“विवाह: Vivah”
पतीद्वारे फसवणूक होत असल्याची लक्षणे
तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत आहे की नाही हे जोखण्याचा सामान्यपणे वापरला जाणारा मार्ग म्हणजे त्याच्या दिनक्रमात व वर्तनात काही बदल आहेत का, हे बघणे. तुमच्या जोडीदाराचे प्रेमप्रकरण सुरू असेल तर तो नक्कीच वेगळा वागेल. याचे कारण म्हणजे, आपण सगळे एका ठराविक दिनक्रमात रमलेले असतो आणि आपल्या आयुष्यात काही बदल झाला, तर साहजिकच आपला द्नक्रम बदलतो व आपण गोष्टी वेगळ्या पद्धतीने करू लागतो. तुमच्या पतीच्या दिनक्रमातील बदलांमधून त्याचे कोणासोबत प्रेमप्रकरण सुरू आहे का, याबद्दल धागेदोरे सापडतील. अर्थात हे अनेकदा नजरेतून सुटूही शकते.
खालीलपैकी काही तुमच्या लक्षात आले आहे का?
– तो तुमच्यावर किंवा मुलांवर पटकन चिडू लागला आहे का?
– पूर्वी तो तुमच्यासोबत आनंदाने घरी थांबत होता पण आता त्याला बाहेर राहणे अधिक आवडू लागले आहे का?
– तो रात्री उशिरापर्यंत जागा राहत आहे का? याचा अर्थ तुम्ही त्याच्या आधी झोपी जाल आणि मग तो ‘तिला’ फोन किंवा एसएमएस करू शकेल या हिशेबाने तो उशिरापर्यंत जागा राहत असेल.
– त्याचे सेलफोनबाबतचे वर्तन संशयास्पद झाले आहे का? म्हणजे तो त्याच्या सेलफोनबद्दल अधिक पझेसिव झाला आहे का? तुम्ही आसपास असताना तो सेलफोन स्वत:च्या जवळच ठेवतो का? फसवणूक करणारे पुरुष दुसऱ्या स्त्रीशी संपर्क साधण्यासाठी सेलफोनचा वापर करतात. ते अगदीच मूर्ख असतील, तरच घरातील फोननंबरचा वापर करतील. तो कॉल लॉग्ज आणि मेसेजेस सारखे इरेझ करत असतो का, याकडे लक्ष ठेवा.
– तुम्ही आसपास असताना फोन घ्यावा लागला तर तो सांकेतिक भाषेत बोलतो का? तुमच्या उपस्थितीत तो अवघडून जातो का?
– त्याचे पैशाचे पाकीट, पॉकेट कॅलेंडर किंवा ब्रिफकेसबद्दल तो अधिक पझेसिव झाला आहे का?
– तो घरात तुम्हाला टाळू लागला आहे का? तो तुमच्या नजरेला नजर देऊन बोलत नाही का?
– तो अधिक वेळ आणि वारंवार चालण्यासाठी बाहेर जात आहे का?
– वाद सुरू झाल्यानंतर तो हिरीरीने वाद न घालता, पडती भूमिका घेत आहे का? पुरुष जेव्हा फसवत असतात तेव्हा त्यांना वाद घालणे आवडत नाही, वाद टाळण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात.
– त्याला पूर्वी ज्या गोष्टीबद्दल खूप प्रेम होते, उदाहरणार्थ एखादा खेळ किंवा छंद, त्या गोष्टीतील त्याचा रस कमी झाला आहे का?
– गेल्या अनेक वर्षांत न भेटलेल्या किंवा तुम्ही पूर्वी नावही ऐकलेले नाही अशा मित्रांना भेटण्याबद्दल तो अचानक बोलू लागला आहे का?
– त्याने कपडे इतस्तत: टाकणे थांबवले आहे किंवा तो स्वत:चे कपडे स्वत: धुऊ लागला आहे का? यामागील कारण या कपड्यांवरील वास किंवा खुणा दूर करणे हे असू शकते.
– तो तुम्हाला एकटीने आईवडिलांना किंवा मित्रमंडळींना भेटण्यास अचानक प्रोत्साहन देऊ लागला आहे का?
– तो पूर्वीच्या तुलनेत अधिक वारंवार चर्चासत्रे/अधिकृत/बिझनेस ट्रिप्सना उपस्थित राहू लागला आहे का किंवा दौऱ्यांवर जाऊ लागला आहे का?
– तो ऑफिसमध्ये करायला विसरलेल्या गोष्टी अचानक आठवून कधीही, कोणत्याही वेळी घराबाहेर जातो का?
– तो साखरपुड्याची अंगठी घालायला विसरू लागला आहे का?
– तुमच्या किंवा मुलांच्या वस्तू बाइक/कारमध्ये राहू नयेत यासाठी तो दक्ष राहू लागला आहे का?
– तो कामासाठी रात्रभर बाहेर जावे लागते म्हणून कपड्याची बॅग ऑफिसमध्ये किंवा कारमध्ये ठेवू लागला आहे का?
