तंत्रज्ञानाने मानवी जीवन व्यापून टाकले आहे. जगाच्या सीमा ओलांडून माणूस समीप आला आहे. उद्योग, व्यवसाय, मनोरंजन, साहित्य, संस्कृती, आरोग्य, विज्ञान या सर्वच क्षेत्रातील विकासाची उंची वाढली आहे. कालानुरूप सर्वच क्षेत्रांनी कात टाकून जागतिकीकरणाच्या प्रवाहात स्वत:ला पुढे ठेवले आहे. माणसाच्या रोजच्या जगण्यात कलेला अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीमध्ये चौसष्ट कला मानल्या जातात. आणि कलेच्या या प्रांतात आता जाहिरात ही पासष्ठावी कला समाविष्ट झालेली आहे. रोजच्या व्यवहारात वर्तमानपत्र असो टेलीव्हिजन अथवा चित्रपट सर्वच क्षेत्रात जाहिरातीस महत्त्व आहे. आज जरी टी.व्ही, रेडीओ चालू केला तरी जाहिराती पहावयास अथवा ऐकायला मिळतात. अनेक उत्पादने, सौंदर्य प्रसाधने, आदी उपयोगी वस्तूंच्या जाहिरातीचा मारा नेहमी ग्राहकांवरती होत असतो.जाहिराती शिवाय माणसाचा एकही दिवस पूर्ण होऊ शकत नाही. इतक्या जाहिराती त्याच्या दृष्टीस पडत असतात. या क्षेत्रातील करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. अनेक परदेशी कंपन्या जाहिरात क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. अर्थात हे क्षेत्र जग व्यापून टाकणारे ठरत आहे. आपल्या मनात अनेक प्रश्न असतील म्हणजेच जाहिरात क्षेत्र करिअरचा पर्याय होऊ शकते का ? त्यासाठी काय पात्रता असावी ? कोणते गुण असावेत ? कोणत्या संस्था याचे प्रशिक्षण देतात ? या सर्व प्रश्नांचे उत्तर कदाचित आपणांस सापडू शकेल आणि आपल्या मधूनच एखादा हरहुन्नर कलाकार जाहिरात क्षेत्राला मिळेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.
पात्रता
जाहिरात क्षेत्रात सुरुवात करण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक असते. जाहिरात हे व्यापक क्षेत्र आहे. त्याचे वेगवेगळे विभाग पडतात. यातील कामाचे तीन मुख्य भाग म्हणजे
- मीडिया प्लानिंग
- क्लाएंट सर्विसिंग आणि
- क्रिएटिव्ह रिसर्च.
मीडिया प्लानिंग
मीडिया प्लॅनर्स म्हणजेच माध्यम सल्लागार हे जाहिरात संस्थांना योग्य त्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. नियोजित प्रकारे वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके अशी छापील माध्यमे व टि.व्ही, रेडिओ, इंटरनेट अशी इलेक्ट्रॉनिक कामही ते करतात. एखाद्या ब्रॅण्डवर विशेष संशोधन करून ग्राहकांच्या अथवा वाचकांच्या सवयी लक्षात घेऊन ब्रॅण्ड रिकॉल व त्याच्याशी निगडीत मोहिम राबविण्याचे कामही मीडिया प्लॅनरला करावे लागते. थोडक्यात मॅथ्स, स्टॅटिस्टिक्स, एम.बी.ए आणि आकडेमोड करणाऱ्या सॉफ्टवेअर्स चलाखीने हाताळणाऱ्या व्यक्तिंना याबाबतीत नोकरीसाठी प्राधान्य दिले जाते. तसेच वेगवेगळ्या जाहिरात कंपन्याना ते सल्लाही देण्याचे काम करतात.
क्लाएंट सर्विसिंग
ग्राहक (क्लाएंट) हा जाहिरात संस्थेचा दर्शनी चेहरा असतो, संस्थेची प्रतिमा त्यावरून जपली जाते. ग्राहकाकडून त्याबाबतची विस्तृत माहिती घेतल्यानंतर अकाऊंट एक्झिक्युटिव्ह आणि अकाऊंट प्लॅनर हे ब्रॅण्ड पोझिशनिंग कशी करावी याबाबत रूपरेषा आखतात. उत्कृष्ट जाहिरात संस्था एम.बी.ए तर इतर जाहिरात संस्था डिग्री/डिप्लोमा, मार्केटिंग आणि मास कम्युनिकेशन प्रशिक्षितांना नोकरीसाठी प्राधान्यक्रम देतात. सर्वात जास्त कार्य या विभागाकडून केले जाते.
अकाऊंट्स विभाग
जाहिरात सेवा देण्यासाठी सेवा पुरविणारी ही शाखा आहे. ग्राहकाला देण्यात येणारी सेवा, त्याबद्दलची रणनिती, बजेट, त्यासाठी योग्य त्या प्रकारचे माध्यमे निवडणे व याबाबतची चर्चा सतत ग्राहक व आपल्या क्रिएटिव्ह टिमशी करत राहणे व शक्य असल्यास मीडिया प्लानिंग डिपार्टमेन्टशी संपर्कात राहणे, मार्केट रिसर्च अभ्यासणे अशी कामे याअंतर्गत करावी लागतात. सततच्या चर्चात्मक मुद्यांना मूर्त स्वरूप देऊन ब्रॅण्ड आणि त्याची मार्केटमधील जागा ठरविण्याचे काम यातून केले जाते.
