पॅरोल म्हणजे कैद्याची विशिष्ट मुदतीपुरती केलेली सशर्त मुक्तता. पॅरोल या इंग्रजी संज्ञेचा अर्थ स्थूलमानाने वचन, वाग्विश्वास असा होतो. पॅरोल दॉनर(parole d’Honneur)या फ्रेंच शब्दापासून तो इंग्रजीत रूढ झाला. तोंडी संविदा, शिक्कामोर्तब न झालेली संविदा, तोंडी दिलेली साक्ष इ. अर्थांनीही ही संज्ञा वापरली जाते. सैनिकी व्यवस्थेत पॅरोलचा अर्थ परवलीचा शब्द असाही होतो. ‘पळून जाण्याचा प्रयत्न करणार नाही व पकडणाऱ्याविरुद्ध शस्त्र उचलणार नाही’ अशा अर्थाचे युद्धबंद्यांनी दिलेले आश्वासन म्हणजेही पॅरोलच. आंतरराष्ट्रीय करारान्वये १९०७ साली युद्धकैद्यांना पॅरोलवर सोडण्यासंबंधी तयार केलेले नियम १९४० साली अमेरिकेतील एका लष्करी नियतकालिकाने प्रकाशित केले. १९५५ साली अमेरिकेने नवीन आचारसंहिता तयार करून अमेरिकेच्या सैनिकास शत्रूकडून पॅरोल घेण्यास मनाई केली. शिक्षाकाल संपण्यापूर्वी सिद्धदोषीस सशर्त मुक्त करणे, असा फौजदारी कायद्यात पॅरोलचा अर्थ होतो [⟶ परिवीक्षा]. तसेच क्षमा किंवा माफी याहून पॅरोलची कल्पना वेगळी आहे. गुन्हेगारावरील आरोप सिद्ध होऊन तो कारागृहात पाठविण्याऐवजी न्यायाधीश त्यास काही कालीवधीकरिता परिवीक्षा संमत करून सुधारण्याची संधी देऊ शकतो. गुन्हेगारास संपूर्ण क्षमा करून मुक्त करण्याची शासनाची कृती क्षमेत मोडते. १८४० मध्ये प्रथम अलेक्झांडर मॅकोनोखीने पॅरोल पद्धतीस पूर्व ऑस्ट्रेलियातील नॉरफॉक बेटावरील ब्रिटिश वसाहतीमध्ये सुरुवात केली. त्यानंतर इतर देशांतही निरनिराळ्या प्रकारचे पॅरोल व सशर्त मुक्ततेचे प्रकार रूढ झाले आहेत. इ. स. १९४६ मध्ये नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशींनुसार कैदी गंभीर आजारी असेल, त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा वा त्याच्या जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल, तर कैद्याला पॅरोलवर सोडता येऊ शकते. इतर काही महत्वाच्या कारणांनी कैद्यास पॅरोलवर काही काळ मुक्त करता येते. पॅरोलकरिता खोटे कारण सांगणाऱ्याला अथवा सवलतीचा गैरफायदा घेणाऱ्याला वा पॅरोलच्या अटींचा भंग करणाऱ्याला शिक्षेची तरतूद केली आहे. स्थानिक महसूल व पोलिस अधिकाऱ्यांतर्फे अर्जांत दाखविलेल्या कारणांची चौकशी करण्यात येते. एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा असणाऱ्यास संचित रजा घेण्याचाही अधिकार आहे. कैद्याला फक्त शिक्षा देऊन न थांबता त्याच्यात सुधारणा करून त्याला पुन्हा समाजात मिसळण्याची संधी देणे, हा पॅरोल पद्धतीमागील एक मुख्य हेतू आहे. तुरुंगात असताना कैद्याच्या वर्तनात झालेली सुधारणा व त्याची मानसिक स्थिती लक्षात घेऊन त्याला पॅरोल दिला जातो. त्याचप्रमाणे काही देशांत पॅरोल देताना कैद्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप व त्याच्या शिक्षेचा कालावधी लक्षात घेतला जातो. अशा देशांत खून, दरोडा, व्यपहरण (किड्-नॅपिंग) अशा गुन्ह्यातील कैद्यांना पॅरोल देत नाहीत. पॅरोल दिलेल्या कैद्यावर लक्ष ठेवण्यात येते; तसेच पोलिसांकडून नियतकालिक तपासणी करणे, खास प्रशिक्षित अधिकाऱ्यांकरवी पॅरोलवर सोडण्यात आलेल्या कैद्याची चौकशी करणे, या किंवा यांसारख्या पद्धतींचा अवलंब करण्यात येतो. तथापि पॅरोलवर सोडण्यात आलेल्या कैद्याने नियुक्त अधिकाऱ्याकडे नियमित हजेरी देणे, ही पद्धत सामान्यतः सर्वत्र प्रचलित आहे. कैद्याने जर पॅरोलच्या शर्तींचा भंग केला, तर त्याचा पॅरोल रद्द होऊ शकतो. भारतीय पुरावा अधिनियमाप्रमाणे पॅरोल-पुरावा याचा अर्थ तोंडी साक्ष किंवा न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांत अंतर्भूत नसलेला, परंतु त्या कागदपत्रांशी संबंधित असा बाह्य पुरावा, असाही होतो.
पॅरोल
Telegram Group
Join Now