- योजनेचे स्वरुप व अंमलबजावणी
- प्रति दिन प्रति बालक खर्च
- बालकांवरील उपचाराचा प्रती दिन खर्च रु.160/-
- अंगणवाडी पायाभूत सुविधा खर्च
- प्रशासकीय खर्च
कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत. कुपोषणावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार देणे आणि वेळीच आवश्यक आरोग्य सेवा पुरविणे या दोन्ही महत्वाच्या बाबी आहेत. किंबहुना पूरक पोषण आणि आरोग्य सेवा या दोन्ही एकत्रितपणे आणि समन्वयाने पुरविल्या तरच हा प्रश्न सोडविता येईल.
प्रत्येक कुपोषित बालकावर जाणिवपूर्वक उपाययोजना करणे आवश्यक असते. ही उपाययोजना अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा आरोग्य रुगणालय, स्त्री रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय या विविध पातळीवर करण्याची आवश्यकता असते, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. म्हणून अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करुन सॅम (SAM) उपचार करण्याची योजना प्रस्तावित करण्यात येत आहे. यापूर्वी केंद्र शासनाच्या निधीतून राज्यात ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) योजना आरोग्य विभागाकडून सुरु होती. यासाठी केंद्राकडून मिळणारा निधी बंद झाल्याने सदरची योजना राज्यात बंद करण्यात आली होती. त्याअनुषंगाने आदिवासी क्षेत्रातील लहान बालकांच्या कुपोषणावर प्रभावीपणे मात करण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) योजना सुरु करुन अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता शासन निर्णय नुसार देण्यात आली आहे.
राज्यातील आदिवासी क्षेत्रात ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) योजना राबविण्यासाठी अपेक्षित रु.17.11 कोटी एवढी रक्कम प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) ही योजना 2016-17 गृहित धरुन पुढील 3 व आर्थिक वर्षाकरिता सुरु राहील. तदनंतर या योजनेच्या फलनिष्पत्ती व मूल्यमापनाच्या आधारावर पुढील निर्णय घेण्यात येईल.
योजनेचे स्वरुप व अंमलबजावणी
- ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) योजनेचे संनियंत्रण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे राहतील. एका केंद्रात जास्तीत जास्त 15 सॅम बालकांचा समावेश राहील.
- अंगणवाडीसेविका 6 महिन्यापासून 6 वर्षांपर्यंतच्या बालकांची उंची घेऊन SAM/MAM/ नोंदवही जतन (register maintain) करतील आणि SAM बालके स्थानिक AASHA / ANM मार्फत तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली जातील.
- पुढील 48 तासांच्या आत ANM/ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी ते बालक SAM श्रेणीतील (Category) आहे किंवा नाही याबाबत दाखला (Certificate) देतील व त्यानंतरच SAM बालकाला ग्राम बाल विकास केंद्रात (VCDC) दाखल करण्यात येईल.
- दुसऱ्या दिवशी आशा वर्कर ग्राम बाल विकास केंद्राला (VCDC) भेट देतील व आठवड्यातून एकदा ए.एन.एम./प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ग्राम बाल विकास केंद्राला (VCDC) भेट देतील व सर्व बालकांची तपासणी/चाचणी करतील. ज्या बालकांमध्ये वाढ/सुधारणा दिसणार नाही त्यांच्या बाबतीत पुढील वैद्यकीय उपचार केले जातील.
- अंगणवाडीसेविकांनी बालकांची दरमहा वजन आणि उंची घेवून बालकांची वर्गवारी साधारण, कुपोषित आणि अति कुपोषित (NORMAL, MAM & SAM) अशी करतील.
- बालकास ग्राम बाल विकास केंद्रात (VCDC) दाखल केल्यानंतर सकाळी 08 ते दुपारी 12 तसेच सायंकाळी 4 ते 7 या वेळेत उपचार केले जातील. त्या बालकांना व त्यांच्या पालकांना पुढील 30 दिवस सलगपणे अंगणवाडीत यावे लागेल.
- अंगणवाडीसेविका ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) चालवतील व बालकांना, अंगणवाडीतून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत दिला जाणारा सकाळचा नाश्ता तसेच पूरक पोषण आहार या व्यतिरिक्त 3 वेळा असा दिवसातून पाच वेळा आहार शिजवून उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी अंगणवाडीसेविका यांची राहणार आहे.
- त्याशिवाय या मुलांची दर आठवड्याला वैद्यकीय तपासणी अंगणवाडीस्तरावर केली जाईल.
- अंगणवाडीसेविका/आशा वर्कर दर आठवड्याला SAM बालकांच्या तब्येतीतील तपशिल (Record) जतन करतील.
- SAM बालकांचा सांभाळ करण्यासाठी जी महिला/पालक सोबत येईल तिला/त्याला बुडीत मजुरी दिली जाईल, शिवाय एक वेळचा जेवणाचा खर्चही दिला जाईल.