क्रिएटिव्ह रिसर्च
जाहिरात संस्थेत क्रिएटिव्ह विभागाचे काम शब्दांची योग्य निवड, त्यांची जुळवाजुळव, अचूक विजूअल्स (दृष्यपरिणाम) साधणे जेणेकरून त्या माध्यमातून दर्शकाचे लक्ष वेधून घेऊन त्याचे ग्राहकात रूपांतर होईल व अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करून खप वाढविला जाईल अशा प्रकारचे असते. क्रिएटीव्ह विभागाचेही कॉपी आणि क्रिएटिव्ह असे दोन भाग पडतात. कॉपी विभागात शब्दांतून ब्रॅण्डचा संदेश पोहोचवला जाईल अशा शब्दांची रचना करणे, जिंगल्स अथवा डायलॉग रचणे अशी कामे केली जातात. तसेच क्रिएटिव्ह विभागात नवनवीन गोष्टींवर तसेच कल्पनेवर काम केले जाते.
मार्केट रिसर्च
जाहिरात संस्थेद्वारे राबविल्या जाणाऱ्या विशिष्ट ब्रॅण्डवरील जाहिरात मोहिमेचे आकडेवारीतील परिणाम व त्याचे मोजमाप करण्याचे काम मार्केट रिसर्चमध्ये करावे लागते. यावर आधारित माहितीनुसार मीडिया प्लॅनर ब्रॅण्डची मार्केटमधील जागा ठरविण्यासाठी अचूक निर्णय प्रक्रिया ठरवतो. यात करिअर करण्यासाठी स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग, सॅंपलिंग टेक्निक्स आणि सायकोग्राफिक्स या क्षेत्रात यासाठी प्राविण्य असावे लागते.
आर्ट विभाग
ब्रॅण्डचा “लूक आणि फिल” कसा असावा हे ठरवण्य़ाचे काम आर्ट विभाग करतो. यासाठी स्केचेस काढणे व त्यातील हेडिंग, विज्यूअल्स, पिक्चर्स, लोगो हे एका ठराविक व मर्यादित जागेत बसवण्याचे काम यात येते. कोणते फॉन्ट्स निवडावेत, फोटोग्राफिक ट्रिटमेन्ट कशी असावी हे काम प्रामुख्याने आर्ट डिपार्टमेंटला करावे लागते. एफ.बी.ए, अप्लाईड आर्ट अथवा ग्राफिक डिझाईनमधील डिग्री व याशिवाय कंप्यूटर ग्राफिक्स, मल्टीमिडियातील ज्ञान या क्षेत्रात काम करण्यासाठी महत्त्वाचे आहे.
प्रशिक्षण संस्था
अजूनही जाहिरात क्षेत्रात करिअर करण्यासाठी फार कमी महाविद्यालये पदव्युत्तर शिक्षण देतात. मीडिया प्लॅनिंग आणि क्लाएंट सर्विसिंग हे विषय मास कम्युनिकेशनची पदवी घेतेवेळी पदवी शिक्षणात समाविष्ट असतात.
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, अरूणा असफ अली मार्ग, जे.एन.यु, न्यू कॅम्पस, नवी दिल्ली. www.iimc.nic.in
- एम.एस युनिवर्सिटी ऑफ बडोदा, फतेहगंज, वडोदरा, गुजरात.
- मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, शेला, अहमदाबाद, गुजरात.
- नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडिज, व्ही.एल मेहता रोड, विले-पार्ले (वेस्ट), मुंबई. www.nmims.edu
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हर्टायझिंग, दीन दयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली. www.nia.org
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, पल्डी, अहमदाबाद, गुजरात. www.nid.edu
- सर जे.जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट, डॉ. डि.एन रोड, मुंबई.
- युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, कॉलेज ऑफ आर्ट, टिळक मार्ग, नवी दिल्ली.
जाहिरात क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. परदेशातील ग्राहक मिळवायचे असतील तर संवाद कौशल्य उत्तम असणे क्रमप्राप्त आहे. या क्षेत्रात काम करताना आकर्षक रुपात मानधन मिळू शकते. १९९२ साली भारतात सुरुवात झालेला हा उद्योग आजवर करोडो रुपयांची वार्षिक उलाढाल करतो आहे. भारत ही जाहिरात कंपन्यांसाठी सतत विस्तारणारी मोठी बाजारपेठ आहे. कष्टाची तयारी तसेच सतत नाविन्यपूर्ण काहीतरी निर्माण करण्याची जिज्ञासा असणाऱ्यासाठी हे क्षेत्र खुणावणारे आहे. अथक परीश्रमातून आपण कलेच्या क्षेत्रात नाव कमावू शकतो गरज आहे ती वेगळ्या वाटा धुंडाळण्याची.