रेडीओलॉजी वैद्यक शास्त्रातील महत्वाची शाखा आहे. रोगनिदान आणि उपचारासंबंधी ही शाखा कार्य करते. रेडीओलॉजीचा वापर शरीरातील अंतर्गत बाबीतील आजारांच्या रोगनिदानासाठी केला जातो. या शाखेत अनेक बाबी अंतर्भूत आहेत. उदा. एक्स रे, फ्लुरोस्कॉपी, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, अॅन्जीओग्राफी या सर्व माध्यमातून डॉक्टर रोगाचे निदान करत असतात आणि उपचाराची दिशा ठरवितात. रेडीओग्राफी शरीराचे संपूर्ण चित्र दाखवीत असते यामध्ये शरीराच्या पेशी, हाडे व शरीरातील इतर भाग सचित्र दिसतो त्यामुळे शरीराला झालेली इजा शोधून त्यावर उपचार करता येतात. एक्सरेचा शोध विल्यम रोंटजेन याने १८९५ मध्ये लावला. आता या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठे बदल झाले आहेत. करिअरच्या दृष्टीने विचार केला असता या विषयात पदवी संपादन करता येते. रोगनिदानात अत्यंत महत्वाची भूमिका रेडीओलॉजी या विभागाची असते. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हा विभाग अत्यावश्यक असतो. कॅन्सर आणि ट्युमरच्या उपचारात रेडीओलॉजीस्ट महत्वाचे ठरतात. चला तर मग या क्षेत्रातील करिअरच्या नेमक्या काय संधी उपलब्ध आहेत ते पाहूयात.
पात्रता
रेडीओग्राफीत दोन प्रकार पडतात एक म्हणजे डायग्नोस्टिक रेडीओग्राफी आणि थेराप्युटीक रेडीओग्राफी. ज्यांना बौद्धिकदृष्ट्या आव्हाने स्वीकारायला आवडतात आणि अत्यंत गुंतागुंतीच्या गोष्टी सोडवण्यास जे प्राधान्य देतात अशांना हे क्षेत्र पूरक ठरते. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि शरीरशास्त्र या विषयाशी या शाखेचा जास्त संबंध येतो. या शाखेतील प्रवेशासाठी विद्यार्थी बारावीत गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयातून पन्नास टक्के गुणासहित उत्तीर्ण असावा. बीएसस्सी हा तीन वर्षाचा पदवी कोर्स रेडीओग्राफी आणि रेडीओथेरपी या विषयात करता येतो. पदव्युत्तर पदवीही या विषयात घेता येते.
आवश्यक कौशल्य
- तपशीलवार निरीक्षण क्षमता
- व्यक्तिगतरित्या काम करण्याची क्षमता
- उत्तम संवाद साधण्याची कला
- तणावात काम करण्याची क्षमता
- पेशंटला हाताळण्याचे कौशल्य
- अवघड परिस्थितीतवर नियंत्रण मिळविण्याचे कसब
- तांत्रिक बाबींची माहिती आणि मशिनी हाताळण्याचे कौशल्य
नोकरीच्या संधी
प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर रेडीओग्राफर, रेडीओथेरपीस्ट, म्हणून नोकरी करता येते. एक्सरे आणि ईसीजी टेक्निशियन म्हणून हॉस्पिटल मधील एक्सरे अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी विभागात काम मिळू शकते. तसेच खाजगी नर्सिंग होम, संशोधन संस्था, औषध संशोधन कंपन्या, शासकीय वैद्यकीय संस्थात ही कामाची संधी मिळू शकते.
प्रशिक्षण संस्था
- ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ली.
- क्रिस्टीयन मेडिकल कॉलेज वेल्होर.
- आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे.
- मौलाना आझाद मेडिकल कॉलेज दिल्ली.
- लेडी हार्डीगस मेडिकल कॉलेज दिल्ली.
- मद्रास मेडिकल कॉलेज चेन्नई.
- सेठ जी.एस मेडिकल कॉलेज (केम हॉस्पिटल) मुंबई.
- ग्रांट मेडिकल कॉलेज आणि सर जे.जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई.
- संत गजानन महाराज कॉलेज ऑफ पॅरामेडीकल कोल्हापूर.
- सिम्बोयसीस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स पुणे.
मित्रहो स्वतंत्रपणे काम करण्याची तयारी आणि त्या जोडीला पूरक असा अभ्यास असेल तर या क्षेत्रात यश मिळविणे सोपे जाते. अद्ययावत तंत्रज्ञान अवगत केल्यास उत्तम पगाराच्या संधी सहज उपलब्ध होतात. आरोग्य हा मानवाच्या जीवनातील महत्वाचा भाग आहे आणि दिवसेंदिवस त्याची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. विस्तारत जाणाऱ्या या क्षेत्रात अनेक परदेशी कंपन्या गुंतवणूक करत आहेत. आता तरुणांना उत्तम पगाराचे पॅकेजही मिळू शकते. नोकरीच्या संधी आजूबाजूला असतात पण गरज असते कौशल्याची, नवे ज्ञान आत्मसात करण्याची या सर्व गोष्टी मिळवल्यास करिअरच्या संधी आपल्यासमोर खुल्या होतात.