अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्यामध्ये झालेला जगातील आंतरराष्ट्रीय व्यापारातील सर्वांत मोठ्या करारांपैकी एक करार. १० जून १९९० रोजी या तीन राष्ट्रांमध्ये मुक्त व्यापाराबाबत करार करण्यासाठी सहमती झाली. त्यानुसार ५ फेब्रुवारी १९९१ रोजी मुक्त व्यापार क्षेत्राबाबत वाटाघाटी सुरू झाल्या. १७ डिसेंबर १९९२ रोजी नाफ्ता करारावर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश, मेक्सिकोचे तत्कालीन अध्यक्ष कार्लोस गोर्तरी आणि कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान ब्रायन मुर्लोन या नेत्यांनी सह्या केल्या. पुढे ऑगस्ट १९९३ मध्ये या करारांतर्गत पर्यावरण व रोजगार यांचा समावेश करण्यात आला. हा करार १ जानेवारी १९९४ पासून अंमलात आला. या करारानुसार सदस्य राष्ट्रातील वस्तुंच्या निर्यातीवरील सर्व अडथळे दूर करण्यात आले. सदस्य राष्ट्रांदरम्यान होणाऱ्या वस्तुंच्या निर्यातीवरील सर्व कर या करारानुसार समाप्त करण्यात आले. या अंतर्गत मुद्राधिकार, एकस्व आणि व्यापारचिन्ह यांच्या सुरक्षिततेचे हक्कही कायम राहणार आहेत. प्रदूषण व पर्यावरणाच्या संदर्भात या करारामध्ये विचार करण्यात आला आहे.
उद्दिष्टे : उत्तर अमेरिकन मुक्त व्यापार कराराच्या उद्दिष्टांमध्ये
(१) सदस्य राष्ट्रातील कराराचे तत्त्व आणि कायदे सोयीचे व पारदर्शक राहतील. त्यानुसार
(अ) आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर करणे आणि नाफ्ताच्या सिमांतर्गत संबंधित राष्ट्रांच्या वस्तू आणि सेवा यांच्यातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे स्वागत करणे.
(ब) सदस्य राष्ट्रांच्या व्यापारासाठी सुलभ स्पर्धावाढीसाठी मुक्तव्यापार क्षेत्रात सोप्या व सरळ अटी ठेवणे. (क) गुंतवणुकीच्या संधीमध्ये वाढ करणे.
(ड) प्रत्येक क्षेत्राला योग्य आणि परिणामकारक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी आपापले बौद्धीक अधिकार देणे.
(इ) या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी परिणामकारक पद्धती अंमलात आणणे. यासाठी संयुक्त प्रशासन आणि लवादासंदर्भांतील नियम तयार करणे.
(ई) या कराराचे फायदे वृद्धींगत करण्यासाठी आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी या करारांतर्गत येणाऱ्या प्रदेशांमध्ये विविध सहकार्य वाढीसाठी नियम तयार करणे.
(२) या कराराला उद्दिष्टांनुसार जास्त प्रभावी करण्यासाठी सदस्य राष्ट्र आत्मपरिक्षण करून आवश्यक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये बदल करून घेतील इत्यादी समाविष्ट आहेत.
उत्तर अमेरिकन मुक्त व्यापार करारानुसार सर्व प्रकारचे आयात प्रशुल्क १५ वर्षांच्या आत समाप्त करण्यात आले. जगातील सर्वांत मोठ्या व्यापारक्षेत्रांपैकी एक असलेल्या या करारानुसार सुमारे ४४.५३ कोटी जनता यामध्ये समाविष्ट झाली आहे. या करारामुळे अमेरिका आणि मेक्सिको यांदरम्यान झालेले पूर्वीचे कृषीविषयक सर्व करार समाप्त करण्यात आले. सदस्य राष्ट्रातील सर्व राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय व्यापार प्रत्येक दिवशी सुमारे २.६ अरब डॉलर इतका आहे. या करारामुळे अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांचा वस्तू उत्पादनविषयक व्यापार तिप्पट झाला आहे.
वर्तमानात जगामध्ये अनेक मुक्त व्यापारक्षेत्रे निर्माण झाली आहेत. मुक्त व्यापार क्षेत्र विश्वबंधुत्वाच्या भावनेत वाढ, गरीबी दूर करणे, रोजगार निर्मिती, सांस्कृतिक देवाण-घेवाण, जीवनमानात वाढ अथवा राहणीमान सुधारणा यांशिवाय राजकीय स्तरावरील सुधारणांसाठी महत्त्वाचे ठरतात. मुक्त व्यापार क्षेत्रामध्ये कंपन्यांना मानवाधिकार आणि श्रमिक कायद्यांमध्ये सवलती मिळतात. त्यामुळे मुक्त व्यापार क्षेत्रांना मानवाधिकार संघटन, पर्यावरणवादी आणि श्रमिक संघटनांद्वारे नेहमीच विरोध केला जातो. या करारामुळे उपभोक्त्यांना स्वस्त किमतीत म्हणजे फायदेशीर वस्तू प्राप्त होऊन जीवनमानात सुधारणा होत आहे; मात्र काही वेळा गरीब देशांना मुक्त व्यापार क्षेत्रांमुळे हानीसुद्धा पोहचू शकते.
आसियान-ऑस्ट्रेलिया-न्युझीलंड मुक्त व्यापारक्षेत्र (एएएनझेडएफटीए), साऊथ एशियन मुक्त व्यापार क्षेत्र (साफ्ता), डोमिनिकन प्रजासत्ताक-मध्य अमेरिका मुक्त व्यापार करार (डीआर-कॅफ्टा), युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन (ईएफटीए), जी-३ मुक्त व्यापार करार, सीईएफटीए, कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स फ्री ट्रेड एरिया (सीसफाटा), पूर्व आणि दक्षिण अफ्रिका सामान्य बाजार, ईएफटीए, ग्रेटर अरब मुक्त व्यापार क्षेत्र (गॉफ्टा), सेफ्टा यांसारखे अनेक करार जगामध्ये झाले असून जागतिक व्यापारवृद्धीसाठी मुक्त व्यापार क्षेत्रामध्ये वाढ होत आहे.
नाफ्टाचे सचिवालय मेक्सिको नगर, वॉशिंग्टन डी. सी. व ओटावा येथे असून यामध्ये फ्रेंच, स्पॅनिश व इंग्रजी या तीन भाषा अधिकृत मानल्या गेल्या आहेत.
संदर्भ :
- जयप्रकाश, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, नई दिल्ली, १९९५.
- मिश्रा, जे. पी., अर्थशास्त्र, आग्रा, २००५.