक्ती फसविली गेली असेल किंवा ज्या व्यक्तीस त्रास झाला असेल किंवा नुकसान पोहोचले असेल ती व्यक्ती अशी फसवणूक करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर उपाययोजना करू शकते. नुसती तोतयेगिरी गुन्हा नाही; पण आर्थिक किंवा इतर फायद्याकरिता तोतयेगिरी करणे मात्र गुन्हा आहे. कारण त्याच्या मुळाशी इतरांचा बुद्धिभेद करून स्वतःचा स्वार्थ साधण्याकरिता फसविण्याचा उद्देश असतो. ज्या व्यक्तीबद्दल अशी तोतयेगिरी केली असेल ती व्यक्ती जिवंत, मृत किंवा काल्पनिक असली, तरी गांभीर्य कमी न होता ती कृती गुन्ह्यातच मोडते. नामसादृश्यामुळे किंवा चेहऱ्याच्या सारखेपणामुळे असे गुन्हे अधिक संभवतात. साधारणतः याच कारणामुळे पानिपतच्या युद्धानंतर (१७६१) भाऊसाहेब पेशवे व जनकोजी शिंदे यांचे तोतये निर्माण झाले होते. परीक्षेच्या वेळी किंवा मतदानाच्या वेळी साधारणतः असे गुन्हे होण्याची शक्यता असते. बँक व्यवहारातही तोतयेगिरीची शक्यता असते. लोकसेवक नसताना लोकसेवक आहोत म्हणून भासविणे, जिवंत अथवा मृत मतदाराच्या नावे किंवा काल्पनिक नावाने मतदानपत्रिका मागणे किंवा मतदान करणे, त्याचप्रमाणे आपण पती आहोत असा भ्रम निर्माण करून एखाद्या स्त्रीचा उपभोग घेणे हे काही गुन्हे तोतयेगिरीच्या प्रकारात मोडतात. तिसरा तोतयेगिरीचा प्रकार जबरी संभोग या गंभीर गुन्ह्यात मोडत असून त्यास कायद्याने आजन्म कारावासासारखी कडक शिक्षा ठेवली आहे.
तोतयेगिरी
Telegram Group
Join Now