लिंकन, अब्राहम : (१२ फेब्रुवारी १८०९ — १५ एप्रिल १८६५). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष. जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात हॉजनव्हिल (केंटकी) येथे. वडील टॉमस व आई नान्सी हॅन्क्स. हे कुटुंब बॅप्टिस्ट पंथीय होते व या पंथाचा गुलामगिरीला विरोध होता. त्यांना सेरा, अब्राहम व टॉमस ही तीन अपत्ये झाली. त्यांपैकी सेरा लग्नानंतर वारली व टॉमस बालवयातच गेला. अब्राहम नऊ वर्षांचा असतानाच आई नान्सी वारली व टॉमस लिंकन यांनी सेरा बुश जॉन्स्टन या तीन मुलांच्या विधवेबरोबर दुसरे लग्न केले (१८१८). जमिनीच्या कोर्टकचेऱ्याला कंटाळून लिंकन कुटुंबाने इंडियाना राज्यातील पीजन क्रीक या गावी स्थलांतर केले. सावत्र आईच्या प्रेमळ वागणुकीमुळे व प्रोत्साहनाने आपल्याला चांगले वळण लागले, असे अब्राहम लिंकन म्हणत. लेखनवाचन करण्याइतपत शिक्षण त्यांना कसेबसे घेता आले; पण अधिक रीतसर शिक्षणाची संधी लाभली नाही. लहानपणापासून लिंकन यांना वाचनाचे विलक्षण वेड होते. बायबल, इसापच्या गोष्टी, पिलग्रिम्स प्रोग्रेस, रॉबिन्सन क्रूसो, ग्रिमशॉचा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा इतिहास, वीमचे जॉर्ज वॉशिंग्टनचे चरित्र यांसारखे ग्रंथ परिश्रमपूर्वक मिळवून त्यांनी वाचून काढले. गावातील चर्चची साफसफाई, जंगलतोड, गावकऱ्यांची पत्रे लिहिणे, मुले जमवून कथा सांगणे इ. उद्योग ते करीत असत. उत्कृष्ट कथाकथनकार म्हणून त्यांचा लौकिक होता.
याच सुमारास जेम्स केन्ट्री हा व्यापारी पीजन क्रीकमधील आपला शेतमाल मिसिसिपी नदीतून न्यू ऑर्लीअन्सला पाठविणार होता. त्याने अब्राहम लिंकन व अन्य दोन तरुण ह्यांच्याकडे ही कामगिरी सोपविली. या तीन महिन्यांच्या प्रवासात त्यांना अनेक अनुभव आले; विशेषतः गुलामगिरीचे विदारक दर्शन घडले. पुढे लिंकन कुटुंबाने १८३० मध्ये पीजन क्रीक सोडून इलिनॉयला स्थलांतर केले. त्या काळात अब्राहम लिंकन यांनी न्यू सेलमच्या दुकानात, तसेच पोस्टमास्तर, वजनमापाचा सर्वेक्षक आदी कामे केली. याच सुमारास रेड इंडियन पुढारी ब्लॅक हॉक याने संघराज्यांविरुद्ध युद्ध सुरू केले होते (१८३२). त्याच्या प्रतिकारार्थ उभारलेल्या स्वयंसेवक सेनेचे कप्तानपद लिंकन यांना देण्यात आले; परंतु प्रत्यक्ष युद्धात भाग घेण्याचा प्रसंग मात्र उद्भवला नाही. न्यू सेलममधील वास्तव्यात त्यांना वर्तमानपत्रे वाचण्याची संधी लाभली व ते राजकरणाकडे आकृष्ट झाले.
लिंकन यांनी विधानसभेची एक अयशस्वी निवडणूक लढविली (१८३४). इलिनॉयच्या विधानसभेत जाण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. जॉन स्ट्यूअर्ट या व्हिगपक्षीय वकील मित्राच्या सल्लामुळे त्यांनी वकिली व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यांनी १८३६ मध्ये कायद्याची परीक्षा देऊन सनद मिळविली व प्रारंभी स्ट्यूअर्टच्या भागीदारीत व नंतर लोगन स्टिव्हनबरोबर वकिली व्यवसाय केला. १८४४ नंतर विल्यम हर्नडन यांस त्यांनी आपल्या भागीदारीत घेतले. अखेरपर्यंत ते या फर्ममध्ये होते. अमेरिकेतील फिरत्या न्यायालयातून ते वकिली करीत असत. यामधून त्यांना पैसा व प्रतिष्ठा दोन्ही लाभले. पुढे इलिनॉयच्या विधानसभेत व्हिगपक्षाचा सदस्य म्हणून ते चार वेळा निवडून आले (१८३४-४०). विधानसभेत त्यांनी गुलामगिरीविरुद्ध आपले मत मांडले.