पत्नीची फसवणूक करणाऱ्या पतीमध्ये ही लक्षणे साधारणपणे लक्षात येतात. ही लक्षणे एकेकटी बघितली तर अनेकदा त्यांच्यात काहीच अर्थ नसतो पण अनेक लक्षणे एका ठराविक नमुन्यात दिसू लागली तर त्यातील इशारा तुम्ही ओळखला पाहिजे आणि कुठे पाणी मुरत आहे हे तपासले पाहिजे. तुमचे लग्न वाचवण्यासाठी तुम्हीच काही पावले उचलणे आवश्यक आहे.
मद्यपी पती
मद्यपानाचे व्यसन ही सर्वत्र आढळणारी समस्या आहे. दारू पिऊन घरी येणाऱ्या व बायका-मुलांना मारझोड करून सगळ्यांची आयुष्ये बिघडवून टाकणाऱ्या नवऱ्यांना शतकानुशतके असंख्य स्त्रिया तोंड देत आहेत. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे बहुतेक स्त्रिया याला विरोध करण्याऐवजी भिऊन आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेतात. कदाचित त्यांच्या अशा काही समस्या असतात किंवा समस्यांशी जुळवून घेण्याचे मार्ग असतात पण नवरा मद्यपान करून तुमचे शोषण करत असेल, तर हे प्रकार थांबवण्याची वेळ आलेली आहे. दारूच्या या व्यसनाविरोधात धैर्याने लढा द्या आणि स्वत:चे व कुटुंबाचे रक्षण करा.
मद्यपी नवऱ्याला मदत करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना:
– तुमची प्रवृत्ती योग्य असावी. तुम्ही नवऱ्याचा तिरस्कार करता, तुम्हाला त्याची काळजी नाही किंवा त्याच्याबद्दल आदर नाही हे त्याला समजले तर त्याला मदत करणे कठीण होऊन बसते.
– मद्यपानाचे व्यसन म्हणजे एखाद्या औषधाचे व्यसन लागण्यासारखे आहे. ते सोडवण्यासाठी केवळ इच्छाशक्ती पुरेशी नाही, तर योग्य ते उपचार आवश्यक असतात. एखाद्या पुनर्वसन केंद्राची किंवा समुपदेशकाची मदत घ्या.
– तुमचा नवरा आजारी आहे असे समजून त्याच्याशी वागा व संभाव्य उपाय देण्याचा प्रयत्न करा. मद्यपींना संधी दिल्याशिवाय ते त्यातून बाहेर येत नाहीत.
– तुमच्या मद्यपी नवऱ्याला त्याच्या कृत्यांसाठी जबाबदार करा. तुम्हीच त्याला काही सबबी पुरवल्या किंवा पाठीशी घातले तर तो पुन्हापुन्हा मद्याच्या आहारी जाणार हे नक्की.
– दारू सोडवण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा वापर करा. मद्याचे व्यसन हा जटील आजार आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी अनेकांची गरज भासते. नवऱ्याच्या जवळच्या मित्रांना (दारूचे व्यसन नसलेल्या) जवळ करा आणि व्यसन सोडवण्यासाठी नवऱ्याचे मन वळवण्याची विनंती त्यांना करा. बरेच पुरुष बायकोच्या विनंत्या अव्हेरतात पण मित्रांचा सल्ला मान्य करतात.
– कधीच आशा सोडू नका; नाउमेद होऊ नका. एकदा केलेल्या प्रयत्नांत तुमच्या नवऱ्याची दारू सुटलेली नसली, तरी त्याची बिजे नक्कीच पेरली गेली आहेत. याची फळे भविष्यकाळात मिळतील हे नक्की.
– मद्याचे व्यसन हा संपूर्ण कुटुंबाला होणारा आजार आहे; सर्व कुटुंबियांवर याचा परिणाम होतो आणि उपचारही सर्वांवर केले जाणे आवश्यक असते.
– मद्यपी नवऱ्याला कधीही एकटे सोडू नका, कायम त्याच्यावर लक्ष ठेवा. सगळ्या पार्ट्या आणि गॅदरिंग्जना नवऱ्यासोबत जा आणि त्याच्यावर दक्षतेने नजर ठेवा. त्याच्यावर लक्ष ठेवणारे कोणी असेल तर तो सहसा मर्यादा ओलांडणार नाही.
– ज्या पार्ट्यांमध्ये तुमच्या नवऱ्याला त्याचे मित्र मद्यपानाचा आग्रह करतात, अशा पार्ट्या टाळा.
– तुमच्या नवऱ्याचा पगार थेट तुमच्या बँकखात्यात जमा होईल अशी सोय करून घ्या. म्हणजे त्याच्याजवळ दारू पिण्यासाठी जास्तीचा पैसाच राहणार नाही.
– समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. व्यवसाचे मूळ कारण समजून घेण्यासाठी त्याच्याशी आतून संवाद साधण्याचा प्रयत्न करा.
– एकदा कारणे सापडली की, त्याच्याशी निगडित समस्या सोडवण्यासाठी उपाय व मार्ग निश्चित करता येतात.