स्वच्छतेसाठी कुठल्याही मोठ्या आर्थिक मदतीची गरज नाही. गरज आहे ती केवळ मानसिकता बदलण्याची. याची प्रचिती येते ती पालघर जिल्ह्यातील नांदगाव शेजारी असलेल्या राजेवाडी या पाड्यावर. आपल्यासह अख्ख्या पाड्याच्या सुरक्षित आरोग्यासाठी सुशिलाबाई खुरकुटे यांनी जिल्हा परिषदेच्या मदतीने केलेलं कार्य एक आदर्श ठरलं आहे. सात महिन्यांची गर्भवती असलेल्या सुशिलाबाईंनी आपल्या घरासाठी शौचालय बांधण्याबरोबरच आपल्या पाड्यातील अन्य लोकांना त्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्या या कामाची दखल घेवून जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांची पालघर जिल्हा स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. महिलादिनी, 8 मार्चला त्यांचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शक्ती अॅवॉर्ड देऊन सन्मान केला जाणार आहे.
पालघर जिल्हा हा तसा आदिवासी जिल्हा. यातील जव्हार तालुक्यातील राजेवाडी या कमी लोकवस्ती असलेल्या पाड्यावर सुशीलाबाईंच वास्तव्य. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची… कुडाच घर… रोजंदारीच्या कामावर चालणारा प्रपंच… घरात दोन लहान मुलं, म्हातारी आजी… आणि स्वतः सात महिन्याची गर्भवती. जगात काय घडतय याचा गंध नसलेली. सगळ्या पाड्याची हीच परिस्थिती. आरोग्य, स्वच्छता याबाबत उदासिन असलेली ही मंडळी.
घरातील मंडळीच नव्हे तर पाड्यावरचे सर्वच जण शौचास बाहेर जात होती. आरोग्याचा गंभीर प्रश्न तर होताच पण जंगलाचा भाग असल्याने धोकेही भरपूर होते. स्वच्छ व सुंदर पालघरचा नारा देत जिल्हा परिषदेने मार्च २०१७ पर्यंत पालघर जिल्हा निर्मल जिल्हा करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी आणि त्यांची टीम यांनी कंबर कसली आहे. गाव, पाडा वस्ती सगळीकडे स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती सुरू होती.
या प्रबोधनातून सुशिलाबाईंना आपल्या मुलांच्या, कुटुंबाच्या आरोग्यासाठी व सुरक्षिततेसाठी शौचालय आवश्यक आहे, याची जाणीव झाली. त्यांनी आपल्यासाठी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. आर्थिक परिस्थिती बेताची, नवरा कामाला गेला नाही तर रोजंदारी मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा न करता आपल्या कामाला सुरुवात केली. घराच्या बाजूची जागा अतिशय खडकाळ होती. या जागेवर खड्डा खोदण्यास त्यांनी सुरुवात केली. सलग तीन दिवस त्यांचे हे काम सातत्याने सुरु होते. ही बाब युनिसेफचे सल्लागार जयंत देशपांडे यांनी गावचे ग्रामसेवक व सरपंच यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी ही गोष्ट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या कानावर घातली. श्रीमती चौधरी यांनीही तातडीने सुशिलाबाईंना भेट देवून त्यांच्या कामाची दखल घेतली.
रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सुशिलाबाईंना सर्वतोपरी सहकार्य करुन त्यांचे शौचालय उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. अवघ्या तीन दिवसात घराशेजारी शौचालय उभं राहीलं. एवढ्यावर सुशिलाबाई थांबल्या नाही. आपल्या आजूबाजूच्या घरातील लोकांना त्यांनी यासाठी प्रवृत्त केले आहे. तसेच इतरांनाही प्रोत्साहित करण्याचे काम त्या करीत आहेत. नांदगावचे ग्रामसेवक डी.सी. पाटील यांनी त्यांना मदत केली. आज या पाड्यावर पंधराहून अधिक शौचालय आहेत. सुशिलाबाईंनी घेतलेला हा पुढाकार सर्वांसाठी आदर्श ठरला आहे. केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता सचिव परमेश्वर अय्यर यांनी त्यांचे ट्विट करून कौतुक केले आहे. तिच्या या जिद्दीला सलाम…
Telegram Group
Join Now