लिंकन यांनी मेरी टॉड (१३ डिसेंबर १८१८ — १६ जुलै १८८२) या केंटकीमधील देखण्या, सुशिक्षित, महत्त्वाकांक्षी पण फटकळ मुलीशी प्रारंभी नकार देऊन नंतर विवाह केला (४ नोव्हेंबर १८४२). त्यांना रॉबर्ट टॉड, एडवर्ड बेकर, विल्यम वॉलस व टॉमस असे चार मुलगे झाले. त्यांपैकी रॉबर्ट टॉड हा दीर्घायुषी ठरला. लिंकन यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक वदंता आहेत; परंतु ऐतिहासिक दृष्ट्या त्यात फारसे तथ्य नाही. आपला पती एक थोर नेता व्हावा, याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा मेरी टॉडला होती आणि ती त्या दृष्टीने लिंकन यांना उत्तेजन देत असे. पुढे लिंकन यांच्या अनपेक्षित हत्येनंतर मानसिक धक्का बसून तिला बुद्धीभ्रंश झाला. त्याच अवस्थेत ती मरण पावली.
लिंकन व्हिग पक्षातर्फे इलिनॉयमधून काँग्रेसमध्ये निवडून आले (१८४७-४९). या काळात त्यांनी राष्ट्राध्यक्ष जेम्स पॉकच्या मेक्सिकोबरोबरच्या युद्धास तीव्र विरोध केला आणि झॅकरी टेलरचा अध्यक्ष पदासाठी प्रचार केला. टेलर निवडूनही आला; पण लिंकनना हवे असलेले आयुक्ताचे पद त्याने दिले नाही. तेव्हा त्यांची घोर निराशा झाली. सक्रिय राजकारणातून त्यांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आणि स्प्रिंगफील्डमध्ये वकिलीत लक्ष घातले. एक कुशल वकील, तडफदार वक्ता व राजकारणी म्हणून त्यांचा लौकिक उत्तरेकडील राज्यांत वाढत होता. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे खटलेही जिंकले.
अमेरिकेत गुलामगिरीविषयी १८२० च्या सुमारास एक तडजोड झाली होती. विशिष्ट सीमारेषेच्या उत्तरेस गुलामगिरी उरू नये, हा या तडजोडीचा हेतू होता. १८५४ च्या सुमारास स्टीफन आर्नाल्ड डग्लस या लोकप्रतिनिधीने सीनेटमध्ये कायद्याचा मसुदा सादर केला. संघराज्यांत सामील होऊ पाहणारी कॅनझस व नेब्रॅस्का ही घटकराज्ये करारांतल्या सीमारेषेच्या उत्तरेस होती. तेथे गुलामगिरी चालू द्यावयाची की नाही, हे घटक राज्यांनी ठरवावे, हा मसुद्याचा आशय होता. प्रचाराच्या फेरीत स्पिंगफील्डमध्ये जाहीर सभेत लिंकन व डग्लस यांची चकमक झडली. स्वसमर्थन करणे डग्लसला अशक्य झाले. या सभेमुळे गुलामगिरीला विरोध करणाऱ्या अमेरिकन जनतेला लिंकन हे नेतृत्व मिळाले. गुलामगिरीला विरोध करणाऱ्या लोकांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली (१८५५).
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ड्रेड स्कॉट नावाच्या गुलामाच्या बाबतीत या सुमारास दिलेला निर्णय गुलामगिरीच्या पुरस्कर्त्यांना अनुकूल होता. दक्षिणेकडची घटकराज्ये व उरलेली घटकराज्ये यांच्या दरम्यान धुमसणारा लढा आता तीव्र बनणार, हे लिंकन यांनी ओळखले. १८५८ सालच्या सीनेटच्या निवडणुकीत त्यांनी डग्लसला विरोध केला. १८६० साली राष्ट्राध्यक्षपद पटकाविण्याची डग्लसची इच्छा आहे व त्याच्यासारखा डळमळीत अध्यक्ष राष्ट्रीय ऐक्य अभंग राखू शकणार नाही, असे लिंकन यांना वाटू लागले. डग्लसच्या महत्त्वाकांक्षेला आव्हान म्हणून त्यांनी १८५८ साली निवडणूक लढविली.