- प्रत्येक बालकाची ग्राम बाल विकास केंद्रातील (VCDC) भरती जास्तीत जास्त एक महिन्यासाठीच राहील. नंतर त्याला ए.एन.एम./प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केल्यानंतर अंगणवाडी सेविकेमार्फत ग्राम बाल विकास केंद्रामधून मुक्त (discharge) करण्यात येईल. तदनंतर पुढील सहा महिन्यांपर्यंत दर आठवड्याला अंगणवाडीसेविका व आशा वर्कर गृह भेटी देतील व बालकाच्या प्रकृतीवर लक्ष दिले जाईल.
- SAM बालकाच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत संदर्भ रुग्ण (Referral patient) म्हणून दखल घेतली जाईल.
- ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) योजना कार्यान्वित करण्यासाठी अंगणवाडी केंद्राला दरवर्षी नियमित खर्च दिला जाईल. सुशोभिकरण, फलक तक्ता, उंची-वजन तक्ता इ.खरेदी करण्यासाठी तो वापरण्यात येईल.
- ग्राम बाल विकास केंद्रामध्ये (VCDC) जास्त तासासाठी काम करण्याबद्दल अंगणवाडीसेविकेला वाढीव मानधन, मजुरी व इंधन दिले जाईल.
- अंगणवाडीसेविका तसेच आशा वर्करकडून SAM बालकांसोबतच्या पालकांचे समुपदेशन/प्रबोधन करुन बालकांची काळजी घेण्याबाबतच्या, पोषण आहार तसेच आरोग्य व आहार विषयक चुकीच्या सवयींमध्ये सुधारणा/बदल करण्याबाबत अवगत केले जाईल.
- या योजनेंतर्गत सर्व SAM बालके/मातांना/काळजी वाहकास सर्व सुविधा आधार Linked ने दिल्या जातील.
- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत पुरविण्यात येणारी सेवा आणि सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नियमित चाचणी, औषधी उपलब्धता यांची सांगड घालून ग्राम बाल विकास केंद्रामार्फत (VCDC) उपाययोजना केली जाईल.
आदिवासी क्षेत्रासाठी बाल ग्राम विकास केंद्र (VCDC) योजना लागू करण्यासाठी प्रती बालक प्रती दिन खर्चाचा तपशिल व वित्तीय निकष खालीलप्रमाणे राहील.
प्रति दिन प्रति बालक खर्च
- तीन वेळचा आहार रुपये- 20/
- औषधी शक्यतो प्राथमिक आरोग्य केंद्रातून घ्यावे. रु.8/-
- अंगणवाडीसेविका व मदतनीस यांना वाढीव मानधन, मजुरी व इंधन एकत्रित. रु.12/-
- बालकाच्या पालकाच्या बुडीत मजुरीपोटी द्यावयाची रक्कम रु.80/-
- बालकाच्या पालकाला आहार रु.25/-
- मायक्रोन्युट्रीयंट/स्प्रींकल्स/इतर औषधी इ.साठी रु.15/- (एकूण खर्च रुपये 160 )
आदिवासी क्षेत्रासाठी बाल ग्राम विकास केंद्र (VCDC) योजना लागू करण्यासाठी वित्तीय भार खालीलप्रमाणे राहिल. ( प्रती दिन प्रती बालक खर्च )
बालकांवरील उपचाराचा प्रती दिन खर्च रु.160/-
- उपचाराच्या दिवसांची संख्या- 30
- उपचारावरील दर बालक एकूण खर्च 160×30= रु.4800/-
- महाराष्ट्र राज्यातील अंदाजित सॅम बालकांची प्रती वर्ष संख्या (मागील तीन वर्षातील सरासरी आकडेवारी पाहता, जवळजवळ एकूण बालकांच्या 1.3 टक्के बालके सॅम म्हणून नोंदविण्यात आली आहेत.) 33628.
- महिन्याचा बालकांवरील एकूण उपचार खर्च. 33628 x4800= 16.14 कोटी.
अंगणवाडी पायाभूत सुविधा खर्च
- प्रती अंगणवाडी पायाभूत खर्च (दरवर्षी) रु.400/-, आदिवासी क्षेत्रातील एकूण अंगणवाड्यांची संख्या- 16034.
- अंगणवाड्यांच्या पायाभूत सुविधांवरील एकूण खर्च (गरजेप्रमाणे)400/16034 = 0.64 कोटी
प्रशासकीय खर्च
- प्रशासकीय किंमत व खर्च (एकूण किंमतीच्या/खर्चाच्या 2 टक्के) यात योजनेचे स्वायत्त संस्थेकडून Autonomus Agency) मूल्यमापनाचा खर्च तसेच योजनेच्या संनियंत्रणाकरिता आवश्यक Electronically Record Maintainance करीता दरमहा (VCDC) ची माहिती घेणे इ.संबंधी खर्च याचा समावेश आहे. रुपये. 0.33 कोटी. एकूण अंदाजित खर्च अ + ब + क रुपये-17.11 कोटी.
अशाप्रकारे राज्यातील आदिवासी क्षेत्रातील अंगणवाड्यामध्ये ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) योजना सुरु करण्यासाठी आवश्यक रु.17.11 कोटी इतका नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे.