(? नोव्हेंबर ७१३–३ जून ७९५). एक अरबी धर्मपंडित, प्रसिद्ध इस्लामीधर्मशास्त्रकार व सुन्नी पंथाच्या मालिकी शाखेचा संस्थापक. याचे पूर्ण नाव अबु अब्दुल्लाह मालिक इब्न अनास अल् हारिथ अल् अस्वाही असे होते. येमेनमधील शुद्ध अरबी वंशाच्या एका जमातीत त्याचा जन्म झाला. मदीना शहरामध्येच त्याचा जन्म व मृत्यू झाला. तथापि त्याच्या जन्ममृत्यूच्या निश्चित तारखांबाबत एकवाक्यता आढळत नाही. त्याची सर्व हयात प्राय: मदीनेमध्येच गेली. मुहंमद पैगंबरांची संकटे आणि साहसे यांमध्ये सहभागी होण्याचे सद्भाग्य ज्याला मिळाले होते, असा त्यांचा उर्वरित सहकारी सिहल इब्नु साद याच्याकडून मालिक इमाम यास इस्लाम धर्माची तत्त्वे व परंपरा यांविषयीचे बाळकडू मिळाले. इतक्या उच्च पातळीवरूनच ज्ञानार्जनाची सुरुवात झाल्यामुळे मालिकने लहान वयातच ⇨कुराण, ⇨हदीस (प्राचीन धर्मपरंपरा), सुन्ना (प्रेषितनिर्णय व प्रेषितवर्तन), इज्मा (धर्मपंडितांमधील मतैक्य), कियास (सतर्क युक्तिवाद) इ. इस्लाम धर्मांच्या उगमस्त्रोतांचा गाढ अभ्यास केला व एक व्यासंगी या नात्याने प्रचंड कीर्ती मिळवली. त्याने अनेक वर्षे मदीनेमध्ये मुफ्ती व मुसलमानी धर्माचा शिक्षिक व गुरू या नात्याने काम केले. मालिक हा परंपरावादी असल्यामुळे कुराण व हदीसवर त्याचा विशेष भर होता. परंतु एक धर्मगुरू या नात्याने त्याने इज्मा व कियास यांचासुद्धा वापर केला. त्याशिवाय त्याने इस्तिलाह (सार्वजनिक हितानुवर्ति तत्त्व) व इस्तिदलाल (कियासपेक्षा थोडा वेगळा असणारा विधितर्कवाद व अनुमान) या तत्त्वांचा पुरस्कार व अवलंब केला. मात्र उत्तरायुष्यामध्ये तो इतका श्रद्धाळू बनला, की मृत्युशय्येवर असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये काही प्रसंगी सतर्क युक्तिवाद व केवळ मानवी न्यायबुद्धी यांचा वापर करून न्यायनिर्णय दिले, याची आठवण होऊन त्याला रडू कोसळले. मालिकने लिहिलेला प्रसिद्ध धर्मग्रंथ म्हणजे किताब अल्-मुवत्ता वा मुवत्ता (मळवाट) होय. ग्रंथाच्या शीर्षकाला अनुरूप अशी प्रामुख्याने कुराणा तील वचने व प्राचीन परंपरा यांवर सदरहू ग्रंथामध्ये लेखकाने भर दिला असला, तरी त्याने त्यात धर्माच्या इतर उगमस्त्रोतांविषयीसुद्धा ऊहापोह केलेला आढळतो. मुवत्ताचे अनेक पाठभेद मालिकच्या शिष्यवर्गामध्ये उपलब्ध आहेत. त्यांपैकी यह्या अल् मसमूदी (मृ. ८४८) तसेच अबू हनीफाचा शिष्य मुहम्मद अल् शैबानी (सु. ७४९–८०५) यांनी काढलेल्या आवृत्या विशेष नावारूपाला आलेल्या आहेत. जाज्वल्य धर्मनिष्ठेमुळे मालिकने राजनिष्ठेवर फारसा भर दिला नाही. किंबहुना खलीफाशी राजनिष्ठा ठेवण्याविषयी घेतल्या जाणाऱ्या शपथेच्या बंधनकारकतेविषयी संशय व्यक्त केल्यामुळे त्याला फटके खावे लागले. अर्थात यामुळे त्याची ख्याती कमी न होता वाढली. मालिकी पंथाचे अनुयायी प्रामुख्याने आफ्रिकेमधील ईजिप्त, मोरोक्को, ट्युनिशिया, अल्जिरिया, लिबिया इ. देशांत आहेत. भारतामध्ये मालिकी पंथाच्या अनुयायांचा अभावच आहे. मालिकच्या शिष्यांमध्ये अल् कैरवान (मृत्यू सु. १००२) व खलील (मृत्यू सु. १३८३) हे दोघे त्यांच्या स्वतःच्या टीकाग्रंथांमुळे विशेष प्रसिद्ध आहेत.
मालिक, इब्न अनास इमाम
Telegram Group
Join Now