लिंकन अमेरिकन नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. १८६० च्या फेब्रुवारीत त्यांनी न्यूयॉर्क येथे व्याख्याने दिली. थोड्या महिन्यांनी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली. लिंकन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले (६ नोंव्हेंबर १८६०). गुलामगिरी हळूहळू नाहीशी होणारच, तिचा प्रसार किंवा निर्मूलन या प्रश्नाबद्दल आग्रह धरून राष्ट्रैक्य बिघडविणे हिताचे नाही, असे लिंकन यांचे मत होते. त्याबरोबर दक्षिणेकडच्या राज्यांपैकी काहींनी संघराज्यातून फुटण्याबद्दलचे ठराव केले. जेम्स ब्यूकॅनन या जुन्या राष्ट्राध्यक्षाने याबद्दलची नापसंती व्यक्त करण्यापलीकडे काही केले नाही. लिंकन यांच्या हाती राष्ट्राध्यक्षाचे अधिकार प्रत्यक्षपणे येण्यापूर्वीच फुटू पाहणाऱ्या राज्यांनी आपले अलग संयुक्त संघराज्य बनवून जेफर्सन डेव्हिसला राष्ट्राध्यक्ष बनविला. सरकारी कारभारात दक्षिणेकडचे अनेक लोक होते. युद्ध होणार हे ओळखून त्यांनी आपल्या पक्षाला सोयीस्कर अशा अनेक तरतुदी केल्या. हे सारे घडत होते व अनेक सहकारी लिंकनना सतावीत होते, तरी त्यांनी धीमेपणाने कारभार चालविला. आपल्या पक्षाने कुरापत काढली असे ठरू नये म्हणून ते जपत होते. १२ एप्रिल १८६१ रोजी दक्षिणेच्या लष्कराने फोर्ट समटरवर तोफा डागल्या. अमेरिकेच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केला आणि अमेरिकेच्या लष्करावर शरणागतीचा प्रसंग लादला. त्यामुळे यादवी युद्ध सुरू झाले.
यादवी युद्ध चार वर्षे चालले. संघराज्यातील तेवीस घटकराज्ये विरुद्ध फुटून निघालेली अकरा राज्ये यांच्या दरम्यानच्या लढाईत सुरुवातीला संघराज्याला पराभव पतकरावे लागले. अनेकवेळा सेनापती बदलण्याचा प्रसंग लिंकन यांच्यावर आला. बंडवाल्या पक्षाला मदत मिळावी म्हणून यूरोपियन राष्ट्रांची संघटना करू पाहणाऱ्या फ्रान्सला स्वस्थ बसावे लागले; कारण ब्रिटनने या उठावाचा पुरस्कार केला नाही. युद्धकाळात अमेरिका व ब्रिटन यांचे संबंध बिघडले नाहीत. याचे एक कारण लिंकन यांचा धीमेपणा. रणांगणाचा रागरंग अमेरिकेच्या दृष्टीने अनुकूल होऊ लागल्यावर १८६२ च्या सप्टेंबरमध्ये लिंकन यांनी एक घोषणा केली, ‘‘नवे वर्ष सुरू होण्याच्या आत फुटून निघालेली घटकराज्ये संघराज्यात सामील झाली नाहीत, तर त्या भागातल्या गुलामांचे स्वातंत्र्य अमेरिका मान्य करील.’’ या घोषणेमुळे यूरोपातले लोकमत अमेरिकेला सर्वस्वी अनुकूल बनले.
लोकशाही कारभार व लिखित संविधान यांमुळे युद्धकार्य नेटाने चालविणाऱ्या लिंकनना त्रास होत होता. त्यांचा स्वभाव धीमा, शांत व खेळकर असल्यामुळे सर्वांना सांभाळून त्यांनी युद्ध चालविले. युद्ध प्रसंगोपात्त आहे, भावी काळातील विकासाला महत्त्व आहे, हे लक्षात ठेवून ते वागत होते. १८६३ मध्ये गेटिझबर्ग गावी झालेल्या संग्रामाचे राष्ट्रीय महत्त्व ओळखून तेथे धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचे स्मारक करण्याचे त्यांनी ठरविले. जिव्हाळ्याने रसरसलेले साधे वक्तृत्व कसे चिरंजीव ठरते, हे लिंकन यांच्या त्या वेळच्या भाषणाने सिद्ध केले.
राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीची १८६४ सालच्या आरंभी वेळ आली. युद्धोत्तरकालीन धोरणाचे भडक नकाशे रंगविणाऱ्या रिपब्लिकन पक्षातल्याच एका गटाने जॉर्ज मॅकलेलन या लष्करी पेशाच्या इसमाचा लिंकन यांचा प्रतिस्पर्धी म्हणून पुकारा केला. मतदान झाले त्या सुमारास युलिसिझ ग्रॅन्ट या सेनापतीने मिळविलेल्या यशाच्या बातम्या धडकल्या. लिंकन पुन्हा निवडून आले. फिरून अधिकार स्वीकार करताना त्यांनी केलेल्या भाषणात त्यांची दूरदृष्टी, माणुसकी, न्याय्यदृष्टी, ईश्वरावरील श्रद्धा इ. गुण स्पष्टपणे दिसतात.
अमेरिकेत विजयाबद्दल आनंदोत्सव चालू होता. फोर्ड थिएटरमध्ये १४ एप्रिल १८६५ रोजी रात्री होणाऱ्या नाट्यप्रयोगाला लिंकन, पत्नी व मित्रपरिवार यांच्यासह उपस्थित होते. त्यावेळी जॉन विल्क्स बूथ या नटाने पाठीमागून त्यांच्या डोक्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
लिंकन यांच्या अल्पकारकिर्दीत अनेक सुधारणांविषयक कायदे संमत झाले. त्यांपैकी टपाल व तारखाते, रेल्वेवाहतूक, किमान जमीन धारणा इत्यादी सुधारणा महत्त्वाच्या होत. रेल्वे अधिनियमांमुळे रेल्वेच्या प्रगतीस उत्तेजन मिळाले आणि सैन्याची वाहतूक सुकर झाली. होमस्टेड ॲक्टमुळे ६५ हेक्टर सार्वजनिक जमीनमर्यादा ठरली. यामुळे धान्योत्पादन वाढले. मॉरील लँड ग्रँड कॉलेज ॲक्टमुळे प्रत्येक घटक राज्यात शेतीविषयक व औद्योगिक महाविद्यालये उघडण्यात आली. अमेरिकेच्या अन्नधान्यविषयक सुबत्तेचा पाया या दोन कायद्यांनी घातला आणि त्याचे श्रेय लिंकन यांनाच द्यावे लागेल. याशिवाय यादवी युद्धाच्या वेळी लिंकन यांनी युद्धाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करून लांब पल्ल्याची हत्यारे आणि वेगवान वाहतुकीची साधने यांच्या साहाय्याने युद्धाची व्याप्ती वाढविली. यामुळे त्यांना आधुनिक युद्धशास्त्राचा जनक म्हणतात.
लोकांचेच, लोकांसाठी, लोकांनी केलेले राज्य म्हणजे लोकशाही, ही त्यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या इतिहासात अजरामर झाली आहे. गुलामगिरीचे निर्मूलन, मानवी स्वातंत्र्याचा पुरस्कार, खंबीर युद्धनेतृत्व आणि युद्धोत्तर काळात देशाची पुनर्रचना करण्याची दूरदृष्टी ह्या संदर्भात लिंकन ह्यांनी केलेल्या विशेष कार्यामुळे अमेरिकेत त्यांना ‘राष्ट्रपिता ’ म्हणून गौरविण्यात येते.
संदर्भ :
- Current, R. N. The Lincoln Nobody Knows, Greenwood, 1980.
- Donald, H. Libery & Union, Boston, 1978.
- Duff, J. J. A Lincoln Prairie Lawyer, New York, 1960.
- Handlin, Oscar; Handlin, Lilian, Abraham Lincoln and the Union, Boston, 1980.
- Mitgang, Herbert, The Fiery Trial : A Life of Lincoln, New York , 1974.
- Neely, M. E. The Abraham Lincoln Encyclopaedia, London, 1981.
- Oates, S. B. Our Fiery Trial, Masachusets, London, 1979.
- Oates, S. B. With Malice Towards None : The Life of Abraham Lincoln, New York, 1977.
- Randall, J. G.; Donald, D. H. The Civil War and Reconstruction, London, 1969.
- अत्रे, प्र. के. अनु. अब्राहम लिंकन एक युगपुरुष, मुंबई, १९६०.
- कुलकर्णी, गोपाळराव , अनु. अब्राहम लिंकन (एमिल ल्यूटव्हिख लिखित), मुंबई, १९५५.
- पानवलकर, प्रभा, अब्राहम लिंकन, पुणे, १९८४.